पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेखन तर केलेलं आहेच पण सामाजिक, वैचारिक विषयही त्यांनी कथा, कादंबऱ्या, दीर्घ लेख अशा विविध मार्गांनी सक्षमपणे हाताळले आहेत. गेल्या आठवड्यात मतकरींच्या अशाच दोन सर्वोत्कृष्ट म्हणाव्यात अशा कलाकृती वाचनात आल्या. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट.
जौळची प्रकटनशैली फार वेगळी आहे. ही एका सर्वसामान्य घरातली कथा आहे. कादंबरीत भरपूर पात्रं आहेत ज्यांची अगदी जेमतेम तोंडओळख करून दिली जाते किंवा अनेकांचा तर एक-दोनदा केवळ निसटता उल्लेख येतो. या एवढ्या पात्रांमधल्या काही निवडक आणि कथेच्या दृष्टीने महत्वाच्या पात्रांच्या दृष्टिकोनात्मक निवेदनातून कथा पुढे सरकत जाते. निवेदक कोण आहे हे सांगितलं जात नाही. पण केवळ पहिल्या किंवा फार तर दुसऱ्या ओळीत हे पात्र कोण आहे ते चटकन लक्षात येतं ही मतकरींच्या लेखनाची खरी जादू आहे. घटनांमधून पात्रांचा परिचय अगदी थोडक्यात करून दिला जात असतानाच पात्रांच्या स्वभावाची ओळख तर वाचकाला होतेच पण त्याचबरोबर कथेची वीणही घट्ट बांधली जाते. आपण अतिशय बांधीव पटकथा वाचतोय असं जाणवत राहतो. जौळ १९८७ साली प्रकाशित झाली आहे हे लक्षात घेता ही निवेदनशैली किती आगळीवेगळी आहे हे जाणवून वाचक पानापानावर थक्क होता जातो. अशी निवेदनशैली शिवाजी सावंतांनी मृत्युंजय मध्ये वापरली होती. परंतु तो विषय पौराणिक आणि त्यातील पात्रांची निवेदनं विशाल आहेत. उलट जौळचा विषय सामाजिक, कौटुंबिक तर आहेच आणि प्रत्येक पात्राची निवेदनं अतिशय लहान अर्थात जेमतेम दीड-दोन पानी आहेत.कथा/शेवट माहीत असूनही पुढे काय होणार याची एवढी हुरहूर मला आत्तापर्यंत (कथा माहीत असणाऱ्या) इतर पुस्तकांच्या बाबतीतही कधीच वाटली नव्हती. पुस्तकाच्या मध्यावर शेवटच्या भयंकर घटनेचं बीज रोवलं जाण्याचे अस्फुट उल्लेख यायला लागतात तेव्हा अक्षरशः धडधडायला लागतं आणि प्रचंड वाईटही वाटायला लागतं. हे सगळं अशा विचित्र दिशेने का जातंय? याला थांबवण्याचा प्रयत्न कोणीच का करत नाहीये? प्रत्यक्षात हे असं घडू शकतं? जेमतेम चार महिन्याच्या संसारात एवढे टोकाचे आणि परतीचे दोर कायमस्वरूपी कापण्याचे निर्णय घेण्याएवढी उलथापालथ होऊ शकते? जीवाला कणभरही किंमत नसावी? कशाचा कशाशी ताळमेळच बसत नाही.