तो आज ७० वर्षांचा झालाय. गेली २७ वर्षं अथकपणे रहस्यमय आणि थरारक कादंबऱ्या लिहून वाचकांच्या मनावर गारुड करणारा तो बघता बघता ७० वर्षांचा झालाय. जॅक रीचर या महाकाय अशा माजी सैनिकाला केंद्रस्थानी ठेवून त्याने आत्तापर्यंत २९ कादंबऱ्या आणि एक कथासंग्रह लिहिला आहे. सालाबादप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात त्याची रीचरवरची 'इन टू डीप' नावाची कादंबरी प्रसिद्ध झालीच पण यावर्षी त्याने त्याच्या चाहत्यांना अजून एक सुखद धक्का दिला आहे.
यापूर्वी त्याच्या
लघुकथांचा 'नो मिडल नेम' नावाचा एक संग्रह २०१७
साली प्रकाशित झाला होता. त्यात रीचरच्या बालपणीच्या, तो सैन्यात असतानाच्या, सैन्यात असताना त्याने
बजावलेल्या निरनिराळ्या कामगिऱ्यांवर आधारित अशा अनेक कथा होत्या. वाचकांना एका
जागी खिळवून ठेवणाऱ्या कादंबऱ्या लिहिणारा हा लेखक, कथा हा लेखनप्रकारही तितक्याच लीलया हाताळू शकतो हा त्याच्या वाचक
चाहत्यांसाठी एक सुखद धक्का होता.
यावर्षी त्याने अजून
एक पाऊल पुढे टाकलं. नेहमीप्रमाणे ऑक्टोबरमधली त्याची रीचर नायक असलेली कादंबरी तर
प्रकाशित झालीच पण त्याच बरोबरीने याच वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात त्याच्या
वाचकांसाठी दिवाळी बोनस म्हणून त्याचा 'सेफ इनफ' नावाचा अजून एक
कथासंग्रह देखील प्रकाशित झाला. हा कथासंग्रह अनेक बाबतीत वेगळा आहे.
पहिली गोष्ट म्हणजे यातल्या कथा या नॉन-रीचर आहेत. अर्थात यातल्या एकाही कथेत रीचर केंद्रस्थानीच काय
तर कथेतही कुठे नाही. सगळ्या कथा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी, हिटमॅन, गॅंगस्टर्स, ब्लॅकमेलर्स, भ्रष्ट पोलीस या आणि
अशा लोकांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या अर्थात कृष्णविश्वातल्या आहेत. रीचर, त्याच्या महाकाय
शरीराची किंचित विनोदी वर्णनं, त्याच्या हाणामाऱ्यांची तपशीलवार वर्णनं, त्याची हुशारी दाखवणारे त्याच्या तोंडचे अतिशय टोकदार संवाद या सर्वासर्वांचा
अभाव असताना या कथा कशा जमल्या असतील हा विचार वाचकाच्या मनात येऊ शकतो.
हा कथासंग्रह वाचायला
सुरु करण्यापूर्वी तर या नॉन-रीचर कथा आहेत हे तर मला माहीतही नव्हतं. पुस्तकाच्या सुरुवातीला मनोगतात या नॉन-रीचर
कथा असण्याविषयीची एक हिंट आपल्याला मिळते. त्याचबरोबर यातल्या काही कथा फसलेल्या, काही प्रकाशकांनी न
छापलेल्या, काही लेखकाला
स्वतःलाही फारशा न आवडलेल्या अशा विविध विभागांतल्या आहेत अशीही माहिती मिळते.
मात्र या कथा अतिशय
खुसखुशीत,
आवश्यक तिथे रहस्यमय, वेगवान, थरारक तर झाल्या आहेतच
पण जवळपास प्रत्येक कथेच्या अखेरीस एक धक्का बसतो ज्याने आपण आत्तापर्यंत
वाचलेल्या कथेचं संपूर्ण रूपच बदलून जातं. जवळपास प्रत्येक कथा 'Unreliable
Narrator' प्रकारातली आहे.
अर्थात निवेदन करणारी व्यक्ती वाचकांसमोर जे चित्र उभं करत असतं ते आभासी असतं, सत्यापासून अनेक योजनं
दूर असतं. सत्य काय आहे हे बऱ्याचदा शेवटच्या दोन-तीन ओळींमधून वाचकांसमोर उलगडलं
जातं. एक-दोन अपवाद वगळता जवळपास सर्वच कथांचे शेवट हे अतिशय धक्कादायक, डार्क, उलथापालथ करवणारे
आहेत.
आणि दुसरं अतिशय
महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या सर्व कथा रीचरच्या मानसपित्याने स्वतः एकट्याने
लिहिल्या आहेत. यातल्या कुठल्याही कथेशी त्याच्या बंधुराजांचा अर्थात अँड्र्यू
चाईल्ड यांचा दुरान्वयेही संबंध नाही. गेल्या सहा-सात वर्षांतल्या (सुरुवातीची २-३
वर्षं अनधिकृतपणे आणि नंतर अधिकृरित्या) सगळ्या कादंबऱ्या या दोन्ही भावांनी एकत्र
मिळून लिहिलेल्या आहेत आणि अर्थात त्यामुळेच त्यांचा दर्जा आधीच्या रीचर कादंबऱ्यांच्या मानाने ढासळलेला आहे हे रीचरचे
चाहतेही मान्य करतातच. आणि अर्थात यावरून अँड्र्यूला वेळोवेळी टीकेला सामोरंही
जावं लागलं आहे. दुसरं वैशिष्ट्य महत्वाचं आहे ते यासाठीच. कारण यात कुठेही
अँड्र्यूच्या लेखणीची ढवळाढवळ नाही. सर्व कथा या रीचरच्या दस्तुरखुद्द
मानसपित्याच्या एकट्याच्या लेखणीतून प्रसवलेल्या आहेत. त्यातले संवाद, चटपटीतपणा, प्रसंगांची बांधणी, वर्णनांची पद्धत, बारीकसारीक तपशील हे
इतके शिताफीने मांडलेले आहेत की वाचकांना रीचरच्या जुन्या कादंबऱ्यांची आठवण हटकून
होते.
आवर्जून उल्लेख कराव्या अशा काही कथांपैकी एक म्हणजे 'Section 7(a0) (operational)'. शीर्षक जेवढं गोंधळून टाकणारं आहे तितकीच कथा सरळसोट आहे. एका माणसाच्या घरात काही अनोळखी व्यक्ती त्याच्या स्वतःच्या आमंत्रणावरून आलेल्या आहेत. त्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं रंगरूप, कपडे, बसण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, स्वभाव इत्यादी गोष्टींची अगदी तपशीलवार माहिती वाचकांना पुरवली जाते. त्याचबरोबर त्यांच्या स्वभावांबद्दल आणि क्षमतांबद्दलचे अंदाज वर्तवले जातात. या सर्वांना एकत्र येऊन पुढच्या सहा महिन्यांत एक खूप मोठं टास्क पूर्ण करायचं आहे हा त्या कथेचा सारांश. मात्र शेवटच्या चार ओळींमध्ये लेखकाने जी कमाल केली आहे ते म्हणजे Unreliable Narrator प्रकारातलं सर्वोत्कृष्ट उदाहरण असावं. निदान या पुस्तकातलं तरी.
अन्य कथांपैकी एक म्हणजे Normal in every way ही कथा तर हटकून शेरलॉक होम्सची आठवण करून देणारी आहे. मात्र कथानायकाच्या नशिबी होम्स एवढंच नव्हे तर कणभरही प्रसिद्धीचं वलय किंवा कौतुक नाही. पुढची कथा मात्र माझ्यासाठी फारच विशेष आहे. दोन कारणांसाठी. एक तर त्या कथेत शेरलॉक होम्स, 221B Baker Street चे थेट संदर्भ तर आहेतच आणि दुसरं आणि अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे ते संदर्भ होम्सच्या माझ्या सर्वात लाडक्या असलेल्या The Red-Headed League कथेतले आहेत. कथेचं नावच आहे The Bone-Headed League. ज्यांनी होम्स आणि मुख्यतः The Red-Headed League वाचली आहे त्यांना यापेक्षा अधिक काही सांगायची गरजच भासणार नाही हे निश्चित. शेरलॉक होम्सच्या एकूण ५६ कथा आणि ४ लघुकादंबऱ्यांपैकी नेमक्या The Red-Headed League याच कथेची निवड ली ने आपल्या कथेसाठी करणं याचा एक अर्थ The Red-Headed League हीच त्याचीही सर्वात आवडती होम्स कथा आहे असाही असू शकतो!
Ten Keys ही आपल्या गॅंगशी फितुरी करणाऱ्या एका शुटरची कथा आहे. ही कथाही अखेरच्या चार ओळीत एकदमच रंग बदलून आपल्या समोर येते. पुस्तकाचं शीर्षक असलेली Safe Enough कथा वाचताना नक्की काय होणार आहे हे कळतच नाही मात्र अखेरीस कॉनलीच्या लिंकन लॉयर सिरीजमधल्या The Fifth Witness या कादंबरीच्या शेवटची हटकून आठवण येते हे नक्की.
रीचरच्या मानसपित्याचं लेखन तर वाचायचं आहे परंतु अँड्र्यूच्या अनावश्यक फोडणीमुळे रीचरची नवीन पुस्तकं वाचायची इच्छा मात्र होत नाही अशा द्वंद्वात सापडलेल्या वाचकांसाठी 'Safe Enough' हा लघुकथासंग्रह म्हणजे सुयोग्य तोडगा आहे. गेली सत्तावीस वर्षं वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या, हादरवून सोडणाऱ्या, थक्क करून टाकणाऱ्या, रीचरच्या अविश्वसनीय पराक्रमांचं कथन करणाऱ्या दर्जेदार कादंबऱ्या सातत्याने लिहिणाऱ्या जेम्स डोवर ग्रांट उपाख्य ली चाईल्डचा आज सत्तरावा तर त्याच्या मानसपुत्राचा अर्थात रीचरचा आज चौसष्टावा प्रकटदिन. त्यानिमित्ताने या रीचरच्या मानसपित्यास समस्त रीचरप्रेमींकडून मनःपूर्वक शुभेच्छा. आणि या सत्तराव्या जन्मदिनी ली ने वाचकांना दिलेल्या (ओन)ली चाईल्ड (अर्थात अँड्र्यू विरहित) कथासंग्रहरुपी भेटीबद्दल त्याचे विशेष आभार.
#HBDLeeChild
#HBDJackReacher
#SafeEnough
--हेरंब ओक
No comments:
Post a Comment