Friday, January 15, 2010

पिझ्झा, पोट, तब्येत, ब्लॉग, शिक्षा वगैरे वगैरे

डोळ्यासमोरची ट्रेन चुकली आज. असला वैताग आला.. आता पुढच्या ट्रेन साठी थांबा. म्हणजे पाचच मिनिट. पण आपल्याला काय वैतागायला काही कारण चालतं. पण त्या पाच मिनिटांचा मी नेहमीप्रमाणे सदुपयोग केला. विचार करण्यासाठी. म्हणजे आता मी दोन ट्रेन च्या मधल्या वेळातच विचार करतो (आणि एखाद्या दिवशी ट्रेन साठी थांबावं लागलं नाही तर विचार नाही?) हे असले अभद्र विचार (तुम्ही माझ्यासारखे दोन ट्रेनच्या वेळेच्या मध्येच विचार करता असं मी गृहीत धरत नाहीये. तेव्हा तुम्हीही धरू नका.) मनात आले असतील तर ते ताबडतोब झटकून टाका. आणि आले नसतीलच तर मग.. तर मग.. वरची ओळ वाचलीच नाही असं समजा. इरेज करा. विसरून जा (गजिनी, मोमेंटो हेल्प मी)

ज्यांच्या मनात वर सांगितलेले कुजकट नासकट विचार आले नसतील त्यांच्यासाठी पोस्ट इथपासून सुरु होतेय. (आणि ज्यांच्या आले असतील त्यांनी १०८ वेळा गजिनीचा जप करावा)

तर त्या पाच मिनिटात मी खूप विचार केला. आपली ट्रेन का चुकली. नेहमीच डोळ्यासमोर असतानाही का चुकते. खूप विचार केल्यावर कारण लक्षात आलं आपण धावत नाही (धावू शकत नाही) हेच त्याचं कारण. धावू का शकत नाही? (पहिल्या प्रश्नाच्या उत्तराने दुसऱ्या प्रश्नाला जन्माला घातलं होतं) त्याचं कारण सुटलेलं पोट. मग हळू हळू १० पावलं धावल्यावर होणारी दमछाक, लेकाला कडेवर घेऊन थोडा वेळ फिरलं की लागणारा दम, कमी होत चाललेला स्टॅमीना, अॅक्टीवनेस, चपळता सगळं जाणवून गेलं. आयला, ही तिशी उलटली ना की सगळं लय वंगाळ होऊन जातं. मी तिशीला दोष द्यायला लागायच्या आतच "बाकीचे बघ ना तिशी पार केलेले, ते कसे अॅक्टीव्ह आहेत फिट आहेत, दमत नाहीत" अशा दुगाण्या तिशीने माझ्या दिशेने झाडल्या. अरे हो तेही आहे म्हणा. मग काय बरं? हा बरोबर.. मी जॉगिंग/वर्कआउट काही करत नाही म्हणून असेल का हे असं?
"ह्म्म्म.. partially" मगाशी झाडलेल्या दुगाण्या आवरून घेत तिशी म्हणाली.

"हात्तीच्या.. एवढं करून पार्शलीच का? मग 'फुल-टू'-ली काय असेल बरं?" आमचं आपलं लाउड थिंकिंग चालूच.

आणि अचानक उत्तर सापडलं. 'तुझे आहे तुजपाशी'... युरेक्का..

पिझ्झा. चीजने रसरसलेला पिझ्झा हेच त्याचं उत्तर होतं. पिझ्झा अति आवडणाऱ्या आणि अति खाणाऱ्या लोकांमध्ये माझा समावेश होतो. जनरल नॉलेज म्हणून माहित असलेलं बरं .. उगाच देशद्रोही, आपल्या मातीशी नाळ तुटलेला असली लेबलं नका लावू बाबा. पुरणपोळी, अळूच्या वड्या, बटाटेवाडे , पाणी पुरी पण तितक्याच आवडीने खातो मी. पण पिझ्झा जरा जास्तच आवडतो. तर तो पिझ्झा, चीज (चीजला चीजवस्तू असं का म्हणत नाहीत असं मला नेहमी वाटतं. कुठल्याही चीजवस्तू पेक्षा ते कणभरही कमी नाहीये), त्यातले फॅट्स, कॅलर्या या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आमची कमी झालेली चपळता असा निष्कर्ष मी चपळतेने काढला. 
तर मग त्यादिवशी पासून ठरलं की पिझ्झा कमी करायचा आता. एकदम कमी... नाही नको.. कमी नको. बंद एकदम बंद.. अजिबात खायचा नाही.. हा हे कसं बरं आहे एकदम. (हाहाहा हाहा हाहाहा.. "तिशी" च कुत्सित हास्य)..  हे जमेल का कळत नव्हतं. पिझ्झा अजिबात नाही खायचा? बाप रे. पण जमवायलाच हवं. आणि ते जमेल आणि ते जमतंय यावर आपला विश्वास बसेल असं काहीतरी करायला हवं होतं. मग मी स्वतःलाच प्रॉमिस दिलं की पिझ्झा खाणार नाही. (वचन पेक्षा प्रॉमिस जरा हलकं फुलकं वाटतं. वचन म्हणजे एकदम पौराणिक कथा किंवा ५०-६० मधले मराठी कृष्ण-धवल सिनेमे आठवतात.) तर मी असं स्वतःलाच प्रॉमिस दिलं पिझ्झा न खाण्याचं. मोठी लोकं (मान्यवर व्यक्ती या अर्थाने म्हणतोय मी) स्वतःला देतात तसं. म्हणजे पिझ्झा न खाण्याचं नव्हे कुठलीही गोष्ट अगदी ठामपणे करताना "he promised himself" असं कुठल्याशा पुस्तकात वाचलं होतं. (आता स्वतःला प्रॉमिस दिल्यानंतर ती लोकं मोठी होतात की मोठी झाल्यावर असं प्रॉमिस द्यायला शिकतात हे नक्की आठवत नाहीये) तर आम्ही दिलं प्रॉमिस. पण हे प्रॉमिस असं होतं की जर का पिझ्झा खाल्ला तर शिक्षा म्हणून ब्लॉग वर रोज एक नवीन पोस्ट टाकायचं. पिझ्झाचा आणि ब्लॉगचा अर्था अर्थी काही संबंध नाही हो किंवा मी ब्लॉग शिक्षा म्हणून लिहितोय असं वगैरे काही नाही. तरीपण नेहमीच येणाऱ्या ढीगभर आळस आणि कंटाळ्याला बाजूला करून रोज एक पोस्ट लिहायला जमणार आहे का? आपण काय महेंद्र काका आहोत का? आपल्यासाठी..-किंवा सोयीसाठी माझ्यासाठी म्हणतो...- तर माझ्यासाठी ती शिक्षाच.

**********************

आज बायको म्हणाली ""पोस्ट-प्रेग्नन्सी- डायट वर वाचत होते आज. मला बरंच डायट करावं लागणार आहे. तू पण सुरु कर ना डायट  माझ्या बरोबर. एकाला दोघे असले कि जरा बरं." .. असं सुरु करून ती हळू हळू फक्त माझ्याच डायट वर घसरली. "आता बटर बंद. चीज बंद. पिझ्झा तर साफ बंद. कॉफीत साखर एकदम कमी घेत जा. जॉगिंग सुरु कर, वर्कआउट सुरु कर"

तर गेल्या चार दिवसात अजिबात पिझ्झा खाल्ला नाहीये आम्ही. हे पोस्ट ड्राफ्टमध्ये पडलेलं दिसलं की काय तिला?? म्हणजे "तब्येतीची काळजी" पेक्षा "रोज ब्लॉग वाचायला लागण्याची भीती" हे मुख्य कारण आहे की काय?

****
तळटीप १ : (अ)पूर्णतः काल्पनिक. (फार प्रेमळ बायको आहे हो माझी)
तळटीप २ : हे पोस्ट इतकं फालतू आणि भरकटलेलं झालंय की ते कुठल्याही कॅटेगरी मध्ये बसणारं नसल्याने मी त्याला "अर्थहीन" अशा लेबलात टाकतोय.
तळटीप ३ : इतकं भरकटलेलं झालं असतानाही का टाकलंस या प्रश्नाचं उत्तर म्हणजे इतका वेळ टाईप करून झाल्यावर निव्वळ आवडलं नाही या कारणाने पोस्ट न टाकायला मी काही चांदीचा (पक्षी पोस्ट्सचा) चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला गर्भश्रीमंत ब्लॉगर नाही म्हणून. आमची आजी म्हणायची "खाउन माजावं पण टाकून माजू नये"
तळटीप ४ : चुकून माकून मोहाला बळी पडून मी जरी पिझ्झा खाल्लाच तरी रोज पोस्ट टाकणार नाही (टाकू शकणार नाही) हे नक्की. (तेव्हा सगळ्यांनी सुटकेचे नि:श्वास सोडून आपापले जीव आपापल्या भांड्यात टाकावेत.) कारण आमच्यात संकल्प हा "संकल्प केला" या अर्थी नव्हे तर "संकल्प सोडला" या अर्थी वापरतात. म्हणजे आचमन करून सोडून द्यावं तसं. जसं पुण्यात सायकल चालवणे हे वाहन चालवणे याअर्थी नाही तर "चळवळ चालवणे " किंवा "तलवार चालवणे" या अर्थी वापरतात तसंच.. (पु ल, पुन्हा एकदा थँक्स हो)

31 comments:

  1. हम्म्म्म अच्छा म्हणजे या ब्लॉगवरच्या फ़ोटोत उगा रेसच्या घोड्यावर बसल्याचा आव आणण्याचं कारण पिझ्झा आहे तर....नाहीतर सरळ पोटाला(फ़ोटोत) कापलं नसतं....
    एकदम भा.पो. पोस्ट आहे बाबा...आता तुझ्यामुळे विकेन्डला पिझा मागवला जाणार असं वाटतंय....(आणि मला त्याची काही शिक्षा-बिक्षा नाहीये सो..........)

    ReplyDelete
  2. Altimate lihita ho tumhi....... Fan ch zale aahe mi tumachi......
    Aani ho mala jar roz ek pizza pathavata aala asta tumhala tar phar bare zale aste mhanaje pratyek weli naahi tari nidan don chaar pizza nantar ek hyapramane posts takalya astya naa tari aamachi changal zali asti.......

    ReplyDelete
  3. ह्म्म्म .. ते कारण तर आहेच. :) (किंवा अगदी असंच काही नाही. वाचा तळटीप १)...
    बरेच जण हे पोस्ट बघून पिझ्झा मागवणार आहेत असं दिसतंय ;) .. dominos, pizza hut वाल्यांना आत्ताच सांगतो माझे % पाठवा म्हणून ;)

    ReplyDelete
  4. मैथिली, कसंच कसंचं ;)

    अरे बाप रे (हे अरेच्चाच्या तालावर वाचावे) रोज पिझ्झा पाठवणार आहेस म्हणत्येस? चालेल पाठव. ३ पिझ्झाला एक पोस्ट. कसं वाटलं डील? ;)

    ReplyDelete
  5. mhanaje aamhaala tujhya post vachayala milanyaasathi tula pizza khava laganar aata ;)

    ReplyDelete
  6. हा पुर्णपणे योगायोग आहे. खरं सांगतो, अगदी माझ्या कतरीना कैफवरच्या प्रेमाची शपथ !!!
    आजच आम्ही ऑफिसमध्ये पिझ्झा हट मधून मागवलाय पिझ्झा संध्याकाळसाठी.... आणि त्यातच ही पोस्ट... माझ्या ग्रहणातल्या काळाचं ’चीज’ झालं !!!!!!!!!

    ReplyDelete
  7. छान लिहिलस... मजा आली वाचून... आणि ते टळटीप प्रकरण लय भारी राव... :)

    ReplyDelete
  8. छान लिहिलस... मजा आली वाचून... आणि ते टळटीप प्रकरण लय भारी राव... :)

    ReplyDelete
  9. नेहमीप्रमाणे भन्नाट लिहिलंय, पोस्ट वाचता वाचता ३-४ वेळेस डॉमिनोजचे मेन्यु कार्ड टेबलावरुन इकडुन तिकडे केले :) मी नाही ऑर्डर करणार

    ReplyDelete
  10. OK Done.... Mala chalel.......... :D
    Pan mag tumachya Diet che kkaaay?????

    ReplyDelete
  11. गौरी, त्या पिझ्झाच्या पायभर (म्हणजे pizza pie याअर्थी म्हणतोय) चीजने आत्ताच मला मुठभर मांस चढलंय.. डायट बोंबललं :)

    ReplyDelete
  12. बघ विक्रांत, चीज हे वस्तू नसून चीजवस्तू असल्याचाच हा पुरावा :)

    ReplyDelete
  13. आभार गजानन, पोस्ट टाकायच्या आधी वाचताना मला पण तळटीपाच जास्त आवडल्या. तळटीपा म्हणजे मुख्य पोस्ट आणि मुख्य पोस्ट म्हणजे तळटीपा म्हणून टाकावंअसाही विचार मनात येऊन गेला एकदा (हे आपलं उगाच ;) )

    ReplyDelete
  14. धन्यवाद आनंद, ऑर्डर नाही करणार? वा. खूप आधार वाटला बघ मला ;)

    ReplyDelete
  15. ते तर आहेच ग मैथिली. पिझ्झा आणि डायटच्या कोंडीत अडकतोय जीव.. ;)

    ReplyDelete
  16. hya hya hya... chan... mag workout suru kelas ki navin psot ghetliyes lihayla.. ?

    ReplyDelete
  17. हा हा.. मी आणि वर्कआउट? शक्य आहे का? आणि पुढची पोस्ट पण एवढ्यात शक्य नाही :).. तळटीप ४ विसरलास? :)

    ReplyDelete
  18. आयला ... पुरणपोळी, अळूच्या वड्या, बटाटेवाडे , पाणीपूरी.. बास की राव... माझा सुद्धा थोड़े थोड़े असेच होते मध्ये मध्ये ... मग जातो आपला सह्याद्रीच्या भेटीला... :)

    ReplyDelete
  19. हो रे. या सगळ्याशिवाय मजा नाही.. अशा वेळी डायट गेलं खड्ड्यात :)

    ReplyDelete
  20. पिझ्झा आवडणारे आमच्या घरी मी सोडुन सगळे.. काय कोणास ठाउक, पण हा प्रकार काही पचनी पडला नाही..कधीच..
    असो, पण पोस्ट छान लिहिलं आहेस... आणि वर्क आउट चं काय झालं??

    ReplyDelete
  21. काका, तुम्ही पिझ्झा हट चा "spicy indian" पिझ्झा खाऊन बघा. बरेच जणांना मी तो पिझ्झा खायला घालून (पिझ्झाच्या) नादी लावलं आहे ;-)
    वर्क आउट अवघड आहे. घरात चालतं बोलतं रडतं वर्क आउट आहेच :)

    ReplyDelete
  22. महेंद्रजींना अनुमोदन...पिझ्झा हा प्रकार माझ्याही पचनी पड्त नाही.....
    पण बाकी तुझं पोस्ट आत्तापर्य़ंत ४ वेळा आवडीने पचवलय....आजीचे असेच ऐकत जा.....पोस्ट इथे टाकून दे हवे तर नेहेमी ट्रॅश बीन पेक्षा!!!!!!

    ReplyDelete
  23. तन्वी, महेंद्रकाकांना दिलेलं उत्तरच तुला पण. एकदा तो 'spicy indian' पिझ्झा खाउन बघ मग तू पण होशील की नाही बघ पिझ्झाबाज. किंवा डॉमिनोने आता नवीन पिझ्झा काढलाय. तो ही खाउन बघितलास तरी चालेल.
    "पिझ्झाबाज तेतुका मेळवावा, पिझ्झा धर्म वाढवावा"

    ४ वेळा? बाप रे. अग मी पण नाही वाचलंय ते ४ वेळा :) आणि नाहीतरी माझं पोस्ट ब्लॉग आणि ट्रॅश बीन दोन्हीकडे सारखंच सुट होतं ;)

    ReplyDelete
  24. Chhaan lihilay lekh... (पु ल, पुन्हा एकदा थँक्स हो) he jaast aavadla..

    ReplyDelete
  25. धन्यवाद मुग्धा. अग तसं म्हटलं तर पु लं च्या उल्लेखा शिवाय माझा एकही लेख पूर्ण होणार नाही :-)

    ReplyDelete
  26. असेच पिझ्झा खात रहा...आणी स्वत:ला शिक्षा देत नवेनवे पोस्ट टाकुन आम्हाला त्यांचा आस्वाद घेउ द्या... :)

    ReplyDelete
  27. पिझ्झा तर खातच राहणार रे. पण दर वेळा नवीन पोस्ट शक्य नाही. तळटीप ४ विसरलास? :)

    ReplyDelete
  28. सुरक्षादलं रक्षन्ति रक्षित:
    http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=61435:2010-04-10-15-34-24&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=13

    लाल किल्ला : नैतिकतेचे अस्त्र!

    http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=61585:2010-04-11-14-57-28&catid=30:2009-07-09-02-02-22&Itemid=8
    Mrunal

    ReplyDelete
  29. मृणाल, ही कमेंट इथे चुकून आलीये वाटतं..

    ReplyDelete
  30. मीही पिझ्झाचा चाहता आहे. पण एक बरं आहे. मला स्वतःच्या पैशाने पिझ्झा खायला आवडत नाही, आणि रोज रोज माझ्यासाठी पिझ्झामध्ये कोणी एवढे (निदान १५ डॉलर्स (टीप: पिझ्झासाठी डॉलर्स द्यावे लागतात याचा अर्थ आम्ही अमेरिकेत आहोत हे सुज्ञ लोकांच्या ध्यानात आलं असेलच... ;-) स्वतःची शेखी मिरवण्याची संधी मी सहसा सोडत नाही.)) पैसे ओतायला तयार होईल एवढा काही मी लोकप्रिय नाही. त्यामुळे आपोआपच पिझ्झा खाणं नियंत्रणात राहतं.

    ReplyDelete
  31. तुझं पिझ्झा नियंत्रण आवडलं. मला जमेल का सांगता येत नाही पण जमवावं लागेल एवढं मात्र नक्कीच ! बघुया.. प्रयत्न चालू आहेत. कंस आवडले ;)

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...