Monday, December 9, 2024

'निरपराध' गुन्हेगारांच्या खंतावून सोडणाऱ्या अविश्वसनीय सत्यकथा : Framed

आत्तापर्यंत सुमारे पन्नासेक पुस्तकं लिहिणाऱ्या जॉन ग्रीशमने यापूर्वी फक्त एकच नॉन-फिक्शन पुस्तक लिहिलं आहे. पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे एक निर्दोष व्यक्ती कित्येक वर्षं तुरुंगात कशी सडते याची तपशीलवार आणि त्यामुळेच अविश्वसनीय घटनांनी भरलेल्या प्रसंगांची मालिकाच त्याने आपल्या 'The Innocent Man: Murder and Injustice in a Small Town' नावाच्या पुस्तकात मांडली आहे. पुस्तक संपवल्यावर येणारी विषण्णता आणि हतबलता असह्य स्वरूपाची असते. याच पुस्तकावर आधारित त्याच नावाची एक मिनीसिरीजही नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.


जॉन ग्रीशमने जिम मॅकक्लॉसकी (Jim McCloskey) या सहलेखकाच्या सोबतीने लिहिलेलं आणि मुख्य म्हणजे याच विषयाला वाहिलेलं Framed नावाचं अजून एक पुस्तक ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रकाशित झालं. 'Framed: Astonishing True Stories of Wrongful Convictions' असं पूर्ण शीर्षक वाचल्यावरच आपल्यापुढे काय वाढून ठेवलं आहे हे आपल्या लक्षात येतं. Innocent man मध्ये एका निर्दोष माणसाला पोलिसांनी खुनाच्या आरोपात कसं जबरस्तीने अडकवलं याचं वर्णन होतं तर Framed मध्ये वाचकांचा थरकाप उडवून सोडणाऱ्या, चांगुलपणावरचा विश्वास उडवून लावणाऱ्या अशा तब्ब्ल दहा सत्यघटनांची वर्णनं आहेत. ग्रीशम आणि मॅकक्लॉसकी यांनी दोघांनीही प्रत्येकी पाच सत्यघटना शब्दबद्ध केल्या आहेत.

जिम मॅकक्लॉसकी हे Centurion Ministries नावाची एक संस्था चालवतात ज्या अंतर्गत पोलिसांनी अन्यायाने, सूडबुद्धीने, चुकीचा तपास करून, मुद्दाम अडकवलेल्या, प्रत्यक्षात निर्दोष असलेल्या परंतु आता देहान्ताची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचं अतिशय महत्वाचं असं काम केलं जातं. महत्वाचं म्हणजे गेल्या पंचवीस-तीस वर्षांत अमेरिकेत घडलेल्या अशा हजारो घटनांपैकी आत्तापर्यंत काही शे घटनांवर मॅकक्लॉसकी यांच्या संस्थेने काम केलं आहे. गुन्ह्याचे तपशील जाणून घेऊन, अभ्यास करून, शासकीय आणि न्यायालयीन कागदपत्रं चाळून, प्रत्यक्ष घटनेची सत्यासत्यता पारखून घेतल्यानंतर Centurion Ministries या संस्थेतर्फे चुकीने अडकवण्यात आलेल्या व्यक्तीला निर्दोष सिद्ध करून तिला तुरुंगातून सोडवण्यासाठी यथाशक्ती सर्व प्रयत्न केले जातात. त्यांना आर्थिक, मानसिक, वकिली, शासकीय अशी सर्व प्रकारची मदत केली जाते. १९८० साली स्थापना झालेली मॅकक्लॉसकीचं अपत्य असलेली Centurion Ministries ही सेवाभावी संस्था अशा प्रकारच्या निरपराध व्यक्तींसाठी काम करणारी जगातली पहिली संस्था असून आत्तापर्यंत त्यांनी ६३ निरपराध लोकांना मृत्युदंडापासून वाचवलं आहे. 

जेव्हा एखादी व्यक्ती अशी चुकीच्या पद्धतीने अडकवली जाते त्यावेळी व्यक्तीचे सहचर, पालक, अपत्यं यांच्या बरोबरीनेच जवळचे नातलग, मित्रमंडळी असे अनेक जीव बरोबरीने भरडले जातात आणि तेही विनाकारण. त्या अन्यायाचे दुष्परिणाम त्या व्यक्तीला जेवढे भोगावे लागतात तेवढ्याच प्रमाणात त्याच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनाही भोगावे लागत असतात. प्रस्तुत पुस्तकात चर्चिल्या गेलेल्या दहा घटनांपैकी निम्म्याहून अधिक प्रसंगांमध्ये तर अशा जाणूनबुजून अडकवण्यात आलेल्या व्यक्तींची किमान संख्या चार आहे. थोडक्यात पुस्तकात दहा घटनांची वर्णनं असली तरी प्रत्यक्षात किती आयुष्याची राखरांगोळी झाली याची मोजदाद करणंही अशक्य आहे! ज्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यात आलं त्यांच्याबद्दल वाचताना तर अमाप नैराश्य येतं. आपण स्वतःला त्या दुर्दैवी जीवांच्या जागी क्षणभरही कल्पून बघण्याचं धाडस करू शकत नाही. यातल्या काहीजणांचं नुकतंच लग्न झालं होतं, काही जणांचं ठरलं होतं, काहींना मुलं होती, काही सन्मानाचं आयुष्य जगत होते. 

एका घटनेत स्वतःच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मित्रांबरोबर पार्टी करायला गेलेला एक सैनिक खुनाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवला जातो आणि त्याच्याबरोबर त्याच्या अन्य दोन मित्रांनाही अडकवलं जातं. दुसऱ्या एका घटनेत घराला आग लागून त्यात स्वतःची तीन लहान मुलं गमावलेल्या एका तरुण पित्यावर त्यानेच मुद्दाम आग लावून त्याच्या मुलांची हत्या केल्याचा आरोप ठेवून त्याला अटक केली जाते. एका घटनेत तर एक स्त्री समोरच एक गुन्हा घडताना आणि गुन्हेगारांना पळून जाताना बघते आणि नागरी कर्तव्य म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतःहूनच आदल्या  दिवशी पाहिलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना द्यायला जाते. अशा वेळी गुन्हेगार, संशयितांचा शोध घेणं तर दूरच, उलट पोलीस तिलाच पकडून, तिच्यावर हत्येचा आरोप टाकून तिला तुरुंगात डांबून टाकतात. अजून एका घटनेत स्वतःच्या बायकोवर अतिशय प्रेम करणाऱ्या मध्यमवयीन शिक्षकाला त्याच्या बायकोचा खुनी म्हणून पोलिसांकडून अटक केली जाते. आणि गंमत म्हणजे तो माणूस गुन्हा घडला तेव्हा बायकोबरोबरच काय, तर घरात, गावातही नसतो. तो कित्येक मैल दूरच्या शहरात असणाऱ्या एका सेमिनारसाठी गेलेला असतो. 

पुस्तकातल्या पहिल्याच घटनेत (Norfolk Four) तर एका स्त्रीवर एक माथेफिरू गुन्हेगार बलात्कार करतो आणि पळून जातो. मात्र प्रत्यक्षात पोलीस अन्य एका खलाशी व्यक्तीला गजाआड डांबतात. त्याच्याविरुद्ध एकही पुरावा मिळत नाहीये म्हंटल्यावर हा गुन्हा दोघांनी घडवला आहे असा परस्पर अर्थ काढून अजून एका निरपराध खलाश्याला गुन्ह्यात अडकवलं जातं. पण त्याच्याविरुद्धही पुरावा न मिळाल्याने अजून एका खलाश्याला अडकवलं जातं. आणि अक्षरशः विश्वास बसणार नाही पण अशा प्रकारे एकूण आठ निरपराध लोकांवर पोलीस नाही नाही ते आरोप ठेवून त्यांना सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून मोकळे होतात. हे सगळे विचित्र प्रकार खरा गुन्हेगार बघत असतो. पोलिसांच्या मूर्खपणाला वैतागून शेवटी तो पोलिसांना शरण येतो आणि गुन्ह्याची कबुलीही देतो आणि अहो आश्चर्यम्! पोलीस त्याच्या कबुलीजबाबाकडे लक्षही न देता, तो जाणूनबुजून आपली दिशाभूल करतोय असा परस्पर समज करून घेऊन त्याला सोडूनही देतात. 

Inocent man या पुस्तकातल्या सत्यघटनेत पोलीस एका निरपराध व्यक्तीला खुनाच्या आरोपाखाली अटक करतात आणि चौकशीचा ससेमिरा मागे लावून, त्याला भंडावून सोडून, त्याच्याकडून त्याने स्वप्नात खून केल्याचा कबुलीजबाब नोंदवून घेऊन, काही तासांनी त्याने तो खून प्रत्यक्षातच केला आहे असं त्याच्या तोंडून वदवून घेतात. Framed मधल्या काही घटनांमधल्या पोलिसांनी देखील तंतोतंत हीच पद्धत वापरून निरपराध लोकांना त्यांनी न केलेले गुन्हे कबूल करायला भाग पाडलं आहे. वाचक म्हणून आपल्याला हे कितीही हास्यास्पद आणि अविश्वसनीय तंत्र वाटत असलं तरी अमेरिकन पोलिसांमध्ये गुन्हे कबूल करवून घेण्याची ही पद्धत अत्यंत सहजरित्या आणि नियमितपणे वापरली जात असावी असं वाटतं.

अशा प्रकारे कुठल्यातरी व्यक्तीला गुन्हेगार 'ठरवून' टाकून सगळा तपास त्याच्याभोवती केंद्रित करण्याच्या तपासाच्या पद्धतीला 'टनल व्हिजन' (tunnel vision) अर्थात झापडबंद तपास म्हणतात. यात पोलीस एकदाच एका व्यक्तीला गुन्हेगार ठरवून टाकतात आणि अन्य पर्याय, अन्य आरोपी, गुन्हेगार, संशयित यांचा तपास तर सोडाच विचारही करत नाहीत. झापडं लावल्याप्रमाणे केवळ एकाच दिशेने आणि त्यांनी ठरवलेल्या संशयिताला गुन्हेगार सिद्ध करण्याच्या त्यांच्या निष्कर्षाला सोयीस्कर अशी मांडणी करत राहतात. इतर दिशांकडे दृष्टिक्षेप टाकत नाहीत की चौकशीची किंवा शोधाची दिशाही बदलत नाहीत. अक्षरशः Tunnel मध्ये अडकून राहतात. तपास करताना आढळणारे रक्त, वीर्य, केस यांसारखे DNA च्या आधारे आरोपीची निर्दोष सुटका करू शकणारे पुरावे, alibi अर्थात गुन्हा घडला तेव्हा आरोपी प्रत्यक्षात अन्य स्थळी, अन्य व्यक्तींबरोबर असल्याचे भक्कम पुरावे अशा सगळ्या महत्वाच्या पुराव्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जातं. त्याउलट Bite marks analysis आणि bloodstain analysis सारख्या नितांत बनावट पद्धतींना अत्यंत मूलभूत शास्त्र असल्याचं सिद्ध केलं जातं आणि त्याआधारे निर्दोष व्यक्तींना निव्वळ त्यांच्या दातांच्या ठश्यांच्या माध्मयातून खुनी ठरवलं जातं. पुस्तकातलं एक संपूर्ण प्रकरण तर अशा Bite marks analysis सारख्या बनावट तंत्राला हाताशी धरून आणि शवविच्छेदन करणाऱ्या दोन डॉक्टरांनी याचा अक्षरशः कसा धंदा मांडला होता या विषयीचं विदारक सत्य सामोरं आणतं. 

ही काळी कृत्यं करणाऱ्या गटसमूहात प्रमुख सरकारी वकीला (district attorney) पासून ते न्यायाधीश, पोलीस डिटेक्टिव्ह, शवविच्छेदन करणारे डॉक्टर, स्वतःची शिक्षा कमी व्हावी म्हणून खोट्या साक्षी देणारे कैदी अर्थात jailhouse snitch असे सगळे सगळे सामील असतात. असाच एक सर्रास खोटे पुरावे देणारा district attorney काही वर्षांनी न्यायाधीश झाला. त्याने आपल्या काळ्या कारकिर्दीत किती निर्दोष आयुष्यं नासवली असतील याची गणनाही करता येणार नाही.

शेवटचा, सर्वात महत्वाचा आणि राहून राहून आपल्याला विचारात पाडणारा मुद्दा म्हणजे पोलीस हे असं सगळं का करतात? अशा रीतीने निरपराध लोकांना का अडकवतात? त्यांच्या तपासात काही त्रुटी राहिलेल्या असतात का? तपासाची दिशा चुकलेली असते का? त्यांची दिशाभूल केली गेलेली असते का?


तर या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे ना आणि ही!!!


या प्रत्येक घटनेत पोलीस जाणून बुजून असं वागले आहेत. त्यांनी मुद्दामहून एखाद्या निरपराध व्यक्तीला त्यात अडकवलं आहे. यातली कुठलीही गोष्ट पोलिसांच्या हातून चुकून किंवा अनवधानाने झालेली नसून पोलिसांनी या सगळ्या गोष्टी अगदी हेतुपुरस्सरपणे केलेल्या आहेत. हे असं काही होऊ शकेल, पोलीस एवढे भ्रष्टाचारी असतील, ते मुद्दाम निरपराध लोकांना खुनासारख्या गुन्ह्यात अडकवतील यावर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचा विश्वासच बसू शकत नाही. या पोलिसांकडून या गोष्टी चुकून, अनवधानाने, नजरचुकीने, गैरसमजुतीतून झाल्या असतील असंच आपल्याला वाटत असतं पण दुर्दैवाने ते खोटं असतं. प्रत्येक घटनेत पोलिसांनी हे बनाव मुद्दाम रचले आहेत, खोटे साक्षी, पुरावे उभे केले आहेत, तपासाच्या दिशा मुद्दाम बदललेल्या आहेत. मुद्दाम बनाव रचण्यात आलेत. 

अनेक घटनांमध्ये अतिशय कमी बुद्ध्यांक असलेल्या लोकांना गुन्हेगार म्हणून जाणूनबुजून अडकवण्यात आलं. Alibi असूनही तिकडे दुर्लक्ष करण्यात आलं, DNA अहवालाकडे दुर्लक्ष करण्यात आलं. यात काही घटनांमध्ये तर पोलिसांच्या बरोबरीने खुद्द न्यायमूर्ती(?) आणि वकीलही या अन्यायात सामील होते. 

आणि हे सगळं केलं गेलंय ते निव्वळ केस क्लोज करण्याचा दबाव म्हणून.चुकून गैरसमजातून झालेली प्रकरणं नाहीयेत ही. एखाद्याला मुद्दाम, ठरवून, योजनाबद्ध रीतीने लक्ष्य करून त्याच्याविरुद्ध खोटे पुरावे, साक्षीदार गोळा करून पद्धतशीरपणे त्याच्या गळ्याभोवती फास आवळण्यात आलाय. आणि सर्वात अविश्वसनीय म्हणजे हे सगळं घडलंय आणि अजूनही घडतंय ते तथाकथित अतिप्रगत, अत्यंत विकसित, हुशार, जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत हजारो वर्षं पुढे असणाऱ्या सर्वगुणसंपन्न, बलाढ्य, सर्वशक्तिमान आणि नानाविध शोधांची जननी असणाऱ्या अमेरिकेत. 

पुस्तकाच्या अखेरीस प्रत्येक प्रकरणातला गुन्हा घडला त्यावेळी अडकवण्यात आलेली निरपराध व्यक्ती आणि १५-२०-२५-३० वर्षांचा कायद्याचा लढा देऊन आणि काही प्रसंगी प्रत्यक्ष मृत्यूच्या दारातून सुटका झालेली व्यक्ती असे दोन फोटो तुलनेसाठी प्रकाशित करण्यात आले आहेत. काळाचे, अन्यायाच्या जखमांचे व्रण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत राहतात. वाया गेलेली उमेदीची वर्षं, दुरावलेली नाती, मोडलेली लग्नं त्या डोळ्यांतून डोकावत राहतात. 

गेल्या वर्षी ग्रीशमने जेव्हा Framed ची घोषणा केली तेव्हाच मी ते वाचणार नाही असं ठामपणे ठरवलं होतं. सुरुवातीला अनेक वर्षं एकापेक्षा एक अप्रतिम कादंबऱ्या लिहिणाऱ्या ग्रीशमने गेल्या आठ दहा वर्षांत त्याच्या पूर्वीच्या कामगिरीला साजेशी पुस्तकं लिहिली नाहीयेत हे एक कारण आणि एका पेक्षा अधिक लेखक (लेखक आणि सहलेखक) असलेली पुस्तकं मला फारशी आवडत नाहीत हे दुसरं. मात्र Framed चा विषय वाचला आणि तत्क्षणी माझ्या डोळ्यांसमोरून 'Innocent man' चमकून गेली. काही वर्षांपूर्वी नेटफ्लिक्सवर बघितलेली Making a murderer आठवली. आणि त्यानंतर मात्र Framed वाचायचं हे नक्की झालं. 

मात्र हे पुस्तक सर्वांसाठी नाही. वाचकाला अतिशय विषण्ण करून टाकण्याची, कमालीच्या नैराश्याने भारून टाकण्याची, अपार खिन्नता आणि औदासिन्याचं मळभ दाटून आणण्याची भयाण शक्ती या पुस्तकात आहे. कारण जे आपण वाचूही शकत नाही ते याच जगाच्या पाठीवर कोणीतरी भोगलं आहे, वर्षानुवर्षं भोगलं आहे आणि काही प्रसंगांमध्ये तर अद्यापही भोगत आहेत ही कल्पनाच अत्यंत दाहक आहे. 

पुस्तक वाचलं नाहीत तरी अमेरिकेतच नव्हे तर भारतात आणि जगभरातल्या देशांमध्ये अशा पोलीस आणि कायद्याच्या नंगानाचामुळे वर्षानुवर्षं काळकोठडीत अडकलेल्या हजारो जीवांवरचा अन्याय दूर व्हावा आणि त्यांची मुक्तता व्हावी, त्यांना त्यांच्या माणसांमध्ये, नातलगांमध्ये परत जात यावं, त्यांच्या गळाभेटी घेता याव्यात आणि उरलंसुरलं आयुष्य सुखाने जगता यावं एवढी प्रार्थना तरी नक्की करा ही विनंती!

--हेरंब ओक

No comments:

Post a Comment

'निरपराध' गुन्हेगारांच्या खंतावून सोडणाऱ्या अविश्वसनीय सत्यकथा : Framed

आत्तापर्यंत सुमारे पन्नासेक पुस्तकं लिहिणाऱ्या जॉन ग्रीशमने यापूर्वी फक्त एकच नॉन-फिक्शन पुस्तक लिहिलं आहे. पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे एक...