Saturday, July 20, 2024

गुन्हेगारी साहित्यविश्वाचा विक्रमादित्य सम्राट : मायकल कॉनली

२०११ मध्ये 'द लिंकन लॉयर' नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट बघायचा ठरवत असतानाच चित्रपट ज्या पुस्तकावर आधारित आहे ते पुस्तक अतिशय उत्तम आहे असं कळल्याने आधी पुस्तक वाचायचं ठरवलं. पण काही कारणाने पुस्तकही वाचायचं राहून गेलं आणि अर्थातच त्यामुळे चित्रपटही बघायचा राहून गेला. तोपर्यंत इतरांचे चित्रपट दाखवणाऱ्या अ‍ॅमेझॉन प्राईमवाल्यांनी, २०१५ च्या जानेवारी महिन्यात सर्वप्रथम त्यांची स्वतःची निर्मिती असलेली अर्थात अ‍ॅमेझॉन प्राईम ओरिजनल असलेली 'बॉश' ही सिरीज प्राईमच्या सदस्यांना उपलब्ध करून दिली. पहिला हंगाम (सिझन) ठीकठाक होता. फार काही विशेष वाटला नाही. त्यावेळी असं वाचनात आलं की मूळ पुस्तक हे मालिकेपेक्षा खूपच उत्तम आहे. शोधाशोध करत असताना बॉश ही व्यक्तिरेखा केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली ही पुस्तकांची मोठी मालिकाच आहे हे लक्षात आलं. पहिलं पुस्तक होतं १९९२ साली प्रकाशित झालेलं 'द ब्लॅक एको' आणि लेखक होता मायकल कॉनली. नाव ओळखीचं वाटत होतं आणि त्याचं कारणही काही काळाने लक्षात आलं. नंतर वाचू म्हणून बाजूला ठेवून दिलेल्या लिंकन लॉयरचा लेखकही मायकल कॉनलीच होता. अर्थात मायकल कॉनलीची पुस्तकं मी अनेकदा वाचनालयात बघितली होती. पण कधी वाचनाचा योग आला नव्हता. अखेरीस लिंकन लॉयर वाचायला घेतलं आणि अक्षरशः हादरूनच गेलो.

मायकल कॉनली :

मायकल जोसफ कॉनली १९८० मध्ये औपचारिक शिक्षण पूर्ण करून काही वर्षं छोट्या मोठ्या वृत्तपत्रांत काम करत १९८७-८८ च्या सुमारास लॉस अँजलस टाईम्समध्ये गुन्हेविषयक वार्ताहर म्हणून रुजू झाला. तिथे ३-४ वर्षं काम केल्यानंतर त्याने 'द ब्लॅक एको' या पुस्तकाद्वारे कालांतराने अतीव लोकप्रिय होणार असणाऱ्या आपल्या डिटेक्टिव्ह हॅरी बॉश या पात्राला जन्माला घातलं. बॉश या व्यक्तिरेखेचं पहिलंच पुस्तक प्रचंड गाजलं
. बॉशला वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. कालांतराने नोकरीला रामराम ठोकून कॉनलीने पूर्ण वेळ लेखन करायला सुरुवात केली. त्याच्या गुन्हेविषयक पत्रकारितेचा त्याला पुस्तकं लिहिण्यासाठी तसेच कादंबऱ्यांमधील पात्रं अस्सलपणे रंगवण्यासाठी खूप उपयोग झाला.

कादंबऱ्यांचं स्वरूप:

कॉनलीच्या कादंबऱ्या प्रामुख्याने गुन्हेविषयक थरार मांडणाऱ्या आणि छोटेमोठे धक्के देत अखेरीस रहस्यांचा उलगडा करणाऱ्या असतात. त्याच्या कादंबऱ्यांमधला कथापट चांगलाच गुंतागुंतीचा असतो, मल्टीलेयर्ड असतो. प्रमुख पात्राच्या बरोबरीने इतरही अनेक दुय्यम पात्रांचा कथेत नियमित राबता असतो. प्रमुख पात्र हे कादंबरीतील मुख्य प्रकरणाच्या (केस) बरोबरीने इतरही काही छोट्यामोठ्या गोष्टींवर काम करत असतं. कधी कधी हे एवढे सगळे तपशील कॉनली आपल्याला का पुरवतोय असा विचारही वाचकाच्या मनात येऊन जातो. परंतु प्रसंगी बिनमहत्वाच्या किंवा किंचित असंबद्ध वाटणाऱ्या त्या गोष्टींचे दुवे नायक (अर्थात कॉनली) कुठे आणि कसे जोडतो ते पाहून वाचक हतबुद्ध होऊन जातो.

कॉनलीच्या कादंबऱ्यांमध्ये पोलीस तपास, तपासातल्या किचकट प्रक्रिया आणि कार्यपध्दती यांचा कीस पाडलेला असतो. कायदेप्रक्रिया, न्यायसंस्था यांमधल्या अतिशय बारीकसारीक मूल्यांचा आणि तत्वांचा अत्यंत बारकाईने विचार केलेला असतो. कॉनलीच्या कादंबऱ्यांमधले खलनायक अतिशय विक्षिप्त, खुनशी आणि चमत्कारिक असतात. बऱ्याचदा नायकाचा सामना हा सिरीयल किलरशी होत असतो. प्रत्येक सिरीयल किलर हा त्याला पटणाऱ्या एका ठराविक पॅटर्ननुसार काम करत असतो. तो पॅटर्न शोधणं, गुन्हेपद्धती शोधणं, सिरीयल किलर अथवा खलनायकाची मानसिकता, भूतकाळ आणि त्याची सामाजिक, कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादी महत्वाच्या गोष्टींची गुन्ह्याशी सांगड घालून तो गुन्हेगार भविष्यात करू शकणारा गुन्हा रोखणं अशा बहुढंगी जबाबदाऱ्यांचं ओझं नायकाच्या खांद्यांवर असतं. शक्यतो शेवटची ६०-७० पानं शिल्लक असताना एखादी प्रचंड महत्वाची घटना घडते जिच्यामुळे तोपर्यंतची सगळी समीकरणंच उलटसुलट होऊन जातात, परिस्थिती आमूलाग्र बदलून जाते, समोर उभ्या ठाकलेल्या परिस्थितीकडे नायकाला पूर्णतः वेगळ्या दृष्टिकोनातून बघावं लागतं. कादंबरीच्या अखेरीस गुंतागुंतीच्या प्रकरणाची उकल झाल्यानंतर कादंबरीभर जाणवत राहणारा, प्रमुख पात्राच्या मनावरचा ताण ओसरतो परंतु त्या प्रकरणाचा परिपाक म्हणून नायकाच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यात प्रचंड उलथापालथ होते जी भरून येण्यासाठी काही महिन्यांचा/वर्षांचा कालावधी जावा लागतो.  

कुठलीही कादंबरी वाचत असताना कॉनलीने त्या विषयाचा, पात्राचा, घटनेचा, भूतकाळात त्यासारख्या घडलेल्या इतर अनेक घटनांचा आणि गुन्ह्यांचा अतिशय बारकाईने अभ्यास केलेला असतो हे वारंवार जाणवत राहतं. एखादा गुन्हा, सिरीयल किलर, त्याची गुन्हे करण्याची पद्धती, कारणमीमांसा, प्रत्यक्ष जगातल्या सिरीयल किलर्सशी जोडलेले संदर्भ आणि त्यातून जाणवणारं गुन्ह्यांमधलं साधर्म्य जेव्हा कॉनली वाचकांसमोर मांडतो त्यावेळी त्याच्या बुद्धीचातुर्याला दाद द्यायला शब्द कमी पडतात. त्याचबरोबर कॉनली आपल्या मानसपुत्रांचा/कन्यांचा जेवढा बारकाईने अभ्यास करतो, त्यांचा भूतकाळ, त्यांची भविष्यात येणारी पुस्तकं, एखादा नवीन नायक/नायिका जन्माला घालायची असल्यास त्या भविष्यातल्या पात्राबद्दल येणारे उल्लेख इत्यादी गोष्टी आणि त्यामागचा कॉनलीचा त्याच्या व्यक्तिरेखांचा अभ्यास आणि पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यांमागची सुस्पष्टता वाचकांना स्तंभित करून सोडते! उदाहरणच द्यायचं झाल्यास त्याच्या 'ब्लड वर्क' या १९९८ साली प्रकाशित झालेल्या कादंबरीत एका पात्राचा ओझरता उल्लेख आहे ज्या पात्रावर कॉनलीने २००५ साली पूर्ण लांबीची कादंबरी आणि कालांतराने संपूर्ण पुस्तक मालिकाच प्रकाशित प्रकाशित केली.

पात्रपरिचय:

हॅरी बॉश, लिंकन लॉयर, टेरी मॅकॅलब, जॅक मॅकइव्हॉय आणि रेनी बॅलर्ड या पाच प्रमुख पात्रांना केंद्रस्थानी ठेवून कॉनलीचं ३८ कादंबऱ्यांचं कॉनली युनिव्हर्स आकाराला आलेलं आहे. ही पाच पात्रं एकमेकांच्या विश्वात ये जा करत असतात. प्रत्येक पात्राची स्वतंत्र असलेली अशी किमान एक कादंबरी आहे ज्याद्वारे त्या पात्राचं सर्वप्रथम कॉनली विश्वात आगमन होतं. त्यानंतरच्या जवळपास प्रत्येक कादंबरीत मूळ पात्राच्या बरोबरीने बॉशचंही दर्शन होतं. अर्थात बॉश हे कॉनलीचं फ्लॅगशिप उत्पादन असल्याने आणि त्याचप्रमाणे कॉनली विश्वातलं सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पात्र असल्याने त्याला झुकतं माप मिळणं स्वाभाविकच आहे. आणि त्यामुळेच कॉनली विश्वातील सर्वाधिक अर्थात २१ पुस्तकांमध्ये बॉश नायक आहे. साधारण आठ-दहा वर्षं बॉशने एकट्याने राज्य केल्यानंतर कॉनलीने हळूहळू अन्य पात्रांना वाचकांच्या भेटीला आणायला सुरुवात केली. त्या पात्रांच्याही साधारण दुसऱ्या-तिसऱ्या पुस्तकांपासून त्यांच्या विश्वात बॉशचा प्रवेश होतो आणि त्या दोघांच्या एकत्र काम करण्याने गुन्ह्याची उकल केली जाते. या सर्व पात्रांचा थोडक्यात परिचय करून घेऊ.

१. हॅरी बॉश : लॉस अँजलस पोलीस खात्यात नोकरीला असलेल्या या ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा भूतकाळ थोडा काळवंडलेला आहे. त्याने व्हिएतनाम युद्धात भाग घेतलेला आहे. एका वारांगनेच्या पोटी जन्माला आलेला आणि बालपणीच अनाथ होणं नशिबी आल्याने विविध फॉस्टर होम्स (अनाथालये) मध्ये लहानाचा मोठा झालेला बॉश स्वकर्तृत्वावर मोठा होऊन लॉस अँजलस पोलीस खात्यात डिटेक्टिव्ह म्हणून काम करत असतो. पंधराव्या शतकातल्या Hieronymus Bosch नावाच्या आपल्या आवडत्या डच चित्रकाराच्या नावावरून त्याच्या आईने ‘हॅरी बॉश’ हे त्याचं नाव ठेवलेलं असतं. द लास्ट कायोटी (The Last Coyote) या बॉशच्या चौथ्या पुस्तकात कॉनलीने Hieronymus Bosch चा इतिहास अतिशय तपशीलवारपणे लिहून ठेवला आहे. एखाद्या पात्राचं नाव
, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्याच्या स्वभावातले कंगोरे हे सगळं व्यवस्थितपणे उलगडून दाखवण्यासाठी एखादा लेखक इतिहास आणि त्यातल्या व्यक्तिरेखांचा एवढा सखोल अभ्यास करू शकतो हा निदान मराठी फिक्शन वाचकांसाठी तरी मोठा सुखद असा धक्का आहे. 

हॅरी बॉशचं व्यक्तिमत्व तसं सर्वसामान्य आहे. मध्यम उंची आणि साधारण शरीरयष्टी असलेला बॉश चटकदार, चमकदार संवादफेक करताना दिसत नाही. त्याच्या व्यक्तिरेखेचं सर्वात मोठं वैशिष्टय आहे ते म्हणजे त्याची चिकाटी आणि जिद्द. कुठे आशेचा किरणही दिसत नसताना किंवा गुन्हेगारांनी कुठल्याही पुराव्याचा मागमूसही मागे सोडला नसतानादेखील बॉश आपल्या उत्तुंग अनुभवाच्या आणि चिकाटीच्या माध्यमातून अशक्य वाटणाऱ्या भल्याभल्या केसेस सोडवताना दिसतो. आदर्शवाद चोखाळणाऱ्या आणि स्वभावाने किंचित तापट असलेल्या बॉशचे कित्येकदा वरिष्ठांशी मतभेद होत राहतात. अनेक केसेसमध्ये रहस्याचा गुंता सोडवण्यात तो यशस्वी होत असला तरी कित्येकदा लालफीत, सरकारी नोकर, वरिष्ठ अधिकारी, राजकारणी/उद्योगपती आणि गुन्हेगारांचे लागेबांधे यांमुळे अनेक केसेसमध्ये मुख्य आरोपी सुटून गेल्याचं पहाणंही त्याच्या नशिबी येतं. काही वेळा अपयशांनंतर डिपार्टमेंट सोडून गेल्यानंतरही किंवा निवृत्त झाल्यानंतरही काही वर्षांनी तो परत येत राहतो आणि गुन्हेगारांना गजाआड पाठवण्यासाठी पोलिसांना शक्य तितकी सर्व मदत करत राहतो. प्रत्येक पुस्तकागणिक प्रगल्भ होत जाणाऱ्या त्याच्या व्यक्तिमत्वाचा प्रवास हा वाचकांना नक्कीच भुरळ घालणारा ठरतो.

२. लिंकन लॉयर : लिंकन लॉयर म्हणून प्रसिद्धी पावलेल्या या डिफेन्स लॉयरचं खरं नाव मिकी हॉलर आहे. कार्यालयाचा खर्च वाचवण्यासाठी लिंकन कंपनीच्या प्रशस्त गाड्यांमध्ये बसून आपला व्यवसाय चालवणारा वकील म्हणून याला 
'लिंकन लॉयर' हे नामाभिधान मिळालेलं असतं. हा डिफेन्स लॉयर असल्याने अर्थातच गुन्हेगार, खुनी, ड्रग डीलर्स, दरोडेखोर, फुटकळ चोर असे लोक ही
याची प्रमुख गिऱ्हाईकं आहेत. 'Holler for Haller' असं चटपटीत स्लोगन वापरणारा हा वकील भल्याबुऱ्याची फारशी चाड ठेवण्याच्या फंदात पडत नाही आणि अनेकदा त्याची ग्राहक मंडळीही त्याला ती ठेवण्यापासून परावृत्त करतात. नेहमी सुटाबुटात वावरणारा, उंची गाड्या वापरणारा, छानछोकीची आवड असणारा असा हा नायक आहे. याच्या तोंडी मात्र कॉनलीने याच्या व्यक्तिमत्वाला शोभतील असे चटकदार संवाद घातले आहेत. 

मिकी नायक असलेली एकूण सात पुस्तकं आहेत. पहिली दोन पुस्तकं (अनुक्रमे लिंकन लॉयर (२००५) आणि ब्रास वर्डीक्ट (२००८) ) ही फार कमाल उतरली आहेत. ती वाचत असताना वाचक पानोपानी कॉनलीला दाद देत राहतो. २०१० साली प्रकाशित झालेल्या तिसऱ्या पुस्तकात (The Reversal) कॉनलीने मिकीला चक्क सरकारी वकील म्हणूनही रंगवण्याचा प्रयत्न करून पाहिला. परंतु इतर पुस्तकांच्या मानाने हा प्रयत्न थोडा फसल्यासारखा वाटतो हे निश्चित. 'द फिफ्थ विटनेस' (२०११) या मिकीच्या चौथ्या पुस्तकात तर कॉनलीने पुस्तकाच्या शीर्षकातच एक भन्नाट खेळ खेळला आहे. अमेरिकन न्यायव्यवस्थेनुसार काही कारणामुळे एखाद्या साक्षीदाराला साक्ष द्यायची इच्छा नसल्यास खुद्द न्यायालयासमोर उभं राहून तसं स्पष्टपणे सांगण्याचा त्याला पूर्ण अधिकार असतो. अमेरिकन घटनेच्या Fifth Amendment नुसार साक्षीदाराला हा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. या पुस्तकातला अत्यंत महत्वाचा साक्षीदार हा साक्षीदार क्रमांक ५ आहे. पुस्तकाच्या शीर्षकातच कॉनलीने या फिफ्थ अमेंडमेंट आणि साक्षीदार क्रमांक ५ या दोन गोष्टींची चातुर्यपूर्ण सांगड घातली आहे. शीर्षकाचं महत्व अर्थात पुस्तकाच्या मध्यावर वाचकांच्या लक्षात येतं आणि कॉनलीच्या अफाट बुद्धीचातुर्याला आपण मनोमन दाद देतो! मिकीची गुन्हेगारी विश्वाशी असलेली नको तितकी जवळीक पाचव्या (२०१३) आणि सहाव्या (२०२०) पुस्तकांमध्ये (The Gods of Guilt आणि The Law of Innocence) तर त्याच्या चांगलीच अंगलट येते. पण प्रचंड बुद्धिमत्ता, कायद्याचं ज्ञान यामुळे त्या सगळ्यांतून तो सुखरूपपणे बाहेर पडतो. दुसऱ्या पुस्तकादरम्यान नेहमीप्रमाणे हॅरीचं आगमन झाल्यावर मिकी आणि हॅरीचं अजून एक रहस्य वाचकांना समजतं. 

मिकीचं कायदेविषयक ज्ञान, गुन्हेगारी जगताशी असलेल्या त्याच्या ओळखी आणि त्या योग्य वेळी वापरण्याचं त्याचं कसब, कुठल्याही प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊन चिकाटीने त्याचा शोध घेऊन रहस्याची उकल करणं हे त्याच्या स्वभावाचे काही महत्वाचे गुणविशेष. कॉनलीच्या समर्थ लेखणीतून उतरलेले हे प्रसंग आणि वर्णनं वाचणं ही वाचकांसाठी एक खरीखुरी पर्वणी ठरते. 

३. जॅक मॅकइव्हॉय : जॅक मॅकइव्हॉय आणि कॉनली यांच्यात एवढं साम्य आहे की कॉनलीने आत्मचरित्रात्मक लिखाण करून स्वतःचंच पात्र पुस्तकात उभं केलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. अर्थात कॉनलीने हे मान्यच केलं आहे की "मी आत्तापर्यंत निर्माण केलेल्या पात्रांपैकी माझ्याशी सर्वाधिक साधर्म्य साधणारं पात्र म्हणजे मॅकइव्हॉय". मॅकइव्हॉय हा देखील कॉनलीप्रमाणेच एका लहान वृत्तपत्रात गुन्हेगारी जगताच्या बातम्या देणारा वार्ताहर म्हणून नोकरी करत असतो. १९९६ साली प्रकाशित झालेलं 'द पोएट' हे मॅकइव्हॉय सिरीज मधलं पहिलं पुस्तक ज्यात कॉनलीने बॉश व्यतिरिक्त अन्य एखादं पात्र नायक म्हणून चितारलं आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच मॅकइव्हॉयच्या आयुष्यातल्या एका महत्वाच्या व्यक्तीने आत्महत्या केल्याने त्याला त्या घटनेचा भयंकर धक्का बसलेला असतो. काही दिवसांनी थोडा सावरल्यानंतर त्याला त्यात काहीतरी काळंबेरं आहे असा संशय यायला लागतो. थोडं अधिक खणून पाहिलं असता ही मृत्यूंची एक मालिकाच असल्याचं त्याच्या लक्षात येतं. अधिक खोलवर चौकशी करून अनेक धागे जुळवल्यानंतर तर अजून एक धक्कादायक गोष्ट त्याच्या लक्षात येते की हे मृत्यू साधेसुधे नसून त्यामागे एक विलक्षण असा पॅटर्न आहे. आणि या अनुमानापर्यंत पोचल्यावर हळूहळू प्रत्यक्ष गुन्हेगार कोण आहे याचा साधारण अंदाज आल्यावर तर त्याला अजूनच धक्का बसतो. पानागणिक विलक्षण रंगत जाणारा कुत्र्यामांजराचा खेळ, पाठलाग, निरनिराळे गुप्त दुवे आणि त्यांची सांगड, त्यासाठी मॅकइव्हॉयला मदत करणारी एक महिला अधिकारी, तिचा वरिष्ठ अधिकारी, अन्य सहकारी आणि त्यांच्यातलं राजकारण असे निरनिराळे विलक्षण टप्पे घेत पुस्तक शेवटाकडे येतं आणि वाचकांना कमालीचं हादरवून टाकतं.

मॅकइव्हॉय हा प्रचंड हुशार वार्ताहर आहे. यंत्रणेतले कच्चे दुवे कोळून पिऊन त्यांचा फायदा बातमी देण्यासाठी कसा करता येईल याचा हिशोब त्याच्या डोक्यात सदैव चालू असतो. ‘स्केअरक्रो’ (२००९) आणि ‘फेअर वॉर्निंग’ (२०२०) ही मॅकइव्हॉय मालिकेतली अन्य दोन पुस्तकं असून या दोघांमधेही काही विशिष्ट लोकांच्या हत्या, त्यांचा एक विशिष्ट पॅटर्न, त्यांच्यातले सामायिक दुवे, ते शोधण्यासाठी चालू असलेली मॅकइव्हॉयची धडपड हे सगळे टप्पे थोड्याफार फरकाने तसेच घडतात. मात्र प्रत्येक पुस्तकातले गुन्हे, त्यांची वारंवारता, गुन्हेगारांची मानसिकता, गुन्ह्यांचे अभिनव प्रकार इत्यादी गोष्टींमधल्या बारीसारीक तपशिलांचा कॉनलीने अतिशय बारकाईने केलेला अभ्यास वाचकांना अक्षरशः थक्क करून सोडणारा आहे.

४. टेरी मॅकॅलब : एक LAPD चा डिटेक्टिव्ह, एक बचावपक्षाचा वकील आणि एक गुन्हेगारी जगताशी संबंधित बातम्या देणारा वार्ताहर झाल्यानंतर कॉनलीने पुढचं पात्र एका निवृत्त FBI अधिकाऱ्याच्या रूपात रंगवलं आहे. टेरी मॅकॅलब हा FBI मध्ये क्रिमिनल प्रोफायलर म्हणून काम करत असतो. प्रत्यक्ष गुन्ह्यांच्या घटना, घटनास्थळाची परिस्थिती, गुन्हा करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींवरून गुन्हेगारांची मानसिकता जाणून घेऊन गुन्हा करणाऱ्या व्यक्तीची पार्श्वभूमी कशी असेल याचा शोध घेणं ही घेणं हे टेरीची प्रमुख जबाबदारी असते. 'ब्लड वर्क' (१९९६) या पहिल्या पुस्तकात व्यक्तिगत कारणांमुळे नाईलाजाने निवृत्त व्हावं लागलेल्या टेरीसमोर अचानकच अशी काही गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होते की त्याला एका शेवटच्या परंतु शब्दशः जीवनमरणाचा प्रश्न ठरलेल्या केससाठी निवृत्त आयुष्यातून तात्पुरत्या काळासाठी परत यावं लागतं. परंतु आता निवृत्त झालेला असल्याने FBI तर्फे मिळणारी कुठलीही साधनं किंवा मदत त्याच्या पाठीशी नसते. मात्र केस आत्यंतिक महत्वाची असल्याने तिचा छडा न लावता स्वस्थ बसणंही त्याला शक्य नसतं. परंतु आपल्या अपूर्व बुद्धिचातुर्याच्या बळावर अवघड परिस्थितीवर मात करून टेरी त्या अविश्वनीय वाटणाऱ्या केसचा धक्कादायक उलगडा करतो.

टेरी मॅकॅलब सिरीजमधलं दुसरं पुस्तक म्हणजे 'अ डार्कनेस मोअर दॅन नाईट' (२०००) ज्यात टेरीच्या सोबतीला बॉश येतो आणि दोघे मिळून अजून एका अशाच धक्कादायक गुन्ह्यांच्या मालिकेचा तपास पूर्ण करतात. यात अमेरिकन तपाससंस्थांमधले आपापसातले हेवेदावे, राजकारण आणि त्याचबरोबर विक्षिप्त गुन्हेगारांची मानसिकता अशा निरनिराळ्या पैलूंवर कॉनली भाष्य करतो.

५. रेनी बॅलर्ड : गुन्हे आणि गुन्हेगारांशी संबंधित निरनिराळ्या क्षेत्रातल्या पात्रांचे प्रकार लीलया हाताळून झाल्यावर कॉनलीने रेनी बॅलर्ड नावाच्या महिला डिटेक्टिव्हचं पात्र वाचकांच्या भेटला आणलं आहे. बॅलर्डचं विशिष्ट्य म्हणजे अतिशय तल्लख बुद्धिमत्ता असूनही अंतर्गत राजकारण, तुलनेने कमी अनुभव आणि तिचं महिला असणं या सगळ्या बाबींचा एकत्रित परिणाम म्हणून तिला रात्रपाळीत काम करावं लागत असतं. आणि त्यामुळेच तिच्या पहिल्या पुस्तकाचं नाव आहे 'द लेट शो' (२०१७). दिवसभरात घडलेल्या गुन्ह्यांच्या नोंदी एकत्रित करून त्या वरिष्ठांना पाठवणे असं अत्यंत नीरस आणि  रटाळ काम तिच्या माथी मारण्यात आलेलं असतं. मात्र ते कंटाळवाणं कामही नियमितपणे पूर्ण करून, जोडीला सध्या चालू असलेल्या केसेसच्या तपासांचे अहवाल वाचून, समजून घेऊन गुन्ह्यांचा तपास आपल्या पद्धतीने करणे, तपासात एखादा कळीचा मुद्दा राहून गेला असल्यास त्याकडे वरिष्ठांचं लक्ष वेधून घेणे अशी लहान पण अतिशय महत्वाची कामं बॅलर्ड करत असते.

शहरातल्या गजबजलेल्या परिसरातल्या एका उपाहारगृहात झालेल्या एका रँडम हत्याकांडाची चौकशी चालू असते. अर्थात बॅलर्डपर्यंत त्यातलं काहीच येत नसतं. तरीही ती तिच्या पद्धतीने शोध घेत त्या हत्याकांडातले महत्वाचे दुवे शोधून काढते आणि अखेरीस पोलीस खात्याला हादरवून टाकणाऱ्या एका धक्कादायक सत्याला वाचा फोडते. 'द लेट शो' नंतर बॅलर्ड सिरीजमधल्या अजून चार कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या असून पुढची कादंबरी 'द वेटिंग' ही १५ ऑक्टोबरला प्रकाशित होणार आहे. गंमत म्हणजे हॅरी बॉशची मुलगी एव्हाना मोठी झाली असून तीही आता LAPD मध्ये जॉईन झाली असून ती आणि बॅलर्ड एकत्रितपणे एका जुन्या, न सुटलेल्या गुन्ह्यांवर काम करत आहेत.

चित्रपट आणि मालिका:

कॉनलीसारख्या अमाप लोकप्रियता प्राप्त झालेल्या लेखकाच्या कादंबऱ्यांवर आणि पात्रांवर चित्रपट आणि मालिका प्रदर्शित झाल्या नसत्या तरच नवल. बॉश या त्याच्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या पात्रावर त्याच नावाची सात सीझन्सची मालिका प्राईमवर प्रदर्शित झाली. Titus Welliver ने छोट्या पडद्यावर रंगवलेला बॉश चाहत्यांना कमालीचा आवडला. मालिकेतल्या सीझन्सची मांडणी ही अर्थात पुस्तकांच्या अनुक्रमानुसार नसून २-३ रँडम कादंबऱ्या एकत्रित करून एकेका सिझनची निर्मिती करण्यात आली आहे. ही मालिका २०२१ साली संपल्यानंतर पुढच्याच वर्षी, अर्थात २०२२ मध्ये 'बॉश लेगसी' या नावाने तिचा स्पिनऑफही प्रदर्शित झाला. या स्पिनऑफ मालिकेचेही दोन सीझन्स झाले असून तिसरा सिझन या वर्षअखेरीस येणं अपेक्षित आहे.

कॉनलीचा बॉशखालोखाल लोकप्रिय असलेला अन्य नायक म्हणजे लिंकन लॉयर. लिंकन लॉयरच्या पहिल्या पुस्तकावर २०११ साली चित्रपट प्रदर्शित झाला असून Matthew McConaughey ने साकारलेला मिकी कमालीचा लोकप्रिय ठरला. त्यानंतर नेटफ्लिक्स वर २०२२ आणि २०२३ साली त्याच्या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या पुस्तकांवर आधारित दोन सीझन्स प्रदर्शित झाले. त्यात Manuel Garcia-Rulfo या अभिनेत्याने मिकी साकारला. कॉनलीच्या पुस्तकविश्वातली पात्रं एकमेकांच्या पुस्तकात सहजपणे ये-जा करत असली तरी दुर्दैवाने मालिकाविश्वात मात्र हा आनंद तांत्रिक बाबीमुळे प्रेक्षकांकडून हिरावून घेतला गेलाय. 'लिंकन लॉयर' चे हक्क नेटफ्लिक्सकडे आणि 'बॉश' मात्र प्राईमकडे असल्याने त्यांचं एकमेकांच्या विश्वात डोकावणे सर्वस्वी अशक्य आहे.

कॉनलीच्या टेरी मॅकॅलब नायक असलेल्या 'ब्लड वर्क' या अत्यंत लोकप्रिय कादंबरीवरदेखील २००२ साली एक चित्रपट निर्माण झाला होता. टेरीची प्रमुख भूमिका आणि त्याचबरोबर दिग्दर्शन या दोन्ही जबाबदाऱ्या हॉलीवूडचे ज्येष्ठ श्रेष्ठ आजोबा क्लिंट ईस्टवूड यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतल्या होत्या. परंतु ब्लड वर्क कादंबरीतील रहस्य, टेरीचा संघर्ष, शोधाचा प्रवास आणि त्यादरम्यान येणारे विविध अडथळे यातल्या कुठल्याच गोष्टी चित्रपटात मूळ कादंबरीच्या १% ही न दाखवता आल्याने दुर्दैवाने चित्रपटाचा पार बोजा उडाला असून शेवटाकडे तर चित्रपट अक्षरशः हास्यास्पद होऊन गेला आहे. (कादंबरी न वाचता थेट चित्रपट बघणाऱ्या एखाद्या व्यक्तीला चित्रपट कदाचित आवडूही शकेल.)

 वाचनक्रम:

कुठल्याही लेखकाची पुस्तकं ही त्याने ती ज्या क्रमाने लिहिली आहेत शक्यतो त्या क्रमानेच वाचणं ही माझ्या दृष्टीने सगळ्यात आदर्श पद्धत आहे आणि ती मी जवळपास प्रत्येक वेळी पाळतोही. अशा प्रकारे वाचन केल्याने लेखकाच्या लेखनशैलीतली आणि त्याचबरोबर त्याच्या प्रमुख पात्राच्या व्यक्तिमत्वातलीही उत्क्रांती लक्षात यायला आपल्याला मदत होते. कॉनलीच्या बाबतीत मात्र क्रम थोडा बदलला गेला. मी कॉनली वाचायला सुरुवात केली ती लिंकन लॉयर या पात्रापासून. लिंकन लॉयर मालिकेतली पहिली दोन पुस्तकं अर्थात 'लिंकन लॉयर' आणि 'द ब्रास वर्डीक्ट' अक्षरशः झपाटल्यागत वाचली. लिंकन लॉयर वाचायला सुरुवात केल्यानंतर काही प्रकरणांनंतरच मिकी आणि कॉनली ही फारच गुंतागुंतीची आणि उच्च दर्जाची प्रकरणं आहेत हे माझ्या लक्षात आलं. पहिल्या पुस्तकात मिकीने गुन्हेगाराच्या तावडीतून कमालीच्या हुशारीने स्वतःची सुटका करून घेऊन त्या गुन्हेगारालाच अन्य एका सापळ्यात अडकवण्याचा प्रवास अशक्य थरकाप उडवणारा आहे. दुसरी कादंबरी असलेल्या 'ब्रास वर्डीक्ट'चा सगळा डोलारा चित्रविचित्र गुन्हे, तपास, कादंबरीचा कमालीचा वेग आणि मिकीचे अप्रतिम संवाद यावर उभारलेला असून या पुस्तकातही वाचक पहिल्या पुस्तकाच्या बरोबरीने गुंतून जातो. अशा तऱ्हेने एकेक करत मिकीची तोवर प्रकाशित झालेली सगळी (७) पुस्तकं वाचून झाल्यानंतर मी बॉशकडे वळलो.

बॉशची पहिली दोन पुस्तकं वाचून झाल्यानंतर मला ती विशेष न आवडल्याने मी बॉशचीच अजून तीन-चार रँडम पुस्तकं संपवली. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर तीही खास न वाटल्याने बॉशला तात्पुरता रामराम ठोकून मी माझा मोर्चा रेनी बॅलर्डकडे वळवला. बॅलर्ड मालिकेतलं पहिलं पुस्तक 'द लेट शो' खूप आवडल्याने ते झाल्यावर लगेचच दुसरं पुस्तक अर्थात 'डार्क सेक्रड नाईट' (२०१८) वाचायला घेतलं. मात्र त्यात बॉशचा प्रवेश झाल्यानंतर पुस्तकाचा वेग थोडा मंदावल्यासारखा वाटल्याने दुसरं पुस्तक संपवल्यानंतर बॅलार्डलाही तात्पुरता निरोप दिला.

कॉनलीचं सर्वात लोकप्रिय पुस्तक कुठलं हे गुगल केल्यावर दहा पैकी नऊ लोक जॅक मॅकइव्हॉयच्या 'द पोएट' या कादंबरीकडे निर्विवादपणे अंगुलीनिर्देश करतात. 'द पोएट' विषयी मी फार पूर्वीपासून ऐकलं असूनही त्याच्या जाडजूड आकारामुळे (पृष्ठसंख्या : ६१०) ते सुरु करायचं धाडस होत नव्हतं. पण अखेरीस एक दिवस रात्री झोपायच्याआधी हिय्या करून वाचायला घेतलं आणि रात्रीचे दोन वाजून गेले तरी ते ठेवावंसं वाटेना. 'द पोएट' ला स्वतःची अशी एक विलक्षण गती आहे, त्यात अचंबित करून सोडणारे पॅटर्न्स आहेत, निरनिराळी वैशिष्ठयपूर्ण पात्रं आहेत, त्यांचे भूतकाळ, वर्तमानकाळ निरनिराळ्या टप्प्यांवर सांधले गेलेले आहेत. 'द पोएट' मध्ये दर काही पानांनंतर एक विलक्षण वळण येतं, सगळं संपलं असं वाटायला लागतं आणि तोवर एक नवीन रहस्यभेद झालेला असतो. हा असा प्रकार सातत्याने करून वाचकांना संपूर्ण कादंबरीभर जखडून ठेवण्याचं आव्हान कॉनलीने लीलया पेललंय. कित्येकदा मी दिवसभर बेचैन होऊन जायचो की "पुस्तकात आता पुढे काय होणार असेल", "जॅकला खऱ्या खुन्याचा शोध लागेल का?". तर अनेकदा "रेचल अशी का वागते आहे?",  "सिरीयल किलरचा पुढचा प्लॅन नक्की काय असेल?" यांसारख्या प्रश्नांचा विचार करकरून मला दिवसभर इतर काही सुचायचंच नाही. या दरम्यान कित्येक रात्री मला पोएट, जॅक, रेचेलची स्वप्नं पडली आहेत. एखाद्या कादंबरीने एवढं झपाटून टाकण्याचा असा अनुभव मी कैक वर्षांनी घेत होतो.

'द पोएट' चा शेवट हा किंचित ओपन एंडेड असल्याने लगेच त्याचा दुसरा भाग अर्थात 'द नॅरोज' (२००४) वाचायला घेतला. आश्चर्य म्हणजे द पोएटचा नायक असलेल्या जॅकचा या कादंबरीत साधा उल्लेखही नाहीये! 'द नॅरोज'ची सुरुवातीची सुमारे पन्नासेक पानं वाचून झाल्यावर त्यात टेरी मॅकॅलबचे भूतकाळातले आणि बॉश आणि टेरीने यापूर्वी एकत्र काम केल्याचे उल्लेख यायला लागले. तोवर मी टेरी मॅकॅलब नायक असलेली एकही कादंबरी वाचली नव्हती. त्यामुळे नॅरोज व्यवस्थित समजून घेण्यासाठी टेरीचं नॅरोजच्या आधीचं पुस्तक अर्थात 'अ डार्कनेस मोअर दॅन नाईट' वाचणं आवश्यक आहे हे लक्षात आलं. आता 'डार्कनेस..' सुरु केल्या केल्या त्यात टेरीच्या त्याआधीच्या पुस्तकातली आश्चर्यकारक केस आणि रहस्यांचे उल्लेख वारंवार येतायत हे लक्षात आलं. यावेळी मात्र वीसेक पानांमधेच हे लक्षात आलं की 'डार्कनेस..' वाचण्यापूर्वी त्यापूर्वीचं आणि अर्थात टेरी नायक असलेलं पहिलं पुस्तक 'ब्लड वर्क' (१९९८) वाचल्याशिवाय काही हा गुंता सुटणार नाही. त्यामुळे ताबडतोब 'ब्लड वर्क' वाचायला घेतलं. 'ब्लड वर्क' सुरु केल्यावर पुन्हा एकदा 'द पोएट' सारखीच अवस्था होऊन बसली. 'ब्लड वर्क' अक्षरशः झपाटल्यागत संपवलं आणि अक्षरशः थक्क होऊन कॉनलीला मनोमन लक्षावधी वेळा साष्टांग दंडवत घातले!

त्यानंतर हे सगळं प्रकरण जिथून सुरु झालं होतं त्या जॅक मॅकइव्हॉयकडे परत जाणं भागच होतं. 'द स्केअरक्रो' (२००९) आणि 'फेअर वॉर्निंग' (२०२०) या जॅकच्या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या पुस्तकाच्या वाचनानंतर जॅक मॅकइव्हॉय प्रकरण एकदाचं सुफळ संपूर्ण झालं. स्केअरक्रो आणि फेअर वॉर्निंग ही पोएटच्या तुलनेत सामान्य म्हणता येण्यासारखी असली तरीही त्यातल्या सीरियल किलर्सचे स्वभाव, कार्यपद्धती, खून करण्याच्या अजब पद्धती इत्यादी बाबींवर कॉनलीने केलेलं संशोधन वाचकांना तोंडात बोटं घालायला भाग पाडेल असं आहे.

आवडती पुस्तकं, आवडती पुस्तक-मालिका आणि आवडतं पात्र:

माझ्या आवडत्या टॉप-५ कॉनली कादंबऱ्यांची यादी करणं खरं तर फार अवघड आहे. कारण फार न आवडलेल्या काही कादंबऱ्यांमध्येदेखील काही काही गोष्टी, घटना, प्रसंग, वर्णनं इतकी विलक्षण आहेत की ती पुनःपुन्हा वाचावीशी वाटत राहतात. तरीही टॉप-५ नावं काढायचीच झाल्यास ती खालीलप्रमाणे असू शकतील. (ही यादी व्यक्तिपरत्वे बदलेल हे तर ओघानेच आलं पण तरीही एखाद्या वाचकाला कॉनली वाचायला सुरुवात करायची असल्यास तर या क्रमाने वाचल्यास कॉनलीच्या लेखणीचं सामर्थ्य लक्षात येण्यास मदत होऊ शकते.)

१. द पोएट

२. लिंकन लॉयर

३. द ब्रास वर्डीक्ट

४. ब्लड वर्क

५. फेअर वॉर्निंग


माझी सर्वाधिक आवडती पुस्तक मालिका ही निर्विवादपणे 'लिंकन लॉयर' हीच आहे. लिंकन लॉयर मालिकेतली पुस्तकं उत्तरोत्तर मुरत जातात, अधिकाधिक रंगत जातात. मिकी, त्याचे सहकारी, ‘त्याच्या’ घटस्फोटित पत्नी, त्याचा ड्रायव्हर, त्याचा इन्वेस्टीगेटर अशा सर्व पात्रांची व्यक्तिचित्रं प्रत्येक कादंबरीगणिक अधिकाधिक सुस्पष्ट होत जातात. दर पुस्तकागणिक मिकी समोर उभी राहणारी नवनवीन आव्हानं, त्यांना तोंड देत, धडपडत दर वेळी नव्या दमाने उभा राहणार मिकी, सरकारी यंत्रणेतल्या पळवाटा शोधून काढून त्यांचा आपल्या अशिलांसाठी आणि अर्थातच स्वतःसाठी फायदा करून घेणारा धडपड्या मिकी, पाचव्या आणि सहाव्या पुस्तकात तर थेट जीवावर बेतलेल्या संकटांना परतवून लावणारा मिकी, सातव्या पुस्तकात वारंवार अपयशी ठरून, लहान लहान लढाया हरुनही अखेरीस महत्वाचं युद्ध जिंकणारा मिकी हा सगळा कधीही न विसरता येण्याजोगा आणि प्रत्येकाने आवर्जून घ्यावा असा अनुभव आहे.

लिंकन लॉयरची पुस्तक-मालिका कितीही आवडती असली तरीही माझं सगळ्यात आवडतं पात्र हे जॅक मॅकइव्हॉय हेच आहे. द पोएट आणि फेअर वॉर्निंग मध्ये त्याने दाखवलेला शोध पत्रकारितेचा उत्कृष्ट नमुना,  त्याची निर्भय पत्रकारिता, जिद्दी, धडपड्या आणि कधीही हार न मानणारा स्वभाव यामुळे मॅकइव्हॉयला पर्यायच नाही! (त्यानंतर अर्थातच मिकीचाच नंबर लागेल हे निश्चित). आणि त्यामुळेच मला ज्या एका गोष्टीचं अत्यंत आश्चर्य आणि तेवढंच दुःखही वाटत राहतं ती म्हणजे 'द पोएट' सारखी अप्रतिम कलाकृती आत्तापर्यंत छोट्या-मोठ्या पडद्यावर आलेली नाही! 'द पोएट' मध्ये असलेली गुंतागुंत पाहता हा एका अडीच-तीन तासांच्या चित्रपटात कोंबून बसवण्याचा प्रकार नाही हेही तितकंच खरं असलं तरी त्यावर एखादी पूर्ण लांबीची नाही तर निदान एखादी मिनीसिरीज तरी आवर्जून निर्माण केली जावी अशी माझी फार इच्छा आहे.

एखादी उत्तम कलाकृती जन्माला घालणं, एखादं विलक्षण पात्र एखाद्या कादंबरीपुरतं उभं करणं ही बाब कितीही अवघड असली तरी अशक्य खचितच नाही. अशक्य बाब ही आहे की अप्रतिम पात्रं, बांधीव कथा, टोकदार संवाद, स्तंभित करून टाकणाऱ्या घटनांची मांडणी सातत्याने करत राहणं आणि हे सारं वारंवार आणि नियमितपणे करत असताना दर्जाशी कुठेही तडजोड होऊ न देणं. 

या सगळ्या गोष्टी वर्षानुवर्षं करत राहणं ही खरोखर अशक्यकोटीतली बाब आहे. पण ती सर्वसामान्य लेखकांसाठी. कॉनलीसारख्या कसलेल्या चतुरस्र चॅम्पियन साहित्यिकासाठी नाही. कॉनली हे रसायनच अजब आहे. त्याचा सातत्याने चालू असणारा रिसर्च, नवनवीन कल्पना, सर्वस्वी नवीन धर्तीच्या गुन्हेकथा इत्यादी पाहता हा माणूस दरवेळी एवढं सगळं नवनवीन आणतो कुठून आणि कसं हा प्रश्न पडत राहतो. पण अर्थात तो ही सामान्य वाचकांना. कॉनलीच्या चाहत्यांना नाही. कॉनलीच्या चाहत्यांना एव्हाना माहीत झालेलं असतं की या साऱ्या गोष्टी कॉनलीसाठी 
आता सवयीचा भाग झालेल्या आहेत, हे दर्जातलं सातत्य राखणं त्याच्यासाठी नित्यनेमाचा भाग आहे.

वाचकांना सातत्याने गुन्हेविश्वातल्या अनोख्या प्रवासाला नेणाऱ्या, त्यांचं वाचनविश्व समृद्ध करणाऱ्या अशा या मायकल कॉनलीचा आज (२१ जुलै) वाढदिवस. आज कॉनली वयाची ६८ वर्षं पूर्ण करतोय. आयुष्याच्या अर्ध्याहून अधिक काळ दर्जेदार लिखाण करून, वाचकांना मोहून टाकणाऱ्या या किमयागार क्राईम-फिक्शन लेखकाच्या लेखणीतून यापुढेही वाचकांना खिळवून ठेवणारं साहित्य असंच उत्तरोत्तर जन्माला येत राहो या मनोकामनांसह त्याला वाढदिवसाप्रित्यर्थ हार्दिक शुभेच्छा!

#HBDMichaelConnelly

#HBDConnelly

--हेरंब ओक

Friday, June 28, 2024

स्वीडन, वॉलंडर आणि मॅन्केल

माझ्या इंग्रजी (फिक्शन) वाचनाचा प्रवास आजवर (काही मोजके अपवाद वगळता), साधारणतः एखादी सिरीज/चित्रपट बघून तो आवडल्यास, तो चित्रपट अथवा सिरीज ज्या पुस्तकावर आधारित आहे ते पुस्तक आणि त्यानंतर त्या लेखकाची अन्य पुस्तकं मिळवून वाचणं अशा प्रकारे होत आलेला आहे. मात्र नुकताच हा क्रम उलट्या दिशेने घडण्यासाठी निमित्त ठरेल अशी एक घटना घडली. एका इंग्रजी पुस्तकांच्या समूहात एका वाचकाने त्याने २०२३ मध्ये वाचलेल्या निवडक पुस्तकांची छायाचित्रं टाकली होती. सगळी पुस्तकं रहस्य, थरार, गुन्हेगारी या माझ्याही आवडत्या जॉनरमधलीच होती. जॉन ग्रिशम, ली चाईल्ड, मायकल कॉनली, डॅन ब्राऊन, डेव्हिड बालडाची, जेम्स पॅटर्सन या नेहमीच्या यशस्वी कलाकारांची मांदियाळी तिथे जमली होती. मात्र त्यात एका वेगळ्या लेखकाने माझं लक्ष वेधून घेतलं. त्याचं नाव होतं हेनिंग मॅन्केल (Henning Mankell) आणि पुस्तकाचं नाव होतं 'फेसलेस किलर्स' (Faceless Killers). लेखकाच्या नावावरून हा आपला नेहमीचा अमेरिकन, ब्रिटिश लेखक नाही हे लक्षात येत होतं. थोडी शोधाशोध केल्यावर मॅन्केल साहेब स्वीडनमधल्या आघाडीच्या ज्येष्ठ लेखकांपैकी एक असून त्यांनी त्यांचा मानसपुत्र असलेला स्वीडिश पोलीस इन्स्पेक्टर कर्ट वॉलंडर (Kurt Wallander) या पात्राला केंद्रस्थानी ठेवून साधारण १२ पुस्तकं लिहिली असल्याची माहिती मिळाली. त्यातलं पहिलं पुस्तक, अर्थात ज्यात कर्ट वॉलंडर हे पात्र पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीस येतं ते पुस्तक म्हणजे फेसलेस किलर्स असून ते मॅन्केल यांनी ३३ वर्षांपूर्वी अर्थात १९९१ साली लिहिलं असल्याचंही समजलं.

कुतूहल म्हणून मी फेसलेस किलर्स वाचायला सुरुवात केली. निदान पहिलं प्रकरण वाचून बघून पुस्तक कसं आहे, वर्णनं कशी आहेत याचा काहीतरी अंदाज बांधू असा विचार केला. पण झालं उलटच! पहिलं प्रकरण तर दहा मिनिटांत संपलंच पण आपोआपच दुसरं प्रकरण वाचायला सुरुवात झाली होती. त्यादिवशी रात्री उशिरापर्यंत जागून तीन प्रकरणं संपवली आणि मॅन्केलची शैली, वर्णनं, त्याने वॉलंडरचं पात्र ज्या खुबीने रंगवलं होतं ते पाहून थक्कच होऊन गेलो.

आपल्याला नेहमीच्या सवयीच्या असणाऱ्या न्यूयॉर्क, लॉस अँजल्स, शिकागो, लंडन, वगैरे ठिकाणांच्या वर्णनांच्या ऐवजी स्वीडन मधल्या स्केन (Skane/Scania) काऊंटीतल्या यस्टाड (Ystad) शहराच्य्या  पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेलं एक दुर्गम गाव, तिथलं राहणीमान, तिथले शेतकरी इत्यादींची मी यापूर्वी कधीच न वाचलेली वर्णनं होती. गावातल्या एका वयोवृद्ध एका शेतकऱ्याचा आणि त्याच्या पत्नीचा अतिशय अमानुषपणे खून करण्यात येतो आणि तिथे आपला नायक वॉलंडर जाऊन पोचतो आणि तपासाला सुरुवात करतो. शेतकऱ्याच्या पत्नीने मृत्यूपूर्वी 'फॉरेन' अशा अर्थाचा काहीतरी शब्द उच्चारला असल्याचं त्याच्या शेजाऱ्यांकडून कळल्यावर वॉलंडर त्याही दिशेने तपास करायला सुरुवात करतो. खूप तपास करून, शोधाशोध करूनही सगळीकडे नन्नाचा पाढा असल्याने वॉलंडर आणि त्याचे सहकारी अक्षरशः हतबल होऊन जातात. दरम्यान एका निर्वासित व्यक्तीचा खून होतो आणि रहस्य अधिकच गहिरं होत जातं.

बरीच सव्यापसव्य करत, अपयशं पचवत, धक्के खात वॉलंडर आणि त्याचे सहकारी काही निष्कर्षांपर्यंत पोचतात आणि पुढचा प्रवास त्या दिशेने सुरु करतात आणि अखेरीस महत्प्रयासाने आणि भरपूर उलथापालथ झाल्यानंतर अतिशय धक्कादायकरीत्या तिन्ही खुन्यांपर्यंत पोचण्यात यशस्वी ठरतात. या प्रवासादरम्यान स्वीडन देश, तिथलं ग्रामीण आणि शहरी जनजीवन, सरकारी कारभार, सुसंपन्न आणि प्रगत असलेला पश्चिम युरोप आणि तुलनेने मागास असा पूर्व युरोप, तिथल्या निर्वासितांचे प्रश्न, त्यातून जन्माला आलेली गुन्हेगारी या सगळ्याची इत्यंभूत माहिती वाचकाला मिळत जाते. वॉलंडरचं साधं परंतु चौकस व्यक्तिमत्व, त्याचे त्याच्या कुटुंबाशी, सहकाऱ्यांशी, वरिष्ठांशी असणारे संबंध, नात्यांमधली ओढाताण, त्याच्या तपासाची शैली, एखाद्या गोष्टीचा अखेरपर्यंत पाठपुरावा करत राहण्याचा हट्टीपणा या सगळ्याचं अतिशय प्रवाही असं वर्णन करण्यात लेखक हेनिंग मॅन्केल अतिशय यशस्वी ठरला आहे.

इतका यशस्वी की पहिलं पुस्तक काही दिवसांत संपताच वॉलंडर मालिकेतलं पुढचं पुस्तक अर्थात डॉग्ज ऑफ रीगा (The Dogs of Riga) आपसूकपणेच सुरु केलं गेलं. दुसऱ्या पुस्तकात स्वीडनशी सागरी हद्द शेअर करणारा शेजारी देश अर्थात लाटविया (Latvia, ज्याच्या राजधानीचं नाव रीगा आहे) देशातलंअस्थिर जीवन, हुकूमशाही सदृश परिस्थिती इत्यादी आपण आजवर कधीही न वाचलेल्या गोष्टींशी आपली ओळख करून दिली जाते. पुस्तकाच्या सुरुवातीलाच अतिशय छळ करून ठार मारण्यात आलेल्या दोन व्यक्तींची प्रेतं एका नावेतून स्वीडनच्या सागरी हद्दीत प्रवेश करतात. अर्थातच आपल्या नायकाला तपास करण्यासाठी नियुक्त केलं जातं. दोन्ही मृत व्यक्ती लाटवियाचे नागरिक असून लाटवियामधील गुन्हेगारी टोळ्यांशी त्यांचे संबंध असून लाटवियामधला एक पोलीस अधिकारी अधिक तपासासाठी स्वीडनमध्ये येणार असतो. तो काही दिवस येऊन, तपास करून परत गेल्यावर लगेच त्याचा त्याच्या देशात खून केला जातो. हे सगळं नक्की काय रहस्य आहे हे न कळल्याने लाटविया पोलिसांकडून मदत म्हणून वॉलंडरला लाटवियामध्ये पाठवण्याची विनंती केली जाते. लाटवियाला पोचल्यावर तिथलं विचित्र जनजीवन, गुन्हेगारी समाज, अंमली पदार्थ आणि त्या अनुषंगाने पोखरली गेलेली नोकरशाही आणि सरकार बघून वॉलंडरला अक्षरशः धक्काच बसतो. काही काळाने वॉलंडर आपल्या नेहमीच्या शैलीने याही खुन्यांचा शोध लावण्यात यशस्वी होतो.

तिसऱ्या पुस्तकात तर एका गुन्ह्याच्या शोधासाठी वॉलंडरला आफ्रिकेत पाठवण्यात आलं असून तिथे योगायोगानेच त्याला नेल्सन मंडेलांच्या खुनाच्या कटाचा सुगावा लागतो अशी साधारण कथा आहे. तिसरं पुस्तक मी अजून सुरु केलं नाहीये पण लवकरच करेन. मॅन्केलच्या कादंबऱ्या या एका अर्थी थोड्या ताणलेल्या दीर्घकथा आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

त्याच्या या वैशिष्ट्यामुळेच त्याच्या पुस्तकांवर आधारित वॉलंडर नावाच्या मालिकेची निर्मिती स्वीडिश आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये करण्यात आली आहे. ब्रिटिश मालिका बीबीसी वर असून साधारण दीड तासाचा एक भाग असून तो वॉलंडरच्या एकेका पुस्तकावर आधारलेला आहे. इंग्रजी मालिकेत वॉलंडरचं पात्र Kenneth Branagh या अभिनेत्याने साकारलं असून अगाथा ख्रिस्तीच्या 'मर्डर ऑन द ओरियंट एक्स्प्रेस' या २०१७ साली प्रकाशित झालेल्या चित्रपटात Branagh ने सुप्रसिद्ध गुप्तहेर हर्क्युल पॉरो (Hercule Poirot) याची भूमिका केली होती.

नेहमीची, टिपिकल शहरी, चकचकीत अमेरिकन वर्णनं वाचून कंटाळा आला असेल, युरोपातलं राजकारण, समाजजीवन याची थोडीफार आवड असेल तर वॉलंडरच्या तपासविश्वात आवर्जून प्रवेश करून बघाच. काहीतरी वेगळं वाचल्याचा आनंद नक्की मिळेल. आणि अर्थातच ज्यांना पुस्तकं वाचायची इच्छा/वेळ नसेल ते थेट मालिका तर बघू शकतातच. जय वॉलंडर, जय मॅन्केल, जय स्वीडन!!!


--हेरंब ओक

Tuesday, June 18, 2024

कडवट विकृतीचं दर्शन घडवणारं ‘बिटर चॉकलेट’

जगभरात अव्याहतपणे चालू असलेल्या बाल लैंगिक शोषणाला केंद्रस्थानी ठेवून लिहिल्या गेलेल्या पिंकी विराणी लिखित आणि मीना कर्णिक अनुवादित ‘बिटर चॉकलेट’ या २००९ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात पानोपानी आढळणारा कडवटपणा पुस्तकाचं शीर्षक आणि मुखपृष्ठ (षांताराम पवार) यांनाही व्यापून राहिलेला आहे. शोषित
बालके, त्यांचे पालक, शेजारीपाजारी, नातलग, समाजसेवी संस्थांमध्ये कार्यरत व्यक्ती, समाजसेवक, (तथाकथित) माननीय न्यायमूर्ती, पोलीस आणि स्वतः शोषक अशा अनेक लोकांच्या या विषयाशी संबंधित अशा शेकडो अनुभवांचं संकलन असं या पुस्तकाचं स्वरुप आहे. यात अल्पवयीन मुलगा/मुलगी यांच्याशी त्यांचे सख्खे/सावत्र वडील, सख्खा भाऊ, मावस/मामे/आत्ये/चुलत भाऊ, काका, मामा, आजोबा, नोकर, स्वयंपाकी, मित्र, शेजारी, शिक्षक, क्रीडा शिक्षक, मैत्रीण यांनी जबरदस्तीने, धूर्तपणे, फसवून, ब्लॅकमेल करून केलेल्या लैंगिक शोषणाचे असंख्य संदर्भ दिले आहेत. या विषयावर जगभरात केल्या गेलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष, अभ्यासकांचे अनुभव, विविध अहवाल, अनेकविध पुस्तके यांचेही उल्लेख पुस्तकादरम्यान येत राहतात. पुस्तकाच्या अखेरीस दिसणाऱ्या संदर्भग्रंथांच्या यादीवरून नजर फिरवली असता, अतिशय अभ्यास करून हे पुस्तक लिहिलं आहे हे लक्षात येतं.

पुस्तकाच्या पहिल्या पानापासून एकेक भयंकर अनुभव वाचत पुढे जात असताना आपला मेंदू आणि गात्रं बधिर होऊन जातात, संवेदना साकळून जाऊन हळूहळू मरून जातात. तरी पुस्तकातली अत्याचारी वर्णनं संपत नाहीत. पिंकी विराणी यांनी अरुणा शानभाग हिच्यावरील दुर्दैवी अत्याचाराचं वर्णन केलेलं 'अरूणाची गोष्ट' हे पुस्तक मी यापूर्वी वाचलं होतं. तेही असंच भयंकर अस्वस्थ करून टाकणारं आहे. हे पुस्तक वाचताना ती अस्वस्थता काही हजार पटींनी वाढलेली असते.    

सावजं कशी हेरली जातात, त्यांना कसं फसवलं जातं, अत्याचारपीडित बालकांची लक्षणं कोणती, तक्रार करणाऱ्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय असते, शोषक व्यक्तीची प्रतिक्रिया कशी असते, सामाजिक संस्था, पोलीस, डॉक्टर्स, समाज, न्यायालयं यांच्या जबाबदाऱ्या काय इत्यादी सर्व गोष्टींवर या पुस्तकात तपशीलवारपणे चर्चा केली आहे. त्याचप्रमाणे या विकृतीवरचे उपाय, त्यापासून आपल्या मुलांचे संरक्षण करण्याच्या पद्धती,  इत्यादींवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून त्या दरम्यान असंख्य शोषितांचे निरनिराळ्या भयंकर अनुभवांची पेरणी असं पुस्तकाचं साधारण स्वरूप आहे.

दरम्यान हे पुस्तक वाचताना प्रचंड धक्कादायक अशी काही माहिती मिळते ज्यामुळे वाचक पूर्णतः हादरून जातो. 'भक्ष्य' मिळण्याची सुलभता आणि अत्यंत ढिसाळ कायदे यामुळे जगभरातल्या विकृत जनावरांचं भारत हे आता एक अतिशय आवडतं स्थळ बनलं असून गोवा हा तर त्यांचा लाडका अड्डाच झालेला आहे. त्याखालोखाल हिमाचल, केरळ यांनाही प्राधान्य दिलं जात आहे. भारतीय मुलांमध्ये आढळणारं एड्सचं नगण्य प्रमाण हे देखील जगभरातल्या विकृतांचा ओढा भारताच्या दिशेने वाढण्यामागचं एक प्रमुख कारण आहे.

लेन पर्नड आणि तिच्या प्रियकरासोबत अठरा जणांवर गोवा पोलिसांनी खटला दाखल केला. केरळमधल्या कोवालम येथे एका जर्मन पर्यटकाला प्रत्यक्ष संभोग करताना पकडलं गेलं, पण त्याने लाच देऊन स्वतःची सुटका करून घेतली. गोव्यातल्या हॉटेलमध्ये पोलिसांनी अन्य एका जर्मन नागरिकाला एका अल्पवयीन मुलासोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह कृत्यं करत असताना पकडलं असता तो 'अनैसर्गिक गुन्हा करत असल्याचे सिद्ध होत नसल्याने 'आदरणीय' न्यायालयाने त्याला सोडून दिलं. गोव्यात अनाथाश्रमाच्या नावाखाली बाल लैगिक शोषणाचा भलामोठा कारभार चालवणारे फादर आणि ब्रदर फ्रेडी यांना जेव्हा १९९१ मध्ये अटक करण्यात आली तेव्हा पोलिसांना तिथे लहान मुलांची २३०० हून अधिक अश्लील छायाचित्रं, सिरिंज, झोपेची औषधं, कामोत्तेजक द्रव्यं असे अनेक पुरावे सापडले. परंतु पंचेचाळीस दिवसांच्या आत पोलिसांनी फ्रेडीला 'पुराव्यांच्या अभावी' जामिनावर सोडून दिलं.

बाल लैगिक शोषणासंदर्भातले भारतातल्या ढिसाळ कायद्यांची आणि निद्रिस्त न्यायव्यवस्थेची जगभरात इतकी दुष्कीर्ती पसरलेली आहे की न्यूझीलंडमधील एका पुरुषाला या गुन्ह्यासंदर्भात अटक झाली असतात त्याने आपला खटला भारतात चालवावा अशी विनंती केली आणि ती मान्यही करण्यात आली!!!

जगभरात वेगाने पसरणाऱ्या वोकीझम (wokism) नावाच्या अक्राविक्राळ राक्षसाने या क्षेत्रातही आपली पावलं टाकायला सुरुवात केली आहे. या पुस्तकात एकामागोमाग एक येणाऱ्या विकृत आणि किळसवाण्या वर्णनांनंतर आपलं मन निबर व्हायला लागलेलं आहे असं वाटत असतानाच पुस्तकाच्या  साधारणतः मध्यावर एक अत्यंत धक्कादायक आणि प्रचंड किळसवाणा असा गौप्यस्फोट केला जातो जो वाचून वाचकाच्या हातातून पुस्तक अक्षरशः गळून पडतं !!!

भारतात आणि जगभरात संभोगासाठी लहान मुलग्यांना मागणी असते ही वस्तुस्थिती आता सर्वत्र स्वीकारण्यात आलेली आहे. अमेरिकेत तर लहान आणि तरुण मुलांसोबत संभोग करता यावा यासाठी द नॉर्थ अमेरिकन मॅन बॉय लव असोसिएशन (नाम्बला - NAMBLA) नावाची एक संघटना स्थापन करण्यात आलेली असून "लहान मुलं आणि मोठी माणसं यांना आपलं प्रेम लैंगिक दृष्ट्या व्यक्त करावंसं वाटलं तर तो कायद्याने गुन्हा असू नये" या मागणीसाठी यांनी ही चळवळ उभी केली आहे. लहान मुलगे आवडणाऱ्या पुरुषांनी लिहिलेली 'व्हेअर द यंग वन्स आर' नावाची एक पुस्तिका अमेरिकेत हातोहात खपली. पाच डॉलर्स किंमत असणाऱ्या या ३० पानी पुस्तिकेच्या ७२००० प्रती तेरा महिन्यांत  संपल्या. 

सोळा वर्षाखालील २५ टक्के मुलग्यांना आणि ४० टक्के मुलींना अशा प्रकारचे अनुभव आलेले असतात. थोडक्यात २००२ पर्यंत लैंगिक दृष्ट्या शोषण होणाऱ्या मुलांमध्ये ४ कोटींहून अधिक मुलगे तर ६ कोटींहून अधिक मुली आहेत. या सगळ्या प्रकाराला कधीतरी कुठेतरी आळा बसावा, संबंधित कायद्यांमध्ये तातडीने सुधारणा व्हाव्यात असं आपल्यासारख्या सुजाण नागरिकांना वाटत असेल तर त्यासाठी लेखिकेने पुस्तकाच्या शेवटी केंद्रीय कायदा मंत्री, केंद्रीय गृहमंत्री, भाजप आणि काँग्रेस पक्ष आणि खुद्द पंतप्रधान यांच्या कार्यालयांचे संपर्कासाठीचे पत्ते दिलेले असून त्या पत्त्यांवर पत्रं पाठ्वण्याचं वाचकांना आवाहनही केलं आहे.

संपूर्ण पुस्तकभर वाचलेल्या गडद, काळ्या, विचित्र आणि विकृत अनुभवांच्या माऱ्यानंतर एका सकारात्मक नोंदीवर शेवट करण्याचा लेखिकेचा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद असला तरी पुरेसा मुळीच नाही. कारण पुस्तकभर निरनिराळ्या काल्पनिक नावांनी वावरणारी, असह्य यातना आणि अन्याय सहन केलेली खरीखुरी लहान मुलं मात्र यापुढे कधीच वाचकांच्या मेंदूतून, त्यांच्या जाणिवांमधून बाहेर पडणार नसतात. न्याय मिळावा यासाठी आपल्याकडे सतत आशेने बघणाऱ्या त्या अदृश्य मुलांना नजरेआड करण्याइतकं धैर्य आपल्या अंगी कधीच येणार नसतं!!!

--हेरंब ओक

२०२५ ची वाचनपूर्ती

२०२५ च्या वर्षात जाडजूड पुस्तकांची आणि त्याचबरोबर इंग्रजी पुस्तकांची संख्या जास्त असल्याने अंतिम आकड्यावर थोडा परिणाम झाला. पण तरीही अर्धशतक...