'फेसबुक' या नावाचं काही अस्तित्वात नसल्याच्या काळातल्या एका प्रसंगापासून चित्रपटाला सुरुवात होते. या प्रसंगानंतर फेसबुक (तेव्हाचं फेसमॅश) जन्म घेणार आहे अशी पुसटशीही शंका येणार नाही असा हा प्रसंग. मार्क झकरबर्ग त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर एका रेस्टॉरंटमध्ये बसलेला असतो. तिथे काही कारणावरून त्यांच्यात खटका उडतो, शब्दाने शब्द वाढत जातो.. खरं तर साधा भांडणाचा प्रसंग पण या पहिल्याच प्रसंगात आपल्याला कळतं की स्क्रीनवर जो पोरगेलासा मुलगा दिसतो आहे तो साधासुधा नाहीये. तो प्रचंड बुद्धिमान आहे, अतिशय हुशार, सुपीक डोक्याचा आहे. सहज बोलता बोलता अनेक फॅक्ट्स तो लीलया मांडतो. पुढे चित्रपटात अनेक प्रसंग आहेत, प्रचंड तिखट, भेदक, हुशार संवाद आहेत ज्यातून मार्कच्या तर्कशुद्ध पण यांत्रिकतेने विचार करण्याच्या पद्धतीची आपल्याला ओळख होत जाते. कित्येकदा या यांत्रिकतेचा अतिरेक होतो. पण मार्कला त्यात काहीही वावगं वाटत नाही. त्याच्यासाठी ते फारच सरळ-सोपं-स्वाभाविक असतं. नाहीतर गर्लफ्रेंडशी भांडताना (वाचा समजूत काढताना) चायनाबद्दलच्या फॅक्ट्स कोण सांगत बसेल बरं??
भांडणानंतर दोघेही रागाने निघून जातात. मार्क आपल्या होस्टेलरूममध्ये येऊन लॅपटॉप सुरु करतो. नायिकेने केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून आपला मित्र एदुआर्दोच्या मदतीने एक प्रोग्राम लिहितो ज्यात कॉलेजमधल्या मुलींची एकमेकींशी आणि प्राण्यांशी अपमानास्पद पद्धतीने तुलना केलेली असते. प्रोग्राम लिहितो, बीअर रिचवतो आणि एकीकडे त्या सगळ्याचं लाईव्ह ब्लॉगिंग करतो. ब्लॉगमध्येही आपल्या मैत्रिणीचा खूप वाईट पद्धतीने अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यानंतर नेटवर्क हॅक करून तो प्रोग्राम कॉलेजमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पाठवला जातो. मुली संतापतात, चिडतात, मैत्रिणीची बदनामी होते. मार्कचा हेतू साध्य होतो. या दोन प्रसंगांनंतर फेसबुक (फेसमॅश) सुरु झालेलं असतं. पण हे प्रसंग प्रत्यक्ष घडत असतानाच्या दरम्यान दाखवलेल्या छोट्या छोट्या घटना आणि संवाद हे प्रचंड फास्ट आणि कल्पक आहेत. मार्कची असामान्य हुशारी, तो इतरांच्या किती पुढचा विचार करू शकतो, बघता बघता समोरच्याला कसा शब्दात पकडू शकतो हे पाहताना थक्क व्हायला होतं. कदाचित हे सगळं बिंबवण्यासाठीच या चित्रपटातले संवाद हे अतिशय अतिशय फास्ट आहेत. कित्येकदा गुंतागुंतीचे वाटण्याएवढे कल्पक आहेत.. ही गुंतागुंत मार्क आपल्या साध्या साध्या संवादांतून इतक्या अचूकपणे व्यक्त करतो की कित्येकदा त्याच्यावर चालू असलेल्या खटल्यादरम्यान प्रतिपक्षाचे वकील एवढे मेटाकुटीला येतात की मार्कच्या वकिलाला विनंती करून मार्कला नीट उत्तरं द्यायला सांगावीत अशी विनंती करण्याची वेळ त्यांच्यावर येते. मात्र आपल्या वकिलाकडून परवानगी मिळाल्यानंतर मार्क त्याच प्रश्नांची एवढ्या सरळपणे उत्तरं देतो की त्याच्या हुशारीला मनोमन पुनःपुन्हा सलाम केल्याशिवाय आपल्याला राहवत नाही!!
पण तो अगदीच सोवळा आहे असं मात्र नाही. प्रत्यक्षातल्याची कल्पना नाही पण निदान चित्रपटातला मार्क तरी सोवळा नक्कीच नाही. (हा चित्रपट सत्यघटनांवर आधारित असला तरी प्रामुख्याने 'अॅक्सिडेंटल बिलियनियर्स' या पुस्तकावर आधारित आहे.) आणि त्याचं हे सोवळं नसणं चित्रपटातल्या अनेक प्रसंगांतून स्पष्ट दिसतं. तो कधी कधी अजाणतेपणी, कित्येकदा जाणूनबुजून समोरच्याला तोंडघशी पाडतो, त्याची फसगत करतो. कित्येकदा हे त्याला करायचं नसतं पण तरीही तो ते करतोय असंही वाटत राहतं. चित्रपटाच्या शेवटी "आय अॅम नॉट अ बॅड मॅन" म्हणतानाची त्याच्या चेहर्यावरची वेदना बरंच काही सांगून जाते. आपल्यावर चित्रपट काढला जावा (आणि त्यात आपली इमेज काळ्या रंगत रंगवली जावी) हे (खर्या) मार्कला (अर्थातच) मान्य नव्हतं आणि ते त्याने तसं बोलूनही दाखवलं होतं. "मी जिवंत असताना कोणी माझ्यावर चित्रपट काढला नसता तर अधिक बरं झालं असतं" अशी प्रतिक्रिया चित्रपट निघाल्यावर त्याने दिली होती. पण अर्थात तरीही चित्रपट निघाला, प्रदर्शित झाला आणि धोधो चाललाही !! मार्कने नापसंती दर्शवली असतानाही तो प्रदर्शित झाला म्हणून काही कोणी जाळपोळी, दगडफेक, संप, बंद, आंदोलनं केली नाहीत की मुख्यमंत्र्याला (इथे गव्हर्नरला) स्वतः थेटरात हजर राहून इस्पेशल संरक्षणात चित्रपट दाखवावा लागला नाही !!!! यावरून अजून एक आठवलं ते म्हणजे येशू ख्रिस्ताचा आक्षेपार्ह उल्लेख असलेलं डॅन ब्राउनचं 'दा विंची कोड' हे पुस्तक आणि त्याच नावाचा सिनेमा हे दोन्ही ख्रिश्चनबहुल असलेल्या पाश्चात्य देशात हातोहात खपले. दोन्हींनी जोरदार धंदा केला. पण भारतातल्या चर्चेसनी मात्र त्यावर बंदी आणावी म्हणून जोरदार निदर्शनं केली.. हाय की नाय मज्जा..?? मागे एकदा माझ्या एका अमेरिकन सहकार्याशी बोलताना मी त्याला येशूच्या आक्षेपार्ह उल्लेखाबद्दल आणि त्या पुस्तक/चित्रपटाबद्दल विचारलं होतं तेव्हा तो अतिशय सहजपणे म्हणाला होता की "त्यात काय..? ती तर फक्त एक काल्पनिक कथा आहे. इटस जस्ट अ नॉव्हेल.. जस्ट अ फिक्शन.. !!!"... तेव्हा मला त्याच्या पाठीवर एक जोरदार थाप मारावीशी वाटली होती.. असो ! विषयांतर झालं. कुठल्याही चित्रपट/पुस्तकाचं परीक्षण/समीक्षण म्हणून पोस्ट न लिहिता निव्वळ 'माझा दृष्टीकोन' या अनुषंगाने पोस्ट लिहिण्याचं एक बरं असतं (समीक्षा करण्याएवढी योग्यता नसते ही झाकली मुठ झाली.) .. असं कधीही कुठेही कितीही भरकटता येतं आणि वर मी कुठे समीक्षण लिहितोय असं म्हणून हात वर करता येतात.. ;) (आणि वर पुन्हा का भरकटलोय हेही जाहीरपणे सांगता येतं ;))
![]() |
मार्क : चित्रपटातला आणि खरा |
चित्रपटातलं कुठलंही पात्र मी वर लिहिलेल्या वाक्यांमधलं एकही वाक्य स्पष्टपणे बोलत नाही की सांगत नाही. "मार्कला असं वाटलं .. म्हणून त्याने असं असं केलं.. त्याला खरं तर हे असं करायचं होतं.. तो असा असा हुशार आहे" असं कोणीही स्पष्टपणे सांगत नाही पण तरीही काय घडलं, काय झालं असावं, कोण कसं आहे, कोणी काय केलं, काय केलं नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी व्यवस्थितपणे कळतात. आणि याचं संपूर्ण श्रेय एकाच व्यक्तीला आहे. श्रीयुत डेव्हिड लिओ फिंचर !! या माणसाने कमाल केली आहे. कथेला पुढे-मागे नेणारे प्रसंग, एखादा भूतकाळात घडणारा प्रसंग आणि तोच प्रसंग पुढे खेचून नेऊन वर्तमानकाळातल्या प्रसंगात त्या जुन्या प्रसंगाच्या अनुषंगाने प्रश्न विचारणं (उदा वकील एदुआर्दोला सही करण्यासाठी पेन देतो तो भूतकाळातला प्रसंग आणि तो प्रसंग तिथेच संपवून वर्तमानकाळात (दुसरा) वकील त्याला विचारतो की "मग तू त्या पेनाने काय केलंस" हा प्रसंग आणि असे कित्येक प्रसंग) हा प्रकार अनेक प्रसंगात, घटनांमध्ये इतक्या अप्रतिम रीतीने जमवला आहे या माणसाने की चित्रपटाचं ते मागे-पुढे जात जात हळू हळू कथा उलगडवत नेणं हे आपल्याला प्रचंड आवडून जातं !!! खरं तर मला फिंचरचा यापूर्वी 'पॅनिक रूम' वगळता कुठलाही चित्रपट विशेष आवडला नव्हता. तसे त्याने सेव्हन, क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन, झोडियॅक, फाईट क्लब असे बरेच लोकप्रिय चित्रपट दिले आहेत. पण निदान मला तरी यात प्रचंड आवडला असा कुठलाच चित्रपट नव्हता (मला कल्पना आहे की यावर प्रचंड वाद होऊ शकतो. पण तरीही...).. पण हा माणूस नेहमी काहीतरी वेगळं करत असतो हे मात्र नक्की. त्यामुळेच सुरुवातीच्या त्या आकर्षक टॅगलाईनने लक्ष वेधून घेतल्यानंतर फिंचर दिग्दर्शन करतोय म्हंटल्यावर फेसबुकबद्दल काहीतरी आगळंवेगळं बघायला मिळणार याची १००% खात्री झाली होती आणि ती अपेक्षा या माणसाने १०००% पूर्ण केली. फिंचरचे चित्रपट बर्याचदा गुंतागुंतीचे असतात. खूप विचार करून आणि नीट लक्ष देऊन बघायला लागतात.. प्रत्येक संवादात बराच अर्थ दडलेला असतो. ते या चित्रपटाच्या बाबतीतही अगदी अगदी खरं आहे. शक्यतो सबटायटल्स ऑन करून बघितलात तर अधिक उत्तम. जास्त एन्जॉय करता येईल चित्रपट !!
माझ्या एका मित्राला शाहरुख-उर्मिलाच्या'चमत्कार'ची गाणी एवढी आवडायची की तो म्हणायचा की "मी कधी जर चित्रपट काढला तर अनु मलिकलाच संगीत करायला देईन." .. त्यानंतर हा संवाद आमच्यात खूप कॉमन झाला. त्याप्रमाणे आत्तापर्यंत अशा माझ्या स्वतःच्या (! ;) ) कित्येक चित्रपटांसाठी मी संगीतकार/दिग्दर्शक/संवादलेखक यांची निवड वेळोवेळी केलेली आहे. ;) त्याच धर्तीवर पुढे म्हणायचं झाल्यास मी आयुष्यात कधी चित्रपट काढला तर तो असाच असेल असा प्रयत्न मी करेन किंवा मग मी सरळ फिंचरलाच दिग्दर्शन करायला सांगेन.. :)
फेसबुकने जगाला किती मोठ्या प्रमाणात झपाटलं आहे हे दाखवणारा आणि तितक्याच टोकदारपणे आजच्या सामाजिक स्थितीवर बोट ठेवणारा एक छोटा प्रसंग चित्रपटाच्या शेवटी आहे. खटला संपल्यावर मार्क आपल्या लॅपटॉपवर काम करत असताना प्रतिपक्षाची ट्रेनी वकील त्याला विचारते "तू काय करतो आहेस?".. मार्क उत्तरतो "बॉस्नियाची स्थिती कशी आहे ते बघतोय" .. ती खिन्नपणे हसून म्हणते "बॉस्निया... हं !! जिथे साधे रस्ते नाहीयेत पण फेसबुक मात्र नक्की आहे. !!!"
'सोने' बघून झाल्यावर मी फेबुवर स्टेटस मेसेज टाकला होता. "इफ यु डोन्ट वॉच सोशल नेटवर्क, मार्क वुईल डिसेबल युअर फेसबुक अकाउंट... !!!"
(यस.. ही कॅन.. ही इज प्रोबॅबली रजनी इन द वेब वर्ल्ड.. ;) चित्रपट बघितल्यावर तुम्हाला कळेलच की तो काहीही करू शकतो :) ) !!
थोडक्यात हे न चुकवावेसे 'सोने' आहे. इटस अ सोशल 'ग्रेट'वर्क !!
टॉप न्यूज. मोस्ट रिसेंट १+ : 'सोने' च्या जबरदस्त संवादांपैकी काही निवडक संवाद इथे अनुभवता येतील.