निरोप घेऊन हात हलविल्याक्षणीच रे गहिवरलो
दाबून धरल्या हुंदक्यांशी रे पार लढाई हरलो
कासावीस अन् आर्त हाकांची भरती ये कानांशी
कसा सानुल्या पडलो अडकून असा दूरच्या देशी ||१||
गादीवरती झोकून द्याया भीतीच रे वाटते
फुफाटणाऱ्या आठवणींची गर्दी फार दाटते
कुस बदलता एकाएकी भिजून जाते उशी
कसा सानुल्या पडलो अडकून असा दूरच्या देशी ||२||
प्रहार करुनी प्रहरांचे त्या रात्र सांडूनी जाते
पुऱ्या जागत्या नेत्रांमधूनी पहाट होऊ येते
किती आराधा तरी न लागे डोळा रे डोळ्याशी
कसा सानुल्या पडलो अडकून असा दूरच्या देशी ||३||
बिछान्यातुनी उठोन बसणे संकट नित्य सकाळी
कुणास ठावे कधी भेटशील काय लिहिले भाळी
सुकलो रे कोमेजून गेलो जीव नसे थाऱ्याशी
कसा सानुल्या पडलो अडकून असा दूरच्या देशी ||४||
लाथाडावे फेकून द्यावे सारे रोज ठरवितो
धावधावुनी अखेरीस परि परीघातच अडखळतो
देवालाही बापाची या दया न येत जराशी
कसा सानुल्या पडलो अडकून असा दूरच्या देशी ||५||