Monday, August 8, 2011

तिसरा

काल ना आम्ही त्या चित्रांच्या दुकानात गेलो होतो. बाबाला उशीर झाला यायला. तो ना असलाच आहे. नेहमीच उशीर करतो कुठेही यायला. आणि मग नेहमीच मला त्याचा राग येतो. पण काल नाही आला. कारण त्या दुकानातली ती मस्त मस्त चित्रं बघण्यात वेळ कसा गेला कळलंच नाही. मी खूप चित्रं बघितली पण मला सगळ्यात आवडलं ते एका छान छोटुल्या चिंटुकलीचं चित्र. काय बरं म्हणाली आई?? पो स ट र.. हां.. असंच काहीतरी.. तर ना त्या चिंटुकलीचे ना डोळे मोठ्ठे होते एकदम आणि टकलूही होती ती.. आणि गुलाबी गाल होते आणि तेही एवढे मोठे नि गुबगुबीत की आता खालीच पडतात की काय असं वाटत होतं. आई म्हणाली की मीही अशीच टकलू होते म्हणून. मग आम्ही दोघी खूप हसलो.

मी आईला म्हटलं की आपण हेच चित्र घ्यायचं विकत. आई काही बोललीच नाही. मला वाटलं तिला ऐकू आलं नसणार म्हणून मी पुन्हा सांगणार होते पण मग तेवढ्यात मला चिप्रा म्हणते ते आठवलं. चिप्रा म्हणते मोठ्या लोकांना आपल्या म्हणण्याकडे दुर्लच्च करायचं असलं की ते असं न ऐकल्यासारखं दाखवतात. तेवढ्यात बाबा आला. मग मी बाबालाही म्हंटलं की आपण या छोटुल्या चिंटुकलीचंच चित्र विकत घेऊ. तर बाबा एकदम चिडलाच. आई म्हणते तसं तो ऑफिसमधल्या कामामुळे चिडचिड करतोय असं मला वाटल्याने मी गप्प बसले. मग जरा वेळाने पुन्हा एकदा त्याला तेच चित्र घेण्याचा हट्ट केला तर एकदम मला म्हणाला कसले ग अभद्र हट्ट करतेस. मला अभद्रचा अर्थ कळलाच नाही. उद्या चिप्रालाच विचारावा लागणार. पण बाबा ओरडून म्हणाला त्याअर्थी काही चांगला अर्थ नसणार हे नक्की.

शेवटी आम्ही एका निळी टोपी घातलेल्या गुबगुबीत बाळाचं चित्र घेऊन घरी आलो.

***

चिप्रा माझी खूप चांगली मैत्रीण आहे पण मला कधीकधी मात्र तिचा खुपच राग येतो. आज शाळेत तिला अभद्रचा अर्थ विचारला तर फिस्सकन हसली त्या घाटपांडे आजींच्या मांजरीसारखी. पण नंतर लगेच अर्थ सांगितलाही. म्हंटलं ना मी ती चांगली मुलगी आहे आणि माझी चांगली मैत्रीणही आहे पण कधी कधी मात्र रागच येतो. अतीच आगाऊपणा करते कधीकधी.. शेता म्हणते की चिप्राला तो लहान भाऊ आहे ना म्हणून जास्त आगाऊपणा करते. पण त्याचा अर्थ मला तरी कळला नाही. तसं तर त्या भावीलाही आहे की लहान बहिण पण ती कुठे असा शहाणपणा करते.. शेताचं आपलं काहीतरीच.

***

"काय बघत्येस? शाळेत नाही का जायचं? उशीर होतोय. आत्ता दहा मिनिटांत येईल स्कूल बस.. आवर ग पटपट.."

खरं तर मला ती गुलाबी चिंटुकली खूप आवडली होती पण आता हे निळी टोपीवालं गुबगुबीत बाळही हळूहळू आवडायला लागलंय. नुसतं त्याच्याकडे बघत रहावसं वाटतं. चिंटुकलीएवढे नसले तरी त्याचेही गाल मस्त गुबगुबीत आहेत. आवडले मला.

"अग जेमतेम सहा वर्षांची तू आणि आरसे कसले बघतेस? आवर ग बाळा फटफट. बस येईल आता"

ही आई पण ना मॅडकॅपच आहे. मी त्या गुबगुबीत चिंटूच्या चित्राकडे बघतेय तर हिला वाटतंय आरश्यात बघतेय. पण मी काही बोललेच नाही. कारण मग ती पुन्हा मलाच ओरडली असती आणि मग पुन्हा तिची ती डोकेदुखी, उलट्या वगैरे सुरु झालं असतं... शी.. त्यापेक्षा नकोच ते... म्हणून मग मी पुन्हा एकदा हळूच त्या चिंटूला टाटा केला आणि लगेच बुट घालायला घेतले.

***

माझा हात पुरत नव्हता म्हणून मग आजीने मला उचलून घेतलं आणि घंटा वाजवायला दिली. चिप्राची आजी खूप छान आहे. नेहमी छान हसत असते बोलताना. आज आईला बरं नव्हतं आणि बाबाला उशीर होणार होता. मला तर घरात बसून अस्सा कंटाळा यायला लागला होता ना. तेवढ्यात चिप्रा आली विचारायला की देवळात येतेस का म्हणून. मी तर काय लगेच तयार झाले. चिप्राची आजी बरोबर येणार होती म्हणून मग आईनेही मला पाठवायला जास्त कटकट केली नाही.

नंतर आजीने चिप्रालाही उचलून घेतलं आणि घंटा वाजवायला दिली. मग आम्ही गणपती बाप्पाला नमस्कार केला आणि प्रदच्चिणा घातली.

मग मी आई म्हणते तशी मला चांगली बुद्धी दे असं बाप्पाला सांगितलं. आणि मग हळूच आईला आणि बाबालाही चांगली बुद्धी दे असंही सांगितलं. ते नेहमी मलाच मागायला सांगतात स्वतःसाठी मागतच नाहीत. म्हणून मी ते नसतात तेव्हा हळूच त्यांच्यासाठीही चांगली बुद्धी मागून घेते. बाप्पा ऐकतो की नाही माहित नाही. नसावा ऐकत.

मग मी हळूच ती गुलाबी गालांची चिंटुकली आमच्या घरात येउदे असंही मागितलं. आणि नंतर चिप्रासारखाच मलाही लहान भाऊ दे असंही मागितलं. बरंय चिप्राचा आगाऊपणा तरी जरा कमी होईल.

***

आज आमच्या शाळेत कसलीतरी मोठ्या लोकांची मिन्टीग होती. त्यामुळे शाळा चक्क मधल्या सुट्टीतच सोडून दिली आणि प्रत्येकाला अगदी घरापर्यंत स्कूलबसने सोडलं. नेहमीसारखं त्या जवळच्या चौकात नाही. त्यामुळे मजा आली. दार वाजवलं तर चक्क चक्क बाबाने दार उघडलं. बाSSS बाSSS ?? आज लवकर घरी? मला खूप मस्त वाटलं एकदम. आज त्याचे डोळे लालही नव्हते. संध्याकाळी बाग आणि मग भेळपुरी असं काय काय ठरवायला लागले मी मनातल्या मनात. तेवढ्यात माझं समोर लक्ष गेलं. एक आजोबा बसले होते समोर. म्हणजे खूप म्हातारे नव्हते. पण टक्कल होतं. पांढरा झब्बा आणि लेंगा घातला होता आणि कपाळाला मोठा अंगारा... उमम्म.. अंगारा नाही गंध गंध.. आजीने सांगितलाय मला गंध आणि अंगार्‍यातला फरक.

"बेटा, हे आहेत अण्णा महाराज.. यांना नमस्कार कर बरं" बाबा म्हणाला.

मी नमस्कार केल्यावर त्यांनी मला जवळ घेतलं आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला. आणि माझ्या कपाळाला त्यांनी लावलेलं तसंच गंधही लावलं. आई, बाबा आणि आजी तिघांच्याही कपाळाला असंच गंध होतं. आत्ता लक्ष गेलं माझं. मग आई मला किचनमधे घेऊन गेली आणि चिवडा आणि बिस्किटं खायला दिली आणि मी लवकर कशी आले हे ही विचारलं. मग मी ते मिन्टीगचं तिला सांगितलं.. ती फक्त हम्म म्हणाली. चिवडा खाऊन झाल्यावर मी बाहेर आले तर बाबा म्हणाला की तू चिप्राकडे जा खेळायला. मला मुळीच जायचं नव्हतं तिच्याकडे. मी फक्त आईकडे बघितलं. मग आई म्हणाली की राहुदे. तिला खेळूदे बेडरूममधे.. बाबा खरं तर तयारच नव्हता मग त्या महाराजांनी हसून फक्त हातानेच "चालेल" अशी खुण केली. मग मी बेडरूममधे जाऊन एकटीच भातुकली खेळत बसले. आधी आवडले नव्हते ते महाराज पण त्यांच्यामुळे मला चिप्राकडे जायला लागलं नाही त्यामुळे बरं वाटलं.

बाबा चक्क कोणाचंतरी ऐकतोय हे पाहून तर मला एकदम मज्जा वाटली.

***

आधी तर मला हसायलाच आलं होतं. ही चिप्रा ना कधीकधी ज्याम मॅडकॅपसारखी बोलते. आधी म्हणाली अपत्य म्हणजे संकट. मला तरी काही ते पटलं नाही. मी तिला म्हंटलंही की अग अपत्य म्हणजे संकट कसं असेल? तिला पटेना म्हणून मग ते महाराज आजोबा म्हणाले ते तिला पुन्हा सांगितलं. तिसरं अपत्य मुलगा... आता अपत्य म्हणजे संकट असेल तर "तिसरं संकट मुलगा" असं होतं ना.. आणि ते महाराज आजोबा असं काहीतरी कशाला बरं बोलतील? अर्थ काय त्या वाक्याचा? तर ती म्हणाली की तू आतमधे होतीस तुला नीट ऐकू आलं नसेल. मी तिला पुन्हा एकदा सांगितलं की मी मला सगळं नीट ऐकू नाही आलं कबुल.. पण तिसरं अपत्य मुलगा हे तीन शब्द मात्र मी नक्की ऐकले. पण तरीही तिचं पादुपल चालूच.. मग जरा वेळ थांबली आणि मग मात्र एकदम जीभ चावून पटकन म्हणाली की अग नाही.. आत्ता आठवलं. संकट म्हणजे अपत्य नाही संकट म्हणजे आपत्ती.. तिच्या पपांनी एकदा बातम्या बघताना सांगितलं होतं म्हणाली. पण अपत्य म्हणजे नक्की काय हे तिलाही माहीत नव्हतं. तिलाही माहित नसणार हे मला माहित होतंच. माहित नाहीये तर सरळ कबुल करायचं ना पण आगाऊपणा करण्याची सवय..

नंतर स्वतःच विचारायला लागली की म्हणे नक्की काय बोलत होते ग ते महाराज आजोबा? काय अर्थ असेल त्याचा? तू अजून काही ऐकलंस का?..... आता हिला खरं तर काय गरज आहे मध्ये मध्ये नाक खुपसायची... त्यामुळे मी ऐकलं होतं तरी मी सरळ नाही म्हणाले. तरीही ती मागे लागली तेव्हा मग मीही जास्त नाटकं न करता जे मी अजून ऐकलं होतं तेही तिला सांगितलं. अगदी नक्की ना? खरं ना? असं कायतरी बाबा आणि आजी विचारत होते ते तिला सांगितलं. आजोबा महाराजांचं अस्पष्ट ऐकू आलेलं बोलणंही सांगितलं.. माझ्यावर विश्वास नाही का?.... आणि सहा आठवडे म्हणजे तर काहीच पॉबेम नाही. घाबरू नका... पुढचा तीन नंबरचा....

मला माहिती होतं तसंच झालं. तिलाही यातल्या एकाही शब्दाचा अर्थ माहित नव्हता. हां तसं म्हणजे आमच्या वर्गात एक नेहा विश्वास परब नावाची मुलगी आहे त्यामुळे विश्वास हे नाव आहे एवढं आम्हाला माहित होतं. कदाचित महाराज आजोबांचं खरं नाव विश्वास असेल. पण ते पॉबेम म्हणजे काय हे तर आम्हाला दोघींनाही काहीच कळलं नाही. तो शब्द तसा ऐकला होता मी. पण बाबा वैतागला असला की तो शब्द वापरतो पण त्यावेळी त्याला त्याचा अर्थ विचारायचा म्हणजे संपलंच...

***

आज बरोब्बर चौथा दिवस. घरात कोणीच कोणाशी बोलत नाहीये. निदान आई तरी कोणाशीच नाही बोलते.. सारखी बेडरूममधे बसून आहे. काल तर चक्क डोळे पुसत होती. मी बघितलं एकदा. जाऊन विचारलंही की काय होतंय? तर म्हणाली की काही नाही. असंच थोडं पोटात दुखतंय. पण बरोबरे.. मलाही एकदा पोटात दुखत होतं ना तर तेव्हा मी खूप रडले होते. रात्री आई आणि आजीने रव्याने की ओव्याने कशाने तरी पोट शेकल्यावर थोडं बरं वाटलं होतं. म्हणून मग मी आईला विचारलं सुद्धा की आपण रव्याने तुझं पोट शेकुया का? तर किंचित हसली आणि नाही म्हणाली. काय झालंय आईला कळत नाही. खरं तर गेले चार दिवस तिची तब्येत बरी आहे. उलट्या नाही, डोकं दुखत नाहीये. पण तरीही झोपून आहे. कशामुळे पोट दुखतंय काय माहित. बाबा तर अजूनच उशिरा आला आज. नेहमीपेक्षाही खूप. आजीशी काहीतरी हळू आवाजात बोलला. आई झोपलेलीच होती. आणि आईच्या बाजूला मी. तो बाहेर टीव्ही लावून बसला.

पहिल्या दिवशी शाळा बुडवताना मज्जा आली एकदम. पण आता चार दिवस घरात बसून मला कंटाळा आलाय. परवा आईला डॉक्टरकाकांकडे जायचं होतं. कुठेतरी लांब आहे त्यांचा दवाखाना. खूप वेळ लागणार होता तपासायला. म्हणून मग माझी तयारी करायला, मला डबा द्यायला कोणालाच वेळ नव्हता. म्हणून मग मला दांडी मारायला मिळाली. आई आली ती थेट संध्याकाळी.. आणि चक्क बाबाही होता तिच्याबरोबर. सकाळी जाताना तर एकटीच गेली होती. तर तेव्हा आली आणि जी बेडरूममधे जाऊन झोपली ती झोपलीच. अशीच वागतेय. आणि मला मात्र कधी एखाद्या दिवशी जरा लोळायचं असलं किंवा उशिरा उठायचं असलं की मला मात्र लगेच आळशी म्हणून मोकळे हे लोक. आता कोण आळशीपणा करतंय बघा..

आठ दिवसांनी शाळेत गेले तरी मला कोणी काही म्हणालं नाही की कुठल्या बाई काही ओरडल्या नाहीत. बाबा आला होता सोडायला. तो मुख्यबाईंशीही बोलला काहीतरी.

***

हळूहळू आईला बरं वाटलं. बेडरूममधून बाहेरही पडली एकदाची. आईला किचनमधे बघून बरं वाटलं. आजी तर म्हणतेच की.. की बाईची जागा सैपाकघरात. आजी म्हणते ते अगदी खरं आहे. मलाही पटलं ते. कारण त्या बेडरूममधून बाहेर पडल्यापासून आई पुन्हा नेहमीप्रमाणे माझी तयारी करायला लागली, मला आंघोळ घालायला लागली, माझी पोनी घालायला लागली, मला डबा द्यायला लागली. तिमाही परीक्षेच्यानंतरचे ते चार दिवस सोडले तर आत्तापर्यंत म्हणजे वार्षिक परीक्षेपर्यंत मी एकही दांडी मारली नाहीये. चिप्राने तीनदा मारली आणि भावीने तर चारदा. आता मी महिनाभर मीनामावशीकडे जाणार आहे राहायला. औरंगाबादला. मीनामावशी, श्रीकाका दोघेही एकदम मस्त आहेत. आणि भक्की तर माझी एकदम चांगली बहिण आहे. नाही बहिण नाही.. मैत्रीण मैत्रीण.. बहिण नाही आवडत मला. मैत्रीणच. मी आणि भक्की आता खूप खेळणार.. त्यांच्याकडे जम्पी आहे. मस्त घरभर धावत असतो, उड्या मारत असतो. हातातलं बिस्कीट ओढून घेतो आणि मटकन खाऊन टाकतो आणि मग हळूच हात चाटतो. भक्की, जम्पी आणि मी.. एकदम मज्जा..

***

मला वाटतं माझ्या आईइतकं कोणपण आजारी पडत नसेल. सारखं डॉक्टर डॉक्टर.. आज पुन्हा जायचं आहे डॉक्टरांकडे.. मला भीती वाटतेय की पुन्हा गेल्या वर्षीसारखी सलग आठ दिवस हे लोक माझी शाळा बुडवतात की काय.

पण आज गंमतच झाली. आज मी शाळेतून घरी आले तेव्हा आई-बाबा अजून डॉक्टरांकडून यायचे होते. मला वाटलं आल्यावर आई आता पुन्हा बेडरूममधे झोपून राहणार. पण उलटंच झालं. आई-बाबा आले ते हसतहसतच. बाबाच्या हातात पेढ्यांचा पुडा होता. तोंड गोड करायला आणलेत असं म्हणत होता तो. आजीसुद्धा एकदम खुश होती. आईही हसत होती थोडी पण नीट कळत नव्हतं तिचं वागणं. मला ना आई आणि चिप्रा शेम वाटतात कधीकधी. कधी नीट वागतात तर कधी एकदम वेगळ्या. चिप्रा हुशार पण आहे आणि येड्चाप पण.. आईही कधी कधी येड्चाप सारखीच वागते म्हणा. आत्ताच बघा ना. मध्येच हसतेय. मध्येच एकदम शांत होतेय. आजीने मला पेढा भरवला आणि मग आई-बाबांच्या खोलीत जाऊन त्या निळी टोपीवाल्या बाळाच्या चित्राचे खूप पापे घ्यायला लागली.

बाबाने पटकन फोन केला आणि कोणाशीतरी काहीतरी बोलला. फोन ठेवल्यावर म्हणाला उद्या येतायत.

***

दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठले तर बाबा म्हणाला की आज शाळेत जायचं नाहीये. मी काही बोललेच नाही कारण का विचारलं तरी कोणी काही सांगतच नाही आमच्या घरात. बाबाही आज ऑफिसला जाणार नव्हता बहुतेक. सगळे आंघोळी करून, नवीन कपडे घालून बसले. कोणाची तरी वाट बघत होते बहुतेक. आजीची दुपारची सिरीयल सुरु होणार तेवढ्यात बेल वाजली. बाबाने धावत जाऊन दार उघडलं आणि एकदम आडवाच पडला. मला तर काय कळलंच नाही काय झालं. बघते तर दारात ते महाराज आजोबा आणि ते आत येतायत न् येतायत तोवर बाबाने त्यांना साशांग नमस्कार घातलेला. आजीनेही तसंच केलं. बाबाने आईला खुण केली. आईनेही नमस्कार केला आणि मलाही करायला लावला. महाराज आजोबा सोफ्यावर बसले आणि आम्ही सगळे खाली. गेल्यावेळसारखं आज मला या लोकांनी बेडरूममधेही पाठवलं नाही. पण मला तिकडे बसायचा जाम कंटाळा आला होता म्हणून मग मी मांडीवर बार्बी घेऊन तिला झोपवायला लागले.

बाबा सारखा चमत्कार झाला असं काहीतरी म्हणत होता. सारखा आजोबांच्या पाया पडत होता. आणि आजीच्या तर डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. हे मोठे लोक नक्की कशासाठी रडतात तेच मला कळत नाही.

बाबा पुन्हा म्हणाला.. महाराज तुम्ही नसतात तर आमचं काही खरं नव्हतं. या एवढ्या मआगाईच्या ज्यमान्यात तीन मुलं सांभाळणं आम्हाला या जनमी तरी शक्य झालं नसतं. तुमच्या अचूक भविच्य आणि माग्रदरशनाची साथ मिळाली नसती तर काही हा पेढा आमच्या नशिबात नव्हता....


==========================
सत्यघटनेवर आधारित.. (दुर्दैवाने) !!!!!

58 comments:

  1. :( predict केलं होतं वाचताना..

    .फक्त असं वाटतं की अजून हृदयाला भिडायला हव होतं पण त्याचा दोष तुझ्या लिखाणाचा नसून भराभर वाचून संपवायच्या माझ्या घाईचा आहे बहुदा...

    ReplyDelete
  2. कथा छान जमली आहे. मुलाचे भावविश्व तर उत्तम उतरले आहे.

    ReplyDelete
  3. छान लिहिलं आहेस..
    दुर्दैवाने माझ्याही माहितीतले असे काही लोक आहेत :(

    ReplyDelete
  4. सत्यकथा असल्याचा उल्लेख शेवटी वाचला आणि फार वाईट वाटले. चीड, कीवही आली. आजही चांगल्या शिकल्यासवरलेल्या घरांमधेही हे घडतेय, दुर्दैव!अश्या अंधश्रध्देचे फासे उलटे पडले तर परिणाम फार भयावह असू शकतात. :(

    पोस्ट चांगली.

    ReplyDelete
  5. मस्त लिहिलंय.. अगदी लहान मुलीची डायरी वाचल्यागत.. शेवटाचा अंदाज मात्र आला होता...

    ReplyDelete
  6. भानस ताई म्हणतीये त्याप्रमाणे फक्त आणि फक्त सुशिक्षित लोकच हे अस करतायेत आजकाल जास्त ...

    ReplyDelete
  7. अवघड रे भावा!! :(

    ReplyDelete
  8. :(

    लिहिलं आहेस सुंदर ... पण असं घडतंय अजूनही, हे किती भयंकर आहे!

    ReplyDelete
  9. पोस्ट मस्त नाही म्हणता येणार ... पण मांडलीयेस मस्त...
    अश्या लोकांना मुलगे न झालेलेच बरे .. वारस कशाला हवा यांना ? अशी कोती मनोवृत्ती पुढे नेण्यासाठी?

    ReplyDelete
  10. :(
    :(
    :(

    काय बोलू यार..कठीण आहे !!!

    ReplyDelete
  11. कठीण...
    अलीकडचीच आहे का ही सत्यकथा ?

    ReplyDelete
  12. भयानक वास्तव.. अनाकलनीयच राहो!!
    gr8!!

    ReplyDelete
  13. उत्कृष्टं कथा वाटतेय हेरंब! लहान मुलीचं भावविश्व चांगलंच उतरलंय! कथा स्त्रीभृण हत्येवर आहे ह्याचा अंदाज जरी वाचताना आला तरी परिणाम कुठेही कमी पडला नाही असं वाटलं.सूचकता आणि लहान मुलीचं निवेदनस्वरूप यामुळे कथा जास्त भिडली! अभिनंदन!

    ReplyDelete
  14. हेरंब लहान मुलीच्या मनातले आणि तिचे शब्द ती सांगत असलेली कथा छानच !! पण आज सुद्धा असे घडते आहे हे सत्य घटनेवर आधारित आहे हे वाचून वाईट वाटले...
    एकूण काय कठीण आहे !!!

    ReplyDelete
  15. :( :( :(

    आजही हे होत आहे हे आपल्या समाजाच खूप मोठ दुर्दैव आहे...

    बाकी त्या मुलीच भावविश्व योग्य त्या शब्दात सादर केल आहेस ...

    ReplyDelete
  16. लहान मुलीचे भावविश्व एकदम जबरदस्त मांडले आहे. दुर्दैवाने मुलाच्या हट्टासाठी चान्स घेणारी माझ्याही माहितीमध्ये काही लोक आहेत.
    त्यांच्या पोटी मुलींची अख्खी क्रिकेट टीम जन्मावी अशीच माझी इच्छा असते.

    ReplyDelete
  17. धन्यवाद अपर्णा.. हो.. थोडं प्रेडिक्टेबल होणार होतंच. कारण तसंही सस्पेन्स मोडमधे लिहायचा प्लान नव्हताच. फक्त सहा वर्षाच्या मुलीच्या नजरेतून लिहायचं म्हणजे बरेचसे थेट उल्लेख वगळले जाणार हे ओघाने आलंच.

    >> .फक्त असं वाटतं की अजून हृदयाला भिडायला हव होतं पण त्याचा दोष तुझ्या लिखाणाचा नसून भराभर वाचून संपवायच्या माझ्या घाईचा आहे बहुदा...

    नाही.. हा नक्कीच माझ्या लिखाणाचा दोष आहे. मे बी नेक्स्ट टाईम :) ..

    ReplyDelete
  18. धन्यवाद काका. असाच एक प्रयत्न केला..

    प्रेरणा : शाळा :)

    ReplyDelete
  19. धन्यवाद केतकी..

    खरंच असे कित्येक लोक आपल्या आसपास अगदी ताठमानेने वावरत असतात !! दुर्दैव.. दुसरं काय :(

    ReplyDelete
  20. श्रीताई, मीही जेव्हा हे पहिल्यांदा ऐकलं ना तेव्हा प्रचंड संताप आला होता. तेव्हा तर मी म्हंटलंही की अशा लोकांना मुलगीच झाली पाहिजे. पण नाही झाली ते एका अर्थाने बरं. उगाच तिचे अजून हाल झाले असते.

    श्रीताई, मधल्या परिच्छेदाच्या मदतीबद्दल तुझे विशेष आभार.

    ReplyDelete
  21. आभार आनंदा..

    हो. अपर्णाला म्हटल्याप्रमाणे अंदाज येणार हे मी थोडंफार गृहीतच धरलं होतं. फक्त थोडी वेगळी मांडणी.

    ReplyDelete
  22. धन्यवाद मान्यवर..

    हो रे.. फारच दुर्दैवी प्रकार आहे :((

    ReplyDelete
  23. खरंय सचिन.. जेवढी संपन्नता, श्रीमंती, शिक्षण अधिक तितकी अंधश्रद्धा अधिक असं चित्र दिसतं हल्ली बऱ्याचदा.. !!

    ReplyDelete
  24. बाबा, फारच कठीण आहे सारं..

    ReplyDelete
  25. धन्यवाद गौरी.

    आणि ही झाली माहित झालेली घटना.. अशा कित्येक घटना आपल्यापर्यंत पोचतही नसतील !!

    ReplyDelete
  26. धन्यवाद लीना.. खरंय.. अशा कोत्या मनोवृत्तीच्या लोकांना खरं तर जबर शिक्षा दिल्या पाहिजेत !

    ReplyDelete
  27. भापो सुहास.. खरंच कठीण आहे !:(

    ReplyDelete
  28. हो अनघा.. अगदी अलिकडची आणि चक्क मुंबईतली !!

    ReplyDelete
  29. आभार योग.. खरंच खुपच भयानक आहे हे !

    ReplyDelete
  30. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद विनायकजी.

    कथा फक्त स्त्रीभृण हत्येबद्दल अशी नाहीये. तो कथेतला एक भाग म्हणता येईल. मुलगा होण्याचा हव्यास, मुलीच्या वाट्याला न् येणारं प्रेम आणि सगळ्यात म्हणजे मुलगा होण्यासाठी अंधश्रद्धाळूपणे कुठल्याही ठरला जाण्याची तयारी हे ही तितकेच महत्वाचे मुद्दे आहेत.

    पुन्हा एकदा प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार.

    ReplyDelete
  31. धन्यवाद श्रिया.. एक जरा वेगळा प्रयत्न म्हणून..

    खरंच फार कठीण प्रकार आहे !

    ReplyDelete
  32. आभार देवेन. खरंच आजच्या काळातही हे प्रकार होतायत हे ऐकायलाही कसलं विचित्र वाटतं नाही ?

    ReplyDelete
  33. आभार ओंकार.

    >> त्यांच्या पोटी मुलींची अख्खी क्रिकेट टीम जन्मावी अशीच माझी इच्छा असते.

    अगदी अगदी.. त्यांच्यासारख्यांसाठी हीच सगळ्यात मोठी शिक्षा असेल मला वाटतं.

    ReplyDelete
  34. कथा प्रेडीक्तेबल असली तरी लहान मुलीच्या दृष्टीकोनातून लिहिण्यास यशस्वी झालास. कथा वाचतांना सरधोपट वाटते खरी, पण ते बरोबरच आहे. एखादे लहान मूल जर डायरी लिहित आहे, रोजच्या घडणाऱ्या गोष्टींची नोंद घेत आहे तर ते सरधोपटच राहील. अलंकारिक, धक्कादायक वगैरे असणार नाही. त्यामुळे कथा हेरंब ओक लिहित नसून कुणीतरी चिमुरडी लिहितेय असे वाटते, हे तुझे यश.
    सत्यघटना आहे, आताची आहे, मुंबईची आहे हे वाचून मन अधिक विषण्ण झाले. मी हे पाहिलेय, पण त्या गावाकडच्या घटना, ७-८ वर्षांपूर्वीच्या, अजूनही हा प्रकार मुंबईसारख्या आधुनिक शहरात सुरु असेल हे धक्कादायक म्हणायला हवे.

    ReplyDelete
  35. :(

    lahaan muleechee bhaaShaa adhun madhun track soDtey asa vaaTala. paN vegaLaa prayatna aahe.

    ReplyDelete
  36. एका वेगळ्या विषयावर वेगळ्या दृष्टीकोनातून मांडलेली सत्यघटना म्हणून कथा आवडली. घटना अर्थातच निषेधार्ह आणि चिंतनीय आहे .
    दुसरा मुलगा सांभाळता येतो पण मुलगी सांभाळणे मात्र लोकांना जड जाते .

    ReplyDelete
  37. कथेचा फ़ॉर्मॅट अगदी योग्य निवडलाय.त्यामुळे त्या घटनेची विदारकता वाढते. हल्लीच्या काळात हे जास्त होत चाललय. अजूनही रूढी आणि अंधश्रद्धा यातून आपण बहेर पडायला तयार नाही. काय करावे!

    ReplyDelete
  38. आपण कोणत्या शतकात आहोत असा प्रश्न पडतो असे अनुभव ऐकले -वाचले की!

    ReplyDelete
  39. छान मांड्णी...छोट्या मुलीच्या नजरेतून...जग किती निरागस वाटतं...?

    अश्या लोकांना मुलगे ह्वेतच कशाला..?

    ReplyDelete
  40. धन्यवद स्वामी. थोडं वेगळं लिहिण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांना आवडली हे वाचून बरं वाटलं.. आणि ती सरधोपट आणि किंचित प्रेडीक्टेबल मुद्दामच ठेवली आहे. पुन्हा एकदा प्रतिक्रियेबद्दल आभार..

    ReplyDelete
  41. हम्म तृप्ती.. काही ठिकाणी झालं असावं असं.

    प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  42. धन्यवाद सुमेधा.

    अशी लोकं समाजात अजूनही आहेत याचं जास्त वैषम्य वाटतं !

    ReplyDelete
  43. अरुणाताई, प्रतिक्रियेबद्दल आभार.

    अंधश्रद्धा हा कधीही नाहीसा न होणारा शाप आहे आपल्या समाजाला !

    ReplyDelete
  44. सविताताई, खरंच.. मानसिकता बदलत नाही तोवर कितीही शतकं आली काय नि गेली काय ! :(

    ReplyDelete
  45. धन्यवाद सारिका.. मी तर म्हणतो अशा लोकांना मुलीही नकोत. !!

    ReplyDelete
  46. काय बोलायचे.. आज सुद्धा अशी लोक आहेत ते सुद्धा मुंबईत.. कठिण आहे..

    ReplyDelete
  47. अनेक गोष्टी आहेत ज्याबाबत आपण हतबल आहोत. हि त्यापैकीच एक, भयंकर...

    ReplyDelete
  48. गौरव, अविश्वसनीय पण तेवढंच सत्य !!

    ReplyDelete
  49. सिद्धार्थ, आपण खरंच हतबल आहोत. फार तर फार ब्लॉगपोस्ट लिहू शकतो आपण ! :((

    ReplyDelete
  50. Bhayanak.......... Ati Bhayanak....... strange but true...

    ReplyDelete
  51. हो अनुप.. खरंच भयानक आहे सगळं..

    प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. !!

    अशीच भेट देत रहा..

    ReplyDelete
  52. Story was excellent but unfortunately as your well wisher I must tell two three things will irritated me.Diary view is independent of the feelings of other characters.We see everything the protagonist see.We have to feel what he feels,in this I think emotions of other characters exploded making feelings of protagonist disappear.whole chipra was excellently handled but somewhere link lost.I always expect extraordinary ending,a bright sunshine or a dark night from you,somewhere in this I felt like next part is yet to come.

    I am really sorry to tell this things,I know I am very small in front of you by both intelligence and age,but this was something I felt.

    ReplyDelete
  53. Dear Anee,

    I agree with you at some extent. But here too you are seeing everything what protagonist is seeing. There are many many points which I have left loose as 6 year old can't interpret it. But she observes it and then makes a note of it.

    Another thing I did not want to slip away from the real life story. So avoided adding any my own stuff.

    but all in all, I agree that I'd have worked more on it to make it well-crafted.

    And dont worry abt comment. You can express urself and rest assured that it's always taken in right spirit. Cheers.

    ReplyDelete
  54. उत्तम लेखन पण परिस्थिती दुर्देवी ...सत्यघटना हा शब्द फारच टोचला

    ReplyDelete
  55. धन्यवाद ललित...

    हो सत्यघटनाच आहे.. दुर्दैवाने !!

    ReplyDelete

ब्रिटनच्या डोळ्यांत इस्लाम 'प्रेमा' चं झणझणीत अंजन घालणारा डग्लस मरे

गेल्या आठवड्यात डग्लस मरे ( Douglas Murray) या ब्रिटिश लेखकाचं ' द स्ट्रेंज डेथ ऑफ युरोप ' (The Strange Death of Europe) हे पुस्तक व...