Tuesday, November 26, 2024

पोलादी भिंतीआडच्या प्रा'चीन' देशाला मराठी लेखणीत पकडण्याचा यशस्वी प्रयत्न : भिंतीआडचा चीन

श्रीराम कुंटे या माझ्या मित्राशी एकदा गप्पा मारत असताना मी सहज, आपण अगदी नेहमी एकमेकांना विचारतो त्याप्रमाणे विचारलं, "मग सध्या काय नवीन?". मला कोणी असले टिपिकल प्रश्न विचारले की मी त्या प्रश्नांना तसंच टिपिकल उत्तर देतो "काही नाही रे. नेहमीचंच. सेम ओल्ड".  पण श्रीराम दोन क्षण थांबला आणि म्हणाला "अरे एक पुस्तक लिहितोय. चीन वर". "काही नाही रे, पाणी पितोय" किंवा "झोपलो होतो" हे जेवढ्या सहजतेने सांगावं त्या सहजतेने त्याने दिलेलं उत्तर ऐकून मी क्षणभर अवाक झालो. आपल्या ऐकण्यात चूक झाली नाही ना याची खात्री करण्यासाठीची राजमान्य पद्धत म्हणजे तोच प्रश्न किंवा शब्द पुन्हा उच्चारणे. अर्थात मीही तीच अवलंबली आणि "पुस्तक?" एवढंच म्हणालो. 

"हो. चीन या विषयावर लिहायचं कधीपासून डोक्यात होतं. ते एकदाचं प्रत्यक्षात आणतोय." मला अधिक प्रश्न पडू नयेत याची काळजी घेत श्रीराम उत्तरला. 

तरीही मला अजून बरेच प्रश्न पडलेच. अर्थात श्रीराम जे म्हणाला अविश्वास दाखवण्याचा प्रश्नच येत नव्हता आणि त्याचं कारण म्हणजे... किंवा त्याची तीन कारणं म्हणजे आमच्या 'शब्दांगण' या चर्चासत्र/पुस्तक परिचय विषयक कार्यक्रमात त्याने नुकतंच म्हणजेच जेमतेम दोन तासांपूर्वीच सत्र घेतलं होतं. जे नुकतंच संपलं होतं आणि त्यानंतरच आम्ही गप्पा मारत बसलो होतो. आणि महत्वाचं म्हणजे सत्राचा विषयच "भारत-चीन संबंधांचे भवितव्य - भविष्याचा भू-राजकीय, सामरिक आणि आर्थिक आढावा" असा भरभक्कम होता. दुसरं कारण म्हणजे श्रीरामचं दांडगं वाचन, अभ्यासू स्वभाव आणि एकूणच व्यासंग या बाबींशी मी लहानपणापासूनच परिचित होतो. त्यामुळे त्याने पुस्तक लिहावं यात माझ्या दृष्टीने तरी नवलाईचा भाग असा काहीही नव्हता. आणि तिसरं कारण किंवा तक्रार म्हणजे हे त्याने फार पूर्वीच करायला हवं होतं असं माझं प्रामाणिक मत होतं. 

तर ही घटना फेब्रुवारी २०२२ मधली. त्यानंतर मध्ये एक दीड वर्षं फार काही घडलंच नाही आणि अचानक एक दिवस श्रीरामचा फोन आला की "मेसेज बघ. वाचून बघ आणि किती वेळ लागेल ते सांग."

मेसेज वाचायला किती वेळ लागणार हे काय सांगायचं हे मला कळेना म्हणून काही न बोलता मी ओके म्हणून फोन ठेवला आणि त्याचा मेसेज उघडला. 'अनटायटल्ड डॉक्युमेंट' नावाच्या वर्ड फाईलवर क्लिक केल्यानंतर मला धक्काच बसला. फेब्रुवारी २०२२ नंतर पुढचे १८ महिने हा माणूस झपाटल्यागत काम करत होता, वाचन करत होता, संदर्भ शोधत होता, सगळे मुद्दे शब्दबद्ध करत होता, पुनःपुन्हा करत होता. आणि या सगळ्या परिश्रमांचा परिपाक मला माझ्या इनबॉक्स मध्ये दिसत होता. श्रीरामाची मेहनत, त्याचं भारावून जाऊन काम करणं, संदर्भांची शोधाशोध, असंख्य पुस्तकांचं वाचन, त्या पुस्तकांसाठी वेळोवेळी करावी लागलेली पदरमोड इत्यादी बाबींचं वर्णन करणं हे त्या 'अनटायटल्ड डॉक्युमेंट' नावाच्या चिमुकल्या सिम्बलच्या कुवतीबाहेरचं होतं जे मला नंतर वेळोवेळी श्रीरामच्या तोंडूनच कळणार होतं. 

त्याने पाठवलेल्या फाईलवर क्लिक केल्यावर आधी ती फाईल उघडायलाच काही मिनिटं लागली. (आणि हा माणूस मला विचारत होता किती वेळ लागेल ते सांग.) फाईल उघडल्यानंतर समोरच भाग-१ आणि त्याखाली सुमारे १०-१२ प्रकरणं, त्यानंतर भाग-२ आणि त्याखाली त्यातली प्रकरणं असे एकूण चार भाग असलेली अशी अनुक्रमणिकासदृश रचना होती. डॉक्युमेंटची अनुक्रमणिकाच जीव दडपून टाकणारी होती. त्यामुळे त्या दिवशी मी पुढे काहीही वाचलं नाही. पुढचे जवळपास तीन चार दिवस कामाच्या गडबडीत इच्छा असूनही वाचायला जमलं नाही. नंतर मात्र लगेच आलेल्या वीकांतात संपूर्ण पुस्तक वाचून काढलं. चीन या विषयाचा (आणि अर्थातच त्यामुळे या पुस्तकाचा) अवाका किती मोठा आहे याची साधारण कल्पना असली तरी तो एवढा विशालकाय असेल हे माझ्यासारख्या माणसाच्या तरी यापूर्वी लक्षात आलं नव्हतं. चीन म्हंटलं की फारतर माओ, युआन श्वांग (हा आपल्याला शाळेत शिकवलेला चुकीचा उच्चार आहे), क्षि जिनपिंग आणि असेच काही विचित्र उच्चारांचे शब्द आपल्या डोक्यात येतात. पण हे पुस्तक आपलं चीन विषयक ज्ञान आणि आपल्या ढोबळ समजुतींपेक्षा फार फार विशाल आणि वेगळं आहे हे माझ्या एव्हाना लक्षात आलं होतं. 

चीन या विषयावर इंग्रजी भाषेत आत्तापर्यंत विपुल लिखाण झालं असलं तरी मराठीत मात्र एका हाताच्या बोटावर

मोजण्याइतकीही पुस्तकं आढळत नाहीत. आणि हा अनुशेष भरून काढण्याचं अत्यंत महत्वाचं काम या पुस्तकाने केलं आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच हे पुस्तक आणि इतर पुस्तकं यातला एक महत्वाचा फरक लेखक स्पष्ट करतो आणि तो म्हणजे इतर पुस्तकांप्रमाणे भारताच्या नजरेतून चीनकडे पाहून त्याचं वर्णन करण्याऐवजी या पुस्तकात लेखकाने चीनकडे चीनी नागरिकांच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात भारत आणि चीन मधली अनेक साम्यस्थळं तर दिसतातच पण त्याहूनही अधिक जास्त प्रमाणात असलेले फरक दिसतात आणि त्यांची त्यांची विस्तारपूर्वक व विचारपूर्वक केलेली मांडणीही दिसते. पुस्तकात ठिकठिकाणी पुरवण्यात आलेले नकाशे आणि विविध छायाचित्रं यांच्यामुळे विषय समजून घ्यायला मदत होते. आपण करत असलेले किंवा प्रचलित असलेले चीनी उच्चार आणि प्रत्यक्षातले उच्चार यांची एक यादी पुस्तकाच्या सुरुवातीला असून ती वाचताना चांगलंच मनोरंजन होतं. पुस्तकाच्या खेरीस भली मोठी संदर्भसूची देण्यात आली असून त्याद्वारे लेखकाचा या विषयावरचा अभ्यास, तळमळ आणि व्यासंग सहजरित्या अधोरेखित होतो. 

वर म्हंटल्याप्रमाणे हे पुस्तक चार भागांत विभागलेलं आहे. चीन हा देश, त्याचा इतिहास, भूगोल, संस्कृती, राजघराणी, युद्धं, कम्युनिझम या सगळ्या विषयांना सामावून घ्यायचं म्हणजे पुस्तकाची विभागणी अशा प्रकारे तीन-चार विषयांच्या छत्रांमध्ये करण्याचा निर्णय अचूकच म्हणायला हवा. पहिल्या भागात वाचकांची चीनमधलया नानाविध राजघराण्यांशी ओळख करून देण्यात आली आहे. पहिलंच प्रकरण एवढं ओघवतं झालं आहे की ते संपलं आहे हे ही आपल्या लक्षात येत नाही. 

निरनिराळी राजघराणी, त्यांच्या अखत्यारीतले वेगवेगळे भौगोलिक प्रदेश, राजघराण्यांना ईश्वरी पाठींबा असल्याचा भोळ्याभाबडया जनतेचा विश्वास, तथाकथित ईश्वरी इच्छेने सुरू होणारी साम्राज्यं, आकाशात होणाऱ्या ग्रहांच्या तथाकथित दैवी युत्या, त्या युत्यांचे राजघराण्यांवर असणारे तथाकथित दैवी आशीर्वाद, पाच राजघराणी, दहा साम्राज्यं अशी अनेक प्रकारची विस्मयकारक माहिती आपल्याला मिळते. युरोपातला रेनसॉं (रेनेसान्स) आपल्याला ऐकून माहीत असतो पण तशाच प्रकारचा एक रेनसॉंचा काळ चीनमध्ये होऊन गेला होता ही माहिती वाचून वाचक आश्चर्यचकित होतो. 

कुठलं राजघराणं कधी सत्तारूढ झालं, कधी सत्तेतून बाहेर गेलं, त्यांनी काय काय केलं अशा टिपिकल गोष्टी आणि सनावळींची जंत्री देऊन आपण इतिहासाचं कुठलं तरी बोजड पुस्तक वाचतोय अशी भावना वाचकांच्या मनात येऊ न देणं हे श्रीरामच्या लेखनाचं खरं कौशल्य आणि त्याच्या त्या सुज्ञपणाबद्दल प्रकरणाच्या (पहिल्याच नव्हे तर प्रत्येकच) प्रकरणाच्या शेवटी वाचक श्रीरामचे मनापासून आभार मानतो. 

दुसऱ्या प्रकरणात सुरुवातीला कन्फ्युशिअस, युआन श्वांग अर्थात शांगझान्ग, जेंगिझ खान वगैरे हजेरी लावून जातात. मात्र त्यानंतर सर्वव्यापी माओ दशांगुळं वर उरतो. माओने चीनी नागरिकांवर केलेले अत्याचार, अन्याय, त्याचं क्रौर्य अक्षरशः अविश्वसनीय म्हणावं असं आहे. 'ग्रेट टेरर' अंतर्गत केवळ वर्षभरात आपल्याच देशातले २० लाखाहून अधिक नागरिक निर्ममपणे ठार मारणं असो किंवा कोरियन युद्धात लाखो चीनी सैनिक मारल्याबद्दलची दर्पोक्ती आणि अजून काही लाख चीनी सैनिक मरतील याचं अभिमानपूर्वक वर्तवलेलं भाकीत असो, किंवा 'ग्रेट लीप फॉरवर्ड' या महामूर्ख सरकारी योजनेअंतर्गत १९५८ ते १९६२ या चार वर्षांत आलेल्या मानवनिर्मित दुष्काळामुळे किमान ३ ते ४ कोटी चीनी नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणं असो!!! या गोष्टी वाचताना सर्वसामान्य वाचकाचा थरकाप उडतो तर कित्येकदा संतापही होतो. माओच्या विक्षिप्तपणाचे असंख्य किस्से आणि सत्तेच्या लालसेपायी त्याने आपल्याच नागरिकांवर केलेले अनन्वित अत्याचार हे कुठल्याही सामान्य माणसाला समजून घेण्यापलीकडचे आहेत.  

त्यानंतर 'सांस्कृतिक क्रांती' च्या नावाखाली फिरलेला हुकूमशाही वरवंटा, भारताची भळभळती जखम असलेलं ६२ सालचं भारत-चीन युद्ध, तिआनमेन चौकातलं विद्यार्थ्यांचं आंदोलन अशा अनेक ऐतिहासिक घटनांकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळतो. 

पुढचं प्रकरण बऱ्यापैकी क्षि जिनपिंगला वाहिलेलं आहे. जिनपिंगच्या काळात आर्थिक, संस्कृतिक, क्रीडा, आयटी क्षेत्रात चीनने अविश्वसनीय अशी प्रगती कशी केली आणि भारत या आपल्या एकेकाळच्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याला दूरवर सोडून चीन स्वतः कित्येक दशकं पुढे कसा निघून गेला याची अविश्वसनीय वर्णनं वाचायला मिळतात. चीन इलेक्ट्रिक वाहनं आणि एआयच्या क्षेत्रात जगाला आ वासायाला लावेल अशा वेगाने करत असलेली प्रगती, बेल्ट-रोड सारखा संपूर्ण जगाला आपल्या टाचेखाली घेण्याची पाशवी महत्वाकांक्षा असलेला महाकाय प्रकल्प इत्यादी गोष्टींची आणि त्यामागच्या जिनपिंगसारख्या नेत्याच्या धोरणीपणाची आणि दूरदृष्टीची इत्यंभूत माहिती वाचकांना मिळते.  

चौथं प्रकरण "हे सगळं आपल्याला का माहीत असायला हवं?" या प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आलेलं आहे. यात चीनने भारतासमोर उभे केलेलं आर्थिक आव्हान, लष्करी आव्हान, विचारसरणीचं आव्हान अशा महत्वाच्या आव्हानांची यादी देण्यात आली आहे. ही आव्हानं नक्की कसली आहेत? हीच आव्हानं एवढी महत्वाची का? या विषयीही उहापोह करण्यात आलेला आहे. 

आवर्जून उल्लेख कराव्या अशा दोन छोट्या किंवा प्रसंगी दुर्लक्षित केल्या जातात अशा दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे मुखपृष्ठ आणि शीर्षक. चंद्रमोहन कुलकर्णी यांचं अत्यंत चपखल (विशेषतः विळा-हातोड्याची अचूक जागी करण्यात आलेली मांडणी) असं मुखपृष्ठ पाहून या भिंतीआड नक्की कुठल्या प्रकारचा देश दडला आहे हे जाणून घ्यायची वाचकांची उत्सुकता शिगेला पोहोचते हे नक्की! 

वर म्हंटल्याप्रमाणे भारतासमोर चीनच्या रूपात ही आव्हानं आहेत किंवा हे प्रश्न/समस्या आहेत हे भारताच्या/भारतीयांच्या लक्षात आलं तर आपण त्या समस्यांवर उपाय शोधण्याचे प्रयत्न करण्यासाठी हातपाय तरी हलवू! जर या समस्या आहेत हे लक्षातच आलं नाही तर मग आपण आपल्याच भ्रामक विश्वात रममाण होऊन राहू आणि तोवर चीन अजून काही दशकं आपल्या पुढे निघून गेलेला असेल. हे असं होऊ नये, या विषयाच्या अनुषंगाने आपल्यामध्ये जागरूकता यावी यासाठी श्रीराम कुंटे लिखित 'भिंतींआडचा चीन - एका अजस्र देशाची कुंडली' हे त्याचं पहिलंच पण कुठल्याही अंगाने पहिलं वाटत नसणारं पुस्तक आवर्जून वाचायलाच हवं!

--हेरंब ओक

No comments:

Post a Comment

पोलादी भिंतीआडच्या प्रा'चीन' देशाला मराठी लेखणीत पकडण्याचा यशस्वी प्रयत्न : भिंतीआडचा चीन

श्रीराम कुंटे या माझ्या मित्राशी एकदा गप्पा मारत असताना मी सहज, आपण अगदी नेहमी एकमेकांना विचारतो त्याप्रमाणे विचारलं, "मग सध्या काय नवी...