Sunday, March 14, 2010

बोंब-ए-मराठी : अर्थात आझाद-ए-हिंदी - भाग २


खरं तर कुठल्याही लेखाचा दुसरा भाग लिहायला मला आवडत नाही किंवा लिहिता येत नाही.. पण हा लेख थोडासा अपवाद आहे असं म्हणू आपण... कारण हा लेख लौकिकार्थाने आझाद-ए-हिंदी चा भाग-२ आहेही आणि म्हंटलं तर नाहीही. भाग-२ आहे एवढ्यासाठी की हा लेखही मराठी-हिंदीतले शब्द, त्यांचे अर्थ/अनर्थ आणि एकूणच नातेसंबंध याच विषयावरचा आहे (म्हणजे निदान प्रयत्न तरी असाच आहे). पण भाग-२ नाही एवढ्यासाठी की हा लेख आझाद-ए-हिंदी सारखा मिश्कील, चुरचुरीत नसेल. कारण या विषयात चुरचुरीतपणा, खमंगपणाला वाव नाहीये. हे आधीच सगळं सांगून टाकलं की कसं बरं असतं.

आपण मराठीत असंख्य हिंदी शब्द घुसडून ठेवले आहेत किंबहुना आपण मराठी बोलतो तेही प्रचंड हिंदी ढंगाने आणि त्याउप्परही हे एवढं नेहमीचं सवयीचं झालं आहे की आपण चुकीचं मराठी बोलतोय हे आपल्या लक्षातही येत नाही. उगाच भाषा शुद्धीकरण, प्रत्येक हिंदी आणि इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द शोधणे आणि रोजच्या वापरातले सोपे शब्द सोडून ते अवघड संस्कृतप्रचुर मराठी शब्द वापरण्याचा अट्टाहास करणे असा कुठलाही छुपा किंवा उघड हेतू हा लेख लिहिण्यामागे नाही. पण हे असं शब्द घुसडण्याच्या समर्थनार्थ "भाषा प्रवाही हवी, सर्वसमावेशक हवी, तरच ती वाढते, प्रगत होते" या असल्या चुकीच्या सबबी सांगून दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न केला जातो ना त्याचा मला तिटकारा आहे. आता भाषा सर्वसमावेशक करायच्या नावावर काय चुकीचं मराठी बोलायचं सरळसरळ? एक मिनिट. मी 'अशुद्ध' म्हणत नाहीये 'चुकीचं' म्हणतोय. खूप मोठा फरक आहे दोन्हीत. कुठल्याही भाषेत शुद्ध आणि अशुद्ध असं काहीच नसतं असं माझं मत आहे. एखादी भाषा बोलणार्‍यांपैकी जास्तीत जास्त प्रमाणावर लोक ज्या प्रकारची भाषा बोलतात ती शुद्ध किंवा मूळ स्वरूपातली भाषा झाली असं माझं मत आहे. छापील स्वरूपातील भाषा लिहिण्या,बोलण्यात आणून तिलाच शुद्ध भाषा म्हणवून मोठ्या प्रमाणावरील लोकांना तुम्ही अशुद्ध बोलताय म्हणून हिणवणं हे मला मुळीच पटत नाही. मुठभर लोकांच्या हातात जर भाषा शुद्ध/अशुद्ध ठरवण्याच्या बाबतीतले निकष लावण्याची जवाबदारी दिली गेली तर अर्थातच ते स्वतः ज्या प्रकारची भाषा, उच्चार, शब्द वापरतात त्याला ते शुद्ध भाषा म्हणवणार आणि ते शब्द/उच्चार सोडून इतर कुठल्याही प्रकारची उच्चार, शब्द वापरणार्‍यांना अशुद्ध म्हंटलं जाणार हे तर सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे नव्हे हा सरळसरळ ढोंगीपणा आहे. 

शुद्ध-अशुद्ध वर एवढं पाल्हाळ लावण्याचं कारण म्हणजे मला 'अशुद्ध मराठी' आणि 'चुकीची मराठी' यातला फरक ढोबळमनाने समजावून सांगायचा होता. पुन्हा सांगतो, अशुद्ध मराठी असं काही नसतं पण चुकीची मराठी बोललेली तुम्हाला पावलोपावली आढळेल आणि तेही अमराठी जनांकडून नव्हे तर १००% मराठी लोकांकडून. ही चुकीची बोलली जाणारी मराठी म्हणजे हिंदीची किंवा काही प्रसंगी इंग्रजीची केलेली भ्रष्ट नक्कल आहे किंवा हिंदी/इंग्रजीतील शब्द तसेच्या तसे वापरून किंवा हिंदी शब्द मराठीत वापरताना अर्थ बदलला तरी तो शब्द तसाच पुढे रेटून मराठीची केली जाणारी गळचेपी आहे. तर या अशा शब्दांची यादी बघायच्या आधी अजून एक मुद्दा सांगतो तो म्हणजे या लेखाचा राज ठाकरे, मनसे किंवा त्यांची चळवळ, राडे यांच्याशी काहीही संबंध नाही. ही माझी वैयक्तित मतं आहेत. अजून एक म्हणजे मला थोडीफार खात्री आहे की हे सगळे शब्दप्रयोग चुकीचे आहेत हे बर्‍याचजणांना पटणार नाही पण... असो.

खूप सारं : खूप सारा/री हा मराठीमध्ये हिंदीतून आंधळेपाने आयात झालेला आणि प्रचंड वापरला जाणारा शब्द. हा 'खूप सारा/री' हिंदीतल्या 'ढेर सारा/री' वरून आलेला आहे. "आज मै ढेर सारे लोगोंसे मिला" हे हिंदी वाक्य बघून "आज खूप सार्‍या लोकांना भेटलो" असं आपण त्याला काही विचार न करता सरळसरळ मराठीत वापरतो. पण हिंदीत ते जेवढं अचूक आहे तेवढंच मराठीत चूक आहे. "आज मी खूप लोकांना भेटलो" म्हंटलं की झालं. त्या 'खूप' नंतर 'सार्‍या' ची गरज नाही.

दुनियाभरचं : "आज मुझे दुनियाभरका काम था" याचं वरच्या 'खूप सारं' प्रमाणे अंधानुकरण करून आपण मराठीत बोलताना "आज मला दुनियाभराचं काम होतं" असं बिनदिक्कतपणे म्हणून टाकतो. हे 'दुनियाभरका' हेही हिंदीत 'खूप' या अर्थानेच जातं. त्यामुळे मराठीत म्हणताना "आज मला खूप काम होतं" म्हंटलं की भा.पो.

गर्व-(अभिमान) : मला वाटतं जराही विचार न करता मराठीत जसाच्या तसा वापरला जाणारा हा हिंदी शब्द म्हणजे समस्त चुकीच्या मराठी शब्दांचा मेरुमणी आहे. याची मूळ गडबड अशी आहे की हे दोन्ही शब्द मराठी आणि हिंदी या दोन्हीत अस्तित्वात आहेत. पण दोन्ही शब्दांचे दोन्ही भाषांतले अर्थ एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. फार पूर्वीपासून हा चुकीच्या पद्धतीने मराठीत वापरला जात आहे आणि त्यात पुन्हा मांजरेकर साहेबांनी त्याला जी झळाळी प्राप्त करून दिली त्यामुळे तर प्रत्येक मराठी माणसाला तो शब्द चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या ठिकाणी वापरण्याचं लायसन्सच मिळालं. मागेही यावर लिहिलं आहेच. पुन्हा थोडक्यात सांगतो. गर्व या शब्दाचा हिंदीतला अर्थ म्हणजे अभिमान आणि अभिमान या शब्दाचा हिंदीतला अर्थ म्हणजे गर्व. म्हणजे "गर्वसे कहो हम हिंदू है" मध्ये तो अभिमान या अर्थाने म्हणजे चांगल्या अर्थाने वापरला जातो आणि अमिताभ-जया वाल्या 'अभिमान' मध्ये तो गर्व या अर्थाने वापरला गेला आहे (कारण तोच त्याचा योग्य अर्थ आहे) हे आपण पाहिलंच आहे. गर्व या शब्दाकडे मराठीत दुर्गुण या अर्थाने कसं बघितलं जातं हे लक्षात घेण्यासाठी थोडं बालपणात डोकावून आपल्याला तेव्हा शिकवल्या गेलेल्या "गर्वाचे घर खाली" किंवा "'ग'  ची बाधा" या म्हणी आठवल्या तरी ते लक्षात येईल. अभिमान हा शब्द योग्य ठिकाणी वापरण्याचं एक उदाहरणं म्हणजे "मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे" हे. मी मराठी असल्याचा गर्व आहे असं म्हंटलं तर ते 'गर्वाचं घर खाली' सारखं वाटेल.

काहीतरी : "मुझे तुमसे कुछ कहना है" किंवा "I want to tell you something" वरून आपण मराठीत बोलताना तो प्रकार जसाच्या तसा उचलून असं म्हणतो की "मला तुला काहीतरी सांगायचंय". योग्य मराठी वाक्य हे असं असेल. "मला तुला एक सांगायचंय" किंवा "मला तुला एक गोष्ट सांगायचीये" .... आपण हे "मला तुला काहीतरी सांगायचंय" हे असलं धेडगुजरी मराठी इतक्या वेळा ऐकतो, वाचतो की त्यामुळे ते चुकीचं आहे असं आपल्याला वाटतच नाही. पण मराठीत 'काहीतरी' या शब्दाचा योग्य प्रयोग होतो तो फक्त "तो काहीतरी बडबडतोय" याअर्थी बोलताना. आता यापुढे आपण आपलं ठरवायला हवं की आपल्याला 'एक गोष्ट' सांगायचीये की 'काहीतरी' सांगायचंय.

कोणीतरी : हा 'कोणीतरी' म्हणजे 'काहीतरी' चा जुळा भाऊ. "त्यांच्याकडे 'कोणीतरी' आलंय" हे कोणी अनोळखी व्यक्ती आलीये हे सांगताना बोलणं ठीक आहे. पण "परवा आमच्याकडे एकजण (ओळखीचे) आले होते." असं सांगताना आपण "परवा आमच्याकडे कोणीतरी आले होते" असले शब्दप्रयोग सर्रास बघतो/ऐकतो. अशा वेळी मला त्यांना विचारावसं वाटतं की "अहो उगाच कोणीतरी अनोळखी व्यक्ती कशाला उगाच तुमच्याकडे येऊन बसेल?" असो.

घबराहट : परवा मटा मध्ये बातमी होती की म्हणे "बॉम्बच्या अफवेने तिथे 'घबराहट' उडून गेली." 'नवभारत टाईम्स' किंवा 'हिंदुस्तान टाईम्स' मधून एखाद्याला आणून थेट मटाची बातमी छापायला बसवलं असावं असं मला वाटून गेलं. मी तिकडे खाली जळजळीत प्रतिक्रियाही टाकली पण ती छापून आली नाही हेसांनल..

फसलो : हिंदीमध्ये फसलो/फसना हा शब्द अडकणे याअर्थी वापरला जातो. उदा. "ये कहा आके फस गया मै". पण मराठीत बोलताना "आज ऑफिसमध्ये एका रटाळ मीटिंगमध्ये खूप वेळ फसलो होतो मी" हे असलं विचित्र मराठी बोलायची काय गरज आहे??

माजवला : "शोर मचाया" "हल्लागुल्ला मचाया" चं कोणी "गोंधळ माजवला" किंवा "हैदोस माजवला" असं भाषांतर/स्वतंत्र वाक्य लिहिलं ना की असला वैताग येतो ना. "माजणे/माजाला येणे" या शब्दाचा योग्य अर्थ किती जणांना माहित असा प्रश्न उगाच निर्माण होतो डोक्यात. हैदोस हा घातला जातो माजवला जात नाही. निदान मराठीत तरी नाही.

आवाज दिला : "आवाज दो कहा हो" हे हिंदी हाक मारणं झालं तरी मराठीत हाक मारताना "त्याने मला आवाज दिला" असं का म्हणावं लागतं ते काही कळत नाही.

चालला गेलो : "गेलो" असं म्हणायच्या वेळी "चला गया" या हिंदी वाक्याचं सरळसोट भाषांतर करून "चालला गेलो" हा शब्दप्रयोग मी असंख्य ठिकाणी बघितला आहे.

वर सांगितलेले हे सगळेच्या सगळे चुकीचे शब्दप्रयोग प्रामुख्याने मराठी वृत्तपत्रं, मालिका (किंवा हिंदी/इंग्रजी जाहिरातींचं मराठीत केलं जाणारं अंध भाषांतर) यांत वेळोवेळी आढळतात यासारखं दुसरं दुर्दैव नसेल. आणि त्यामुळे आपोआपच ते सामान्य माणसाच्या बोलण्यातही वापरले जातात. वर दिलेली यादी ही फक्त एक सहस्त्रांश आहे असं मी म्हणेन. हल्ली मराठी मालिका बघणं (सुदैवाने) बंद झालं असल्याने अजून शब्द आत्ता आठवत नाहीयेत. पण जर चुकून एखादी मालिका बघायची वेळ आली तर असले शब्द वाक्यावाक्यागणिक खड्यासारखे लागतात आणि त्यातूनही जर सलग तासभर मालिका बघितल्या तर अजून १५-२० असे शब्द सहज येऊन टोचतात. आणि रोज मालिका बघितल्या तर यादीत अजूनअजून वाढ होत राहील. कारण प्रत्येक भागात नवनवीन चुकांचा भरणा असतोच. 

त्यामुळे कितीही चुकीचं मराठी कानावर पडलं तरीही आपण बोलताना जास्तीतजास्त योग्य/अचूक शब्द असलेलं मराठी बोलण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा एवढंच म्हणू शकतो !

----

* हा लेख टाकून झाल्यावर काही तासांतच मटाने "मुंबई बचावली" असे अकलेचे तारे तोडलेले सागरने दाखवले. मी फक्त एक मोठ्ठा सुस्कारा टाकला !!! 

29 comments:

  1. लेख छान आहे...पण तू म्हटल्याप्रमाणे खमंग नाहीये.
    गर्व आणि अभिमान यांच्यातील फरक अगदी अचूक सांगितला आहे.
    काहीतरी हा शब्द मला खटकला नाही. मला काही सांगायचे आहे यात मला काही चुकीचे वाटत नाही.
    बाकी शब्दांच्या चुका बोलीभाषेत होतात हे मान्य. अधिकाधिक चांगले आणि अचूक मराठी वाचण्यात आले तर या चुका दुरुस्त होऊ शकतील.

    ReplyDelete
  2. बापरे, मला तर कल्पना देखिल नव्हती.
    पण कोणीतरी, काहीतरी, आणि फसलो मला त्यापैकी वाटले नाहीत.
    फसगत हा शब्द मग मराठी आहे का ?

    बाकी शब्दप्रयोग खरंच खटकण्यासारखे आहेत...

    ReplyDelete
  3. सागर, हम्म्म. हा लेख खमंग होणार नव्हता हे मला माहित होतं. म्हणून तसं आधीच सांगितलं.. त्यामुळे आझाद-ए-हिंदी भाग-२ देऊ की नको असाही विचार करत होतो.

    "मला काही सांगायचे आहे" हे बरोबरच आहे रे. पण मराठी मालिका त्या 'काही'चं सर्रास 'काहीतरी' करून टाकतात. ते साफ चूक आहे.

    ReplyDelete
  4. अरे तसं नाही. 'फसणे' हा शब्द फसगत या अर्थी वापरला तर बरोबरच आहे. पण हिंदीत 'फसना' याचा अर्थ 'अडकणे'. आणि आपणही बोलताना मग तसंच बोलतो की "मी आज ट्रॅफिकमध्ये एक तास फसलो होतो." तर 'या' फसणे ला माझा विरोध आहे.

    ReplyDelete
  5. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे शब्द तर असन्ख्य आहेतच, पण आप्ण वक्यरचना पण हिन्दी किन्वा इन्ग्रजी प्रमाणे करतो तेन्वा मनाल फ़ार दुःख होते.

    ReplyDelete
  6. हो बरोबर आहे अरुणाताई. हिंदी/इंग्रजी प्रमाणे वाक्यरचना हा तर मोठ्ठा विषय आहे वेगळा. साधं "फोन करू का?" विचारताना लोक "फोन करू शकतो का?" असं म्हणतात.. काय बोलणार आता?? :(

    ReplyDelete
  7. हम्म्म..बर्‍यापैकी चांगली उदा.दिलीत तू...फ़क्त मला असं वाटतं की भाषा शुद्ध आणि अशुद्ध अशी असते..लेखी आणि तोंडी दोन्ही...माझा फ़ार अभ्यास नाहीये पण आकार-उकार याला अर्थ आहे...त्यामुळे तू जे शुद्ध-अशुद्ध असं काही नाही म्हणतोस ते तितकंसं पटत नाही....

    ReplyDelete
  8. नाही अग तसं नाही. मी र्‍हस्व-दीर्घ बद्दल बोलतच नाहीये. ते अचूक असलंच पाहिजे. थोडक्यात मी लिखाणातल्या शुद्ध-अशुद्धतेविषयी नाही उच्चारातल्या शुद्ध-अशुद्धतेविषयी म्हणत होतो. अगदी स्पष्ट उदाहरण द्यायचं झालं तर खेडेगावात वर्षानुवर्ष राहणारा माणूस 'आणि' ला 'आनि' च म्हणणार कारण तो किंवा त्यांच्या आजूबाजूचे लोक वर्षानुवर्ष तसंच बोलत असतात. पण त्याला उगाच पुस्तकी भाषेचा दाखला देऊन 'तू अशुद्ध बोलतोस' असं जे हिणवलं जातं त्यावर माझा आक्षेप होता.

    ReplyDelete
  9. लेख चांगला झालाय. . .वेगळी माहिती मिळाली. . .हे सगळे शब्द हिंदीतुन आलेत हे आजच समजल. . .धन्यवाद!!!

    ReplyDelete
  10. आभार मनमौजी. शब्द मराठीच आहेत. पण आपण वापरतो ते हिंदीच्या अर्थाने, पद्धतीने आणि ढंगाने. त्यामुळे जाम गडबड होते.

    ReplyDelete
  11. लेख मस्तच आहे...आणि जळजळीतही आहे...मात्र एकच शंका आहे - समर्थ म्हणतात तेव्हा 'दिसामाजी काहीतरी ते लिहावे' त्यात काहीतरी शब्द बरोबर अर्थाने वापरला आहे...तेव्हा तो मुद्दा तेवढा पटला नाही...

    ReplyDelete
  12. maja ek mitr bolto aapla marthmola "shahir" ya shabdache mul hindit ahe te mhanje "Shayar"...tumhala kay vatta

    Lihita mast ! asech lihiti raha.

    ReplyDelete
  13. प्रतिक्रियेबद्दल आभार निखिल. मी म्हणतोय ते (म्हणजे चुकीच्या पद्धतीने वापरलं जाणारं) 'काहीतरी' आणि 'दिसामाजी काहीतरी' मध्ये फरक आहे असं वाटतं मला. समर्थ म्हणतात ते "काहीही चालेल पण काहीतरी नक्कीच लिहा रोज" अशा अर्थाचं आहे. मी म्हणतोय ते काहीतरी वेगळं आहे. उदाहरण देतो.

    मुलगा मुलीला मागणी (प्रपोज रे) घालताना म्हणेल "मला तुला एक सांगायचंय" किंवा "मला तुला एक गोष्ट विचारायाचीये" (आपण चुकीचं मराठी इतकं ऐकलं आहे की इथे 'एक'च्या ऐवजी 'काहीतरी' हेच बरोबर आहे असं तुला हे वाक्य वाचल्यावाचल्या नक्की वाटेल याची मला खात्री आहे पण दुर्दैवाने ते चूक आहे.)

    आता 'काहीतरी' चा योग्य उपयोग दाखवतो. वरच्या उदाहरणात म्हटलेले मुलगा आणि मुलगी बोलत असताना लांबून त्याचे दोन मित्र बघताहेत. आणि त्यांच्यातला संवाद

    पहिला : काय रे? कधी जायचं घरी?
    दुसरी : काय माहित. तो तिच्याशी काहीतरी बोलतोय. त्यांचं बोलणं झालं की मग जाऊ.

    थोडक्यात, काय संवाद आहे ते माहित नसलेल्या एखाद्या बोलण्याविषयी बोलताना 'काहीतरी' हा शब्दप्रयोग योग्य आहे. किंवा मी मूळ लेखात दिलेल्या उदाहरणाप्रमाणे "तो काहीतरी बडबडतोय" अशा अर्थी. आणि समर्थांच्या "दिसामाजी काहीतरी" विषयी मी (माझ्या समजाप्रमाणे) आधीच सांगितलं आहे..

    ReplyDelete
  14. हर्षल, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार. हे शायर आणि शाहीरचं नव्हतं आलं लक्षात. पण मला वाटतं त्यात चूक बरोबर असं काही नसावं. जो शब्द आधी जन्माला आलाय तो अर्थातच मूळ शब्द मग तो उर्दू असो वा मराठी. आणि दुसरा शब्द म्हणजे पहिल्या शब्दाचा अपभ्रंश करून किंवा जसाच्या तसा वापरलेला शब्द असं मी म्हणेन. जसं आपण 'जंगल' किंवा 'नीट' हे इंग्रजी शब्द मराठीत जसेच्या तसे वापरतो अगदी तसंच.

    ReplyDelete
  15. लेख छान झाला आहे..मराठी भाषेचा अगदी बारकाइने निरीक्षण चालु आहे राव तुमच ...चालु द्या..असो काही शब्द/वाक्यरचना हे विशिष्ट भागातील बोली भाषेत असे चिकटुन बसले आहेत कि आता तुम्ही ती चुक दाखवुन दिलीत व ती माहिता असली तरी तोंडातुन तेच बाहेर पडणार...

    ReplyDelete
  16. आभार देव. अरे बारकाईने निरीक्षण असं नाही. हे शब्द मला वर्षानुवर्ष खटकत आले आहेत आणि हल्ली तर ते अशाच चुकीच्या पद्धतीने मालिका आणि वृत्तपत्रांमध्ये वारंवार वापरले जातात त्यामुळे नकळतच अनेक लोक तसंच बोलायला लागतात.
    आणि माझा विशिष्ठ भागातील बोलीभाषेला मुळीच विरोध नाही. शुद्ध/अशुद्ध चं एवढं मोठ्ठं पाल्हाळ लावलं ते त्यासाठीच. पण हे हिंदी आणि इंग्रजी शब्दांचं, वाक्यांचं अंधानुकरण करणं हे म्हणजे अति झालं.

    ReplyDelete
  17. आमच्या इथे नागपुरचे एक व्यक्ती आहेत ते तुम्ही सांगीतल्याप्रमाणे चालला गेलो वैगेरे शब्द बोलतात..आता हे हिंदीच अंधानुकरण आहे.मी एकदा याबबात विचारलेही होते ते म्हणाले जन्मापासुन हे शब्द ते अशेच ऐकत-बोलत आले आहेत म्हणुन...

    ReplyDelete
  18. मला वाटतं नागपूर, वर्धा किंवा अजूनही MP ला लागून असणा-या गावां/शहरांमध्ये हे 'चाललो गेलो' नेहमीचं असावं. ते हिंदीचं अनुकरण नाही असं आपण म्हणू क्षणभर पण मराठीत अशी काही वाक्यरचनाच नसल्याने ऐकायला थोडं वेगळं वाटतं..

    ReplyDelete
  19. lekh chhan zalay... pan jungle ha mul Hindi shabd ahe,sanskritotdbhav. hindi vate to english madhe gelay..

    Amchchya bhagat i mean Nagpur kade 'chalala gelo', 'karun tak' ya prakarchi marathi bolali jate... Hindi pattyachya javalikicha ha parinaam ahe.. matr for centuries we are speaking like this and we don't feel awkward while speaking such marathi.. In fact, jevha amhi praman marathi vachato, tevha amhala ti marathi tutak-tutak vatate.. Nagpuri boli chukichi nahi ki praman marathi chukichi nahi.. ha tya- tya bolibhashecha svabhav ahe. Praman marathit ashi kahi vakyarachna naselhi pan hi vakyarachna Nagpuri,zadiboli ani varhadi bolincha ek ghatak ahe. tyamule amchya bolit boltanna yashi vakyarachna chukichi mhanata yenar nahi.. Praman marathi boltanna matr ashi vakyarachna chukichich ahe..

    ReplyDelete
  20. आभार संकेत.. मी देवेंद्र (दवबिंदू) दिलेलं उत्तरच तुलाही लागू होतं. पण तुझाही मुद्दा मला पटला हे नक्की. :)

    ReplyDelete
  21. chhan lekh!Malahi raag yeto marathi serials/news madhli bhasha aikun!
    War konitari mhatlya pramane vidarbha chya bhashewar hindi cha prabhav aahe, pan to tya bhashecha ch ghatak aahe..tyala chuk nahi mhanta yenar..to tya lokanni muddam style marnya sathi kelela badal nahi tar ti tyanchi parampara gat bolibhasha aahe ..
    Matr mala aajkal chya marathi blogs lihinarya lokanni uchlun dharlelya "dhans", "weekant", "misle", "postle" type marathi cha prachand raag yeto..karan hya janun bujun kelelya chuka/badal aahet..ani war avirbhav asa ki hyat janu kahi chuk naahi ch :(
    Plz dnt take it personally..mi pratinidhik udaharne dilit.
    --Sayali

    ReplyDelete
  22. सायली, आपल्या मनमोकळ्या आणि तपशीलवार प्रतिक्रियेबद्दल आभार.. वैदर्भीय भाषेविषयी मला नव्हतं म्हणायचं काहीच. माझा रोष मराठी मालिका आणि वृत्तपत्रांमध्ये निष्काळजीपणे आणि हलगर्जीपणे चुकीची मराठी वापरली जाते त्यावर होतं.

    आणि ब्लॉगर्सच्या भाषेविषयी. कृपया मी ब्लॉगर आहे म्हणून मी ब्लॉगर लोकांची बाजू घेतोय असं प्लीज समजू नका. पण धन्स, धन्यु, विकांत, पोस्टले हे शब्द just टाईमपास, लाईट मूड म्हणून वापरले जातात. ते अधिकृत मराठी शब्द आहेत असं कोणाचाच म्हणणं नाही.

    आणि हो. मुख्य म्हणजे ब्लॉगवर स्वागत.. अशीच भेट देत रहा !! :-)

    ReplyDelete
  23. Thanks for taking note of my opinion.
    Tyamule ch argument pudhe wadhwaychi himmat kartey :)
    Pratham, tumhi vaidarbhiy bhashe wishayi kahi chuk mhatle asa kahi mhanane nahi ho. Just 1 udaharn mhanun te ghetla. Gairsamaj nasawa.
    Argument chalu:
    Aaj je shabd timepass mhanun waparle jatat ani tehi bloggers (informal buddhiwadi ani prachand following asnare) kadun, tech adhikrut aahet asa samaj whayla (or muddam pasrawayla) kitisa wel lagnar? at max 10-15 warshe!! :P e.g. "mi karnare/janare" he wakya hi bolibhashet barobar asla tari likhit madhye nahi..pan te ikde pune-mumbai che lok nehami ch wapartat mhanun tyawar koni aakshep ghet nahi. Pan tech vidarbhat bollaya janarya " mi chalala gelo" war kiti tari lok tika kartat. Karan ek ch: Punya-mumbai kadli marathi hi ch Standard marathi ha samaj. Asach samaj kahi diwasani marathi bloggers wishayi hi honar ch (karan bloggers shiway kon marathi la kharokhar yogya maan milwun det aahet? media tar nakkich nahi.) Shiyway marathi blog/sites warti asnari lobby kadhihi swatah chya chuka manya karat nahi :) Aso.Manat aale mhanun lihile. Konala shikawnyacha kimwa dukhavnyacha hetu nahi.
    --Sayali

    ReplyDelete
  24. Ani ajun ek..Blog mast ch aahe :)
    --Sayali

    ReplyDelete
  25. सायली, नाही गैरसमज अजिबात नाही. काळजी नसावी :-)
    Argument : माझ्या मते १५-२० वर्षांपूर्वीची मराठी बोली भाषा बघितली तर त्यात सही, पोपट, जबरी, कलटी, सुस्साट (सुसाट वेग या अर्थी नव्हे) वगैरे शब्द नव्हते. पण तरुणाईने ते शब्द भाषेत आणले. अजूनही कुठल्याही दर्जेदार साहित्यात ते शब्द वापरले जात नाहीतच. छापील, दर्जेदार वाङमयासाठी ते अजूनही निषिद्धच आहेत. ते स्वीकारले जावेत असं मी अजिबात म्हणत नाहीये पण त्या अनुषंगाने उदाहरण देतोय फक्त. पण ते पुस्तकात वापरले जात नाहीत म्हणून बोलीभाषेत वापरायचे कुठे थांबतात. कारण बोलीभाषा व्याकरणावर नाही तर भावनेवर चालते. (पण तेच जर टीव्ही मालिका, पेपर मध्ये येत असेल तर ते योग्य व्याकरणासह आलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि तेच मी लेखात मांडलं आहे.) तर अगदी त्याचं प्रमाणे धन्यु, धन्स, विकांत, हे शब्दही ब्लॉगर्स, वाचक यांच्यात वापरले जातात, अधिकाधिक वापरले जातील पण त्यांना दर्जेदार साहित्यात स्थान नसेल आणि नसावंही. Coz they are just for light moods and not for the deep literature.. थोडं कन्फ्युज करत का होईना माझं म्हणणं मांडायचा प्रयत्न केला आहे. बघा पटतं का.

    आणि ब्लॉग आवडला हे आवर्जून सांगितल्याबद्दल खूप खूप धन्स सॉरी धन्यवाद :-) (just गंमत केली. राग नसावा.)

    ReplyDelete
  26. छान ! असं सूक्ष्म निरीक्षण करणं गरजेचं झालंय मराठीच्या हितासाठी.
    savadhan.wordpress.com

    ReplyDelete
  27. आभार सावधानजी !!

    ReplyDelete
  28. लोक काहीही लिहितात आणि बोलतात. झी मराठीवरच्या ’फू बाई फू’ या कार्यक्रमात सई ताम्हनकर (तिच्या आडनावाचा उच्चार ’ताम्हणकर’ आहे अशी माझी समजूत होती, पण ती स्वतःच ’ताम्हनकर’ म्हणते.) स्पर्धकांना बर्‍याच वेळा म्हणते, ’आपलं खूप खूप स्वागत’! ही कोणती पद्धत स्वागताची? स्वागत हे मनापासून असू शकतं, खूप खूप कसं असेल? मराठीविषयी असलेल्या प्रचंड अनास्थेमुळे हे असं होतं. आपण काय बोलत आहोत, बोलत आहोत ते चूक की बरोबर या गोष्टींचा अजिबात विचार होत नाही आजकाल. चुकीच्या बोलण्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे ’ष’ य अक्षराचा उच्चार. सुधीर फडकेंची गाणी ज्यांनी ऐकली असतील त्यांना खरा उच्चार कळेल या अक्षराचा. पण किती लोक ’ष’ चा उच्चार ’ष’ असा करतात? खूप कमी. ’भाषा’ आणि ’शहामृग’ हे शब्द एकाच पद्धतीने उच्चारले जातात.

    ReplyDelete
  29. हा हा.. ती सई म्हणजे अशुद्ध बोलण्याचं सगळ्यात शुद्ध उदाहरण आहे. खूप खूप स्वागत.. हा हा हा. "मला मदत केली" च्या ऐवजी सर्रास "माझी मदत केली" वापरतात लोकं.. माझी मदत कुठून आली ही आता? 'मेरी मदद करो' चं आंधळं भाषांतर पुन्हा.
    आणि ते श आणि ष बद्दल एकदम पटलं रे..

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...