Monday, March 10, 2025

मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!

पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेखन तर केलेलं आहेच पण सामाजिक, वैचारिक विषयही त्यांनी कथा, कादंबऱ्या, दीर्घ लेख अशा विविध मार्गांनी सक्षमपणे हाताळले आहेत. गेल्या आठवड्यात मतकरींच्या अशाच दोन सर्वोत्कृष्ट म्हणाव्यात अशा कलाकृती वाचनात आल्या. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट.

जौळची प्रकटनशैली फार वेगळी आहे. ही एका सर्वसामान्य घरातली कथा आहे. कादंबरीत भरपूर पात्रं आहेत ज्यांची अगदी जेमतेम तोंडओळख करून दिली जाते किंवा अनेकांचा तर एक-दोनदा केवळ निसटता उल्लेख येतो. या एवढ्या पात्रांमधल्या काही निवडक आणि कथेच्या दृष्टीने महत्वाच्या पात्रांच्या दृष्टिकोनात्मक निवेदनातून कथा पुढे सरकत जाते. निवेदक कोण आहे हे सांगितलं जात नाही. पण केवळ पहिल्या किंवा फार तर दुसऱ्या ओळीत हे पात्र कोण आहे ते चटकन लक्षात येतं ही मतकरींच्या लेखनाची खरी जादू आहे. घटनांमधून पात्रांचा परिचय अगदी थोडक्यात करून दिला जात असतानाच पात्रांच्या स्वभावाची ओळख तर वाचकाला होतेच पण त्याचबरोबर कथेची वीणही घट्ट बांधली जाते. आपण अतिशय बांधीव पटकथा वाचतोय असं जाणवत राहतो. जौळ १९८७ साली प्रकाशित झाली आहे हे लक्षात घेता ही निवेदनशैली किती आगळीवेगळी आहे हे जाणवून वाचक पानापानावर थक्क होता जातो. अशी निवेदनशैली शिवाजी सावंतांनी मृत्युंजय मध्ये वापरली होती. परंतु तो विषय पौराणिक आणि त्यातील पात्रांची निवेदनं विशाल आहेत. उलट जौळचा विषय सामाजिक, कौटुंबिक तर आहेच आणि प्रत्येक पात्राची निवेदनं अतिशय लहान अर्थात जेमतेम दीड-दोन पानी आहेत. 

कथा/शेवट माहीत असूनही पुढे काय होणार याची एवढी हुरहूर मला आत्तापर्यंत (कथा माहीत असणाऱ्या) इतर पुस्तकांच्या बाबतीतही कधीच वाटली नव्हती. पुस्तकाच्या मध्यावर शेवटच्या भयंकर घटनेचं बीज रोवलं जाण्याचे अस्फुट उल्लेख यायला लागतात तेव्हा अक्षरशः धडधडायला लागतं आणि प्रचंड वाईटही वाटायला लागतं. हे सगळं अशा विचित्र दिशेने का जातंय? याला थांबवण्याचा प्रयत्न कोणीच का करत नाहीये? प्रत्यक्षात हे असं घडू शकतं? जेमतेम चार महिन्याच्या संसारात एवढे टोकाचे आणि परतीचे दोर कायमस्वरूपी कापण्याचे निर्णय घेण्याएवढी उलथापालथ होऊ शकते? जीवाला कणभरही किंमत नसावी? कशाचा कशाशी ताळमेळच बसत नाही. 

अर्थात वाचकांना कांदबरी वाचताना पडू शकणाऱ्या या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं लेखकाने पुस्तकाच्या सुरुवातीला मनोगतात दिली आहेत. या कादंबरी विषयी आपली भूमिका मांडताना मतकरी सुरुवातीलाच म्हणतात की ही कादंबरी एका सत्यघटनेवर आधारित आहे. आणि आवर्जून हा उल्लेख करण्याचं कारण एवढंच की कादंबरी पूर्णतः काल्पनिक असती तर त्यांनी कथेत अनेक बदल केले असते जेणेकरून पात्रांच्या विचित्र वागण्याला एक किमान सुसंगती येऊ शकली असती, त्यांच्या विक्षिप्त प्रतिक्रिया किमान तार्किक वाटल्या असत्या. फार मोठी कारणं नसतानाही काल्पनिक सुखाच्या शोधात माणसं अतिशय असंबद्ध, अतर्क्य वागून फार घातक निर्णय घेतात आणि उलट दुःखाच्या अजून अजून खोल गर्तेत जातात. 

'जौळ' किमान पंचवीसेक वर्षांपूर्वी वाचनालयातून आणून वाचली होती. तेव्हा मतकरींचे सलग १०-१२ कथासंग्रह झपाटल्यागत वाचले होते. त्या प्रवासात मी मतकरींचं वाचलेलं हे तिसरं किंवा चौथं पुस्तक होतं. या कादंबरीतल्या प्रत्येक पात्राची निवेदनाची पद्धत, हळूहळू डोकावत जाणारे विसंवादी सूर वाचताना हादरून गेलो होतो. मुख्य म्हणजे ही कादंबरी डोंबिवलीत घडलेल्या एका शोकांतिकेवर आधारित असल्याने अजूनच कनेक्ट झालो होतो. तेव्हा पुस्तक विकत घेऊन वाचण्याची लायकी, ऐपत, पात्रता नव्हती. जेव्हा ती आली त्याच्या फार आधीच जौळ आऊट ऑफ प्रिंट झाली होती. गेल्या वर्षी ती पुन्हा उपलब्ध झाल्याचं वाचून घ्यायचं नक्की ठरवलं होतंच. या सत्यघटनेवर आणि कादंबरीवर नंतर 'माझं काय चुकलं?' हे नाटक आणि 'माझं घर माझा संसार' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 

अर्थात जौळ यावेळी पुन्हा वाचताना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला असं म्हणू शकणार नाही! उलट जौळ वाचताना वेदना, हतबलता, रिक्तपणा अशा सगळ्या भावनांचा एकत्रित कल्लोळ जाणवत राहतो याच्याशी जौळ वाचलेली कुठलीही व्यक्ती सहमत होईल!

========

रत्नाकर मतकरींच्या इन्व्हेस्टमेंट या कथेवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटाला २०१२ साली सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं होतं. चित्रपट दिग्दर्शनाचा हा मतकरींचा पहिलाच प्रयत्न होता ही विशेष उल्लेखनीय बाब! इन्व्हेस्टमेंट या कथासंग्रहात शीर्षककथेव्यतिरिक्त अन्य सात कथा असून त्या २००० च्या पहिल्या दशकात निरनिराळ्या मासिकांमध्ये प्रकाशित झाल्या होत्या. 

सामाजिक विषयावर बेतलेल्या यातल्या सर्व कथांमध्ये एक सामायिक गडदपणा आढळतो. पैसे, चैन, ऐशोआराम अशा भौतिक सुखांना सर्वस्व मानून नीतिमूल्यांना पायदळी तुडवण्यात नेत्यांपासून ते कारखानदारांपर्यंत आणि पोलिसांपासून ते सामान्य माणसापर्यंत सर्वांची जी एक जीवघेणी स्पर्धा चालू आहे त्यात कोणीही जिंकलं तरी अंतिम हार ही समाजाचीच होणार आहे हे तत्त्व प्रत्येक कथा वाचताना जाणवत राहतं. नाही म्हणायला प्रत्येक कथेत संस्कार, सामाजिक जाणिवा, चांगुलपणा शिल्लक असणारी एखाद-दोन पात्रं आहेत परंतु विरोधी पात्रांच्या भाऊगर्दीत अशा लोकांच्या प्रतिकाराचा काय चोळामोळा होऊन जातो हे वाचून फारसं आश्चर्य वाटत नसलं तरीही नैराश्य मात्र येतंच. 

इन्व्हेस्टमेंट ही कथा मी काही वर्षांपूर्वी पहिल्यांदा वाचली, त्या आधी त्यावर आधारित चित्रपट बघितला होता. तो प्रचंड आवडला होता. कथेतले पालक, विशेषतः आई ही चंगळवाद, श्रीमंतीच्या हव्यासाने पछाडलेली आहे. उच्च मध्यमवर्गीय शैलीचं अतिसुखी जीवन जगात असतानाही तिची 'अजून' ची हाव मिटत नाही आणि त्यापायी संस्कारक्षम वयातल्या मुलावर सुख ओरबाडून घेण्याचे संस्कार केले जातात. आणि विशेष म्हणजे कोणालाही त्याबद्दल काहीही वाटत नाही. कथेचा शेवट आणि त्यातही अखेरचं वाक्य एवढं भयंकर धक्का देणारं आहे की कथा संपल्यावरही दीर्घ काळ वाचक त्या धक्क्याचा अनुभव घेत राहतो. (चित्रपटाचा शेवट किंचित बदललेला आहे). 

नंतरच्या कथेत एक ध्येयमार्गी, सच्छिल पण कणखर लेखक आणि त्याच लेखकाकडून चरित्र लिहून घ्यायचा अट्टहास बाळगणाऱ्या, सर्व प्रकारच्या गैरकृत्यांत गुंतलेल्या एका स्थानिक नेत्याची जुगलबंदी आहे. अखेरीस सन्मार्गाचा विजय होणार असं वाटत असे असेपर्यंत लेखक पुस्तकातलया आदर्श जगातला शेवट बाजूला सारून खऱ्या आयुष्यातला शेवट दाखवून कथा संपवतो आणि वाचकाची अखेरची आशाही मावळते!

पुढच्या कथेत स्वतःच्या बायकोला स्वतःची मालकी वस्तू असल्यागत जपणारा मात्र रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे केवळ 'मादी' म्हणून बघणारा एक विकृत इसम, तर त्यानंतरच्या कथेत गैरकृत्य करता करता अचानक सद्सद्विवेकबुद्धी जागृत झालेला बालगुन्हेगार अशी दोन सर्वस्वी विभिन्न व्यक्तिमत्वं वाचकांच्या भेटीस येतात. दोन्ही कथांमध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल याची धाकधूक वाचकांना वाटत राहते. त्यानंतरच्या, 'फॅक्टरी' हे अतिशय सुयोग्य नाव असलेल्या, कथेत मानव हा वाट्टेल त्या पातळीवर उतरून कुठलीही घृणास्पद कृत्यं पापणीही न लववता कशी सहजगत्या करू शकतो ते वाचून अंगावर काटा उभा राहतो. मुलींचा अनाथाश्रम, त्यात चालणारी गैरकृत्यं, स्थानिक नेता, त्याचे कुटुंबीय, सज्जन भासणारे संस्थाचालक इत्यादी सर्वजण ही पापाची फॅक्टरी बिनबोभाटपणे चालवत राहतात आणि या अन्यायी वर्तुळाला छेद देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सज्जन व्यक्तीचं जगणं नकोसं करून टाकलं जातं!

पुढच्या कथांमध्ये शिक्षणक्षेत्र आणि राजकीय क्षेत्र हातात हात घालून चालायला लागली की किती गलिच्छ प्रकार अगदी सहजरित्या ताठ मानेने घडवता येऊ शकतात आणि त्याबद्दल कोणालाच कशी कणभरही खंत-खेद वाटत नाही याबद्दलची हतबल करून टाकणारी वर्णनं आहेत. प्रत्येक वेळी सद्सद्विवेकबुद्धी जागृत असलेला एखादा क्षीण आवाज बंडखोरी करण्याचा प्रयत्न करतो पण तो शिताफीने तिथल्या तिथे दाबून टाकला जातो. जवळपास प्रत्येक कथेत थोड्याफार फरकाने घडणारा हा प्रकार, आवाज दाबून टाकल्या गेलेल्या व्यक्तीचं नरकासम होणारं पुढचं आयुष्य, कुठल्याही प्रकारच्या लाजा न बाळगता बिनबोभाटपणे चालू राहणारं पापी वर्तुळ वाचून वाचून चांगुलपणावरचा विश्वासच उडून गेल्यासारखा होतो. 

जौळ असो की इन्व्हेस्टमेंट, दोन्ही वाचत असताना वाचकाच्या अंतर्मनात एकच विचार वारंवार येत राहतो की हे "व्हायला नकोय! हे असं का होतंय? हे थांबवा कोणीतरी! यांना आवरा कोणीतरी!" पण दुर्दैवाने तसं होत नाही. जे व्हायला नको तेच होतं आणि अखेरीस शेवटच्या पानाशी आल्यावर वाचक निराश होऊन, अपार खिन्नतेने पुस्तक मिटून टाकतो. मतकरींच्या कथा गूढ असतात, विनोदी असतात, सामाजिक असतात पण या दोन पुस्तकांमधल्या कथा (आणि कादंबरी) ही न वाचवल्या जाणाऱ्या प्रकारच्या आहेत.... न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा. आपल्या उद्यासाठी..!

--हेरंब ओक

No comments:

Post a Comment

मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!

पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेख...