झपाटलेलं घर केंद्रस्थानी असलेल्या भयकथा/कादंबऱ्यांमध्ये हटकून दिसणारी मांडणी म्हणजे गावाबाहेर एक प्रशस्त घर/बंगला, तिथे नव्याने राहायला आलेलं छान चौकोनी कुटुंब, मग कुटुंबातल्या लोकांना हळूहळू यायला लागणारे भुताखेतांचे अनुभव आणि त्याविरुद्ध त्यांनी दिलेला लढा आणि अंतिम विजय सत्याचा... वगैरे वगैरे.
गेल्या महिन्यात झपाटलेल्या घरांसंबंधित दोन रंजक कादंबऱ्या वाचनात आल्या. आणि महत्वाचं म्हणजे या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये, वर सांगितलेल्या 'नेहमीच्या यशस्वी' गोष्टींपैकी अगदी किंचित अपवाद वगळता काहीही नव्हतं आणि तरीही, किंबहुना म्हणूनच, त्या अत्यंत उत्कंठावर्धक आणि वाचकाला सर्वकाळ बांधून ठेवणाऱ्या, अनेकदा दचकावून टाकणाऱ्या ठरल्या.
यातली पहिली कादंबरी म्हणजे Jason Rekulak लिखित Hidden Pictures. मॅलरी नावाच्या एका तरुणीला एका अत्यंत सुखवस्तू अशा त्रिकोणी कुटुंबातल्या टेडी नावाच्या लहान मुलाला उन्हाळी सुट्टीच्या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी सांभाळण्यासाठीची नोकरी मिळते. नोकरी तशी बऱ्यापैकी सोपी असते. निदान सुरुवातीला असं वाटतं तरी..... मॅलरीचं घरात आगमन झाल्याझाल्याच तिच्याकडे घराची एक नियमावली सोपवली जाते. काही नेहमीचे पण काही मात्र बऱ्यापैकी विचित्र वाटावे असे नियम त्यात असतात. मात्र गडद भूतकाळामुळे, मिळालेली नोकरी काहीही करून स्वीकारणे आणि टिकवून ठेवणे याशिवाय मॅलरीकडे दुसरा पर्यायच नसतो.
त्या घरात हळूहळू निरनिराळ्या चमत्कारिक घटना घडायला लागतात आणि गूढ वस्तू आणि व्यक्तींचं आगमन व्हायला लागतं. एकामागोमाग एक धक्के बसायला लागतात. काही प्रसंगांत टेडीचं चमत्कारिक वागणं, त्याच्या पालकांचं त्याहूनही विचित्र वागणं पाहून मॅलरी आणि अर्थात वाचकही अक्षरशः हबकून जातो. घराच्या शेजारी असलेल्या छोट्याशा खोलीत मॅलरीच्या निवासाची व्यवस्था करण्यात आलेली असते. ते घर झपाटलेलं आहे असं वाटावं असे अनुभव हळूहळू मॅलरीला यायला लागतात. सुरुवातीला छोटे वाटावे असे प्रसंग हळूहळू जीवघेण्या हल्ल्यांमध्ये बदलत जातात. त्या घरात पूर्वी राहणाऱ्या आणि आता मृत झालेल्या व्यक्तीचा आत्मा मॅलरीला तिथून हाकलून लावण्यासाठी जंग जंग पछाडत असतो. दरम्यान मॅलरीच्या त्या घराच्या, त्या व्यक्तीच्या इतिहास शोधण्याच्या अथक प्रयासांना हळूहळू यश यायला लागतं. मात्र गुंता सुटण्याऐवजी अजूनच गूढ आणि गडद होऊन जातो. कादंबरीच्या अखेरीस घडणारे प्रसंग, देण्यात आलेलं स्पष्टीकरण हे खरोखरच हादरून टाकणारं असं आहे.
लहानग्या टेडीने काढलेली भरपूर चित्रं हा या कादंबरीचा यूएसपी आहे. या पुस्तकातली पानंच्या पानं ही टेडीच्या प्रसंगी ओबडधोबड/भीतीदायक आणि अनेकदा मोहक अशा चित्रांनी भरलेली आहेत. मजकूर सांगून झाल्यावर काही पानांनंतर लेखकाने खुबीने ती चित्रं पेरलेली आहेत. वाचून झाल्यावर मनात तयार झालेल्या प्रतिमेचा अगदी न चुकता चक्काचूर करण्याचं काम ही चित्रं जवळपास १००% वेळा बिनबोभाटपणे निभवतात आणि वाचकाच्या डोक्यातला गुंता अजूनच वाढवून ठेवतात. दुसरी कादंबरी म्हणजे Marcus Kliewer लिखित We used to live here. काही महिन्यांपूर्वी अनपेक्षित, धक्कादायक, कलाटणी देणारे शेवट असलेल्या पुस्तकांविषयीच्या एका पोस्टवर गणेशने मला हे पुस्तक सुचवलं होतं. ते वाचण्याचा अखेरीस योग आला.
अतिशय दूरवरच्या, बऱ्यापैकी निर्मनुष्य अशा परिसरातलं एक अतिशय जुनं पण प्रशस्त घर इव्हा आणि चार्ली या दोन मुली विकत घेतात. राहायला येऊन जेमतेम काही दिवस झालेले असताना अचानक एका वादळी संध्याकाळी थॉमस नावाचा एका मनुष्य आपली बायको आणि तीन मुलांना घेऊन इव्हा आणि चार्लीच्या घरासमोर दत्त म्हणून उभा राहतो. थॉमसचं बालपण त्या घरात गेलेलं असतं आणि आपल्या बायकोमुलांना आपल्या बालपणीचं घर दाखवावं, तिथल्या छान आठवणी सांगाव्यात अशी थॉमसची इच्छा असते. तो इव्हा आणि चार्लीच्या घराची बेल वाजवतो आणि फक्त पंधरा मिनिटांसाठी त्यांचं घर आपल्या कुटुंबियांना फिरून दाखवू देण्याची विचित्र विनंती करतो. चार्ली त्यावेळी घरात नसते आणि एकट्या इव्हाला चटकन निर्णय घेता येत नाही. पण अखेरीस "नकोच ती नसती कटकट" म्हणून इव्हा थॉमसची विनंती नाकारते. काहीही ना बोलता थॉमस आणि त्याचे कुटुंबीय घराच्या दारातूनच निघून जात असताना मुलांचे पडलेले चेहरे पाहून शेवटच्या क्षणी इव्हा आपला निर्णय बदलते आणि पंधरा मिनिटांच्या बोलीवर त्यांना घरात प्रवेश देते.
एकाएकी घरात गूढ घटना घडायला लागतात. घरात, घरातील तळघरात अनोळखी व्यक्ती, भीतीदायक आकृत्या दिसायला लागतात. अखेरीस इव्हा थॉमस आणि कंपनीला घराबाहेर हाकलून देण्यात यशस्वी होते. मात्र..... काही वेळातच ते पुन्हा घरात हजर होतात. एव्हाना चार्ली पण परत आलेली असल्याने ती त्यांच्याशी बोलून काही तासांपुरतं त्या कुटुंबाला त्या घरात निवासाची परवानगी देते. हळूहळू विचित्र घटना, अनुभव, प्रसंग यांची वारंवारता वाढायला लागते. चार्ली आणि इव्हा दोघांनाही अनुभव यायला लागतात. त्यानंतर चार्ली गायब होते. तिला शोधायला बाहेर पडलेल्या इव्हाला आसपासच्या परीसरातील लोकांकडून आणि शेजाऱ्यांकडून त्या घराच्या आणि थॉमसच्या इतिहासाविषयी अतिशय भीतीदायक असे तपशील कळतात. ते ऐकून तर इव्हाच्या पायाखालची जमीनच सरकते.
दरम्यान इव्हा चार्लीला भेटते मात्र तेवढ्यात तिला 'दुसऱ्या चार्ली'चा फोन येतो. खरी चार्ली कोण? खरी इव्हा कोण? थॉमस नक्की कोण आहे? इथे येण्यामागे त्याचा नक्की काय हेतू आहे? या सर्वांची अतिशय अस्पष्ट उत्तरं देत आणि असंख्य शक्यता निर्माण करत एका धूसर वाटेवर कादंबरी संपते.
कादंबरीचा शेवट ओपन एंडेड असला तरी दोन प्रकरणांच्या मध्ये लेखकाने छोटी छोटी प्रकरणं पेरून ठेवली आहेत. त्या प्रकरणांचा फॉन्ट, भाषाशैली सगळंच कादंबरीच्या मुख्य प्रकरणांपेक्षा सर्वस्वी भिन्न आहे. ते घर, थॉमस, इव्हा, चार्ली, थॉमसचं कुटुंबीय या सर्वांवर त्रयस्थ नजरेतून केलेलं डॉक्युमेंटेशन आहे. त्यात पोलीस चौकशी आहे, डॉक्टरांच्या नोट्स आहेत, स्थानिक वर्तमानपात्रातल्या जाहिराती, बातम्या आहेत, काही महत्वाच्या संशोधनांची माहिती देणारे उतारे आहेत.
हे सगळे मुद्दे, वर्णनं, प्रसंग या सर्वांची साखळी गुंफून काहीतरी अर्थ लावण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही वाचकांच्या हाती फार काही ठोस असं लागत नाही ही वाचकांच्या दृष्टीकोनातून पुस्तकाविषयीची, म्हंटलं तर नकारात्मक बाब आहे.
अजून एक नकारात्मक बाब म्हणजे भाषाशैली! प्रचंड लांबच्या लांब उतारे असलेली शब्दबंबाळ प्रकरणं, असंबद्ध वर्णनं, अर्धवट तोडलेली वाक्यं इत्यादींमुळे कुठल्याही कादंबरीच्या वाचकप्रियतेसाठी अत्यावश्यक असलेला प्रवाहीपणा कमी होतो. त्या दृष्टीने ही कादंबरी रीडर फ्रेंडली नाहीये. पण अर्थातच हे गूढ, विचित्र, गहिरं वातावरण अनेक वाचकांना आवडलेलंहे आहे. कादंबरीचा अर्थ शोधणारे अनेक थ्रेडस आणि लेख नेटवर उपलब्ध आहेत हा कादंबरीच्या अमाप लोकप्रियतेचा पुरावा.
गूढ, अद्भुत, सुपरनॅचरल, पॅरानॉर्मल वाचायला आवडणाऱ्यांनी या दोन कादंबऱ्या आवर्जून वाचायला हव्यात.
--हेरंब ओक
No comments:
Post a Comment