Saturday, February 25, 2023

भारत-पाकिस्तान ते कोरिया-जपान.... व्हाया चीन

गेल्या एक-दीड महिन्यांत दोन अप्रतिम पुस्तकं वाचण्याचा योग आला. अक्षरशः खिळवून ठेवणारी, हतबुद्ध करून सोडणारी! एक फिक्शन कादंबरी आणि दुसरं म्हणजे आत्मचरित्र. कादंबरी आहे ती ही भारतात घडलेल्या एका महत्त्वाच्या घटनेवर आणि त्या घटनेच्या अनुषंगाने घडलेल्या अनेक लहान मोठ्या तपशीलांबाबत महिती देणारी तर आत्मचरित्र आहे ते एका उत्तर कोरियन व्यक्तीचं.

८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी पंतप्रधानांनी निश्चलनिकरणाची ऐतिहासिक घोषणा केली. या महत्त्वाच्या घटनेला मध्यवर्ती ठेवून श्री अय्यर यांनी 'हू पेंटेड माय मनी व्हाईट?' ही कादंबरी लिहिली. निश्चलनिकरण, त्याची कारणं , आवश्यकता, अनिवार्यता, परिणाम अशा अनेक अंगांना लेखाने या पुस्तकात स्पर्श केला आहे. भारतीय राजकारणातील अनेक चिरपरिचित पात्रं, त्यांचे स्वभाव, लकबी घेऊन आणि मूळची नावं किंचितच बदलेल्या स्वरूपात आपल्याला भेटतात. त्यात चिदंबरम पासून ते सोनिया आणि मोदींपासून ते राहुल गांधींपर्यंत सर्वांचा समावेश आहे.

भारतीय चलनाची छपाई करण्यासाठीच्या एका यंत्राच्या (LEPE Machine) गुप्त लिलावाच्या घटनेपासून पुस्तकाला सुरुवात होते आणि प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला आणि अखेरीस एकेक नवीन धक्का वाचकांना बसत जातो. अनेक घटनांची मांडणी असूनही वेगवान हाताळणीमुळे पुस्तक कुठेही आणि किंचितही कंटाळवाणं होत नाही. काही वेळातच कोट्यवधी खोट्या नोटा घेऊन केरळच्या किनाऱ्यावर पोचणारं जहाज, त्या पैशाचं शिताफीने आणि अतिशय नियोजनबद्ध रीतीने करण्यात आलेलं वाटप अशा अविश्वसनीय घटनांबद्दलच्या माहितीबरोबरच त्या पैशाचा लव्ह-जिहाद, लॅन्ड-जिहाद, दहशतवादी उद्योग इत्यादींनासाठी केला जाणार वपर आणि या सगळ्यात पाकिस्तानचा असणारा थेट सहभाग  याविषयी अतिशय खुलेपणाने मांडणी केलेली आढळते. त्याच्याच जोडीला, दरम्यानच्या काळात भारतीय राजकारणात घडणाऱ्या घटना आणि राजकारण्यांचे निर्ल्लज उद्योग वाचताना अक्षरशः संताप येतो.

श्री अय्यर

श्री अय्यर यांच्या मनी सिरीजमधील हे पाहिलं पुस्तक असून दुसरं पुस्तक 'हू पेंटेड माय लस्ट रेड?' हे आयपीएल मधील राजकीय लागेबांधे आणि भ्रष्टाचारावर आधारित आहे. तर तिसरं पुस्तक 'हू पेंटेड माय फ्युचर ब्राईट?' असून ते भारतीय राजकारणातील नजीकच्या भविष्यकाळात घडू शकणाऱ्या घटनांबद्दल आहे. ही  दोन पुस्तकंदेखील लवकरच वाचण्याचा मानस आहे.  

'हू पेंटेड माय मनी व्हाईट?' मध्ये असंख्य छोटे छोटे तपशील आहेत आणि अनेक राजकीय घटनांकडे वेगळ्या दृष्टिकोनातूनही बघितलं गेलं आहे. त्यामुळे अधिक लिहिण्यापेक्षा हे पुस्तक आवर्जून वाचावं असं मी सांगेन. या पुस्तकाचा अनुवादही उपलब्ध असून घातसूत्रचे लेखक श्री दीपक करंजीकर यांनी 'विघ्नाविराम' या नावे तो केला आहे.

=======================================

'अ रिव्हर इन डार्कनेस' 


'अ रिव्हर इन डार्कनेस' या मासाजी इशिकावा (Masaji Ishikawa) लिखित आत्मचरित्रात उत्तरकोरियाच्या 

कम्युनिस्ट हुकूमशाही सरकारच्या राजवटीत असंख्य हालअपेष्टा आणि भ्रष्टाचार आणि उपासमार यामुळे मरणोन्मुख झालेल्या जनतेचं अत्यंत भयकारी चित्रण आहे. लेखकाचे वडील मूळचे दक्षिण कोरियन असून आणि आई जपानी होती. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या जपानच्या पराभवानंतर सुमारे चोवीस लाख कोरियन सैनिक जपानमध्ये अडकून पडले ज्यात लेखकाचे वडीलही होते. कालांतराने त्यांचं स्थानिक जपानी मुलीशी लग्न होतं. काही वर्षांनी जपानमध्ये अडकलेल्या कोरियन नागरिकांना जवळपास जबरदस्तीनेच उत्तर कोरियाला नेण्यात येतं, ज्यात जपान सरकारचाही अप्रत्यक्ष सहभाग होता.

उत्तर कोरिया म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग असून तिथे जाणं हे जणू  प्रत्येक कोरियन नागरिकाचं कर्तव्यच आहे हे त्यांच्या मनावर बिंबवण्यात येतं. मात्र प्रत्यक्षात उत्तर कोरियाला पोचल्यानंतर स्वर्ग तर राहोच पण किमान नागरी सुविधा आणि प्राथमिक गरजा पूर्ण होण्याच्या बाबतीतही तिथे कशी मारामार आहे हे लेखकाच्या कुटुंबियांच्या लक्षात येतं. त्यात पुन्हा जपानमधून आलेले (Returnees) म्हणून कोरियन सरकार आणि जनतेकडून या लोकांना सदैव दिली जाणारी वाईट वागणूक आणि केला जाणारा भेदभाव यामुळे मूळची वाईट परिस्थिती अधिकच भयानक होते.

दिवसचे दिवस होणारी उपासमार, लहान मुलांचं कुपोषण, सरकारी अधिकाऱ्यांची वक्रदृष्टी आणि तरीही सतत स्वस्तुतीत मग्न असणारं सरकार पाहून जॉर्ज ऑरवेलच्या १९८४ ची प्रकर्षाने आठवण येते. ऑरवेलने काल्पनिक म्हणून लिहिलेय कादंबरीतील कित्येक घटना उत्तर कोरियात प्रत्यक्षात जशाच्या तशा घडताना पाहून धक्का तर बसतोच पण ऑरवेलच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटल्यावाचूनही राहत नाही. 

मासाजी इशिकावा 

असंख्य लटपटी, खटपटी, मानहानी, अपमान, जवळच्यांचे मृत्यू, आत्महत्येचा प्रयत्न अशा अनेक अविश्वसनीय आणि हेलावून टाकणाऱ्या घडामोडींनंतर लेखकाची उत्तर कोरियातील आणि चीन यांच्या मध्ये वाहणारी यालु नदी जीवाच्या करारावर ओलांडून जाऊन चीनमार्गे जपान मध्ये प्रवेश करण्याची तयारी होते. पुस्तकाच्या अखेरीस का होईना भेटणाऱ्या काही चांगल्या व्यक्ती आणि नशिबाची साथ यामुळे लेखकाचा उत्तर कोरियातील छत्तीस वर्षांचा नरकवास संपुष्टात तर येतो परंतु त्याचबरोबर एक नवीन दुःख त्याची सदैव सोबत करणार असतं.


अतिशय आनंद आणि तितकंच टोकाचं दुःख अशा एका विचित्र मनस्थितीत वाचकाला ठेवून पुस्तक संपतं. शेवटची ओळ वाचून झाली तरी मासाजी इशिकावा आणि त्यांच्यासारख्या असंख्य दुर्दैवी जीवांनी आणि त्यांच्या कुटूंबियांनी भोगलेल्या अतीव हालअपेष्टा वाचून वाचकांच्या मनात दाटून येणारी विषण्णता काही केल्या जात नाही आणि त्याच वेळी निव्वळ एका चांगल्या देशात जन्म घेतल्याने अन्य लोकांपेक्षा आपण किती सुदैवी आहोत हाही विचार मनात आल्यावाचून राहत नाही!

-हेरंब ओक

No comments:

Post a Comment

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...