Tuesday, January 26, 2010

कुणी "पद्म" (विकत) घ्या.. कुणी... !!



संत सिंग चटवाल. अतिशय मानाच्या पद्मभूषण पुरस्काराचे या वर्षीचे मानकरी. यशस्वी उद्योजक. "बॉम्बे पॅलेस" या जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या मोठ्या हॉटेल-चेनचे मालक. शून्यातून विश्व उभं केलं. या हॉटेल-चेन मधलं पहिलं हॉटेल उघडलं ते न्यूयॉर्क मध्ये आणि नंतर त्याच्या अनेक शाखा उघडल्या त्या जगभर. वेगवेगळ्या देशांत. सगळं एकदम आखीव रेखीव, टिपिकल आत्मचरित्रात आढळणारं. एकदम आदर्शवत्. एवढंच नाही तर अमेरिकेतील अत्युच्च राजकीय वर्तुळात उठबस. निवडणूक काळात हिलरी क्लिंटन यांच्यासाठी भरीव निधी उभारण्याचं अति-महत्वाचं काम केल्याने हिलरी, बिल क्लिंटन या दोघांनाही अगदी जवळचे. अगदी विश्वासू सहकारी. क्लिंटन फाऊन्डेशनचे ट्रस्टी.

Toss the coin. नाणं उडवा, दुसरी बाजू. पहा काय दिसतंय? काळोख.. अगदी काळाकुट्ट. मिट्ट, कभिन्न... दिव्याखाली अंधार.

याच देववत भासणाऱ्या, आदर्शवत वाटणाऱ्या माणसावर असंख्य गुन्हे दाखल झालेले आहेत. फक्त अमेरिकेतच नाही तर अगदी आपल्या भारतात पण. त्याच्या काळ्या कृत्यांची यादी देणारे अनेक लेख अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. आणि तेही शब्दकोडं वाल्या चार पानी सायंदैनिकांमध्ये नव्हे तर अगदी टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस आणि अमेरिकेतल्या न्यूयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट सारख्या मानाच्या वृत्तपत्रांत .. तर काय काय केलं या चटवाल साहेबांनी??? ............ काय नाही केलं विचारा.

-अमेरिकेतल्या मोठ मोठ्या बँकांमधून मोठ्ठल्ली कर्जं घेऊन ती बुडवली?
----- हो बुडवली. लिंकन सेव्हीन्ग्स, फर्स्ट न्यूयॉर्क बँक फॉर बिझनेस सारख्या बँकांना विचारा.

-भारतातल्या मोठ्या बँकांमधून मोठ्ठल्ली कर्जं घेऊन ती बुडवली?
----- हो अगदी. आणि तेही "द गल्ली बँक ऑफ भूरगड" वगैरे सारख्या नाही तर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया अशा सरकारी बँकांना.

-हॉटेल संदर्भात चुकीची कागदपत्रे दाखवून एक्स्चेंज कमिशनची दिशाभूल केली?
----- हो केली. खोट्या कागदपत्रांच्या आधारे बँकरप्सी नोंदवून कर्जं बुडवण्यासाठी याचा वापर केला.

- राजकीय संबंधांचा वापर व्यक्तिगत स्वार्थासाठी केला?
----- हा हा हा.. हा गुन्हा असेल तर भारतातले सगळे आजी, माजी, भावी नेते १०००० वर्षांसाठी तुरुंगात जातील. पण असो. विषयांतर नको. तर हे सुद्धा केलं चटवाल साहेबांनी.

-  यांना कधी अटक झाली होती?
----- अहो बँकांना फसवल्याबद्दल सीबीआय ने अटक केली होती. पण वर उल्लेखल्याप्रमाणे राजकीय बळाचा वापर करून ते यातून सही सलामत सुटले.

आणि अशा महान माणसाला आपलं सरकार राष्ट्राच्या उच्चतम सन्मानांपैकी एक सन्मान हसतहसत बहाल करतं. भलेही चटवाल या सगळ्यात निर्दोष असेल, गुन्हे खोटे असतील वगैरे वगैरे गोष्टी आपण मान्य करू. पण तरीही देशातील अशा महान सन्मान दिल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या चारित्र्यावर (सामाजिक चारित्र्य या अर्थी) कुठलाही डाग नको, तो अगदी स्वच्छ असला पाहिजे ही अपेक्षा चटवाल आणि त्याच्या पिलावळीच्या दृष्टीने भ्रामक असली तरी आपल्या सारख्या सामान्यांच्या मताचा विचार करता अवास्तव आहे का? की सरकार पुरस्कारांच्या घोषणा करताना त्या बातमीच्या खाली ** घालून तळटीपा वगैरे देते की "आम्ही हवे त्याला पुरस्कार देऊ, जनतेचा यात काही संबंध नाही" वगैरे वगैरे !!

चटवालची बातमी वाचण्याआधी मी "सैफ अली खान" ला पद्मश्री मिळाल्याबद्दल जाम वैतागलो होतो. म्हटलं याचं काय  कर्तृत्व? पण आता ही बातमी बघून त्याबद्दल काहीच वाटत नाहीये. चटवाल सारख्याला जर पद्म पुरस्कार मिळतो तर सैफ अलीच्या गेल्या ४० आणि येणा-या ८० पिढ्यांनाही तो दिला गेला तरी आपली काही तक्रार नाही.

अर्थात गोपीनाथ मुंड्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून पुरस्कार मागे घेण्याची मागणी केली आहे. पुढे काय होईल कोण जाणे. पण माझा मूळ मुद्दा अतिशय छोटासा आणि वेगळाच आहे. मला २ दिवसांपूर्वी पर्यंत संतसिंग चटवाल बद्दल काय माहित होतं? शून्य. काहीही नाही. टोटल ब्लँक.. पुरस्कारांच्या घोषणा ऐकल्या चटवाल बद्दल ऐकलं. थोडं विकी केलं, थोडं गुगल मारलं आणि वरचे सगळे मुद्दे मिळाले. जर माझ्या सारख्या सामान्य माणसाला २-४ टिचक्या मारून चटवाल बद्दलची सगळी (आक्षेपार्ह) माहिती दीड मिनिटात मिळाली तर मग पुरस्कार समिती, तेथील अधिकारी, पंतप्रधान कार्यालय किंवा इतर कुठलीही संबंधित कार्यालयं काय झोपा काढत होती की काय? मुंड्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून आक्षेप नोंदवल्यानंतर या सर्व वेबसाईट्सवर चटवाल बद्दल माहिती टाकली गेली असं नाही न होऊ शकत? मग तरीही त्याला दामटून पुरस्कार देण्यात कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत? आणि ते कोणाचेही गुंतले असोत पण अशा माणसाला पुरस्कार देण्याने पद्म पुरस्कारांची किंमत आणि पुरस्कार समितीची विश्वासार्हता मात्र नक्कीच कमी झालीये. अगदी काही न करणा-या ओबामाला शांततेचा नोबेल देणाऱ्या नोबेल समितीच्या विश्वासार्हतेपेक्षाही काकणभर नाही तर अगदी मणभर अधिकच कमी कारण कितीही म्हटलं तरी नोबेल परका आहे पण पद्म आपला आहे आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे आपल्या करांच्या पैशातला आहे. म्हातारीही जातेय आणि काळही सोकावतोय. अधिकाधिकच !!!

28 comments:

  1. ‘या राज्यात कुणाला घोडं आणि गाढवामधला फरक कळत नाही ... दरबारी भलावण करतात त्यावर राजा आंधळेपणाने विश्वास ठेवतो, आणि शहाणे लोक तटस्थ राहतात, त्यामुळे उगाच गाढव म्हणून ओझी वाहण्यापेक्षा घोडा म्हणून राजाच्या पागेत मजेत रहा’ असं एक संस्कृत सुभाषित होतं ... त्याची आठवण झाली.

    ReplyDelete
  2. वा गौरी. मस्त सुभाषित आहे. एकदम चपखल बसतंय.. मूळ सुभाषित मिळू शकेल का?

    ReplyDelete
  3. बापरे भयानक माहिती आहे...साधासुधा माणूस नाहीये ना हा म्हणूनच त्याला पद्म दिलंय की काय?? (का मागून घेतलंय??) पुरस्कार आणि त्यामागचं राजकारण यासाठी कुणाला पुरस्कार द्यायचा असेल तर आपल्याच मायबाप सरकारला नाही का??

    ReplyDelete
  4. मागून, खेचून, लुबाडून, जबरदस्तीने, दबावाने, विकत... काहीही म्हण. "दिलंय" सोडून कुठलाही पर्याय योग्य आहे.. अक्षरशः बाजार मांडलाय साल्यांनी..

    ReplyDelete
  5. अरे बाप रे.. खरंच डेंजरस आहे माणुस हा. सैफ अली सारख्या तद्दन फालतु कलाकाराला किंवा हेलन सारखीला पण जर पद्म मिळू शकतो तर काय बोलणार?
    मागच्या वर्षीच्या लिस्ट मधे पण अशिच नावं होतं. यावेळची यादी पाहिलेली नाही अजुनतरी..
    त्याने बहुतेक पद्म विकत घेतलंय.. आता कोणाला किती द्यावे लागले ते त्यालाच माहिती.
    पंतप्रधान कार्यालय म्हणजे काय? तर एक ब्युरोक्रॅट्स चा जखिरा..

    ReplyDelete
  6. थोडक्यात काय तर फिल्मफेअर ते पद्मभूषण सगळं विकत मिळतं आपल्याकडे. बस पैसा फेको.

    ReplyDelete
  7. 'पद्म' puruskar hi vikat gheata ka lok ? asen hi bahutek tyamulech tar asha lokanchi varni lagte

    ReplyDelete
  8. काय करणार रे.. दुर्दैव आपलं दुसरं काय !!

    ReplyDelete
  9. याविषयावरच मागे सर्किटनेही मस्त पोस्ट लिहीली होती....आजच्या तुझ्या पोस्टमधली हलक्या फुलक्या रुपातली गंभीर हाताळणी पाहिली आणि त्याची पोस्ट आठवली..........
    कठीण आहे रे सगळे........आणि आपण वांझोटा संताप करणार मग काय हे असेच सुरू रहाणार.....

    ReplyDelete
  10. arere.. kaay he. bhaarat ratna paN asaach det asatil mag.. same case with shourya purskaar then :)
    The other side is.. kharokhar laayak asaNaaryaa jyaa lokaanaa asaa purskaar milato, tyaanaach to 5-10 varshaani bhangaaraat vikaavaa laagato hi mothi khant aahe.

    ReplyDelete
  11. lekh kharach changala aahe pan yachi dusari bajuhi aahe.....mi kahi congresscha pravakta nahi tari mala je vatata te sangto....
    1)
    vartaman patrat yenarya mag te kitihi moththa
    aso sagala khara asatach asa nahi...kadhi kadhi kagadpatrantil truti, misunderstandigmule batmya peralya jatat.....ata ekada ashi batmi aali ki nantar koni khara khota karat basat nahit aani mag pudhe to dhaga pakdun batmya dilya jatat.....asa sarwattrik anubhav aahe....
    2) desh chalavatana naitikata baghavich lagate yad vad kinwa dumat asu shakat nahi pan tyahipeksha deshacha vikas...ithalya nagrikanchi unnatti aani jagat deshala milanara man (ha naklupi sanskruticha nako tar takdivar milalela hava) mahtwacha asato....bhartachya arthvyavasthela NRI changli madat karu shakatat asa vishwas sarVach economistna aahe tyamule NRI la prohtsan denyasathi asa purskar dila asanyachi shakyata aahe.....
    3)
    mag dusare NRI melet ki kay asa tumhala prashna padel....par yanha har chand pe dag hain....

    ReplyDelete
  12. चांगलीच माहिती दिलीत रे.. असाच जनविश्वास आणि माहिती द्यायला पाहिजे!
    च्यामायला तो - [* ही शिवी नाही - आणि असतीच तरीही वापरलीच असती!] ... चोर!

    ReplyDelete
  13. हे पुरस्कार घेणारे लोक आणि देणारे सरकार यांनाच काय ते माहिती! पण यामुळे चांगल काम करून पुरस्कार मिळणा-यांकडेही अशाच दृष्टिकोनातून बघितलं जात हे सर्वात मोठ नुकसान..

    ReplyDelete
  14. अगदी मनातले लिहिलेस आहेस हेरंब,
    पद्य घोषित झाल्यावर आम्ही घरी चर्चा करता होतो कि सैफचे असे काय कर्तुत्व आहे कि त्याला पद्य मिळाले....
    हीच अवस्था पोलिसांना दिलेल्या रस्ष्ट्रपती मेडल ची आहे. २००९ मधेय केंद्र सरकारने दोन police अधिकाऱ्यांचे मेडल्स परत घेतली ती सुद्धा २० वर्षांनी. हे ऑफिसर्स police महासंचालक आहेत.

    मृणाल

    ReplyDelete
  15. संत सिंग चटवालबद्दल आत्ता तुझ्या ब्लॉगवरुन कळले. नाहीतर नाव माहीत सुद्धा नव्हते... कसे रे असे सर्व .. एक जात हरामखोर... आपल्यासारखा विचार करणारा खुर्चीच्या त्यापलिकडे का नसतो ? की गेला की बदलून जातो ???

    ReplyDelete
  16. खोट्या बातम्यांची गोष्ट वेगळी, सुषमेय.. पण या माणसाविरुद्ध सीबीआय कडे पुरावे आहेत. सीबीआय सारखी संस्था पूर्ण तपास करून मगच गुन्हे दाखल करत असणार ना? कित्येक सरकारी बँकांची कर्जं याने बुडवली आहेत. मला नाही वाटत हे सगळंच्या सगळं खोटं असेल. धूर दिसतोय म्हणजे कुठेतरी लांब (दृष्टीला दिसत नसेल तरी) आग असणारच. आणि अनिवासी भारतीयांना गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं योग्यच आहे. पण त्यासाठी असे सर्वोच्च पुरस्कार कोणालाही दान करायचे? ते दान सत्पात्री नको?
    असो बघुया काय होतं पुढे ते.

    ReplyDelete
  17. अगदी बरोबर महेश. फिल्मफेअर पुरस्कारांची विक्री ते पद्म पुरस्कारांची विक्री. फारच मोठा पल्ला गाठलाय आपण :(

    ReplyDelete
  18. @सविता, नाही असं व्हायला नको. चांगलं काम करणाऱ्यांना अजून प्रोत्साहन मिळालंच पाहिजे. आणि त्यासाठी अशा पुरस्कार-चोरांचे आणि संबंधितांचे बुरखे आपण फाडले पाहिजेत.

    ReplyDelete
  19. हो ना तन्वी, आपण नेहमीच वांझोटा संताप व्यक्त करून गप्प बसतो. पण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. अर्थात मी पण नुसतं बोलतोय, मी काय केलंय हाही प्रश्नच आहे. पण निदान एक पोस्ट टाकून निदान काही लोकांना याची कल्पना दिली. खारीचा (नाही खारीच्या पिल्लाच्या पिल्लाचा) वाटा.

    मला सर्किटच्या पोस्टची लिंक पाठव ना.

    ReplyDelete
  20. हो ना दीपक. जास्तीत जास्त लोकांना हे कळलं पाहिजे. आणि बरोबर बोललास. शिवी असती तरीही (उलट अजून आनंदाने) दिलीच असती. च्यामायला चोर तो !!

    ReplyDelete
  21. बापरे. हे माहित नव्हतं, मृणाल. ही पोलिसांच्या राष्ट्रपती पदकाची काय भानगड आहे नक्की? मी ऐकलं नाहीये हे.

    ReplyDelete
  22. @रोहन, अरे हे पोस्ट टाकायच्या आधी १ दिवस मला तरी कुठे काय माहित होतं त्याच्याबद्दल. पण मी तेच म्हणतोय ना. गुगल,विकी ला २-४ टिचक्या मारल्या आणि सगळी माहिती मिळाली. एवढी सहज उपलब्ध होती ही माहिती. पुरस्कार समिती, सरकारला वगैरे दिसलं नाही हे?

    मला वाटतं खुर्चीत बसायच्या आधी कोणी तसा नसतो. एकदा खुर्चीची ऊब मिळाली की पूर्ण बदलून जातो.. :-(

    ReplyDelete
  23. हेरंब, मूळ सुभाषित इथे बघ:

    http://subhashitani.wordpress.com/2009/12/05/

    ReplyDelete
  24. वा मस्तच. आभार गौरी !!

    ReplyDelete
  25. चटवाल आधी कुणाला ठावुक नव्हता, पद्मश्री मुळे प्रसिद्ध झाला...
    पुरस्कार म्हणजे खिरापत झाली आहे.

    ReplyDelete
  26. हो ना. सगळ्याचा नुसता पोरखेळ करून टाकलाय या चोरांनी !! :-(

    ReplyDelete
  27. चुक तुमची आहे. कुणाकडून तुम्ही कसल्या अपेक्षा ठेवताय?

    ReplyDelete
  28. ह्म्म्म. बरोबर आहे म्हणा. माझंच चुकलं खरं !! :(

    ReplyDelete

पोलादी भिंतीआडच्या प्रा'चीन' देशाला मराठी लेखणीत पकडण्याचा यशस्वी प्रयत्न : भिंतीआडचा चीन

श्रीराम कुंटे या माझ्या मित्राशी एकदा गप्पा मारत असताना मी सहज, आपण अगदी नेहमी एकमेकांना विचारतो त्याप्रमाणे विचारलं, "मग सध्या काय नवी...