Thursday, November 17, 2011

शब्द : ए ते यु

तम्मत्तद्दो ओ ओ ओ
(कै)त्ता चम्माना आदा नतते दिकादे
तम्मत्तद्दो ओ ओ ओ

अलम हिंदी संगीताच्या दुनियेत हे एकमेव गाणं शिल्लक उरलं असावं किंवा मग सरकारने यच्चयावत सगळ्या गाण्यांवर बंदीची मोहोर उमटवली असून फक्त, फक्त आणि फक्त (ट्रुथ, द होल ट्रुथ अँड नथिंग बट द ट्रुथ किंवा आपल्या हिंदी चित्रपटांच्या कोर्टातल्या सीनमधल्या "सिर्फ सच कहुँगा और सच के सिवा कुछ नही कहुँगा" च्या स्टायलीत) हे एकच गाणं ऐकण्याची (वाचा पुन्हा पुन्हा ऐकण्याची) सक्ती केली असावी अशा थाटात हे गाणं आमच्याकडे वाजतं, वाजत असतं.. म्हणजे इत्त....क्या वेळा वाजत असतं.. अर्थात वर दिल्याप्रमाणे नाही तर नॉर्मल अ-बोबड्या शब्दांत.. त्याचं बोबडेकरण हे अगदी शुध्द होममेड आहे. अर्थात अ‍ॅकॉनने गायलेलं मूळ गाणंही खरं तर बोबड्या शब्दांतच आहे. (आणि कदाचित त्यामुळेच लेकाला ते जवळचं वाटलं असावं... बडबडगीतासारखं).. त्यामुळे ते अजून बोबड्या शब्दांत गायलं तर त्यात काहीच चूक नाही. हवं तर त्याला 'होममेड रिमिक्स व्हर्शन' म्हणू शकतो. अर्थात ते अ‍ॅक्क्याने (कृ. अक्षयकुमारप्रेमींनी गैरसमज करून घेऊ नये.) गायलेलं असल्याने त्याला सगळं माफ आहे. परंतु समजा हेच जर मी (इथे 'मी' हे फक्त उदाहरणादाखल वापरण्यात आलेले सर्वनाम आहे याची समस्त जिज्ञासूंनी कृपया नोंद घ्यावी.) शाळेत हिंदीच्या पेपरात हे असं 'अखियाँ' च्या ऐवजी 'अक्किया' (कृ. अक्षयकुमारप्रेमींनी पुन्हा एकवार गैरसमज करून घेऊ नये.) किंवा मग 'कैसा'च्या ऐवजी 'केस्सा', 'नखरे दिखा' च्या ऐवजी 'नक्रे दिका' आणि 'छम्मकछल्लो' च्या ऐवजी 'चम्मकचल्लो' असं लिहिलं असतं तर फकस्त हिंदीच्याच नाही तर समस्त शिक्षकगणाने मला "धिन मे तारे दिका"वले असते. अर्थात कुठल्या शाळेच्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात 'छम्मकछल्लो' हा शब्द ऑफिशियली वापरला जातो हा मुद्दा तूर्तास गौण आहे.

तर हे असं 'चम्मकचल्लो' वारंवार ऐकून मला माझ्या उमेदीची वर्षं आठवली. 'चित्रपट प्रेक्षक' या नात्याने काढलेली उमेदीची वर्षं.. गोंधळ झाला असल्यास दोन्ही वाक्यं पुन्हा एकदा वाचा.. झालेला गोंधळ शमला असल्यास पुढचं वाक्य वाचा. शमला नसेलच याची खात्री असल्याने तेच वाक्य पुन्हा एकवार व्यवस्थित लिहितो.

"तर हे असं 'चम्मकचल्लो' वारंवार ऐकून मला माझ्या 'चित्रपट प्रेक्षक' या नात्याने काढलेली उमेदीची वर्षं आठवली." हुश्श..

तर तो काळ म्हणजे असा की ज्यावेळी रा. रा. रणजीत (रा. रा. रणजीत हे क... क... किरण प्रमाणे वाचू नये. अन्यथा रा१ बा१ वेळा बघण्याची शिक्षा ठोठावण्यात येईल.), शक्ती कपूर, गुलशन ग्रोव्हर, रझा मुराद, किरण कुमार वगैरे लोक श्रीदेवी, जयाप्रदा (लांब केस असल्याने लहानपणीची माझी आवडती हिरवीण) झालंच तर पूनम धिल्लो, रीना रॉय वगैरे बायांची त्या 'गाव के नदी पे' पाणी भरायला किंवा मग कपडे धुवायला जात असताना वाट अडवायचे आणि तेव्हा त्या छेडछाड प्रकरणाचा श्रीगणेशा व्हायचा तो याच वाक्याने. "हाय रे म्मेरी छम्मकछल्लो." त्यानंतर मग माफक चर्चेनंतर आणि त्या बाईच्या त्या चित्रपटातल्या स्थानानुसार (म्हणजे हिरोची बहिण/प्रेयसी/बायको) 'हिरव्या' ची एन्ट्री किंवा छम्मकछल्लोचा तो क्लासिक डायलॉग उच्चारणार्‍या कुत्त्या/कमिन्याच्या गालावर एक चपराक आणि त्यानंतर बाईचं अपहरण वगैरे गोष्टी घडायच्या. पण असो. तो आपला आजचा मुद्दा नव्हे.

तर 'छम्मकछल्लो' या शब्दाची ओळख मला झाली ती अशी रणजीत, शक्ती कपूर, गुलशन ग्रोव्हर, रझा मुराद, किरण कुमार यांच्या तोंडूनच. अमिताभ, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, गोविंदा, मिथुनदा, संजू बाबा प्रभृतींनी कधीही आपल्या साता जन्माच्या प्रेयसीला छम्मकछल्लो सोडा साधं डार्लिंग/डिअर म्हटल्याचंही स्मरत नाही. गेला बाजार जानू, जान, सनम, दिलबर, जानेमन वगैरेच आणि तेही कटाक्षाने फक्त गाण्यांमध्येच.

तत्कारणात् शाहरुख खानाला त्याच्या बायडीला त्या अलिखित नियमानुसार उपरोल्लेखित साच्यातली हाक न मारता एखाद्या खलनायकाने रस्त्यावरच्या बाईला छेडताना बोलवावं तशा पद्धतीने बोलावताना आणि त्या हाकेला ओ देत त्या बयेने नाचत नाचत पुढे येताना पाहून माझ्यातल्या ऑर्थोडॉक्स प्रेक्षकाला अंमळ कसंसंच झालं आणि सुमारे १२-१५ वर्षांपूर्वीची करीना करिष्मा आठवली. लग्नानंतर करिष्माचं वेगाने गायब होणं आणि त्याच्या जवळपास दुप्पट वेगाने करीनाने पडदा काबीज करणं यामुळे झालंय काय की "त म्हटल्यावर ताकभात" प्रमाणे "क म्हटल्यावर/लिहिल्यावर" आधी करीनाच आठवते (इथे सैफभक्तांच्या किंवा एकताभक्तिणींच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास आम्हास त्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही. एखाद्याला सैफ किंवा/आणि एकता आवडतो/ते हाच खरं तर पुरेसा गुन्हा आहे !!). करिष्मा डोक्यातही येत नाही. असो..

तर या 'चम्मकचल्लो' (शब्दा) च्या सढळ वापरामुळे मला पंधरा एक वर्षांपूर्वी 'खुद्दार' नावाच्या गोंद्याच्या तद्दन टाकाऊ चित्रपटात करिश्माच्या तोंडी असलेलं "सेक्सी सेक्सी सेक्सी मुझे लोग बोले, हाय सेक्सी हॅलो सेक्सी क्यों बोले" वालं गाणं आठवलं. ते गाणं पहिल्यांदा टीव्हीवरच्या 'सुपरहिट मुकाबला' (चित्रहार/छायागीतचं नव्वदीच्या दशकातलं अपग्रेडेड व्हर्शन) नामक कार्यक्रमात ऐकलं आणि धरणीमाय पोटात घेईल तर बरं असे काहीसे भाव अस्मादिकांच्या आणि आमच्या 'चित्रपट-नावडणाऱ्या' पालकांच्या चेहर्‍यावर जवळपास एकाच वेळी दाटले. लगबगीने उठून च्यानेल बदलले गेले हेसांनल. त्यावेळी आमच्या घरात निर्माण झालेलं गोंधळाचं वातावरण जवळपास मुंबईभर किंवा कदाचित देशभरही ("वचने किं दारिद्रता" च्यायला) पसरलं असावं. कारण दोनच दिवसांनी चित्रहाराच्या कार्यक्रमात ते गाणं चक्क असं वाजलं होतं.

"__ __ __ मुझे लोग बोले
हाय __ हॅलो __ क्यों बोले"

त्यानंतर काही दिवसांतच 'सेक्सी'चं सोवळेकरण करून गाळलेल्या जागा भरत तिथे चतुराईने 'बेबी' शब्दप्रयोगाचा चपखल वापर करून मोठ्या खुबीने तेच गाणं पुन्हा "बेबी बेबी बेबी मुझे लोग बोले" करत राजरोसपणे वाजायला लागलं आणि तमाम 'सेक्सी' प्रकरणावर पडदा पडला. त्याच्यानंतर काही दिवसांनी/महिन्यांनी घडलेली गोष्ट असेल. 'दुलारा' नामक असल्याच लक्षातही ठेवण्याची लायकी नसलेल्या चित्रपटात "मेरी पेँट भी सेक्सी, मेरा शर्ट भी सेक्सी" असं करत करत शेवटी रुमालावर घसरत म्हणजे "रुमालभी सेक्सी है" असं जाहीर करत अचानक गोंद्या उड्या मारताना दिसला. त्याच्या त्या तथाकथित सेक्सी कपड्यांचं ('गोविंदाचे कपडे' आणि 'सेक्सी' हे दोन शब्द एकाच वाक्यात येणे यासारखं विरोधाभासाचं दुसरं उदाहरण नसेल !!) उड्या मारत केलेलं मार्केटिंग त्यानंतर काही दिवस चालू होतं. परंतु तेव्हा त्या गाण्यावर कोणी विशेष आक्षेप घेतल्याचं स्मरत नाही. कदाचित मुलीने स्वतःला सेक्सी म्हण(व)णं आणि मुलाने आपले कपडे सेक्सी आहेत हे तारस्वरात जाहीर करणं यातला दुसरा पर्याय सरकार/सेन्सॉरला कमी निर्लज्ज वाटला असावा.

अर्थात "काय सेक्सी झालीये पावभाजी" किंवा "कसली सेक्सी बाईक आहे यार तुझी" च्या काळात वर सांगितलेलं हे सगळं सेक्सीपुराण म्हणजे निव्वळ चर्वितचर्वण वाटण्याचाच संभव अधिक आहे.. आणि तसंही हे चर्वितचर्वणच आहे. कुठे काही मुद्दा तरी आहे का? उगाच या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारणं तर चाललंय. असो.

'छम्मकछल्लो' च्या पॉझिटीव्ह (चित्रपटात स्वतःच्याच बायकोला उद्देशून असल्याने पॉझिटीव्ह) वापरामुळे आणि वय वर्षं अडीच ते वय वर्षं कितीही या सर्वांनी अगदी आवडीने डोक्यावर घेतल्याने असाच अडगळीत पडलेला किंवा निगेटीव्ह (वरच्या कंसाच्या विरुद्ध) अर्थाने वापरल्या जाणार्‍या 'आयटम' या शब्दास सोन्याचे दिवस येण्याची शक्यता आम्ही आत्ताच वर्तवून ठेवत आहोत. आणि करीनाने 'छम्मकछल्लो' केल्याने कतरीना 'आयटम' शब्द असलेलं आयटम सॉंग करणार हे जवळपास नक्की आहे !! कदाचित 'दुःशासन : The Dusha's-Son' किंवा मग "कंस : The Con's Story" असल्या एखाद्या नावाच्या चित्रपटात विवेक मुश्रान किंवा शरद कपूर किंवा मग गेला बाजार चंद्रचूड सिंग असल्या एखाद्या दुसरं कुठलंही काम नसणार्‍या महामख्ख चेहऱ्याच्या निरुपद्रवी इसमाला 'Dusha's-Son' किंवा 'The Con' म्हणून आपल्यासमोर उभं करून सल्लू किंवा हृतिक किंवा आमीर 'किसन : The Key-Son' म्हणून आपल्यापुढे उभे ठाकतील. थोडक्यात 'छम्मकछल्लो' च्या अचानक वाट्याला आलेल्या अमाप लोकप्रियतेमुळे त्याच्या धाकट्या भावंडाला (की भगिनीला?) उर्फ 'आयटम' ला मरण नाही हे निश्चित आणि कदाचित आयटमच्या मागोमाग 'माल' आणि तत्सम शब्दही या भल्यामोठ्या यादीत असतील !!!

अनेक वर्षांपूर्वी निळूभौंच्या मराठी सिनेमात एका स्त्रीवर झालेल्या अतिप्रसंगाबद्दल बोलताना फक्त 'भानगड' असा काहीतरी शब्द वापरून त्या प्रसंगाचं वर्णन केलं गेलं होतं. त्यानंतरही कित्येक वर्षं जबरदस्ती, बळजबरी असे तुलनेने अहिंसक (वर्णनाच्या दृष्टीने अहिंसक) शब्द वापरण्याचा अलिखित नियम होता. एखादा निवडक 'ए' प्रमाणपत्र असलेला हिंदी चित्रपट आला तर त्यात चुकून 'बलात्कार' हा शब्द ओझरता निघून जायचा. जेमतेम वीस वर्षात चित्रपटांच्या भाषेची, दिग्दर्शकांच्या अकलेची आणि प्रेक्षकांच्या संवेदनशीलतेची एवढी 'प्रगती' झाली की एके काळी दबून हलक्या आवाजात उच्चारला जाणारा शब्द 'चमत्कार' ला प्रतिशब्द म्हणून वापरला गेला आणि तो तशा पद्धतीने वापरला गेल्याने जणु त्याची तीव्रता कमी होत असावी अशा प्रकारे त्या शब्दावर विनोद करून पोट धरून हसण्यापर्यंत या प्रगतीच्या कक्षा रुंदावल्या !!!

खरं तर हेलन, बिंदु, अरुणा इराणी वगैरे बायका म्हणजे आद्य आयटम गर्ल्स. एखाद्या क्लबात कॅबरे वगैरे करणं हे त्यांचं चित्रपटातलं प्रमुख काम. कारण आशा पारेख, शर्मिला टागोर, हेमामालिनी, साधना, बबिता, नूतन वगैरे बायांनी असलं काही करणं हे कमीपणाचं किंवा अशोभनीय समजलं जायचं. पण आता करीना, प्रियांका, कतरिना वगैरेंसारख्या मेन हिरविणीच हे काम आनंदाने आणि प्रसंगी मुद्दाम मागून घेऊन करायला लागल्याने राखी सावंत, इत्यादींसारख्या फुलटाईम आयटम-गर्ल्सवर भुकेकंगाल होण्याची वेळ आली आणि त्यांना एकतर बाष्कळ बडबड करून, बेगडी स्वयंवरं रचून आणि टुक्कार न्यायालयांचे तमाशे मांडावे लागले किंवा मग भुक्कड टीव्ही मालिकांमध्ये भडक काजळं लावून भोळ्याभाबड्या, सहनशील नायिकेच्या नवऱ्यांना पटवण्याची कामं इमानेतबारे करावी लागली.

असो.. खरंतर हाही विषय नव्हताच आजचा. तसं म्हटलं तर कुठलाच नव्हता किंवा कोणाबद्दल कसली काही तक्रारही नाही. कारण सिनेमा हे जात्याच एवढं बदलतं माध्यम असल्याने हे कधीनाकधी तरी होणार होतंच.. पण तरीही 'चम्मकचल्लो' मुळे चित्रपटांमधल्या बदलत्या भाषेचा प्रवास सहज जाणवून गेला आणि तो थोडाफार इथे मांडला. अर्थात ही पोस्ट म्हणजे काही तो प्रवास मांडण्याचा वगैरेही काही प्रयत्न नव्हता कारण तो समग्र प्रवास मांडण्यासाठी खूपच विस्तृतपणे लिहावं लागेल. हा लेख म्हणजे फार तर फार काही निवडक किंवा एके काळी वाळीत असलेल्या किंवा सभ्य नायकाने चारचौघात वापरण्यावर बंदी असलेल्या शब्दांचा 'ए' पासून 'यु' पर्यंतचा प्रवास असं म्हणू शकतो जास्तीत जास्त आणि मुख्य म्हणजे 'दिल्लीच्या गुरगुरणाऱ्या पोटा' कडे पाहता/ऐकता ही म्हणजे त्या प्रवासाची फक्त, फक्त आणि फक्त सुरुवात आहे असंच केवळ आपण म्हणू शकतो !!

19 comments:

  1. पेटंट हेरंब स्टाईल पोस्ट ... कंसधारी हेरंब ऑलवेज रॉक्स ... :)
    ए ते यु चा प्रवास अगदी खुसखुशीतपणे मांडलास...
    पण थोडीशी निराशा झाली कारण सुरुवात वाचून पोस्ट युवराज आदितेयांवर असेल अस वाटल होत....

    "तम्मत्तद्दो ओ ओ ओ
    (कै)त्ता चम्माना आदा नतते दिकादे
    तम्मत्तद्दो ओ ओ ओ...." अस बोलणारी महापराक्रमी युवराजांची मूर्ती डोळ्यासमोरून हलत नव्हती पोस्ट वाचतांना ... :)

    ReplyDelete
  2. आदिमहाराजांचा आणि त्यांच्या "तम्मत्तद्दो" अभंगाचा विजय असो.

    एकदम जबरी. ही पोस्ट म्हणजे विस्मरणात गेलेल्या व्यक्तींना (विवेक मुश्रान, शरद कपूर (हा कोण?), चंद्रचूड सिंग) एक हलकिशी (अप)मानवंदनाच म्हणायची.

    अवांतर - मध्यंतरी वटवट अ.आ.मोडमध्ये असल्याने जर का आदिमहाराजांच्या शीला आणि मुन्नी ह्या अभंगांचा जनतेला लाभ घेता आला नसेल तर ते अभंग जनहितार्थ त्वरित उपलब्ध करून द्यावेत. आणि हो, अश्याच भराभर पोस्ट लिहीत रहा नाहीतर आदिमहाराज रा१ ची ५१ पारायणे करायला लावतील.

    ReplyDelete
  3. छम्मक-छल्लोचे आद्य गुरु श्री.श्री. ढाई किलो का हाथ मिस्टर सनी देवल आहेत.. अन छम्मक छल्लो करीश्मा कपूर...

    http://www.youtube.com/watch?v=ulwGYiluVvk

    :-)

    ReplyDelete
  4. जबरदस्त लेख... सेक्सी शब्दाचं शुद्धिकरण हा खरंच भारतीय सिनेइतिहासातला माईलस्टोन आहे! ;)

    ReplyDelete
  5. >>>>जेमतेम वीस वर्षात चित्रपटांच्या भाषेची, दिग्दर्शकांच्या अकलेची आणि प्रेक्षकांच्या संवेदनशीलतेची एवढी 'प्रगती' झाली की एके काळी दबून हलक्या आवाजात उच्चारला जाणारा शब्द 'चमत्कार' ला प्रतिशब्द म्हणून वापरला गेला आणि तो तशा पद्धतीने वापरला गेल्याने जणु त्याची तीव्रता कमी होत असावी अशा प्रकारे त्या शब्दावर विनोद करून पोट धरून हसण्यापर्यंत या प्रगतीच्या कक्षा रुंदावल्या ...........
    चाबूक आणि आसूड वाक्य आहे हे हेरंबा!!!!!

    पोस्टचा विषय तू बोललाच होतास आधि... त्यानूसार ही एक तुझ्या स्टाईलची सुंदर पोस्ट असणार हे माहित होते आणि तसेच ते आहेही!!! शब्द शब्दावर आणि वाक्यावाक्यांवर कोट्या नेहेमीप्रमाणे.... का कोण जाणे पण अंतर्मुख होऊन विचारात पडलेय तुझ्या पोस्टमूळे... ए ते यू ही प्रगती की अधोगती??

    सिद्धार्थ ’अभंग’ हा शब्द जो काही तू वापरला आहेस नं त्याबद्दल तूला स्टॅंडिंग ओवीएशन :)

    आणि पत्रेबूवा अहो तुमचे स्पेशल आभार... किती दिवसानी सनीपाजीला ’नाचताना’ ;) पाहिले हो...

    ReplyDelete
  6. हेरंब, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी योग्य विषयाला नेमक्या वेळी तू हातात घेतलंस आणि तुझ्या टिपीकल शैलीत खरपूस समाचार घेतलास त्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन....:)

    आणखी एक सिद्धोबा तुझ्या फ़र्माईशी फ़िल्मि अभंगो के कार्यक्रम हो हमारा साष्टांग दंडवत...कुठून सुचतं रे याला.....:)

    ReplyDelete
  7. चालायचंच रे... परिवर्तन संसार का नियम हैं असले काहीतरी माझी आई सांगायची, आणि हा नियम चित्रपटांनाही लागू होतो. चित्रपटांची भाषा सातत्याने बदलत आहे. ’प्रिये-प्राणेश्वरी’चे ४०-५० चे चित्रपट बघणार्‍यांना जान-ए-मन, गुलबदन वगैरे शब्द पचले नव्हते.. ’जवानी जान-ए-मन’ म्हणजे कानावर हात !!

    ’सेक्सी’ वरुन असलाच एक शब्द आठवला ’डार्लिंग’.. गाण्याच्या भेंड्या खेळतांना " रुक रुक रुक, अरे बाबा रुक..." गाण्यातला "डार्लिंग" शब्दाला आपोआप सायलेन्ट केले जायचे लहानपणी. :D

    लेख भन्नाट !!! जाम आवडला !! आदितेयचे तम्मत्तद्दो काय आहे ते आधी कळलेच नव्हते. :P

    जाता-जाता : जुन्या चित्रपटांत दाखवल्याप्रमाणे "छम्मकछल्लो" हा शब्द गावातल्या मवाल्यांनी ,eve-teasers, वगैरेंनी वापरायचा शब्द होता. त्याचा अर्थ पण चांगला नाही. "छम्मकछल्लो" म्हणजे काही ’सभ्य स्त्री’ (lady) करता वापरायचा शब्द नव्हता.पण आता....असो.. काळानुसार शब्दांचे अर्थसुद्धा बदलतात किंवा बदलले जातात.

    ReplyDelete
  8. हेहेहे.. धन्स धन्स देवेन..

    >> पण थोडीशी निराशा झाली कारण सुरुवात वाचून पोस्ट युवराज आदितेयांवर असेल अस वाटल होत....

    हाहाहा.. अशा प्रकारची प्रतिक्रिया मला अपेक्षितच होती :) पण ते असंच बोबडं दिलंय. उगाच. टीआरपी वाढवायला.. आवरा !!! :P

    अरे त्याचं प्रचंड आवडतं गाणं आहे हे. सत्तत ते आणि तेवढंच ऐकायचं असतं फक्त !

    ReplyDelete
  9. >>"तम्मत्तद्दो" अभंग !!!

    अशक्य महान ! :))))

    अरे शरद कपूर म्हणजे 'जोश' मधला शाहरुखचा प्रतिस्पर्धी.. किंवा मग.........

    जाऊदे.. अजून काही बोलण्यासारखं किंवा लक्षात ठेवण्याजोगं नाहीये त्याच्याबद्दल !

    अ. आ. मोड?? ह्ये काय आनी?

    हाहा.. होईल तेवढं समग्र वांङमय उपलब्ध करून देण्याचा मानस आहेच.. बघू कसं जमतं :)

    ReplyDelete
  10. आप्पासाहेब, आपण महान आहात. असलं काही गाणं अस्तित्वात आहे हे मी विसरूनही गेलो होतो.

    Thanks for the correct credits :P

    ReplyDelete
  11. हाहा.. धन्स विभि.. खरंच आपल्याकडे भावना दुखावल्याच्या नावाखाली काहीही बदल घडू शकतात !

    ReplyDelete
  12. धन्स तन्वी.. असे अनेक मठ्ठ प्रकार आपण विनोदाच्या नावावर खपवून घेत असतो. जे माझ्या मते पूर्णतः असंवेदनशील आहे.. असो.

    >> ए ते यू ही प्रगती की अधोगती??

    कळीचा प्रश्न आहे. पण बदलतं जग/सिनेमा/भाषा/व्याख्या पाहता याला प्रगती किंवा अधोगती असं काळं किंवा पांढरं अशा एकाच रंगात रंगवता येणं अवघड आहे. थोडक्यात, अवघड आहे हा प्रश्न :)

    ReplyDelete
  13. धन्यवाद अपर्णा. पण तू पूर्ण प्रतिक्रिया दिली नाहीस :)

    ReplyDelete
  14. खरं आहे संकेत. प्रिये-प्राणेश्वरी ते छम्मकछल्लो व्हाया जवानी जान-ए-मन असा प्रवास अवघड नक्कीच. आनी प्रत्येक जुन्या पिढीला पुढच्या पिढीतला शब्द उच्चारताना जेवढं अवघड जातं तितकीच नवीन पिढी "छ्या.. त्यात काय एवढं?" एवढ्या सहजतेने ते शब्द वापरते.

    हो मला 'छम्मकछल्लो' चा अर्थ माहित्ये. त्यामुळेच ते गाणं पहिल्यांदा ऐकल्यापासूनच हा लेख मनातल्या मनात तयार हॉट होता.

    ReplyDelete
  15. >> अ. आ. मोड?? ह्ये काय आनी?

    बावा, ह्यो तुझ्याच 'आशु' पोस्टमधलो शब्दशोध असा

    अआ = अत्यंत आळशी

    ReplyDelete
  16. >> बावा, ह्यो तुझ्याच 'आशु' पोस्टमधलो शब्दशोध असा

    हाहाहा.. आयला खरंच की.. लक्षात ठेवण्याच्या आळसापायी विसरलो ;)

    ReplyDelete
  17. मस्त मस्त मस्त !! खूप दिवसांनी ब्लॉगवर आले आणि मस्त ‘हेरंबी’ लेख वाचायला मिळाला.
    @ संकेत - आम्ही पण ‘रूक रूक’ गाणं असंच म्हणायचो.

    ReplyDelete
  18. धन्यवाद धन्यवाद प्रज्ञा..

    >> ‘हेरंबी’ लेख

    हाहाहा.. आवडलं :)

    ReplyDelete
  19. Hey keep posting such good and meaningful articles.

    ReplyDelete

ब्रिटनच्या डोळ्यांत इस्लाम 'प्रेमा' चं झणझणीत अंजन घालणारा डग्लस मरे

गेल्या आठवड्यात डग्लस मरे ( Douglas Murray) या ब्रिटिश लेखकाचं ' द स्ट्रेंज डेथ ऑफ युरोप ' (The Strange Death of Europe) हे पुस्तक व...