पूर्वसूचना : लेख वाजवीपेक्षा थोडा जास्तच मोठा झाला असल्याने पुरेसा वेळ आणि सहनशक्ती असेल तेव्हाच (किंवा तरच) वाचावा.
रुबीन कार्टर... न्यू जर्सीत राहणारा एक कृष्णवर्णीय अमेरिकन मुलगा. लहानपणापासूनच विविध लहानसहान गुन्ह्यांमुळे बालसुधारगृह/तुरुंगाच्या वार्या केलेला. कालांतराने अमेरिकन सैन्यात सामील होतो. तीन वर्षांनी सैन्यातून बाहेर पडतो आणि व्यावसायिक बॉक्सिंगला सुरुवात करतो. त्याच्या पंच करण्याच्या असामान्य शक्ती आणि प्रतिभेमुळे अनेक स्पर्धा जिंकतो. रुबीन कार्टरचा 'द हरीकेन', रुबीन 'द हरीकेन' कार्टर होतो.
![]() |
डेन्झेलने रंगवलेला 'द हरीकेन' |
१७ जून १९६६. मध्यरात्रीचा अडीच-तीनचा सुमार. खाऊन,पिऊन, नाच-गाणं, थोडी दंगामस्ती वगैरे करून कार्टर न्यू जर्सीतल्या पॅटरसन शहरातल्या एका बारमधून बाहेर पडतो. त्याच्याबरोबर जॉन आर्टिस नावाचा तरुण असतो. आपल्याला कार्टरबरोबर जायला मिळतंय, त्याची गाडी चालवायला मिळते आहे यामुळे आर्टिस प्रचंड खुश असतो. काही काळ गाडी चालल्यावर अचानक एका चौकात त्यांची गाडी पोलिसांच्या गाडीने थांबवली जाते. चारी दिशांनी पोलीस कार्स येऊन कार्टरच्या गाडीला घेरतात आणि त्याची गाडी एका बारमधे (कार्टर आधी होता त्या बार मधे नाही तर दुसर्याच एका बार मधे) आणतात. पोलिसांना मिळालेल्या वायरलेस संदेशानुसार त्या बारमध्ये काही वेळापूर्वी दोन कृष्णवर्णीय माणसांनी अंदाधुंद गोळीबार केलेला असतो. कार्टर आणि आर्टिस पोलिसांबरोबर जेव्हा बारमध्ये शिरतात तेव्हा तिथलं वातावरण भयंकर असतं. सामान अस्ताव्यस्त पसरलेलं असतं, काचांचा खच पडलेला असतो आणि जमिनीवर तीन प्रेतं पडलेली असतात. त्या गोळीबाराच्या घटनेचे साक्षीदार असलेल्या दोन माणसांसमोर कार्टर आणि आर्टिस यांना आणलं जातं आणि ओळखपरेड केली जाते. दोन्ही साक्षीदार हे दोघे 'ते' नसल्याचं ठामपणे सांगतात. कार्टर आणि आर्टिसला तात्पुरतं सोडून दिलं जातं.
हे दोन साक्षीदार म्हणजे भुरटे चोर असतात आणि त्यांच्याविरोधात पोलिसांकडे अनेक जुन्या केसेस चालू असतात. त्या केसेसची धमकी देऊन साक्ष बदलण्यासाठी या दोघांवर पोलिसांकडून दबाव आणला जातो. घाबरून जाऊन साक्ष बदलली जाते. बदललेल्या साक्षीच्या आधारावर कार्टर आणि आर्टिस यांच्यावर खटला उभा राहतो. खटल्यादरम्यान कार्टर आणि आर्टिस यांच्या वकिलाकडून अनेक अॅलबी साक्षीदारांची (अॅलबी : गुन्हा घडला तेव्हा आरोपी सदर घटनास्थळी नसून अन्य ठिकाणी होता याचा पुरावा देणारी व्यक्ती) साक्ष दिली जाऊन ते त्यावेळी अन्य ठिकाणी उपस्थित होते हे सिद्ध केलं जातं. परंतु ते पुरावे (कदाचित) पुरेसे न ठरल्याने कार्टरला आणि आर्टिसला तीन खुनांबद्दल तीन जन्मठेपांची शिक्षा सुनावली जाते.
![]() |
वास्तवातला रुबिन 'द हरीकेन' कार्टर |
तुरुंगात असताना कार्टर द सिक्स्टीन्थ राउंड (संदर्भ : बॉक्सिंग मॅचमधे १५ फेर्या असतात.) नावाचं त्याचं आत्मचरित्र लिहितो. त्या
आत्मचरित्रात त्याचा तोवरचा प्रवास, बॉक्सिंग, न केलेल्या गुन्ह्याबद्दलची शिक्षा वगैरेची तपशीलवार माहिती असते. दरम्यान ते आत्मचरित्र कॅनडात राहणार्या लेस्रा मार्टीन नावाच्या एका अमेरिकन कृष्णवर्णीय मुलाच्या हाती लागतं. लेस्राच्या शिक्षणाची आणि पालनपोषणाची जवाबदारी दोन कॅनेडियन तरुण आणि एका तरुणीने मिळून घेतलेली असते. कार्टरच्या आत्मचरित्राचा लेस्रावर प्रचंड प्रभाव पडतो. तो भारावून जातो, चिडतो, प्रसंगी वैफल्यग्रस्तही होतो. कारण कार्टरच्या सुरुवातीच्या आयुष्यातल्या घटना आणि लेस्राच्या आयुष्यातल्या घटना यात बरंच साम्य असतं. दोघांनीही सारखाच त्रास भोगलेला असतो. यानंतर सुरु होतो तो कार्टर आणि लेस्रामधला पत्रव्यवहार आणि कालांतराने त्यांची झालेली पहिली भेट. सुरुवातीच्या पत्रव्यवहारानंतर आणि पहिल्या भेटीनंतर लेस्राचा सांभाळ करत असलेला कॅनेडियन तरुणांचा ग्रुप आणि लेस्रा मिळून कार्टरला सोडवण्याचा निर्धार करतात. ते सगळ्या केसची कागदपत्र पहिल्यापासून तपासतात, तपशीलातल्या चुकांच्या नोंदी करतात. चुकीच्या आणि खोट्या साक्षी, अर्धवट पुरावे यामुळेच कार्टरला शिक्षा भोगावी लागली यावर त्यांचं एकमत होतं. अनेक महिने प्रयत्न करून, पुरावे गोळा करून त्यांना अखेरीस असा एक महत्वाचा पुरावा पोलिसांच्या वायरलेस यंत्रणेवरच मिळतो की ज्याच्यामुळे हे सिद्ध होतं की गोळीबाराच्या घटनेविषयीची माहिती देणारा कॉल ज्यावेळी वायरलेसवर आला त्यावेळी कार्टर त्या बारमधे नाही तर अन्य बार मधे होता. पोलिसांच्या स्वतःच्या रेकॉर्डमधल्या नोंदीला कोर्टाला ग्राह्य मानावंच लागतं आणि अखेरीस कार्टर आणि आर्टिस यांची निरपराध म्हणून सुटका होते. पण ............... पण त्यासाठी त्यांना त्यांच्या आयुष्यातला २० वर्षांचा अमुल्य काळ गमवावा लागलेला असतो. कार्टरला अटक होते तेव्हा तो त्याच्या बॉक्सिंग कारकीर्दीच्या शिखरावर असतो. पोलिसांच्या सामान्य चुकांमुळे, पूर्ववैमनस्यामुळे दोन तरुणांच्या आयुष्याची नासाडी होते... !!!
----------
रॉन विल्यमसन.. ओक्लाहोमा राज्यातल्या एडा शहरात राहणारा.. लहानपणापासूनच बेसबॉलच्या वेडाने झपाटलेला. बेसबॉल हेच आयुष्य मानणारा. शाळेच्या बेसबॉल टीममधे आपल्या जबरदस्त खेळाने चमत्कार करणारा आणि एक दिवस बेसबॉलच्या मेजर लीगमधे खेळायचं स्वप्न पहात असणारा मुलगा. घरची परिस्थिती बेताची असूनही आई-वडील आणि दोन मोठ्या बहिणींनी त्याचा छंद पुरवण्यासाठी त्याला होता होईतो मदत केलेली असते. कालांतराने त्याची बेसबॉलच्या मायनर लीगमधे निवड होते. संमिश्र यश मिळतं. तो अजून अजून सराव करायला लागतो. पण जोडीला सिगारेट, दारू, बारहॉपिंग, क्लब्ज हे प्रकारही सुरु होतात आणि होता होता जोर धरायला लागतात.
दरम्यान त्याचं त्याच्या एका जिवलग मैत्रिणीशी लग्न होतं. पण... लग्नानंतरही त्याची व्यसनं कमी होत नाहीत. खेळ सुधारत नसतोच. उलट अजूनच बिघडत जातो. अशात एक दिवस त्याचा उजवा हात प्रचंड दुखायला लागतो आणि त्याला काही महिन्यांसाठी खेळातून विश्रांती घ्यावी लागते. काही महिन्यांनंतर तो पुनरागमन करतो परंतु कामगिरीत अजिबात सुधारणा होत नाही. त्याला मायनर लीगच्या टीममधून वगळलं जातं. घरातली भांडणं, व्यसनं वाढत जातात. तीन-चार वर्षात घटस्फोट होतो.
दरम्यान त्याच्या वडिलांचा मृत्यू होतो. त्यानंतर रॉन खुपच एकलकोंडा होतो. विचित्र वागायला लागतो. कधी तासनतास गिटार वाजवत बसतो तर कधी वीस-वीस तास झोपून काढायला लागतो. मध्येच आरडाओरडा करायला लागतो किंवा कधी दिवसभर एडाभर भटकत राहतो. त्याच्या विचित्र वागणुकीकडे बघून त्याला मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे हे त्याच्या आईच्या आणि बहिणींच्या लक्षात येतं. त्या त्याला अनेक वेगवेगळ्या डॉक्टर्स, हॉस्पिटल्स मधे नेतात परंतु रॉन कुठेही टिकत नाही किंवा उपचारांसाठी सहकार्य करत नाही. त्यामुळे त्याच्यावर योग्य उपचार कधीच होत नाहीत.
याच काळात गिटार आणि क्लब या सामायिक आवडींमुळे त्याची ओळख डेनिस फ्रिट्झशी होते. डेनिस शाळाशिक्षक असतो आणि आपल्या आईविना मुलीचा सांभाळ करत असतो. डेनिस आणि रॉन चांगले मित्र बनतात. बार्स, क्लब्जमधे एकत्र जायला लागतात. बर्याच ठिकाणी भटकायला लागतात.
८ डिसेंबर १९८२ ची सकाळ. डेब्रा स्यू कार्टर या २२ वर्षांच्या तरुणीचा मृतदेह तिच्या घरात सापडतो. डेब्रा एका स्थानिक बारमधे वेट्रेस म्हणून काम करत असते. मारण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झालेला असतो आणि अत्यंत हालहाल करून तिला मारण्यात आलेलं असतं. तिच्या घरातल्या दिवाणखान्यातल्या आणि स्वयंपाकघरातल्या भिंतींवर "आमचा पाठलाग करू नका" अशा अर्थाची विधानं लिहिलेली आढळतात. ती विधानं आणि हल्ल्याचा एकूण प्रकार पाहता हा खून एकापेक्षा अधिक लोकांनी केलाय याची पोलिसांना खात्री पटते. पोलीस अनेक लोकांना ताब्यात घेतात, अनेकांची चौकशी करतात परंतु बरेच दिवस शोधूनही गुन्हेगार काही त्यांच्या हाती लागत नाही. दरम्यान ग्लेन गोर नावाचा एक तरुण पोलिसांकडे येतो आणि डेब्रा ज्या बारमधे काम करत असते तिथे आदल्या रात्री त्याने तिला रॉनबरोबर बघितलं असल्याचं सांगतो. आधीच्या एकाही साक्षीदाराने रॉनच्या तिथे असण्याचा कुठलाही उल्लेख केलेला नसतो. पण तरीही पोलीस मिळालेल्या माहितीच्या आधारे रॉनला पोलीस स्टेशनमधे बोलावतात. त्याची चौकशी करतात. त्याच्या केसाचे, रक्ताचे नमुने जमा करतात. त्याची पॉलिग्राफ टेस्ट करतात. आणि तो टेस्ट फेल झाला आहे असं सांगतात. थोडक्यात तो खोटं बोलतोय असं सांगून त्याने गुन्ह्याची कबुली द्यावी यासाठी त्याच्यावर दबाव आणला जातो. पण रॉन काही त्या दबावाला बधत नाही. अनेक तासाच्या चौकशीअंती त्याला सोडून देतात. दरम्यान अजून एक माणूस पोलिसांकडे येऊन साक्ष देतो की डेब्राचा खून झाला त्या रात्री त्याच्या घराजवळ रॉन आणि अजून एक माणूस आरडाओरडा करत होते. सार्वजनिक नळावर हात पाय धूत होते. निव्वळ रॉनचा चांगला मित्र आहे या आधारावर पोलीस डेनिसलाही पोलीसस्टेशनमधे बोलावतात. त्याचीही पॉलिग्राफ टेस्ट केली जाते, कसून चौकशी केली जाते. पण तोही दबावाला न बधाल्याने त्यालाही सोडून दिलं जातं.
दरम्यान एडामधल्याच एका छोट्या दुकानातून डेनिस हॅरवे या तरुणीचं अपहरण होतं. पण झटापटीच्या कुठल्याही खुणा आढळत नाहीत. अनेक आठवडे प्रचंड शोधाशोध करूनही पोलिसांना गुन्हेगारांचा पत्ता लागत नाही. लागोपाठ घडलेल्या अशा प्रकारच्या दोन घटनांमुळे एडाचे रहिवासी त्रस्त होतात आणि पोलिसांवर प्रचंड दबाव येतो. या दबावापायी पोलीस टॉमी वॉर्ड आणि कार्ल फॉन्टनॉट या दोन सामान्य तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतात आणि काही वेळाने सोडून देतात.
![]() |
रॉन विल्यमसन |
रॉन, डेनिस, टॉमी, कार्ल या सगळ्यांची चौकशी करणारे पोलीस सारखेच असतात आणि अर्थातच चौकशीची पद्धतही अगदी सारखी असते. ती म्हणजे धाकदपटशाने न् केलेला गुन्ह्याची कबुली नोंदवून घेणे. यासाठी त्यांचा प्रचंड मानसिक छळ केला जातो, धमक्या दिल्या जातात.. आरडाओरडा, मारहाणीची धमकी असे काय काय प्रकार केले जातात. आणि कहर म्हणजे त्यांनी स्वप्नात डेनिस हॅरवेचा खून केला होता हे त्यांच्या डोक्यात ठसवलं जातं आणि त्या स्वप्नात केलेल्या खुनाचा कबुलीजवाब त्यांना प्रत्यक्षात देण्यास भाग पाडलं जातं. या कबुलीजवाबाचं रेकॉर्डिंग केलं जातं आणि त्यात कुठेही हा स्वप्नात घडलेला गुन्हा आहे असा उल्लेख येणार नाही याची काळजी घेतली जाते. असा कबुलीजवाब मिळवण्यासाठी त्यांचे कुठल्या प्रकारचे हाल केले जातात ते अर्थातच व्हिडीओवर येत नाही.
(या स्वप्नातल्या गुन्ह्यांच्या कबुलीजवाबांच्या हास्यास्पद आणि धक्कादायक पुराव्यांची गोष्ट एक दिवस रॉबर्ट मेयर या न्यूयॉर्क टाईम्सच्या एका पत्रकाराच्या कानी पडते. तो सगळ्या गोष्टींचा, तपशीलांचा, पुराव्यांचा अभ्यास करतो आणि त्याला धक्काच बसतो. तो 'ड्रीम्स ऑफ एडा ' नावाचं एक पुस्तक काढतो आणि त्यात टॉमी आणि कार्लवर झालेल्या अन्यायाचं विस्तृत विवेचन करतो. पण काहीही फरक पडत नाही. दोघेही या क्षणीही तुरुंगात आहेत. टॉमी वॉर्ड कदाचित पुढेमागे जामिनावर सुटूही शकेल परंतु क्लिष्ट यंत्रणेमुळे आणि काही विक्षिप्त नियमांमुळे कार्ल फॉन्टनॉट कधीच सुटू शकणार नाही. !!!!!!)
![]() |
डेनिस फ्रिट्झ |
काही महिन्यांनी रॉन आणि डेनिसला पुन्हा चौकशीला बोलावून त्यांच्याकडूनही असाच स्वप्नात केलेल्या गुन्ह्याचा कबुलीजवाब त्यांना दबावाखाली आणून घेतला जातो. थोडक्यात खरा गुन्हेगार शोधणं पोलिसांना शक्य नसतं, त्यांची तेवढी लायकी नसते, इच्छा नसते आणि अर्थातच डोक्यावर परिणाम झालेल्या, दारुड्या, प्रसंगी ड्रग्सचं सेवन करणार्या, दिवसभर इथेतिथे भटकणार्या वेडसर रॉनला टार्गेट करणं त्यांच्या दृष्टीने अतिशय सोपं असतं. जेणेकरून गुन्हेगार पकडल्याबद्दल कौतुकही केलं जातं आणि कुठल्याही प्रकारच्या जनक्षोभाला बळीही पडावं लागत नाही. डेनिसला अटक करण्यामागचं कारण तर अतिशयच हास्यास्पद असतं. कारण त्याच्याविरुद्ध तर काहीच पुरावा नसतो (रॉनबद्दल खोटं का होईना पण ग्लेन गोरने काहीतरी सांगितलेलं तरी असतं) निव्वळ रॉनचा मित्र असतो म्हणून आणि एका माणसाने डेब्राच्या घराबाहेर दोन माणसांना त्या रात्री बघितलेलं असतं म्हणून डेनिसला अटक होते.
मिळालेल्या भक्कम (!!!) पुराव्याच्या आधारे रॉन आणि डेनिसविरुद्ध खटला उभा राहतो. डेब्रा कार्टरच्या घराची आणि मृतदेहाची भयानक छायाचित्रं दाखवून ज्युरींचं मन वळवलं जातं आणि त्या रॉनला देहदंडाची आणि डेनिसला जन्मठेपेची शिक्षा होते. पोलीसदल सुखावतं, आपली टिमकी वाजवून घेतं.
यानंतर सुरु होतो तो तुरुंगाताला जीवघेणा प्रवास. प्रचंड त्रास, छळ. विक्षिप्त कैदी, विचित्र जेलर. जेलमध्येही रॉनचा प्रचंड मानसिक छळ होतो. त्यामुळे आणि पुरेशा आणि योग्य औषधोपचार आणि डॉक्टरी मदतीच्या अभावी त्याची मानसिक स्थिती अजूनच ढासळायला लागते. दरम्यान त्याच्या आणि रॉनच्या अपिलाची सुनावणी होते. त्यात जेलमधले अधिकारी आणि पोलीस संगनमताने जेलमधल्या काही कैद्यांच्या रुपाने खोटे साक्षीदार उभे करतात जे सांगतात की रॉनने त्यांच्याकडे डेब्राचा खून केल्याचा कबुलीजवाब दिलाय आणि त्याचा त्याला आता प्रचंड पश्चात्ताप होतोय. त्याच्याबरोबर डेनिसही गुन्ह्यात सामील होता. डेनिस आणि रॉन अर्थातच ते निर्दोष असल्याचं नेहमीप्रमाणेच ठासून सांगतात.
सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रॉनची केस मांडायला जो वकील सरकार पुरवतं तो अत्यंत हुशार वगैरे असतो पण दुर्दैवाने तो अंध असतो आणि त्याला पुरावे/फोटो/कागदपत्र इत्यादींची तपासणी करण्यासाठी मदतनीसही दिला जात नाही. अर्थातच रॉनची केस लंगडी पडते. त्यांचं अपील फेटाळलं जातं. अशी तीन वेगवेगळया कोर्टात, तीन वेगवेगळया स्तरांवर त्यांची अपिल्स फेटाळली जातात. इतक्या असंख्य वकील, जेलर, पोलीस, न्यायाधीश यापैकी कोणालाही रॉनच्या ढासळलेल्या मानसिक संतुलनाविषयी एक शब्दही काढावासा वाटत नाही. खरं तर रॉनची मानसिक अवस्था एवढी वाईट असते की शिक्षा तर सोडाच त्याच्यावर साधा खटला उभा राहणं हेही बेकायदेशीर आणि अमानुष असतं. पण ही एवढी साधी बाब या एवढ्या मान्यवर आणि तज्ज्ञ व्यक्तींपैकी कोणाच्याही साधी नजरेसही येत नाही.
दरम्यान रॉनची आई जाते. परंतु जाण्यापूर्वी रॉनला शिक्षेपासून वाचवण्याच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचं काम करते. ज्या रात्री डेब्राचा खून झाला त्या रात्री रॉन डेब्राच्या क्लबमधे किंवा घरी नाही तर स्वतःच्या घरी असल्याचा पुरावा शोधते. त्या रात्री रॉनने चित्रपटांची कॅसेट भाड्याने आणलेली असते आणि त्या रात्री तो त्याच्या आईबरोबर चित्रपट बघत असतो. रॉनची आई त्या दुकानाची त्या दिवशीची पावती शोधते आणि रॉनच्या निर्दोषत्वाचा पुरावा म्हणून ती पोलिसांना नेऊन देते. तो पुरावा अर्थातच पोलीस दाबून टाकतात.
![]() |
ज्याच्या चुकीच्या तपासामुळे या निर्दोष जीवांना मरणप्राय यातना भोगाव्या लागल्या तो डिस्ट्रीक्ट अॅटर्नी बिल पिटरसन |
आणि एक दिवस रॉनची देहदंडाची शिक्षा अंमलात आणण्याचा दिवसही मुक्रर केला जातो. ही बातमी ऐकून रॉन आणि त्याच्या बहिणी मुळापासून हादरून जातात. शिक्षेच्या निर्णयाचं पत्र एक औपचारिकता म्हणून धड शुद्धीवरही नसलेल्या रॉनला वाचून दाखवलं जातं. तेव्हाही तो सतत फक्त आपण निर्दोष असल्याचंच वारंवार बजावून सांगतो. त्याकडे अर्थातच दुर्लक्ष केलं जातं. परंतु सुदैवाने त्याचवेळी एका शेवटच्या अपिलाला यश येतं. (अमेरिकेन व्यवस्थेप्रमाणे देहदंड झालेल्या गुन्हेगाराला विविध लेव्हलच्या न्यायालयांमध्ये अपिलाची संधी दिली जाते जेणेकरून चुकुनही एखाद्या निर्दोष माणसाचा बळी जाणार नाही.) आणि त्याची शिक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली जाते आणि त्याचा कैदेतला शारीरिक/मानसिक छळ पुन्हा चालू होतो. पुरेसं जेवण मिळत नाही, मिळतं ते अतिशय निःकृष्ट असतं. थंडीतही पुरेसे कपडे दिले जात नाहीत.
मानसिक छळ तर याहीपेक्षा भयानक असतो. जेलमधील कर्मचारी/पोलीस त्याला अनेक प्रकारे त्रास देतात. कधीकधी घोषणा करण्याच्या सार्वजनिक माईकवरून "रॉन, मी डेब्रा कार्टर बोलते आहे. तू मला का मारलंस?" किंवा "रॉन, मी डेब्राचे वडील बोलतोय. तू माझ्या मुलीचा खून का केलास???" अशा प्रकारचे विचित्र प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नासरशी रॉन अधिकाधिक बिथरतो आणि अधिकाधिक आक्रमक होतो. आपण निर्दोष असल्याचा त्याचा घोशा चालूच राहतो. रात्रभर तारस्वरात ओरडत राहतो.
फ्रिट्झचीही अवस्था काही विशेष वेगळी नसते. त्या छळाला कंटाळून आणि मुख्य म्हणजे न केलेल्या गुन्ह्याचं बालंट माथ्यावरून पुसून टाकण्यासाठी तो जंग जंग पछाडायचं ठरवतो. त्याला काही करून तिथून बाहेर पडायचं असतं. तुरुंगातच तो कायद्याचा अभ्यास करायला लागतो. तुरुंगातल्या वाचनालयात जाऊन आपलं कायदेविषयक ज्ञान वाढवायला लागतो. कायदेविषयक अनेक पुस्तकं पालथी घालतो. स्वतःच्या आणि रॉनच्या केसचा, आरोपांचा बारकाईने अभ्यास करतो. अनेक टिपणं काढतो.
फक्त देहदंड झालेल्या व्यक्तींनाच त्यांची केस लढण्यासाठी सरकारकडून वकील दिला जातो असा नियम आहे. डेनिसला जन्मठेपेची शिक्षा झाली असल्याने त्याचा खटला लढण्यासाठी त्याला स्वतःला वकील शोधावा लागणार असतो. दरम्यान इनोसन्स प्रोजेक्ट या संस्थेचं नाव त्याच्या कानावर पडतो. इनोसन्स प्रोजेक्ट ही चुकीच्या रीतीने देहदंड/जन्मठेप किंवा तत्सम शिक्षा झालेल्या निर्दोष व्यक्तींना कायदेशीर मदत मिळवून देणारी सामाजिक/कायदेविषयक संस्था आहे. तो त्यांच्याशी संपर्क साधतो. आपली केस त्यांना समजावून सांगतो. आपली टिपणं त्यांना दाखवतो. ही केस किती चुकीची आहे हे इनोसन्स प्रोजेक्टच्या वकिलांच्याही लक्षात येतं.
![]() | |
|
इनोसन्स प्रोजेक्ट आणि रॉनच्या केसवर काम करणारे अन्य वकील या केसमधल्या छोट्या छोट्या चुका शोधतात. कसा अन्याय घडलाय त्याचं पूर्ण विवेचन कोर्टाला सादर करतात. दरम्यान जवळपास अकरा वर्षांचा काळ निघून गेलेला असतो. न केलेल्या चुकीसाठी त्यांनी अकरा वर्षं कैद्याचं भीषण आयुष्य जगलेलं असतं. त्याच दरम्यान डीएनए चं तंत्र विकसित होतं आणि बलात्कार किंवा तत्सम गुन्हे शोधण्यासाठी डीएनएच्या तंत्राचा वापर करायला न्यायालय मान्यता देतं. या डीएनएच्या तंत्राच्या आधारे डेब्राच्या प्रेतावर मिळालेल्या रक्त आणि वीर्याच्या नमुन्यांचा अभ्यास केला जातो आणि अखेर........ अखेर बारा वर्षांच्या अमानुष छळाचा, पोलिसी विक्षिप्तपणाचा अंत होतो. डेनिस आणि इनोसन्स प्रोजेक्टच्या अव्याहत परिश्रमाला यश येतं आणि रॉन आणि डेनिस निर्दोष असल्याचं सिद्ध होतं आणि त्यांची निर्दोष सुटका होते !!! पण तोवर त्यांच्या आयुष्यातली ऐन उमेदीच्या काळातली सोन्यासारखी १२ वर्षं मातीमोल झालेली असतात. !!
---------
काही वर्षांपूर्वी '१२ अँग्री मॅन ' बघितला होता तेव्हा अनेक प्रश्नांची वावटळ मनात उमटवून गेला होता. त्यापूर्वी चोरी, खून, बलात्कार अशा एकापेक्षा एक गुन्ह्यांना फाशीची, जन्मठेपेची शिक्षा झालेली बघून आनंद, समाधान वाटायचं. बस्स.. छान अद्दल घडली असं वाटायचं. '१२ अँग्री मॅन ' ने सारी परिमाणंच बदलून गेली. गुन्हेगार, गुन्ह्याची व्याप्ती, शक्यता, शिक्षा, निकालाची अचूकता या सार्यासार्यांवर भलीमोठी प्रश्नचिन्हं उमटवून गेला. काही वर्षांनी ब्लॉग लिहायला लागल्यावर त्यावर पोस्ट लिहायची म्हणून पुन्हा एकदा बघितला, अजून नीट बघितला. कालांतराने मॅच्युरिटी नामक पुटं चढली असल्याने की काय तो जास्तच भावला, अधिकच ओरखडे उमटवून गेला.
सुदैवाने '१२ अँग्री मॅन' मधल्या निर्दोष असलेल्या कोवळ्या आरोपी मुलाच्या मागे हेन्री फोंडासारखा चाणाक्ष, निष्पक्षपाती आणि सजग ज्युरी सदस्य होता आणि त्याने हट्टाने उरलेल्या अकरा जणांशी भांडून, त्या गुन्ह्यातल्या अन्य शक्यता वर्तवून तो मुलगा दोषी आहे हे १००% कसं सिद्ध होत नाही हे सर्वांना दाखवून दिलं आणि त्या मुलाचा जीव वाचवला... पण पण... पण दुर्दैवाने तो चित्रपट होता, काल्पनिक होता. वास्तवात असं काही घडलं नव्हतं. प्रत्यक्षात असं कधीच घडत नाही. प्रत्यक्षातल्या हरीकेन कार्टर, रॉन विल्यमसन, डेनिस फ्रिट्झ, टॉमी वॉर्ड, कार्ल फॉन्टनॉट आणि इतर असंख्य अशा अनाम निर्दोष व्यक्तींच्या माथी गुन्हेगारी कलंक लागतो तो जन्मभरासाठी. कित्येकांना अनेक वर्षांनी न्याय मिळतो पण आयुष्यातला सुवर्णकाळ जातो तो जातोच. तो परत थोडीच मिळतो?? कित्येकांच्या नशिबी तर तेही नसतं. त्यांची आयुष्यं अशीच तुरुंगातल्या चार निर्जीव भिंतीत संपून जातात.
'द इनोसंट मॅन' प्रकाशित होण्याच्या काही काळ आधी जॉन ग्रिशम ला एका मुलाखतीत (अमेरिकन) न्यायव्यवस्थेविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. तो प्रश्न आणि त्याने दिलेलं उत्तर खाली देतोय.
Q : Is the criminal-justice system broken?
A : It is a mess. More than 100 people have been sent to death row who were later exonerated because they weren’t guilty or fairly tried. Most criminal defendants do not get adequate representation because there are not enough public defenders to represent them. There is a lot that is wrong.
![]() |
'द इनोसंट मॅन'चा लेखक जॉन ग्रिशम |
मोर दॅन १००? शंभरपेक्षा अधिक ?? (अर्थात त्याने १०० माणसं किती काळात बळी गेली हे सांगितलं नसलं
तरीही १०० हा आकडा कितीही कालावधीसाठी खूप मोठा आहे!!) एवढी निर्दोष माणसं अनाठायी मारली गेली आहेत? आणि का तर फक्त सरकारकडे त्या लोकांचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या माणसांची कमतरता आहे म्हणून? म्हणून सरळ त्यांना मरू द्यायचं? फारच भीषण आहे हे सारं. अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशात जिथे गुन्हे शोधून काढण्यासाठी, रोखण्यासाठी अतिप्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्या देशात जर का हा एवढा अन्याय होत असेल तर भारतासारख्या विकसनशील देशात हा आकडा शंभर ऐवजी किती असेल बरं? आज कैदेत असलेले किती लोक खरोखर दोषी असतील? अर्थात 'द इनोसंट मॅन'च्या नावातच असलेल्या 'murder and injustice in small town' गृहीत धरता हे अमेरिकेतल्या छोट्या शहरांमध्ये जिथे तंत्रज्ञान प्रमुख शहरांएवढं पोचलेलं नाही किंवा जिकडची पोलीसखाती गुन्हा शोधण्याच्या नवीन नवीन तंत्रांच्या बाबतीत अद्ययावत नाहीत, प्रशिक्षित नाहीत तिथेच हे घडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही गोष्ट किमान ३० वर्षांपूर्वीची आहे हे जरी गृहीत धरलं तरी अन्याय तो अन्यायच.
थोडक्यात पोलीस एखाद्याला आरोपी म्हणून उभं करतात तेव्हा प्रत्येकच वेळी ती व्यक्ती खरंच आरोपी असेल असं मानायचं कारण नाही. त्यात कदाचित पोलिसांचे काही लागेबांधे असतील, पूर्ववैमनस्य असेल, जुने हिशोब पुरे करायचे असतील किंवा तपास करताना खरंच पुरेसे पुरावे मिळाले नसतील किंवा जे मिळाले असतील ते दिशाभूल करणारे मिळाले असतील !!! आणि पोलीसच का निकाल देणारा खुद्द न्यायाधीश (त्याने कितीही निष्पक्षपाती राहून निर्णय देणं अपेक्षित असलं तरीही) संपूर्ण निष्पक्षपातीपणे निर्णय देत असेल असं मानण्याची गरज नाही. अमेरिकेत अजूनही आरोपी काळा आहे की गोरा यावर निर्णय देणार्या ज्युरींचा निर्णय ठरल्याची उदाहरणं आहेत. त्याप्रमाणे आपल्या इथेही न्यायालयाने (म्हणजे न्यायाधीशांनी) दिलेले कित्येक निर्णय आरोपीची जात/धर्म यावरून तीव्र किंवा सौम्य झाल्याची उदाहरणं आहेत.
या एवढ्या भल्यामोठ्या लेखाचं (!!) तात्पर्य काय काढायचं, हे एवढं सगळं मी का लिहिलंय मला माहित नाही. हरीकेन आणि इनोसंट मॅन जवळपास लागोपाठ वाचले/बघितले गेले आणि त्यात दाखवलेल्या यंत्रणेच्या जागरूकतेअभावी अनाठायी बळी जाणार्या अशा असंख्य निष्पाप, निर्दोष जीवांची कणव आल्यावाचून राहिली नाही. आणि हे सगळं सगळ्यांना सांगावंसं वाटलं म्हणून लिहिलंय म्हणा हवं तर..
किंवा अगदी तात्पर्य काढायचंच झालं तर ते एवढंच काढू की प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते हे लक्षात ठेवणं अतिशय अतिशय आवश्यक आहे. जे घडतंय त्याची एकच बाजू आपल्याला दिसत असते. पण त्याची न दिसणारी बाजूही असतेच. कदाचित ती दिसते त्या बाजूपेक्षा अधिक उजळ, अधिक प्रभावी, अधिक सच्ची असेल. पण समोर दिसणार्या एकाच बाजुमुळे त्या व्यक्तीसंबंधी, त्या घटनेसंबंधी लगेच अनुकूल/प्रतिकूल मत बनवण्याची गरज नाही. कुणी सांगावं, समोरच्या घटनेची, व्यक्तीची, प्रसंगाची दुसरी बाजू बघता बघता कदाचित आपल्याला आपल्यापासून अनभिज्ञ असलेल्या आपल्याच दुसर्या बाजूची नव्याने ओळख होईल !!!