Monday, March 15, 2010

डोसा : भाग १

पहिल्याच रिंगला मी मोबाईल उचलला आणि थोडंसं वैतागूनच विचारलं.

"अग आहेस कुठे? कधीची वाट बघतोय आम्ही.. पोरं तर बिचारी कंटाळून गेली."
"अरे काय सांगू. क्लायंट मीटिंग एवढी लांबली ना की बस. आणि त्यांना मिटींगमध्ये सांगितलेले चेंजेस आजच्या आज करून हवेत."
"काय आत्ता? तुझ्या साहेबाला घड्याळ कळतं ना?"
"प्लीज रागावू नकोस"
"सॉरी. उगाच चिडलो तुझ्यावर. पण मग आता काय करायचं?"
"एक काम करा. तुम्ही पुढे व्हा. मुलं तयार होऊन बसलीयेत. हॉटेलमध्ये जायचं ठरल्यावर ती आता घरी जेवणार नाहीत. तासा-दोन तासात माझं काम संपलं तर मी थेट हॉटेललाच येते."
"बरं. लवकर निघा"
"हो"

**

तिने हो म्हणून फोन ठेवला असला तरी कितीही प्रयत्न केला तरीही तिला हॉटेलला येता येणार नव्हतं हे आम्हाला दोघांनाही चांगलंच माहित होतं.
फोन ठेवल्या ठेवल्या शेंडेफळाने--उर्वी-वय-वर्षं-५-ने-- विचारलं "काय म्हणाली आई?"
"काय म्हणाली काय? ऐकलं नाहीस का? आई येणार नाहीये. त्यामुळे हॉटेल कॅन्सल" उन्मेष रागाने डाफरला.
हा तिच्यापेक्षा तीनच वर्षांनी मोठा असूनही एवढा आगाऊपणे का वागतो कधीकधी असा नेहमीचा प्रश्न मला पुन्हा पडला. मी लगेच सावरून घेत म्हंटलं. "असं काही नाहीये. आपण जातोय हॉटेलमध्ये".
"खर्र्रर्रच?" उर्वी चित्कारली. तिला हॉटेलमध्ये जाणं महत्वाचं होतं. कोण येतंय आणि कोण नाही याच्याशी तिला विशेष कर्तव्य नव्हतं.
"आईशिवाय?" उन्मेषचं मातृप्रेम नको तेव्हा उफाळलं.
"आईशिवाय नाही. आईही येणारे. पण थोडी उशिरा. आईनेच सांगितलंय आपल्याला पुढे व्हायला. ती मागाहून येईल."
उन्मेषला ते विशेष पटल्याचं दिसत नव्हतं पण उर्वीचं तर लक्षच नव्हतं. ती दरवाजाकडे पळालीही होती.
गाडी पार्क करून हॉटेलमध्ये शिरेपर्यंत ९ वाजून गेले होते. शुक्रवार असल्याने गर्दीही चांगलीच होती. पण तरीही २०-२५ मिनिटात म्हणजे गर्दीच्या मानाने लवकरच टेबल मिळालं आम्हाला.
"काय खायचंय?" असं विचारल्यावर उर्वी नुसती हसायला लागली.
"नाही हं छकुली. आज डोसा नाही. दरवेळी पेपर डोसा मागवतेस आणि निम्मा पण नाही संपवत. आम्हालाच संपवायला लागतो.
"आं. मला डोसाच पाहिजे. आज संपवेन मी सगळा. आणि उरला तर आई खाईल."
"आईने खायचा असेल तर घरी न्यायला लागेल." चिरंजीव
"का? ती येणारेना इकडे?" छकुली
"गप रे तू... का उगाच तिला त्रास देतोयस? हो.. आई येणारे इकडे. तोवर जेवढा जाईल तेवढा डोसा खा तू. उरलेला आई खाईल."
चिरंजीवांसाठी चीज पावभाजी आणि चॉकलेट मिल्कशेक, छकुलीसाठी डोसा आणि स्ट्रॉबेरी आईसक्रीम आणि माझ्यासाठी बिर्याणी आणि पेप्सी मागवून झाल्यावर मी सहजच इकडे तिकडे नजर टाकली. मित्रमैत्रिणी, नवीनच लग्न झालेली कपल्स, काही ठिकाणी नुसतीच कॉलेजची गँग आणि काही ठिकाणी आमच्यासारखे सहकुटुंब आलेले लोकं यांनी हॉटेल नुसतं भरून गेलं होतं.
थोड्या वेळाने आमची ऑर्डर आमच्या टेबलवर विराजमान झाली. आम्ही सुरुवात करेपर्यंत चिरंजीवांचा पहिला पाव मटकावून झालाही. मी बिर्याणीचा घास घेईपर्यंत पुन्हा छकुलीच्या हसण्याचा आवाज आला.
"आता काय झालं ग तुला हसायला? पटापटा खायला लागा. मग गार झाला की म्हणशील मला नको म्हणून."
तरी ती हसतच होती.
"उर्वी... !"
आमच्या शेजारच्या टेबलकडे बोट दाखवत ती म्हणाली "बाबा बघ ना ती कशी खात्ये."
मी त्या दिशेने मी बघायला आणि त्या टेबलवरच्या माणसाने आमच्याकडे बघायला एकच गाठ पडली. मी पटकन तिचा हात खाली केला आणि त्याच्याकडे बघून ओशाळसं हसलो. पण सुदैवाने त्याचं आमच्याकडे लक्ष नव्हतं. तो आमच्यातून आरपार बघत असल्यासारखा कुठेतरी पहात होता.
"छकुली, अशी बोटं नाही दाखवायची कोणाकडे... किती वेळा सांगितलंय तुला..... कोणीही कसंही जेवूदे......... आपल्याला काय... तू लक्ष नको देऊ.... चल जेव पटापट......." मी जरा ओरडल्यावर उर्वी शांतपणे मान खाली घालून जेवायला लागली.

**

तिला शांत बसायला लावल्यावर ती कोणाकडे बघून हसत होती हे पहायचा मोह मला आवरेना. दोन्ही मुलं जेवणात गुंग आहेत असं बघून मी हळूच माझी मान शेजारच्या टेबलाकडे वळवली. माझ्याच वयाचा किंवा माझ्यापेक्षा फार तर २-३ वर्षांनी मोठा असलेला तो मगासचा माणूस, त्याच्याशेजारी एक १०-१२ वर्षांचा मुलगा आणि समोर साधारण आमच्याच चिरंजीव आणि कन्यकेच्या वयाचे एक मुलगा आणि मुलगी बसले होते. म्हणजे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करणारी आमची सौ एकमेव नव्हती तर. बाकीही बर्‍याच बॉसेसना त्यांच्या हाताखाली काम करणार्‍यांच्या पर्सनल लाईफविषयी विचार करण्याची गरज वाटत नव्हती. माझ्या डोळ्यासमोरून वपुंच्या पार्टनरमधला आगरकरांबरोबरचा संवाद तरळून गेला. तेवढ्यात माझं लक्ष त्या मुलीकडे गेलं. मी उर्वीला ओरडलो खरा पण ती मुलगी खरंच खूप विचित्र जेवत होती. तिने पण पेपर डोसाच मागवला होता बहुतेक. पण तो दहा ठिकाणी सांडला होता.तिचे हात सांबार, चटणीने नुसते माखले होते. चेहर्‍याला ठिकठिकाणी सांबाराचे डाग पडले होते. हळू हळू माझं लक्ष बाकीच्या दोन मुलांकडे गेलं. त्यांचीही परिस्थिती विशेष वेगळी नव्हती. वेगवेगळे पदार्थ मागवून, ते अर्धवट खाऊन टाकून, ठिकठिकाणी सांडून ठेवून त्यांचं मनसोक्त खाणं चाललं होतं. माझ्या मुलांनी असं काही केलं असतं तर मी कसला वैतागलो असतो. हा माणूस यांना काही बोलत कसा नाही म्हणून मी त्याच्याकडे नजर वळवली. बघतो तर उलट तो त्या तिघांकडेही अगदी प्रेमाने बघत होता. काय हवं नको विचारात होता. मधेच कधीतरी तो शून्यात कुठतरी बघे मगाशी माझ्यातून आरपार बघितलं होतं तसा. पण क्षणभरच. पुन्हा त्याच्या डोळ्यातून कौतुक बरसू लागे. मला जरा आश्चर्यच वाटलं त्याचं. अर्थात स्वतः दाढीचे खुंट वाढवून आलेल्या, अगदी मळके म्हणता येणार नाहीत पण अस्वच्छ् कपडे घातलेल्या, विसकटलेल्या केसांच्या गबाळ्या माणसाकडून त्याच्या गबाळ्या मुलांना काही शिस्त लागेल ही अपेक्षा ठेवणं वेडेपणाचंच होतं........  काय हे !!!. काय करत होतो मी !!! कोण कुठला तो माणूस ज्याच्याबिषयी मला एक अक्षरही माहित नव्हतं त्याला आणि त्याच्या मुलांना मी सरळसरळ गबाळं बनवून टाकलं होतं. क्षणभर ओशाळलो मी. पण खरंच ती मुलं म्हणावीत तर तीही अशीच अस्वच्छ आणि मळक्या कपड्यांमधलीच होती. ज्यांना घालायला धड कपडे नाहीत असे लोकं या असल्या हॉटेलमध्ये येऊन पन्नास रुपयांचा डोसा कसा खाऊ शकतात याबददल मला राहूनराहून कुतूहल वाटत होतं.

-- क्रमशः

- भाग २ इथे  वाचा. 

20 comments:

  1. क्रमश:चे वारे नकोत .. लवकर लवकर टाक पुढचा भाग ... वाचतोय.

    ReplyDelete
  2. अरे आयुष्यात पहिल्यांदा कधी नव्हे ते कथेसारखं काहीतरी डोक्यात आलं म्हणून लघुकथा लिहायला बसलो तर ती वाढतच गेली. पुढचा भाग खूप विस्कळीत आहे. जरा डागडुजी करून उद्या टाकतो.

    ReplyDelete
  3. कर कर लवकर डागडुजी... आणि खरयं रे हे क्रमश: नको बरं!!!!
    पटकन लिही...खरं सांगु का खेकडेगिरी लक्षात घेता पुढे तू काय वळवणार आहेस कथेला ते जरासं ध्यानात येतेयं!!! फिर भी तुम्हारे किबोर्ड का टायपा हुवा जल्दी से पोस्ट करो!!!!

    ReplyDelete
  4. क्रमशः????नको रे. . .सलग लिहून टाक. . .क्रमशः असलं पुढे काय लिहणार याचाच भुंगा डोक्यात घुमत राहतो!!!

    ReplyDelete
  5. तन्वी, करतो नक्की करतो डागडुजी आणि टाकतो पुढचा भाग. आणि ओळखला असलास तरी शेवट प्लीज कोणाला सांगू नकोस हं.. पण मला नाही वाटत शेवट कोणाला ओळखता येईल.. बघू.. उद्या वाचून सांग की तुझ्या डोक्यात पण असंच होतं का?

    ReplyDelete
  6. मनमौजी, सॉरी यार.. सगळ्यांच्या वाटचं सॉरी तुला म्हणून टाकतो. उद्या नक्की टाकतो पुढचा भाग.

    ReplyDelete
  7. डोसा मस्त झालाय.....कुठे हि काहीही कमी पडलेल नाही....प्रसंग छान उभा राहिलंय....लवकर दुसरा डोसा पाहिजे....
    खरच कोण असेल ती व्यक्ती?ती त्याची मुल असतील का?त्याची बायको अजून जिवंत आहे का?असेल तर तो शून्यात का नजर लावून बसलाय?

    ReplyDelete
  8. आभार सागर.. सगळी उत्तरं उद्याच्या भागात..

    ReplyDelete
  9. एवढच सांगतो, मी वाट पहातोय...

    ReplyDelete
  10. काय मित्रा?? आपल्या फ्यान्स (?) ना वाट बघायला लावणे फार आवडतं कारे तुम्हा लेखक लोकाना?? क्रमश: ?? आम्ही नही विकत घेणार तुझ म्याग्झीन जर असा क्रमश: करशील तर.. जा बुआ.

    ReplyDelete
  11. आनंद, आज येतोय दुसरा भाग.

    ReplyDelete
  12. अमित आणि सगळ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांच्या भा.पो. पण उगाच काहीतरी खरडण्यापेक्षा डोक्यात असलेल्या कल्पनेला थोडंस व्यवस्थित शब्दात मांडण्यासाठी थोडा वेळ लागतोय. पण नक्की सांगतो की आज भाग २ येणार. नक्की.

    ReplyDelete
  13. he tumcha aata....ekta kapoor style hotay.....te kramashah band kara raav.

    ReplyDelete
  14. एकता???? का शिवी देताय राव..

    ReplyDelete
  15. अंदाज आलाय थोडा थोडा...... :)

    ReplyDelete
  16. :) .. बहुतेक तरी सगळ्यांचे अंदाज खोटे ठरतील अशी मला खात्री आहे. (पण पहिलाच प्रयत्न असल्याने १००% खात्री नाही देऊ शकत :) )

    ReplyDelete
  17. आभार माऊ. आणि ब्लॉगवर स्वागत.. !!

    ReplyDelete
  18. mitra 100/100 !!

    sahi aahe katha
    sagali vachali
    :)

    -Sachin

    ReplyDelete
  19. खूप धन्यवाद सचिन !!

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...