'सकाळ' मध्ये

http://www.esakal.in/ar/220810_blog_it_heramb.aspx

मला ब्लॉगिंग सुरु करून साधारण दीड वर्षं होऊन गेलं. सुरुवातीला फक्त इंग्रजी ब्लॉग होता. बर्‍यापैकी नियमित लिहायचो तिथे. पण तरीही काहीतरी कमी आहे असं वाटायचं नेहमी. साधारण ८-१० महिन्यांपूर्वी मराठी ब्लॉग्सच्या विश्वात प्रवेश झाला. आपल्याला जे वाटतंय ते जास्त योग्य रीतीने मराठी ब्लॉगवरून मांडता येईल असं ठाम वाटलं. कदाचित शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाल्याने असेल. ब्लॉग लिहायला लागल्यावर सुरुवातीला तरी वर्तमानपत्रातल्या बातम्या, चालू घडामोडी यावर आपलं मत मांडणं, थोडंसं सिरीयस, टिपिकल लिखाण असंच स्वरूप होतं. तेव्हा माझं इतर ब्लॉग्सचं वाचन कमी होतं. कालांतराने एकेक जबरदस्त, वेगवेगळया विषयांवरचे धम्माल ब्लॉग्स वाचायला मिळाले. तेव्हा लक्षात आलं की अरे आपण का उगाच (फक्त) वैचारिक दळण दळल्याचा *आव* आणतोय बरं? मग जरा विनोदी ढंगाने लिहिणं सुरु केलं, काही लेख डार्क ह्युमर, सटायर पद्धतीने लिहिले. मधून मधून माझ्या सव्वा वर्षाच्या लेकाच्या लीलांचं दर्शन ब्लॉगवर घडवत राहिलो. आवडते चित्रपट, उल्लेखनीय पुस्तकं यावर लिहीत गेलो. काही कथा लिहिल्या. सुदैवाने सगळे प्रकार लोकांना आवडले. आठ महिन्यांतच फॉलोअर्सची संख्या १०० च्या वर गेली. असंख्य मेल्स आले. अनेकांनी चॅटवरून भावना पोचवल्या. नवीननवीन प्रतिक्रिया येत राहिल्या. सगळ्यात महत्वाची प्रतिक्रिया म्हणजे राही अनिल बर्वे यांच्या बाल-लैंगिक-शोषणावरच्या 'मांजा' या चित्रपटाविषयी लिहिलेल्या पोस्टवर खुद्द राही यांची आभाराची प्रतिक्रिया आली. तेव्हा एक वेगळंच फिलिंग आलं होतं.   

माझ्या ब्लॉगचं युआरएल असलेला harkatnay.com हा काय प्रकार आहे असा प्रश्न सुरुवातीला अनेकांना पडला होता. ब्लॉग सुरु करायच्या नुकतंच आधी 'हरकत नाय' नावाची एक सामाजिक कविता लिहिली होती. त्या हँगओव्हर मधेच युआरएल साठीही तेच शब्द निवडले. आणि तितकंच विचित्र वाटणारं 'वटवट सत्यवान' हे ब्लॉगचं नाव. त्याचंही कारण असंच जरा वेगळं आहे. मला मन, मनाला, मनाच्या असं 'मन' वालं काही नाव नको होतं उलट जरा विचित्र, विक्षिप्त, अब्सर्ड  नाव हवं होतं. मग हे असंच काहीही विचार न करता आलेलं नावच निवडलं आणि नावाशी सुसंगत वाटलं पाहिजे म्हणून काहीतरी जोडून ब्लॉगचा उद्देशही 'तयार केला' ;-)
"मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही वटवट केली तरी ती (शक्यतो :) ) सत्यच असणार हे नक्की !!"

हल्ली अनेकानेक नवीन मराठी ब्लॉग्स सुरु होताहेत. गेल्या वर्षभरातच शेकडोंनी ब्लॉग्स सुरु झाले. अनेक ब्लॉगर्सनी वेगवेगळे विषय, विविध फॉर्म्स, निरनिराळ्या मांडण्या यशस्वीपणे हाताळल्या. अजूनही कित्येकजण नवनवीन प्रयोग करताहेत. ही तर सुरुवात आहे. अजून खूप प्रगती होईल. मोठा पल्ला गाठला जाईल. पण त्यासाठी ब्लॉगर्सना थोडा वेळ दिला गेला पाहिजे. सध्या तरी ब्लॉग म्हणजे कथा, कविता, कदंबर्‍या यासारखा एखाद्या व्याख्येत बसवता येणारा साहित्यप्रकार नाही. मनात आलं ते, वाटलं ते, काहीही, सहज लिहिलेलं अशा प्रकारचं लेखन आहे ते. तेव्हा निष्कारणच एकांगी/दर्जाहीन किंवा तोचतोचपणा असलेलं लेखन अशी लेबलं लावली जाऊ नयेत, उगाच अपेक्षांचं ओझं ब्लॉगर्सवर लादलं जाऊ नये एवढीच अपेक्षा  !!

-हेरंब
ब्लॉगचा दुवा : http://www.harkatnay.com/

No comments:

Post a Comment

हिंसक आंतरराष्ट्रीय राजकारणाचं प्रत्ययकारी चित्रण : 'राजकीय हत्या'

आपल्या (तथाकथित!) सुसंस्कृत समाजात नियमितपणे घडणाऱ्या मोर्चे ,  धरणी , आंदोलनं यांसारख्या घटना किंवा अगदी सार्वजनिक उत्सव , समारंभ , मिरवणुक...