Monday, December 30, 2024

२०२४ मधील वाचनयात्रा

 १. माझं नाव भैरप्पा : एस एल भैरप्पा (अनुवाद - उमा कुलकर्णी)

२. जगाला पोखरणारी डावी वाळवी : अभिजित जोग

३. कायदे आझम : आनंद हर्डीकर

४. 'इंका'ची देवदरी - गूढ इंका संस्कृती आणि माचूपिच्चू : डॉ संदीप श्रोत्री

५. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीतून इस्लाम : संकलक - भरत आमदापुरे

६. हे राम - गांधी हत्याकांडाचा प्रामाणिक धांडोळा : प्रखर श्रीवास्तव (अनुवाद : डॉ सच्चिदानंद शेवडे)

७. एकात्मतेचे शिल्पकार (मुसलमान मराठी संतकवी) : रा. चिं. ढेरे

८.  महाभारताचे अनावरण : अमी गणात्रा (अनुवाद - दीपाली पाटवदकर) 

९. भिंतीआडचा चीन : श्रीराम कुंटे

१०. गार्गी अजून जिवंत आहे : मंगला आठलेकर

११. स्तोत्र मंत्रांचे विज्ञान : स्वामी सवितानंद

१२. विटाळ : दया पवार

१३. शोकोल ग्रिहो हारालो जार : तसलिमा नासरिन (अनुवाद - मंजिरी धामणकर)

१४. विघ्नविराम : श्री अय्यर (अनुवाद - दीपक करंजीकर)

१५. लॉर्ड्स ऑफ द डेक्कन : अनिरुद्ध कनिसेट्टी (अनुवाद : मीना शेटे-संभू)

१६. हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड : आर. व्ही. एस. मणी (अनुवाद - अरुण करमरकर)

१७. डॅम इट आणि बरंच काही : महेश कोठारे

१८. मी बहुरूपी : अशोक सराफ (शब्दांकन - मीना कर्णिक)

१९. माझ्या नवऱ्याच्या बायका : सुनंदा राजा गोसावी

२०. फ्री फॉल : गणेश मतकरी

२१. महाराष्ट्राची शोकांतिका : अरुण सारथी

२२. गर्द : अनिल अवचट

२३. तू धैर्याची अससी मूर्ति : अपर्णा चोथे

२४. बिटर चॉकलेट : पिंकी विराणी (अनुवाद - मीना कर्णिक)

२५. सोमाली माम द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स : सोमाली माम (अनुवाद - भारती पांडे)

२६. द स्काय इज फॉलिंग : सिडने शेल्डन (अनुवाद - बाळ कर्वे)

२७. व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी : डॉ बाळ फोंडके

२८. डेंजरस माईन्ड्स : एस हुसेन झैदी आणि ब्रिजेश सिंग (अनुवाद - अमृता दुर्वे)

२९. हेडली आणि मी : एस हुसेन झैदी आणि राहुल भट (अनुवाद - अभय सदावर्ते)

३०. पायरोज् अर्ली केसेस : अगाथा ख्रिस्ती (अनुवाद : मधुकर तोरडमल)


सेतुमाधवराव पगडी

३१. नियतीच्या विळख्यात औरंगजेब

३२. मोगल मराठा संघर्ष


शेषराव मोरे

३३. मुस्लिम मनाचा शोध

३४. चार आदर्श खलिफा

३५. अप्रिय पण

३६. विचारकलह

३७. १८५७ चा जिहाद


वपु

३८. पार्टनर

३९. वलय

४०. भुलभुलैय्या


जयवंत दळवी

४१. सुखदु:खाच्या रेषा

४२. सरमिसळ


जयंत नारळीकर

४३. अभयारण्य

४४. प्रेषित

४५. वामन परत न आला

४६. अंतराळातील स्फोट


वि. स. खांडेकर

४७. ययाति

४८. सुखाचा शोध


सुधा मूर्ती

४९. डॉलर बहू : अनुवाद - उमा कुलकर्णी

५०. बकुळा : अनुवाद -  लीना सोहोनी

५१. परीघ : अनुवाद - उमा कुलकर्णी

५२. अस्तित्व : अनुवाद - प्रा. ए. आर. यार्दी


अतुल कहाते

५३. उत्तर कोरिया - जगाला पडलेले एक कोडे!

५४. वॉरन बफे

५५. 'च' ची भाषा

५६. अंतराळ स्पर्धा

५७. नेल्सन मंडेला

५८. फिडेल कॅस्ट्रो


रुपाली भुसारी

५९. आत्मघातकी दहशतवाद

६०. दहशतवादाच्या विरोधात इस्रायल


जितेंद्र दिक्षित 

६१. मुंबई आफ्टर अयोध्या - एक बदलते शहर : अनुवाद - वर्षा वेलणकर

६२. ३५ दिवस - २०१९ ने दिली महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी : अनुवाद - पराग पोतदार


English


६३. Safe Enough : Lee Child

६४. Framed: Astonishing True Stories of Wrongful Convictions : John Grisham and Jim McCloskey

६५. Goat Days - Benyamin

६६. Ticket to Syria: A Story About the ISIS in Maldives - Shirish Thorat

६७. Reversion : O Shruti


Robert Spencer

६८. The Truth About Muhammad: Founder of the World's Most Intolerant Religion

६९. Did Muhammad Exist?: An Inquiry into Islam’s Obscure Origins


Michael Connelly

७०. Resurrection Walk (Lincoln Lawyer series)

७१. Blood Work (Terry McCaleb series)

७२. A Darkness More Than Night (Terry McCaleb / Harry Bosch series)

७३. The Narrows (Harry Bosch series)

७४. The Poet (Jack McEvoy series)

७५. Scarecrow (Jack McEvoy series)

७६. Fair Warning (Jack McEvoy series)

७७. The Crossing (Harry Bosch/Lincoln Lawyer series)

७८. Concrete Blonde (Harry Bosch series)


Vashi Sharma

७९. The Naked mughals

८०. Indian muslims

८१. Islam means peace, But

८२. Every muslim is not a terrorist


Henning Mankell (Kurt Wallander series)

८३. Faceless Killers

८४. Dogs of Riga


८५. Gone Girl : Gillian Flynn

८६. The Vault of Vishnu : Ashwin Sanghi

८७. Memory Man : David Baldacci


--हेरंब ओक


Monday, December 9, 2024

'निरपराध' गुन्हेगारांच्या खंतावून सोडणाऱ्या अविश्वसनीय सत्यकथा : Framed

आत्तापर्यंत सुमारे पन्नासेक पुस्तकं लिहिणाऱ्या जॉन ग्रीशमने यापूर्वी फक्त एकच नॉन-फिक्शन पुस्तक लिहिलं आहे. पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे एक निर्दोष व्यक्ती कित्येक वर्षं तुरुंगात कशी सडते याची तपशीलवार आणि त्यामुळेच अविश्वसनीय घटनांनी भरलेल्या प्रसंगांची मालिकाच त्याने आपल्या 'The Innocent Man: Murder and Injustice in a Small Town' नावाच्या पुस्तकात मांडली आहे. पुस्तक संपवल्यावर येणारी विषण्णता आणि हतबलता असह्य स्वरूपाची असते. याच पुस्तकावर आधारित त्याच नावाची एक मिनीसिरीजही नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.


जॉन ग्रीशमने जिम मॅकक्लॉसकी (Jim McCloskey) या सहलेखकाच्या सोबतीने लिहिलेलं आणि मुख्य म्हणजे याच विषयाला वाहिलेलं Framed नावाचं अजून एक पुस्तक ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रकाशित झालं. 'Framed: Astonishing True Stories of Wrongful Convictions' असं पूर्ण शीर्षक वाचल्यावरच आपल्यापुढे काय वाढून ठेवलं आहे हे आपल्या लक्षात येतं. Innocent man मध्ये एका निर्दोष माणसाला पोलिसांनी खुनाच्या आरोपात कसं जबरस्तीने अडकवलं याचं वर्णन होतं तर Framed मध्ये वाचकांचा थरकाप उडवून सोडणाऱ्या, चांगुलपणावरचा विश्वास उडवून लावणाऱ्या अशा तब्ब्ल दहा सत्यघटनांची वर्णनं आहेत. ग्रीशम आणि मॅकक्लॉसकी यांनी दोघांनीही प्रत्येकी पाच सत्यघटना शब्दबद्ध केल्या आहेत.

जिम मॅकक्लॉसकी हे Centurion Ministries नावाची एक संस्था चालवतात ज्या अंतर्गत पोलिसांनी अन्यायाने, सूडबुद्धीने, चुकीचा तपास करून, मुद्दाम अडकवलेल्या, प्रत्यक्षात निर्दोष असलेल्या परंतु आता देहान्ताची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचं अतिशय महत्वाचं असं काम केलं जातं. महत्वाचं म्हणजे गेल्या पंचवीस-तीस वर्षांत अमेरिकेत घडलेल्या अशा हजारो घटनांपैकी आत्तापर्यंत काही शे घटनांवर मॅकक्लॉसकी यांच्या संस्थेने काम केलं आहे. गुन्ह्याचे तपशील जाणून घेऊन, अभ्यास करून, शासकीय आणि न्यायालयीन कागदपत्रं चाळून, प्रत्यक्ष घटनेची सत्यासत्यता पारखून घेतल्यानंतर Centurion Ministries या संस्थेतर्फे चुकीने अडकवण्यात आलेल्या व्यक्तीला निर्दोष सिद्ध करून तिला तुरुंगातून सोडवण्यासाठी यथाशक्ती सर्व प्रयत्न केले जातात. त्यांना आर्थिक, मानसिक, वकिली, शासकीय अशी सर्व प्रकारची मदत केली जाते. १९८० साली स्थापना झालेली मॅकक्लॉसकीचं अपत्य असलेली Centurion Ministries ही सेवाभावी संस्था अशा प्रकारच्या निरपराध व्यक्तींसाठी काम करणारी जगातली पहिली संस्था असून आत्तापर्यंत त्यांनी ६३ निरपराध लोकांना मृत्युदंडापासून वाचवलं आहे. 

जेव्हा एखादी व्यक्ती अशी चुकीच्या पद्धतीने अडकवली जाते त्यावेळी व्यक्तीचे सहचर, पालक, अपत्यं यांच्या बरोबरीनेच जवळचे नातलग, मित्रमंडळी असे अनेक जीव बरोबरीने भरडले जातात आणि तेही विनाकारण. त्या अन्यायाचे दुष्परिणाम त्या व्यक्तीला जेवढे भोगावे लागतात तेवढ्याच प्रमाणात त्याच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनाही भोगावे लागत असतात. प्रस्तुत पुस्तकात चर्चिल्या गेलेल्या दहा घटनांपैकी निम्म्याहून अधिक प्रसंगांमध्ये तर अशा जाणूनबुजून अडकवण्यात आलेल्या व्यक्तींची किमान संख्या चार आहे. थोडक्यात पुस्तकात दहा घटनांची वर्णनं असली तरी प्रत्यक्षात किती आयुष्याची राखरांगोळी झाली याची मोजदाद करणंही अशक्य आहे! ज्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यात आलं त्यांच्याबद्दल वाचताना तर अमाप नैराश्य येतं. आपण स्वतःला त्या दुर्दैवी जीवांच्या जागी क्षणभरही कल्पून बघण्याचं धाडस करू शकत नाही. यातल्या काहीजणांचं नुकतंच लग्न झालं होतं, काही जणांचं ठरलं होतं, काहींना मुलं होती, काही सन्मानाचं आयुष्य जगत होते. 

एका घटनेत स्वतःच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मित्रांबरोबर पार्टी करायला गेलेला एक सैनिक खुनाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवला जातो आणि त्याच्याबरोबर त्याच्या अन्य दोन मित्रांनाही अडकवलं जातं. दुसऱ्या एका घटनेत घराला आग लागून त्यात स्वतःची तीन लहान मुलं गमावलेल्या एका तरुण पित्यावर त्यानेच मुद्दाम आग लावून त्याच्या मुलांची हत्या केल्याचा आरोप ठेवून त्याला अटक केली जाते. एका घटनेत तर एक स्त्री समोरच एक गुन्हा घडताना आणि गुन्हेगारांना पळून जाताना बघते आणि नागरी कर्तव्य म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतःहूनच आदल्या  दिवशी पाहिलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना द्यायला जाते. अशा वेळी गुन्हेगार, संशयितांचा शोध घेणं तर दूरच, उलट पोलीस तिलाच पकडून, तिच्यावर हत्येचा आरोप टाकून तिला तुरुंगात डांबून टाकतात. अजून एका घटनेत स्वतःच्या बायकोवर अतिशय प्रेम करणाऱ्या मध्यमवयीन शिक्षकाला त्याच्या बायकोचा खुनी म्हणून पोलिसांकडून अटक केली जाते. आणि गंमत म्हणजे तो माणूस गुन्हा घडला तेव्हा बायकोबरोबरच काय, तर घरात, गावातही नसतो. तो कित्येक मैल दूरच्या शहरात असणाऱ्या एका सेमिनारसाठी गेलेला असतो. 

पुस्तकातल्या पहिल्याच घटनेत (Norfolk Four) तर एका स्त्रीवर एक माथेफिरू गुन्हेगार बलात्कार करतो आणि पळून जातो. मात्र प्रत्यक्षात पोलीस अन्य एका खलाशी व्यक्तीला गजाआड डांबतात. त्याच्याविरुद्ध एकही पुरावा मिळत नाहीये म्हंटल्यावर हा गुन्हा दोघांनी घडवला आहे असा परस्पर अर्थ काढून अजून एका निरपराध खलाश्याला गुन्ह्यात अडकवलं जातं. पण त्याच्याविरुद्धही पुरावा न मिळाल्याने अजून एका खलाश्याला अडकवलं जातं. आणि अक्षरशः विश्वास बसणार नाही पण अशा प्रकारे एकूण आठ निरपराध लोकांवर पोलीस नाही नाही ते आरोप ठेवून त्यांना सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून मोकळे होतात. हे सगळे विचित्र प्रकार खरा गुन्हेगार बघत असतो. पोलिसांच्या मूर्खपणाला वैतागून शेवटी तो पोलिसांना शरण येतो आणि गुन्ह्याची कबुलीही देतो आणि अहो आश्चर्यम्! पोलीस त्याच्या कबुलीजबाबाकडे लक्षही न देता, तो जाणूनबुजून आपली दिशाभूल करतोय असा परस्पर समज करून घेऊन त्याला सोडूनही देतात. 

Inocent man या पुस्तकातल्या सत्यघटनेत पोलीस एका निरपराध व्यक्तीला खुनाच्या आरोपाखाली अटक करतात आणि चौकशीचा ससेमिरा मागे लावून, त्याला भंडावून सोडून, त्याच्याकडून त्याने स्वप्नात खून केल्याचा कबुलीजबाब नोंदवून घेऊन, काही तासांनी त्याने तो खून प्रत्यक्षातच केला आहे असं त्याच्या तोंडून वदवून घेतात. Framed मधल्या काही घटनांमधल्या पोलिसांनी देखील तंतोतंत हीच पद्धत वापरून निरपराध लोकांना त्यांनी न केलेले गुन्हे कबूल करायला भाग पाडलं आहे. वाचक म्हणून आपल्याला हे कितीही हास्यास्पद आणि अविश्वसनीय तंत्र वाटत असलं तरी अमेरिकन पोलिसांमध्ये गुन्हे कबूल करवून घेण्याची ही पद्धत अत्यंत सहजरित्या आणि नियमितपणे वापरली जात असावी असं वाटतं.

अशा प्रकारे कुठल्यातरी व्यक्तीला गुन्हेगार 'ठरवून' टाकून सगळा तपास त्याच्याभोवती केंद्रित करण्याच्या तपासाच्या पद्धतीला 'टनल व्हिजन' (tunnel vision) अर्थात झापडबंद तपास म्हणतात. यात पोलीस एकदाच एका व्यक्तीला गुन्हेगार ठरवून टाकतात आणि अन्य पर्याय, अन्य आरोपी, गुन्हेगार, संशयित यांचा तपास तर सोडाच विचारही करत नाहीत. झापडं लावल्याप्रमाणे केवळ एकाच दिशेने आणि त्यांनी ठरवलेल्या संशयिताला गुन्हेगार सिद्ध करण्याच्या त्यांच्या निष्कर्षाला सोयीस्कर अशी मांडणी करत राहतात. इतर दिशांकडे दृष्टिक्षेप टाकत नाहीत की चौकशीची किंवा शोधाची दिशाही बदलत नाहीत. अक्षरशः Tunnel मध्ये अडकून राहतात. तपास करताना आढळणारे रक्त, वीर्य, केस यांसारखे DNA च्या आधारे आरोपीची निर्दोष सुटका करू शकणारे पुरावे, alibi अर्थात गुन्हा घडला तेव्हा आरोपी प्रत्यक्षात अन्य स्थळी, अन्य व्यक्तींबरोबर असल्याचे भक्कम पुरावे अशा सगळ्या महत्वाच्या पुराव्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जातं. त्याउलट Bite marks analysis आणि bloodstain analysis सारख्या नितांत बनावट पद्धतींना अत्यंत मूलभूत शास्त्र असल्याचं सिद्ध केलं जातं आणि त्याआधारे निर्दोष व्यक्तींना निव्वळ त्यांच्या दातांच्या ठश्यांच्या माध्मयातून खुनी ठरवलं जातं. पुस्तकातलं एक संपूर्ण प्रकरण तर अशा Bite marks analysis सारख्या बनावट तंत्राला हाताशी धरून आणि शवविच्छेदन करणाऱ्या दोन डॉक्टरांनी याचा अक्षरशः कसा धंदा मांडला होता या विषयीचं विदारक सत्य सामोरं आणतं. 

ही काळी कृत्यं करणाऱ्या गटसमूहात प्रमुख सरकारी वकीला (district attorney) पासून ते न्यायाधीश, पोलीस डिटेक्टिव्ह, शवविच्छेदन करणारे डॉक्टर, स्वतःची शिक्षा कमी व्हावी म्हणून खोट्या साक्षी देणारे कैदी अर्थात jailhouse snitch असे सगळे सगळे सामील असतात. असाच एक सर्रास खोटे पुरावे देणारा district attorney काही वर्षांनी न्यायाधीश झाला. त्याने आपल्या काळ्या कारकिर्दीत किती निर्दोष आयुष्यं नासवली असतील याची गणनाही करता येणार नाही.

शेवटचा, सर्वात महत्वाचा आणि राहून राहून आपल्याला विचारात पाडणारा मुद्दा म्हणजे पोलीस हे असं सगळं का करतात? अशा रीतीने निरपराध लोकांना का अडकवतात? त्यांच्या तपासात काही त्रुटी राहिलेल्या असतात का? तपासाची दिशा चुकलेली असते का? त्यांची दिशाभूल केली गेलेली असते का?


तर या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे ना आणि ही!!!


या प्रत्येक घटनेत पोलीस जाणून बुजून असं वागले आहेत. त्यांनी मुद्दामहून एखाद्या निरपराध व्यक्तीला त्यात अडकवलं आहे. यातली कुठलीही गोष्ट पोलिसांच्या हातून चुकून किंवा अनवधानाने झालेली नसून पोलिसांनी या सगळ्या गोष्टी अगदी हेतुपुरस्सरपणे केलेल्या आहेत. हे असं काही होऊ शकेल, पोलीस एवढे भ्रष्टाचारी असतील, ते मुद्दाम निरपराध लोकांना खुनासारख्या गुन्ह्यात अडकवतील यावर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचा विश्वासच बसू शकत नाही. या पोलिसांकडून या गोष्टी चुकून, अनवधानाने, नजरचुकीने, गैरसमजुतीतून झाल्या असतील असंच आपल्याला वाटत असतं पण दुर्दैवाने ते खोटं असतं. प्रत्येक घटनेत पोलिसांनी हे बनाव मुद्दाम रचले आहेत, खोटे साक्षी, पुरावे उभे केले आहेत, तपासाच्या दिशा मुद्दाम बदललेल्या आहेत. मुद्दाम बनाव रचण्यात आलेत. 

अनेक घटनांमध्ये अतिशय कमी बुद्ध्यांक असलेल्या लोकांना गुन्हेगार म्हणून जाणूनबुजून अडकवण्यात आलं. Alibi असूनही तिकडे दुर्लक्ष करण्यात आलं, DNA अहवालाकडे दुर्लक्ष करण्यात आलं. यात काही घटनांमध्ये तर पोलिसांच्या बरोबरीने खुद्द न्यायमूर्ती(?) आणि वकीलही या अन्यायात सामील होते. 

आणि हे सगळं केलं गेलंय ते निव्वळ केस क्लोज करण्याचा दबाव म्हणून.चुकून गैरसमजातून झालेली प्रकरणं नाहीयेत ही. एखाद्याला मुद्दाम, ठरवून, योजनाबद्ध रीतीने लक्ष्य करून त्याच्याविरुद्ध खोटे पुरावे, साक्षीदार गोळा करून पद्धतशीरपणे त्याच्या गळ्याभोवती फास आवळण्यात आलाय. आणि सर्वात अविश्वसनीय म्हणजे हे सगळं घडलंय आणि अजूनही घडतंय ते तथाकथित अतिप्रगत, अत्यंत विकसित, हुशार, जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत हजारो वर्षं पुढे असणाऱ्या सर्वगुणसंपन्न, बलाढ्य, सर्वशक्तिमान आणि नानाविध शोधांची जननी असणाऱ्या अमेरिकेत. 

पुस्तकाच्या अखेरीस प्रत्येक प्रकरणातला गुन्हा घडला त्यावेळी अडकवण्यात आलेली निरपराध व्यक्ती आणि १५-२०-२५-३० वर्षांचा कायद्याचा लढा देऊन आणि काही प्रसंगी प्रत्यक्ष मृत्यूच्या दारातून सुटका झालेली व्यक्ती असे दोन फोटो तुलनेसाठी प्रकाशित करण्यात आले आहेत. काळाचे, अन्यायाच्या जखमांचे व्रण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत राहतात. वाया गेलेली उमेदीची वर्षं, दुरावलेली नाती, मोडलेली लग्नं त्या डोळ्यांतून डोकावत राहतात. 

गेल्या वर्षी ग्रीशमने जेव्हा Framed ची घोषणा केली तेव्हाच मी ते वाचणार नाही असं ठामपणे ठरवलं होतं. सुरुवातीला अनेक वर्षं एकापेक्षा एक अप्रतिम कादंबऱ्या लिहिणाऱ्या ग्रीशमने गेल्या आठ दहा वर्षांत त्याच्या पूर्वीच्या कामगिरीला साजेशी पुस्तकं लिहिली नाहीयेत हे एक कारण आणि एका पेक्षा अधिक लेखक (लेखक आणि सहलेखक) असलेली पुस्तकं मला फारशी आवडत नाहीत हे दुसरं. मात्र Framed चा विषय वाचला आणि तत्क्षणी माझ्या डोळ्यांसमोरून 'Innocent man' चमकून गेली. काही वर्षांपूर्वी नेटफ्लिक्सवर बघितलेली Making a murderer आठवली. आणि त्यानंतर मात्र Framed वाचायचं हे नक्की झालं. 

मात्र हे पुस्तक सर्वांसाठी नाही. वाचकाला अतिशय विषण्ण करून टाकण्याची, कमालीच्या नैराश्याने भारून टाकण्याची, अपार खिन्नता आणि औदासिन्याचं मळभ दाटून आणण्याची भयाण शक्ती या पुस्तकात आहे. कारण जे आपण वाचूही शकत नाही ते याच जगाच्या पाठीवर कोणीतरी भोगलं आहे, वर्षानुवर्षं भोगलं आहे आणि काही प्रसंगांमध्ये तर अद्यापही भोगत आहेत ही कल्पनाच अत्यंत दाहक आहे. 

पुस्तक वाचलं नाहीत तरी अमेरिकेतच नव्हे तर भारतात आणि जगभरातल्या देशांमध्ये अशा पोलीस आणि कायद्याच्या नंगानाचामुळे वर्षानुवर्षं काळकोठडीत अडकलेल्या हजारो जीवांवरचा अन्याय दूर व्हावा आणि त्यांची मुक्तता व्हावी, त्यांना त्यांच्या माणसांमध्ये, नातलगांमध्ये परत जात यावं, त्यांच्या गळाभेटी घेता याव्यात आणि उरलंसुरलं आयुष्य सुखाने जगता यावं एवढी प्रार्थना तरी नक्की करा ही विनंती!

--हेरंब ओक

Tuesday, November 26, 2024

पोलादी भिंतीआडच्या प्रा'चीन' देशाला मराठी लेखणीत पकडण्याचा यशस्वी प्रयत्न : भिंतीआडचा चीन

श्रीराम कुंटे या माझ्या मित्राशी एकदा गप्पा मारत असताना मी सहज, आपण अगदी नेहमी एकमेकांना विचारतो त्याप्रमाणे विचारलं, "मग सध्या काय नवीन?". मला कोणी असले टिपिकल प्रश्न विचारले की मी त्या प्रश्नांना तसंच टिपिकल उत्तर देतो "काही नाही रे. नेहमीचंच. सेम ओल्ड".  पण श्रीराम दोन क्षण थांबला आणि म्हणाला "अरे एक पुस्तक लिहितोय. चीन वर". "काही नाही रे, पाणी पितोय" किंवा "झोपलो होतो" हे जेवढ्या सहजतेने सांगावं त्या सहजतेने त्याने दिलेलं उत्तर ऐकून मी क्षणभर अवाक झालो. आपल्या ऐकण्यात चूक झाली नाही ना याची खात्री करण्यासाठीची राजमान्य पद्धत म्हणजे तोच प्रश्न किंवा शब्द पुन्हा उच्चारणे. अर्थात मीही तीच अवलंबली आणि "पुस्तक?" एवढंच म्हणालो. 

"हो. चीन या विषयावर लिहायचं कधीपासून डोक्यात होतं. ते एकदाचं प्रत्यक्षात आणतोय." मला अधिक प्रश्न पडू नयेत याची काळजी घेत श्रीराम उत्तरला. 

तरीही मला अजून बरेच प्रश्न पडलेच. अर्थात श्रीराम जे म्हणाला अविश्वास दाखवण्याचा प्रश्नच येत नव्हता आणि त्याचं कारण म्हणजे... किंवा त्याची तीन कारणं म्हणजे आमच्या 'शब्दांगण' या चर्चासत्र/पुस्तक परिचय विषयक कार्यक्रमात त्याने नुकतंच म्हणजेच जेमतेम दोन तासांपूर्वीच सत्र घेतलं होतं. जे नुकतंच संपलं होतं आणि त्यानंतरच आम्ही गप्पा मारत बसलो होतो. आणि महत्वाचं म्हणजे सत्राचा विषयच "भारत-चीन संबंधांचे भवितव्य - भविष्याचा भू-राजकीय, सामरिक आणि आर्थिक आढावा" असा भरभक्कम होता. दुसरं कारण म्हणजे श्रीरामचं दांडगं वाचन, अभ्यासू स्वभाव आणि एकूणच व्यासंग या बाबींशी मी लहानपणापासूनच परिचित होतो. त्यामुळे त्याने पुस्तक लिहावं यात माझ्या दृष्टीने तरी नवलाईचा भाग असा काहीही नव्हता. आणि तिसरं कारण किंवा तक्रार म्हणजे हे त्याने फार पूर्वीच करायला हवं होतं असं माझं प्रामाणिक मत होतं. 

तर ही घटना फेब्रुवारी २०२२ मधली. त्यानंतर मध्ये एक दीड वर्षं फार काही घडलंच नाही आणि अचानक एक दिवस श्रीरामचा फोन आला की "मेसेज बघ. वाचून बघ आणि किती वेळ लागेल ते सांग."

मेसेज वाचायला किती वेळ लागणार हे काय सांगायचं हे मला कळेना म्हणून काही न बोलता मी ओके म्हणून फोन ठेवला आणि त्याचा मेसेज उघडला. 'अनटायटल्ड डॉक्युमेंट' नावाच्या वर्ड फाईलवर क्लिक केल्यानंतर मला धक्काच बसला. फेब्रुवारी २०२२ नंतर पुढचे १८ महिने हा माणूस झपाटल्यागत काम करत होता, वाचन करत होता, संदर्भ शोधत होता, सगळे मुद्दे शब्दबद्ध करत होता, पुनःपुन्हा करत होता. आणि या सगळ्या परिश्रमांचा परिपाक मला माझ्या इनबॉक्स मध्ये दिसत होता. श्रीरामाची मेहनत, त्याचं भारावून जाऊन काम करणं, संदर्भांची शोधाशोध, असंख्य पुस्तकांचं वाचन, त्या पुस्तकांसाठी वेळोवेळी करावी लागलेली पदरमोड इत्यादी बाबींचं वर्णन करणं हे त्या 'अनटायटल्ड डॉक्युमेंट' नावाच्या चिमुकल्या सिम्बलच्या कुवतीबाहेरचं होतं जे मला नंतर वेळोवेळी श्रीरामच्या तोंडूनच कळणार होतं. 

त्याने पाठवलेल्या फाईलवर क्लिक केल्यावर आधी ती फाईल उघडायलाच काही मिनिटं लागली. (आणि हा माणूस मला विचारत होता किती वेळ लागेल ते सांग.) फाईल उघडल्यानंतर समोरच भाग-१ आणि त्याखाली सुमारे १०-१२ प्रकरणं, त्यानंतर भाग-२ आणि त्याखाली त्यातली प्रकरणं असे एकूण चार भाग असलेली अशी अनुक्रमणिकासदृश रचना होती. डॉक्युमेंटची अनुक्रमणिकाच जीव दडपून टाकणारी होती. त्यामुळे त्या दिवशी मी पुढे काहीही वाचलं नाही. पुढचे जवळपास तीन चार दिवस कामाच्या गडबडीत इच्छा असूनही वाचायला जमलं नाही. नंतर मात्र लगेच आलेल्या वीकांतात संपूर्ण पुस्तक वाचून काढलं. चीन या विषयाचा (आणि अर्थातच त्यामुळे या पुस्तकाचा) अवाका किती मोठा आहे याची साधारण कल्पना असली तरी तो एवढा विशालकाय असेल हे माझ्यासारख्या माणसाच्या तरी यापूर्वी लक्षात आलं नव्हतं. चीन म्हंटलं की फारतर माओ, युआन श्वांग (हा आपल्याला शाळेत शिकवलेला चुकीचा उच्चार आहे), क्षि जिनपिंग आणि असेच काही विचित्र उच्चारांचे शब्द आपल्या डोक्यात येतात. पण हे पुस्तक आपलं चीन विषयक ज्ञान आणि आपल्या ढोबळ समजुतींपेक्षा फार फार विशाल आणि वेगळं आहे हे माझ्या एव्हाना लक्षात आलं होतं. 

चीन या विषयावर इंग्रजी भाषेत आत्तापर्यंत विपुल लिखाण झालं असलं तरी मराठीत मात्र एका हाताच्या बोटावर

मोजण्याइतकीही पुस्तकं आढळत नाहीत. आणि हा अनुशेष भरून काढण्याचं अत्यंत महत्वाचं काम या पुस्तकाने केलं आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच हे पुस्तक आणि इतर पुस्तकं यातला एक महत्वाचा फरक लेखक स्पष्ट करतो आणि तो म्हणजे इतर पुस्तकांप्रमाणे भारताच्या नजरेतून चीनकडे पाहून त्याचं वर्णन करण्याऐवजी या पुस्तकात लेखकाने चीनकडे चीनी नागरिकांच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात भारत आणि चीन मधली अनेक साम्यस्थळं तर दिसतातच पण त्याहूनही अधिक जास्त प्रमाणात असलेले फरक दिसतात आणि त्यांची त्यांची विस्तारपूर्वक व विचारपूर्वक केलेली मांडणीही दिसते. पुस्तकात ठिकठिकाणी पुरवण्यात आलेले नकाशे आणि विविध छायाचित्रं यांच्यामुळे विषय समजून घ्यायला मदत होते. आपण करत असलेले किंवा प्रचलित असलेले चीनी उच्चार आणि प्रत्यक्षातले उच्चार यांची एक यादी पुस्तकाच्या सुरुवातीला असून ती वाचताना चांगलंच मनोरंजन होतं. पुस्तकाच्या खेरीस भली मोठी संदर्भसूची देण्यात आली असून त्याद्वारे लेखकाचा या विषयावरचा अभ्यास, तळमळ आणि व्यासंग सहजरित्या अधोरेखित होतो. 

वर म्हंटल्याप्रमाणे हे पुस्तक चार भागांत विभागलेलं आहे. चीन हा देश, त्याचा इतिहास, भूगोल, संस्कृती, राजघराणी, युद्धं, कम्युनिझम या सगळ्या विषयांना सामावून घ्यायचं म्हणजे पुस्तकाची विभागणी अशा प्रकारे तीन-चार विषयांच्या छत्रांमध्ये करण्याचा निर्णय अचूकच म्हणायला हवा. पहिल्या भागात वाचकांची चीनमधलया नानाविध राजघराण्यांशी ओळख करून देण्यात आली आहे. पहिलंच प्रकरण एवढं ओघवतं झालं आहे की ते संपलं आहे हे ही आपल्या लक्षात येत नाही. 

निरनिराळी राजघराणी, त्यांच्या अखत्यारीतले वेगवेगळे भौगोलिक प्रदेश, राजघराण्यांना ईश्वरी पाठींबा असल्याचा भोळ्याभाबडया जनतेचा विश्वास, तथाकथित ईश्वरी इच्छेने सुरू होणारी साम्राज्यं, आकाशात होणाऱ्या ग्रहांच्या तथाकथित दैवी युत्या, त्या युत्यांचे राजघराण्यांवर असणारे तथाकथित दैवी आशीर्वाद, पाच राजघराणी, दहा साम्राज्यं अशी अनेक प्रकारची विस्मयकारक माहिती आपल्याला मिळते. युरोपातला रेनसॉं (रेनेसान्स) आपल्याला ऐकून माहीत असतो पण तशाच प्रकारचा एक रेनसॉंचा काळ चीनमध्ये होऊन गेला होता ही माहिती वाचून वाचक आश्चर्यचकित होतो. 

कुठलं राजघराणं कधी सत्तारूढ झालं, कधी सत्तेतून बाहेर गेलं, त्यांनी काय काय केलं अशा टिपिकल गोष्टी आणि सनावळींची जंत्री देऊन आपण इतिहासाचं कुठलं तरी बोजड पुस्तक वाचतोय अशी भावना वाचकांच्या मनात येऊ न देणं हे श्रीरामच्या लेखनाचं खरं कौशल्य आणि त्याच्या त्या सुज्ञपणाबद्दल प्रकरणाच्या (पहिल्याच नव्हे तर प्रत्येकच) प्रकरणाच्या शेवटी वाचक श्रीरामचे मनापासून आभार मानतो. 

दुसऱ्या प्रकरणात सुरुवातीला कन्फ्युशिअस, युआन श्वांग अर्थात शांगझान्ग, जेंगिझ खान वगैरे हजेरी लावून जातात. मात्र त्यानंतर सर्वव्यापी माओ दशांगुळं वर उरतो. माओने चीनी नागरिकांवर केलेले अत्याचार, अन्याय, त्याचं क्रौर्य अक्षरशः अविश्वसनीय म्हणावं असं आहे. 'ग्रेट टेरर' अंतर्गत केवळ वर्षभरात आपल्याच देशातले २० लाखाहून अधिक नागरिक निर्ममपणे ठार मारणं असो किंवा कोरियन युद्धात लाखो चीनी सैनिक मारल्याबद्दलची दर्पोक्ती आणि अजून काही लाख चीनी सैनिक मरतील याचं अभिमानपूर्वक वर्तवलेलं भाकीत असो, किंवा 'ग्रेट लीप फॉरवर्ड' या महामूर्ख सरकारी योजनेअंतर्गत १९५८ ते १९६२ या चार वर्षांत आलेल्या मानवनिर्मित दुष्काळामुळे किमान ३ ते ४ कोटी चीनी नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणं असो!!! या गोष्टी वाचताना सर्वसामान्य वाचकाचा थरकाप उडतो तर कित्येकदा संतापही होतो. माओच्या विक्षिप्तपणाचे असंख्य किस्से आणि सत्तेच्या लालसेपायी त्याने आपल्याच नागरिकांवर केलेले अनन्वित अत्याचार हे कुठल्याही सामान्य माणसाला समजून घेण्यापलीकडचे आहेत.  

त्यानंतर 'सांस्कृतिक क्रांती' च्या नावाखाली फिरलेला हुकूमशाही वरवंटा, भारताची भळभळती जखम असलेलं ६२ सालचं भारत-चीन युद्ध, तिआनमेन चौकातलं विद्यार्थ्यांचं आंदोलन अशा अनेक ऐतिहासिक घटनांकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळतो. 

पुढचं प्रकरण बऱ्यापैकी क्षि जिनपिंगला वाहिलेलं आहे. जिनपिंगच्या काळात आर्थिक, संस्कृतिक, क्रीडा, आयटी इत्याफी क्षेत्रांतमध्ये चीनने अविश्वसनीय अशी प्रगती कशी केली आणि भारत या आपल्या एकेकाळच्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याला दूरवर सोडून चीन स्वतः कित्येक दशकं पुढे कसा निघून गेला याची अविश्वसनीय वर्णनं वाचायला मिळतात. चीन हा देश इलेक्ट्रिक वाहनं आणि एआयच्या क्षेत्रात जगाला आ वासायाला लावेल अशा वेगाने करत असलेली प्रगती, बेल्ट-रोड सारखा संपूर्ण जगाला आपल्या टाचेखाली घेण्याची पाशवी महत्वाकांक्षा असलेला महाकाय प्रकल्प इत्यादी गोष्टींची आणि त्यामागच्या जिनपिंगसारख्या नेत्याच्या धोरणीपणाची आणि दूरदृष्टीची इत्यंभूत माहिती वाचकांना मिळते.  

चौथं प्रकरण "हे सगळं आपल्याला का माहीत असायला हवं?" या प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आलेलं आहे. यात चीनने भारतासमोर उभ्या केलेल्या आर्थिक आव्हान, लष्करी आव्हान, विचारसरणीचं आव्हान अशा महत्वाच्या आव्हानांची यादी देण्यात आली आहे. ही आव्हानं नक्की कसली आहेत? हीच आव्हानं एवढी महत्वाची का? या विषयीही उहापोह करण्यात आलेला आहे. 

आवर्जून उल्लेख कराव्या अशा दोन छोट्या किंवा प्रसंगी दुर्लक्षित केल्या जातात अशा दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे मुखपृष्ठ आणि शीर्षक. चंद्रमोहन कुलकर्णी यांचं अत्यंत चपखल (विशेषतः विळा-हातोड्याची अचूक जागी करण्यात आलेली मांडणी) असं मुखपृष्ठ पाहून या भिंतीआड नक्की कुठल्या प्रकारचा देश दडला आहे हे जाणून घ्यायची वाचकांची उत्सुकता शिगेला पोहोचते हे नक्की! 

वर म्हंटल्याप्रमाणे भारतासमोर चीनच्या रूपात ही आव्हानं आहेत किंवा हे प्रश्न/समस्या आहेत हे भारताच्या/भारतीयांच्या लक्षात आलं तर आपण त्या समस्यांवर उपाय शोधण्याचे प्रयत्न करण्यासाठी हातपाय तरी हलवू! जर या समस्या आहेत हे लक्षातच आलं नाही तर मग आपण आपल्याच भ्रामक विश्वात रममाण होऊन राहू आणि तोवर दुर्दैवाने चीन अजून काही दशकं आपल्या पुढे निघून गेलेला असेल. हे असं होऊ नये, या विषयाच्या अनुषंगाने आपल्यामध्ये जागरूकता यावी यासाठी श्रीराम कुंटे लिखित 'भिंतींआडचा चीन - एका अजस्र देशाची कुंडली' हे त्याचं पहिलंच पण कुठल्याही अंगाने पहिलं वाटत नसणारं पुस्तक आवर्जून वाचायलाच हवं!

--हेरंब ओक

Thursday, November 21, 2024

इस्लाम, अ‍ॅडम आणि रॉबर्ट

इस्लाम या विषयाची ज्यांना आवड आहे, ज्यांचा अभ्यास आहे अशा लोकांना रॉबर्ट स्पेन्सर आणि अ‍ॅडम सीकर ही दोन नावं खचितच अनोळखी नाहीत. तुलना म्हणून नाही पण या दोघांनीही इस्लाम विषयी जनजागृती करण्यासाठी आपापल्या पद्धतीने प्रचंड काम करून ठेवलं आहे आणि ते अजूनही चालूच आहे.

इस्लाम, अल्ला, जिहाद, मोहंमद पैगंबर, कुराण, हदीस इत्यादी विषयांवर रॉबर्ट स्पेन्सर या अमेरिकन लेखकाने जवळपास वीसेक पुस्तकांचं लेखन केलं आहे.

त्याने लिहिलेली Truth about Muhammad, Did Muhammad Exist? आणि The Critical Quran ही माझी विशेष आवडती पुस्तकं. यात अनुक्रमे मुहंमद पैगंबरांचं आयुष्य, त्यांच्या अस्तित्वाविषयीची चर्चा आणि कुराणाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न याविषयी लेखन केलं गेलं आहे.

Adam Seeker हे एक अजब रसायन आहे. मूळची कट्टर मुस्लिम असलेली ही व्यक्ती इस्लामचा सखोल अभ्यास केल्यानंतर इस्लामची कट्टर विरोधक बनली. त्याच्या युट्यूब चॅनलवरच्या चर्चांमध्ये तो इस्लाम, कुराण, अल्ला, पैगंबर यांविषयीचं सत्य हिरीरीने आणि मिश्कीलपणे मांडत असतो.

महत्वाचा मुद्दा हा की १८ नोव्हेंबरला Adam Seeker च्या चॅनलवरच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये दस्तुरखुद्द Robert Spencer यांनी हजेरी लावली. रॉबर्ट स्पेन्सर यांच्या गेल्या महिन्यात प्रकाशित झालेलं Muhammad: A Critical Biography हे नवीन पुस्तक हा या चर्चेचा विषय होता आणि या निमित्ताने या दोघांच्या गप्पा, चर्चा, विनोद आणि इस्लामचा सखोल अभ्यास अनुभवण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळाली.

 



याच निमित्ताने ज्यांना इस्लामचा अभ्यास करायचा आहे अशांसाठी काही* पुस्तकांची यादी देतो आहे.   (* = काही यासाठी की इस्लाम, अल्ला, मुहंमद पैगंबर यांच्याविषयी हजारो ग्रंथ लिहिले गेले आहेत. त्यापैकी मी वाचलेल्या, मला आवडलेल्या काही निवडक पुस्तकांची ही यादी आहे.)

*शेषराव मोरे*

काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?

१८५७ चा जिहाद

मुस्लिम मनाचा शोध

चार आदर्श खलिफा

काश्मीर एक शापित नंदनवन

*सेतुमाधवराव पगडी*

एका माळेचे मणी

नियतीच्या विळख्यात औरंगजेब

इस्लामची ओळख : गजानन भास्कर मेहेंदळे

इस्लामचे अंतरंग : डॉ श्रीरंग गोडबोले

पण’ती' ला जपताना : समीर दरेकर

फतव्यांचे जग : अरुण शौरी

हिंदू मुसलमान ऐक्य, भ्रम आणि सत्य : ब ना जोग

डॉ आंबेडकरांच्या दृष्टीतून इस्लाम : भरत अमदापुरे

आवरण : भैरप्पा (फिक्शन असूनही शेवटी संदर्भ ग्रंथांची भलीमोठी यादी दिली आहे)

*इंग्रजी पुस्तके*

Among the Mosques : Ed Husain

Story of a Reversion : O Sruthi

The Last Girl : Nadia Murad

Ticket to Syria : Shirish Thorat

*Robert Spencer*

Truth about Muhammad

Did Muhammad exist?

Islam : religion of bigots

Worldwide jihad

Critical quran

*Vashi Sharma (small books)*

Naked Mughals

Islam means peace BUT

Hoax of Islamic Superiority

Decoding islam

*Youtube Channels*

Exmuslim Sahil Uncensored

Adam Seeker

आणि ही अशा पुस्तकांची यादी की जी फारच चांगली आहेत असं मी ऐकलंय पण माझी वाचायची राहिली आहेत...

Muhammad : A Critical Biography - Robert Spencer

Curse of God - Why I left Islam : Harris Sultan

Why I am not a muslim : Ibn Warraq

Islamophilia: Douglas Murray

The strange death of europe: immigration, identity, islam : Douglas Murray

Twenty three years: A study of the prophetic career of mohammad : Ali Dashti

Babur: The Chessboard king : Aabhas Maldahiyar

-- हेरंब ओक


Monday, October 28, 2024

सेफ इनफ अर्थात (ओन)ली चाईल्ड कथासंग्रह


तो आज ७० वर्षांचा झालाय. गेली २७ वर्षं अथकपणे रहस्यमय आणि थरारक कादंबऱ्या लिहून वाचकांच्या मनावर गारुड करणारा तो बघता बघता ७० वर्षांचा झालाय. जॅक रीचर या महाकाय अशा माजी सैनिकाला केंद्रस्थानी ठेवून त्याने आत्तापर्यंत २९ कादंबऱ्या आणि एक कथासंग्रह लिहिला आहे. सालाबादप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात त्याची रीचरवरची 'इन टू डीप' नावाची कादंबरी प्रसिद्ध झालीच पण यावर्षी त्याने त्याच्या चाहत्यांना अजून एक सुखद धक्का दिला आहे.

यापूर्वी त्याच्या लघुकथांचा 'नो मिडल नेम' नावाचा एक संग्रह २०१७ साली प्रकाशित झाला होता. त्यात रीचरच्या बालपणीच्या, तो सैन्यात असतानाच्या, सैन्यात असताना त्याने बजावलेल्या निरनिराळ्या कामगिऱ्यांवर आधारित अशा अनेक कथा होत्या. वाचकांना एका जागी खिळवून ठेवणाऱ्या कादंबऱ्या लिहिणारा हा लेखक, कथा हा लेखनप्रकारही तितक्याच लीलया हाताळू शकतो हा त्याच्या वाचक चाहत्यांसाठी एक सुखद धक्का होता.

यावर्षी त्याने अजून एक पाऊल पुढे टाकलं. नेहमीप्रमाणे ऑक्टोबरमधली त्याची रीचर नायक असलेली कादंबरी तर प्रकाशित झालीच पण त्याच बरोबरीने याच वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात त्याच्या वाचकांसाठी दिवाळी बोनस म्हणून त्याचा 'सेफ इनफ' नावाचा अजून एक कथासंग्रह देखील प्रकाशित झाला. हा कथासंग्रह अनेक बाबतीत वेगळा आहे.

पहिली गोष्ट म्हणजे यातल्या कथा या नॉन-रीचर आहेत. अर्थात यातल्या एकाही कथेत रीचर केंद्रस्थानीच काय तर कथेतही कुठे नाही. सगळ्या कथा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी, हिटमॅन, गॅंगस्टर्स, ब्लॅकमेलर्स, भ्रष्ट पोलीस या आणि अशा लोकांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या अर्थात कृष्णविश्वातल्या आहेत. रीचर, त्याच्या महाकाय शरीराची किंचित विनोदी वर्णनं, त्याच्या हाणामाऱ्यांची तपशीलवार वर्णनं, त्याची हुशारी दाखवणारे त्याच्या तोंडचे अतिशय टोकदार संवाद या सर्वासर्वांचा अभाव असताना या कथा कशा जमल्या असतील हा विचार वाचकाच्या मनात येऊ शकतो.

हा कथासंग्रह वाचायला सुरु करण्यापूर्वी तर या नॉन-रीचर कथा आहेत हे तर मला माहीतही नव्हतं.  पुस्तकाच्या सुरुवातीला मनोगतात या नॉन-रीचर कथा असण्याविषयीची एक हिंट आपल्याला मिळते. त्याचबरोबर यातल्या काही कथा फसलेल्या, काही प्रकाशकांनी न छापलेल्या, काही लेखकाला स्वतःलाही फारशा न आवडलेल्या अशा विविध विभागांतल्या आहेत अशीही माहिती मिळते.

मात्र या कथा अतिशय खुसखुशीत, आवश्यक तिथे रहस्यमय, वेगवान, थरारक तर झाल्या आहेतच पण जवळपास प्रत्येक कथेच्या अखेरीस एक धक्का बसतो ज्याने आपण आत्तापर्यंत वाचलेल्या कथेचं संपूर्ण रूपच बदलून जातं. जवळपास प्रत्येक कथा 'Unreliable Narrator' प्रकारातली आहे. अर्थात निवेदन करणारी व्यक्ती वाचकांसमोर जे चित्र उभं करत असतं ते आभासी असतं, सत्यापासून अनेक योजनं दूर असतं. सत्य काय आहे हे बऱ्याचदा शेवटच्या दोन-तीन ओळींमधून वाचकांसमोर उलगडलं जातं. एक-दोन अपवाद वगळता जवळपास सर्वच कथांचे शेवट हे अतिशय धक्कादायक, डार्क, उलथापालथ करवणारे आहेत. 

आणि दुसरं अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या सर्व कथा रीचरच्या मानसपित्याने स्वतः एकट्याने लिहिल्या आहेत. यातल्या कुठल्याही कथेशी त्याच्या बंधुराजांचा अर्थात अँड्र्यू चाईल्ड यांचा दुरान्वयेही संबंध नाही. गेल्या सहा-सात वर्षांतल्या (सुरुवातीची २-३ वर्षं अनधिकृतपणे आणि नंतर अधिकृरित्या) सगळ्या कादंबऱ्या या दोन्ही भावांनी एकत्र मिळून लिहिलेल्या आहेत आणि अर्थात त्यामुळेच त्यांचा दर्जा आधीच्या रीचर  कादंबऱ्यांच्या मानाने ढासळलेला आहे हे रीचरचे चाहतेही मान्य करतातच. आणि अर्थात यावरून अँड्र्यूला वेळोवेळी टीकेला सामोरंही जावं लागलं आहे. दुसरं वैशिष्ट्य महत्वाचं आहे ते यासाठीच. कारण यात कुठेही अँड्र्यूच्या लेखणीची ढवळाढवळ नाही. सर्व कथा या रीचरच्या दस्तुरखुद्द मानसपित्याच्या एकट्याच्या लेखणीतून प्रसवलेल्या आहेत. त्यातले संवाद, चटपटीतपणा, प्रसंगांची बांधणी, वर्णनांची पद्धत, बारीकसारीक तपशील हे इतके शिताफीने मांडलेले आहेत की वाचकांना रीचरच्या जुन्या कादंबऱ्यांची आठवण हटकून होते.

आवर्जून उल्लेख कराव्या अशा काही कथांपैकी एक म्हणजे 'Section 7(a0) (operational)'. शीर्षक जेवढं गोंधळून टाकणारं आहे तितकीच कथा सरळसोट आहे. एका माणसाच्या घरात काही अनोळखी व्यक्ती त्याच्या स्वतःच्या आमंत्रणावरून आलेल्या आहेत. त्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं रंगरूप, कपडे, बसण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, स्वभाव इत्यादी गोष्टींची अगदी तपशीलवार माहिती वाचकांना पुरवली जाते. त्याचबरोबर त्यांच्या स्वभावांबद्दल आणि क्षमतांबद्दलचे अंदाज वर्तवले जातात. या सर्वांना एकत्र येऊन पुढच्या सहा महिन्यांत एक खूप मोठं टास्क पूर्ण करायचं आहे हा त्या कथेचा सारांश. मात्र शेवटच्या चार ओळींमध्ये लेखकाने जी कमाल केली आहे ते म्हणजे Unreliable Narrator प्रकारातलं सर्वोत्कृष्ट उदाहरण असावं. निदान या पुस्तकातलं तरी.

अन्य कथांपैकी एक म्हणजे Normal in every way ही कथा तर हटकून शेरलॉक होम्सची आठवण करून देणारी आहे. मात्र कथानायकाच्या नशिबी होम्स एवढंच नव्हे तर कणभरही प्रसिद्धीचं वलय किंवा कौतुक नाही. पुढची कथा मात्र माझ्यासाठी फारच विशेष आहे. दोन कारणांसाठी. एक तर त्या कथेत शेरलॉक होम्स, 221B Baker Street चे थेट संदर्भ तर आहेतच आणि दुसरं आणि अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे ते संदर्भ होम्सच्या माझ्या सर्वात लाडक्या असलेल्या The Red-Headed League कथेतले आहेत. कथेचं नावच आहे The Bone-Headed League. ज्यांनी होम्स आणि मुख्यतः The Red-Headed League वाचली आहे त्यांना यापेक्षा अधिक काही सांगायची गरजच भासणार नाही हे निश्चित. शेरलॉक होम्सच्या एकूण ५६ कथा आणि ४ लघुकादंबऱ्यांपैकी नेमक्या The Red-Headed League याच कथेची निवड ली ने आपल्या कथेसाठी करणं याचा एक अर्थ  The Red-Headed League हीच त्याचीही सर्वात आवडती होम्स कथा आहे असाही असू शकतो!

Ten Keys ही आपल्या गॅंगशी फितुरी करणाऱ्या एका शुटरची कथा आहे. ही कथाही अखेरच्या चार ओळीत एकदमच रंग बदलून आपल्या समोर येते. पुस्तकाचं शीर्षक असलेली Safe Enough कथा वाचताना नक्की काय होणार आहे हे कळतच नाही मात्र अखेरीस कॉनलीच्या लिंकन लॉयर सिरीजमधल्या The Fifth Witness या कादंबरीच्या शेवटची हटकून आठवण येते हे नक्की.


रीचरच्या मानसपित्याचं लेखन तर वाचायचं आहे परंतु अँड्र्यूच्या अनावश्यक फोडणीमुळे रीचरची नवीन पुस्तकं वाचायची इच्छा मात्र होत नाही अशा द्वंद्वात सापडलेल्या वाचकांसाठी 'Safe Enough' हा लघुकथासंग्रह म्हणजे सुयोग्य तोडगा आहे. गेली सत्तावीस वर्षं वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या, हादरवून सोडणाऱ्या, थक्क करून टाकणाऱ्या, रीचरच्या अविश्वसनीय पराक्रमांचं कथन करणाऱ्या दर्जेदार कादंबऱ्या सातत्याने लिहिणाऱ्या जेम्स डोवर ग्रांट उपाख्य ली चाईल्डचा आज सत्तरावा तर त्याच्या मानसपुत्राचा अर्थात रीचरचा आज चौसष्टावा प्रकटदिन. त्यानिमित्ताने या रीचरच्या मानसपित्यास समस्त रीचरप्रेमींकडून मनःपूर्वक शुभेच्छा. आणि या सत्तराव्या जन्मदिनी ली ने वाचकांना दिलेल्या (ओन)ली चाईल्ड (अर्थात अँड्र्यू विरहित) कथासंग्रहरुपी भेटीबद्दल त्याचे विशेष आभार.

#HBDLeeChild

#HBDJackReacher

#SafeEnough

--हेरंब ओक

मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!

पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेख...