Friday, June 25, 2010

मित्रेभ्या नमः : भाग १

So no one told you life was gonna be this way
Your job's a joke, you're broke, your love life's DOA
It's like you're always stuck in second gear,
When it hasn't been your day, your week, your month,
or even your year, but...

I'll be there for you...
When the rain starts to pour
I'll be there for you...
Like I've been there before

I'll be there for you...
'Cause you're there for me too.

डिसेंबरची एक संध्याकाळ. सगळीकडे ख्रिसमसची सजावट. कॅलिफोर्निया असल्याने स्नोचा प्रश्न नव्हता. पण चांगलीच थंडी होती. आमच्याकडे गाड्या-घोडे नसल्याने बाहेर फिरायला जाणं म्हणजे चैनीचा मामला होता. अर्थातच तो आम्हाला परवडणारा नसल्याने डोळे टीव्हीला चिकटवून बसण्याचं काम इमानइतबारे पार पाडत होतो. पहिलाच अमेरिका दौरा. त्यामुळे सगळ्याच गोष्टींचं अप्रूप. अगदी टीव्हीवरल्या मालिकांचंही. मालिका या प्रकाराशी माझं आयुष्यात जमलेलं नाही. त्यामुळे सच्च्या चित्रपटभक्ताप्रमाणे पिक्चर बघणं चालू होतं. ब्रेकात इतर चॅनल्सना खोखो देण्याचे प्रकार चालू होते. त्यावेळी वरचं गाणं ऐकू आलं. जरा बरं वाटत होतं ऐकायला. त्यानंतर अचानक एक माणूस (अर्थात स्क्रीनवर) येऊन "How you doin'?" सदृश्य काहीतरी म्हणाला. चेहरा जरा ओळखीचा वाटत होता त्याचा. अचानक मागून जोरजोरात हसण्याचे आवाज आले. मालिका विनोदी आहे हे भासवण्यासाठी भाडोत्री प्रेक्षकांचे कृत्रिम हसण्याचे आवाज ऐकणं याचा मला "चला एकवार जोरदार टाळ्या होऊन जाउदेत !!!" एवढाच किंबहुना किंचित अधिकच तिटकारा होता. तत्परतेने चॅनल बदललं गेलं.


F.R.I.E.N.D.S या जगप्रसिद्ध, अनेकानेक विक्रम प्रस्थापित केलेल्या सिटकॉमशी (सिच्युएशनल कॉमेडी) आलेला हा माझा पहिला संबंध. काही सेकंदच टिकलेला. तशी भारतात 'स्टार वर्ल्ड' वर याची ओळख झाली होती मागे पण मालिका या प्रकाराशी फटकून वागण्याच्या माझ्या स्वभावामुळे या 'मित्रां'बद्दल कधी आपुलकी वाटली नव्हती. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा अमेरिकेत जायचा योग आला. यावेळी तर एकटा होतो हॉटेलात आणि तेही तीन महिने. रूममेट्स नाहीत की कोणी नाही. त्याच त्याच चॅनल्सवरचे तेच तेच चित्रपट बघून कंटाळा यायला लागला होता. अशात एका लॉंग विकांताला एका मित्राशी भेट झाली. गप्पा मारता मारता त्याने नेटफ्लिक्सवरून मागवलेल्या फ्रेंड्सच्या चौथ्या सिझनच्या डीव्हीडी बद्दल मला सांगितलं आणि फ्रेंड्स बघायचं का म्हणून विचारलं. आमच्या मित्रवर्याला त्या डीव्हीडीतले सगळे एपिसोड्स तोंडपाठ होते. सुरुवातीचं संगीत संपून पहिला डायलॉग सुरु झाला की तो लगेच म्हणायचा "अरे हो. हा तो पोकरचा एपिसोड" किंवा "हा एपिसोड बोरिंग आहे ". काहीही न बोलता त्याचं ते ज्ञानामृत रिचवता रिचवता मला एकच प्रश्न छळत होता की "जर याला हे सगळे एपिसोड्स तोंडपाठ आहेत तर मग तरीही याने डीव्हीडी का मागवली आहे?". आणि हाच छळवादी प्रश्न जेव्हा मी त्याला उघडपणे विचारला तेव्हा "वत्सा, तू किती किरकोळ आहेस याची तुजला जाणीव आहे काय?" अशा अर्थाचा एक जळजळीत कटाक्ष माझ्याकडे टाकत तो "तू या वीकांतात ही डिव्हीडी बघ आणि मग आपण बोलू." असे वदता झाला... झालं !!! जे टीव्हीवर दिवसरात्र दिसत असतात आणि ज्यांना मी शिताफीने टाळतो असे फ्रेंड्स माझ्या या फ्रेंडच्या रुपाने माझ्या मनोरंजन विश्वात चंचुप्रवेश करते झाले. त्या वीकांतात चौथ्या सिझनची डीव्हीडी मी बघून काढली ('वाचून काढली' सारखं)... अ‍ॅंड बिंगो. लव्ह अ‍ॅट 'सेकंड' साईट !!! अक्षरशः प्रेमात पडलो त्यांच्या. उरलेल्या दौर्‍यात अजून दोन सिझन्स संपवले. भारतात परत आल्यावर जवळच्या व्हिडीओ लायब्ररीत जाऊन दर विकांताला एक अशा रीतीने एक ते दहा सिझन्स (एक सिझन = २४-२५ एपिसोड्स) संपवून टाकले तेव्हा कुठे आत्मा तृप्त झाला ... छ्या नाहीच. उलट सतत आणि अजून अजून फ्रेंड्सचेच एपिसोड्स बघावेसे वाटू लागले. आणि "जे वाटतं ते करावंच" या (माझ्या) नियमाप्रमाणे ईसवी सन २००५ पासून ते आजतागायत काही किरकोळ अपवाद वगळता मी दररोज फ्रेंड्सचा एक तरी एपिसोड बघतोच. दिवसा किंवा रात्री, अमेरिकेत असो वा भारतात, कितीही बिझी असो वा दमलेला असो, या फ्रेंड्सना दिवसातून एकदातरी भेटल्याशिवाय चैन पडत नाही. दहाही सिझन्स हार्डडिस्कमध्ये कॉपी करून ठेवले आहेत. एवढी काय जादू आहे यांच्यात? असो ते नंतर बघू. तूर्तास त्यांचे काही ठळक विक्रम बघू.


१. १९९४ ते २००४ अशी सलग दहा वर्षं अमेरिकन टेलिव्हिजनवर चाललेली मालिका

२. असंख्य पारितोषिकं आणि नामांकनं

३. सलग दहा वर्षांत यातलं एकही पात्र बदललेलं नाही. अगदी छोट्यात छोट्या भूमिकेतले कलाकारही तेच आहेत. (अपवाद फक्त एक पात्र आणि तेही पहिल्याच सिझनमध्ये).. आपल्याकडे प्लास्टिक सर्जर्‍या करून करून एक दिवसाआड पात्र बदलण्याच्या सिरियल्सवाल्यांच्या सवयीच्या पार्श्वभूमीवर या गोष्टीचं महत्व लक्षात यावं.

४. हॉलीवूडच्या मोठ्या पडद्यावरच्या अनेकानेक मान्यवर कलाकारांनी यात हजेरी लावली आहे. उदा. ब्रॅड पिट, ब्रूस विलीस, जॉर्ज क्लूनी, रॉबिन विल्यम्स, जीन-क्लॉड वॅन डॅम, टॉम सेलेक, चार्ली शीन, ज्युलिया रॉबर्टस, हेलन हंट, इझाबेला रोसेलिनी, क्रिस्टीना अ‍ॅपलगेट, रिज विदरस्पून, ब्रुक शिल्ड्स, रिचर्ड ब्रॅन्सन (व्हर्जिन अटलांटिक), राल्फ लॉरेन (पोलो)

५. यातले अनेक संवाद, स्टाईल्स अमेरिकन तरुणाईने जसेच्या तसे उचलले. जसं जोईचा "How you doin'?" वाला द-ग्रेट-फ्लर्टिंग संवाद किंवा रेचलचा फेमस 'रेचल कट. किंवा अजून एक म्हणजे "ओ माय गॉड" हा साधासा भासणारा संवाद आवाजाच्या चढउताराच्या सहाय्याने, निरनिराळ्या ढंगात इतक्या अनंत पद्धतींनी म्हणता येतो हा नवीन शोध लागला.

जे आत्तापर्यंत कधीच या मित्रांना भेटलेले नाहीत किंवा फार क्वचित भेटले आहेत किंवा नुसतीच तोंडओळख झाली आहे अशा लोकांसाठी या मित्रांच्या ओळखीचा अनौपचारिक कार्यक्रम करून टाकू. याची कथा प्रामुख्याने सहा प्रमुख पात्रांभोवती फिरते. खरं तर कथा नाहीच. (अमेरिकन) तरुणाईच्या रोजच्या जीवनातले प्रसंग. नेहमी घडणारे. तेचतेच. परंतु जबरदस्त संवाद, उत्तम संवादफेक, नवनवीन शब्दांची निवड, आणि ते वापरण्याच्या निरनिराळ्या पात्रांच्या निरनिराळ्या लकबी, विलक्षण मांडणी, विनोदाची उत्कृष्ट जाण असलेले कलाकार आणि संवादांचं/विनोदाचं अप्रतिम टायमिंग या प्रमुख अस्त्रांच्या आधाराने सामान्य प्रसंगही हसून हसून मुरकुंडी वळायला लावणारे ठरतात. पण कितीही रोजच्या जीवनातले प्रसंग म्हंटले तरीही आधी म्हंटल्याप्रमाणे ते अमेरिकन जीवनातले किंबहुना न्यूयॉर्कर तरुणाईच्या जीवनातले प्रसंग आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे (हो खूप फरक आहे. आपल्याकडे जसं मुंबईकर वि. पुणेकर, मुंबईकर आणि पुणेकर वि. इतर्स असे प्रकार असतात तसंच इथेही न्यूयॉर्क वि. इतर किंवा ईस्ट कोस्ट वि. वेस्ट कोस्ट असे सामने रंगत असतात. जसं सर्वसामान्य अमेरीकनाला आपण बाकीच्या जगापेक्षा कोणीतरी ग्रेट, वेगळे आहोत असं वाटत असतं तसंच इथल्या सर्वसामान्य न्यूयॉर्करालाही आपण अन्य अमेरिकनांपेक्षा जरा जास्तच वरचढ आहोत असं (उगाचंच) वाटत असतं. आता यातले मुंबईकर कोण, पुणेकर कोण आणि अन्य कोण याची अनुमानं वाचकांच्या आपापल्या 'स्थलपरत्वे' बदलू शकतात हेसांनल.) अन्यथा यातली मुक्त भाषा, सेक्सचे उल्लेख, त्या अनुषंगाने येणारे प्रसंग, गे/लेसबियन्स बद्दलचे मुक्त संवाद आणि प्रसंग, गे-मॅरॅजेस, प्रत्येक पात्राची अनेकांबरोबर असणारी प्रकरणं (आपल्या भाषेत लफडी), अमेरिकन (मुख्यतः न्यूयॉर्क) संस्कृती, मुलांच्या दृष्टीने पालकांचं असलेलं घरातलं स्थान (आणि व्हाईसवर्सा), कुटुंबव्यवस्था, लग्न टिकवण्याची धडपड आणि तरीही कित्येकदा ते फसणं, सावत्र आई-वडील, पहिली-दुसरी-तिसरी-चौथी बायको/नवरा हे प्रकार म्हणजे अतिरेक वाटू शकतात. पण एकदा का ही मालिका अमेरिकन नजरेतून बघता यायला लागली की मग कधी आपण त्यात एकरूप होऊन हास्याच्या नायगारात सामील होऊन कोसळायला लागतो ते कळतही नाही. असो. तर ही सहा प्रमुख पात्र म्हणजे रेचल ग्रीन, फिबी बुफे, मोनिका गेलर, रॉस गेलर (रॉस आणि मोनिका बहिण भाऊ), चँडलर बिंग, जोई (जोसेफ) ट्रिबियानी.


तसं म्हंटलं तर यांमध्ये अजून एक महत्वाचं पात्रही आहे आणि ते म्हणजे हे सहा जण दर संध्याकाळी भेटतात ते 'सेंट्रल पर्क' नावाचं छोटंसं कॉफीशॉप. इथे यांच्या अनेक मीटिंग्स होतात, खेचाखेची, बडबड, गप्पा, नवीन प्लान्स, नवीन बॉयफ्रेंड्स/गर्लफ्रेंड्सच्या ओळखी, प्रत्येकाच्या आयुष्यातल्या नवीन नवीन बातम्या या सगळ्या इथेच शेअर केल्या जातात. थोडक्यात जसा आपल्या इथे नाका किंवा अड्डा (तो चोरांचा नव्हे, आपल्यासारख्या सभ्य तरुणतरुणींचा) असतो तसं यांचं हे 'सेंट्रल पर्क'... !!


 रेचल ग्रीन (जेनिफर अ‍ॅनिस्टन) : आपल्याला या लग्नात इंटरेस्ट नाही याचा अचानक लग्नाच्या दिवशी साक्षात्कार होऊन लग्नाच्या हॉलमधून पळून जाऊन मोनिकाकडे येऊन धडकणारी, फॅशनच्या दुनियेत करिअर करायची इच्छा असलेली तरुणी. वडील डॉक्टर, होणारा नवरा डॉक्टर. पण सगळं सोडून ती पळून येते. या पात्राच्या अनेक लकबी आहेत, अनेक छटा आहेत. कधी रॉसवर जीवापाड प्रेम करणारी मुलगी तर कधी त्याचा प्रचंड द्वेष करणारी किंवा स्वार्थीपणे त्याच्याकडून हवं ते वदवून घ्यायचा प्रयत्न करणारी. मला स्वतःला जेनिफर अ‍ॅनिस्टन कितीही आवडत असली तरीही रेचल ग्रीन या पात्राचा नेहमीच राग येतो. अनेकदा स्वार्थी, मतलबी, प्रसंगी कावेबाज असं वाटणारं आणि वागणारं हे पात्र. तिच्यावर जीवापाड प्रेम करणार्‍या रॉसला कित्येकदा फसवून, गंडवून त्याचा वापर करून घेते. पण अनेकदा तिचं वागणं, स्टाईल, संवाद, दिसणं हे प्रचंड आवडून जातं. तिचं रॉसबद्दलचं प्रेम, एकटं राहण्याची धडपड, मोनिकाबरोबरची मैत्री आणि कधीकधी उडणारे खटके, फॅशन जगताची आवड, जोईशी जवळीक आणि अखेरीस पुन्हा रॉसकडे जाणं हे सगळं विलक्षण आवडून जातं.

फिबी बुफे (लिझा कुद्रो) : ही बया म्हणजे एक अजब रसायन आहे. बालपणीच आईने केलेली आत्महत्या, वडिलांचा पत्ता नाही, विक्षिप्त जुळी बहिण या सगळ्यामुळे बालपण अतिशय हालात गेलेलं. त्यामुळे पोटापाण्याचा उद्योग म्हणून ही मसाज पार्लरमध्ये (किंवा अनेकदा फ्रीलान्सर म्हणून) 'मसुस (masseuse)' चं काम करते आणि 'सेंट्रल पर्क' मध्ये गिटारही वाजवते. हे वाचताना जेवढं भयानक किंवा दयनीय वाटतं त्याच्या कैकपटीने प्रत्यक्षात हलकंफुलकं आहे. तिचं विचित्र वागणं, कधीकधी (इतर पात्रांच्या) डोक्यात जाणारी पण निरागस निरर्थक बडबड, तिच्या नजरेतलं नीतिमुल्यांचं महत्व, तिचा शाकाहाराचा अट्टाहास, महागड्या कृत्रिम वस्तूंविषयी तिच्या मनात असणारा राग, मित्रांसाठी केव्हाही काहीही करण्याची तयारी यामुळे नियमित फ्रेंड्स बघणार्‍या अनेकांची ती सगळ्यांत आवडती फ्रेंड आहे. मी हे म्हणतोय त्याअर्थी माझंही हे 'फ्रेंड्स' मधलं सगळ्यांत आवडतं पात्र आहे हे वेगळं सांगायला नकोच. पण मला फिबी सगळ्यांत आवडते ते तिच्या पांचट, निरर्थक बडबडीमुळे आणि त्यातून होणार्‍या विनोदांमुळे. एक उदाहरण सांगतो. एकदा फिबी रेचलला रेचलच्या होणार्‍या मुलाविषयी काहीतरी विचारते.

रेचल : फिबी, मला याविषयावर बोलायची निदान आत्तातरी इच्छा नाहीये.

फिबी : बरं ठीके.

दोन सेकंद पॉझ

फिबी : बरं आता?

फिबीचे विनोद, तिची बडबड काय लायकीची असेल आणि त्यामुळे आपली कसली भन्नाट करमणूक होत असेल हे सांगायला हा एवढा प्रसंग पुरेसा आहे मला वाटतं.


मोनिका गेलर (कर्टनी कॉक्स) : निव्वळ मॅनहॅटनसारख्या महागड्या परिसरात आजीचा जुना फ्लॅट असल्यानेच मॅनहॅटनमध्ये राहू शकणारी ही मुलगी. ही आणि रेचल रूममेट्स आहेत. (आणि त्यांच्या समोरच्याच फ्लॅटमध्ये चँडलर आणि जोई राहतात.) उत्कृष्ट शेफगिरी आणि स्वच्छतेची अतिरेकी आवड हे तिचे दोन प्रमुख गुण. आणि स्वच्छतेची अतिरेकी आवड ही अतिशयोक्ती नाही. मोठ्या व्हॅक्युम क्लिनर स्वच्छ करण्यासाठी छोटा व्हॅक्युम क्लिनर वापरणारी किंवा रॉसचं एका मुलीबरोबर ब्रेकऑफ झाल्यानंतर त्या मुलीचं घर प्रचंड अस्वच्छ आहे हे रॉसकडून कळल्यावर रात्री धडपडत त्या मुलीच्या घरी जाऊन तिला "तुझं घर मी साफ करून देऊ का?" असं विचारणारी ही बाई. :D. आता कळलं ना स्वच्छतेची किती अतिरेकी आवड आहे हिला ते. स्वतःच्या मालकीचं एक रेस्टॉरंट असावं असं स्वप्न कायम बघणारी, सख्खा भाऊ रॉसशी सतत तुलना झाल्याने रॉसवर, आई-बाबांवर वैतागणारी. अपघातानेच चँडलरच्या प्रेमात पडून पुढे त्याच्याशी लग्न करणारी, लहान मुलांची प्रचंड आवड असणारी पण दुर्दैवाने ते सुख नशिबात नसणारी अशी ही मुलगी. हे सगळे प्रकार तिला पडद्यावर करताना बघताना मजा येते जाम.

बापरे.. एका दिवसासाठी खूप झालं लिहून. उरलेल्या फ्रेंड्सना उद्या भेटू !!

फ्रेंड्सच्या गाण्याचे व्हिडिओज खालील ठिकाणी पाहता येतील.


Opening Sequence


पूर्ण गाणं

* सर्व 'मित्रचित्रे' आणि व्हिडीओज आंतरजालावरून साभार.

- भाग २ इथे  वाचा.

35 comments:

  1. American Pie आठवला! थॅक्स फॉर शेअरींग!

    ReplyDelete
  2. I'll be there for you...
    Cause you're there for me too...
    मस्त फ्रेंड्स ही सिरीज खूप खूप आवडते ..मस्त झालीय पोस्ट :)

    हा वीडियो बघ माझ्या मित्रांसाठी केलेला काही महिन्यांपुर्वी
    http://www.youtube.com/watch?v=3Q7XQgq1apg

    ReplyDelete
  3. आभार यशवंत. 'अमेरिकन पाय' चे पहिले तीन भाग मला जाम आवडतात.

    ReplyDelete
  4. धन्स सुहास. तुझा 'फ्रेंड्स'चा व्हिडिओ बघितला. सुपर्ब आहे एकदम.

    अरे मी पोस्ट मध्ये ओरिजनल व्हिडीओ टाकत होतो पण त्या Embedded code मध्ये काहीतरी प्रॉब्लेम येत होता. आता रिपेअर केलंय बघ.

    ReplyDelete
  5. मी पण मालिका कधी बघत नाही....मित्राने या मालिकेविषयी सांगितल होत पण पाहण्याच धाडस काही केल नव्हत.....तुझी पोस्ट वाचल्यामुळे आता पाहायला काही हरकत नाही.

    ReplyDelete
  6. योगेश, अरे नक्की बघ. भन्नाट प्रकार असतो हा.. !!

    ReplyDelete
  7. मी एकही नाही पाहिला फ्रेंड्स चा एपीसोड. एकदा प्रयत्न केला होता, तर त्या मधे काय सुरु आहे हेच समजत नव्हतं, दोनच मिनिटात बदलून टाकला. पण आत शोधतो टॉरंटवर.. :)
    सध्या मुली ’ग्रे’ज ऍनोटोमी आणि अजून एक कॅसल बघतात. दोन्ही मला पण आवडले सिरियल्स.. :)

    ReplyDelete
  8. ज्यांनी कोणी "एकदा बघुन काही कळत नाही" या कारणाने फ़्रेंड्स बघितलेलं नसेल, त्यांना कळकळीची विनंती. अगत्य बघण्याचे करावे. मलाही फ़्रेंडस च्या पेपरमधे ९० टक्के जरुर मिळतील.
    बाकी सत्या, लय आभार हे सगळं डोक्युमेण्ट केल्याबद्दल! आता नवीन कोणी भेटला, की त्याला हा पत्ता देईन. ;)

    ReplyDelete
  9. हेरंब,

    वा! फ्रेंड्स वर पोस्ट! ह्यासारखा निखळ विनोद भारतीय मालिकांत कधीतरीच पहायला मिळतो! आम्ही हे फ्रेंड्स आमचे कधी मित्र झाले ते कळलेच नाही.

    आता जरा पुणेरी (किंवा माजबोली) खाक्यात एक अनाहूत टिप्पणी :)

    मित्रानाम नम: चा अर्थ होतो मित्रांचा नमस्कार. मित्रांना नमस्कार म्हणायचे असेल तर मित्रेभ्या नमः म्हणतात असे माझे तुटपुंजे संस्कृत ज्ञान सांगते!

    बाकी लेख मस्तच!

    ReplyDelete
  10. Mi suddha barech aikalay F.R.I.E.N.D.S. baddal...!!! Ajun nai pahilay pan ekahi episode... :(
    Tu itke chaan varnan keleyas ki lagech baghayachi iccha hotey... :)

    ReplyDelete
  11. हेरंबा,
    ही माझी आवडती मालिका, सर्व सिझन्स संपूर्ण पाहिले नसले तरिही! या मालिकेशी माझी ओळख झाली ती कॉल सेंटरमधे उच्चार आणि संवाद कसे म्हणावेत याचं ट्रेनिंग घेताना. ’ओह माय गॉड’ची तर आम्ही स्वत: वेगवेगळ्या टोनमधे पारायणं केली आहेत. तुझ्याप्रमाणेच मलाही रेचलचा राग येतो पण फिबी तितकीच आवडते. जोई, रॉस आणि चॅंडलर बद्दल तू लिहिशिलच. माझा आवडता मात्र रॉस आहे. सर्व सिझन्सच्या डी.व्ही.डी. ज आता मिळू लागल्यात. विकत घ्यायचा विचार आहे (हा, हा, हा - माझा नवरा पण हेच म्हणतो. बघितलेली मालिका पुन्हा काय बघायचीय, ती पण विकत घेऊन. आता कसं सांगू त्याला? आपल्या संस्कृतीचे नसूनसुद्धा आपले वाटणारे फ्रेंड्स नेहमी नेहमी थोडीच मिळतात.)

    ReplyDelete
  12. काका, प्लीज नक्की बघा. मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडेल. नेटवर सगळ्या नसल्या तरी बऱ्याच सिझन्सच्या टोरंटस उपलब्ध आहेत.

    ReplyDelete
  13. ऋयाम, अगदी अगदी.. मीही फ्रेंड्सच्या टक्केवारीत नव्वदीच्यावर आहे.. :)

    अरे आणि आत्ताशी फक्त पोरींचंच लिहून झालंय. अजून तीन हिरो राहिलेत. भाग-२ मध्ये त्यांच्यावर लिहितो. बघू एक-दोन दिवसांत.. हा फ्रेंड्स प्रकार एवढा आवडता आहे की लिहिता लिहिता कळलंच नाही की जरा जास्तच लिहिलं गेलंय.

    ReplyDelete
  14. यस यस यस निरंजन. अगदी बरोबर. माझी चूक मला सपशेल मान्य आहे. मी आधी 'मित्राय नमः' असं शीर्षक देणार होतो पण त्याचा अर्थ (एकाच) मित्राला नमस्कार असा होतो. म्हणून मग 'मित्रांना नमस्कार' ला काय म्हणतात ते आठवता आठवता एकदम कन्फ्युज होऊन गेलो. मित्रेभ्या नमः हे एकदम योग्य आहे. बदल केला आहे. चूक दाखवून दिल्याबद्दल आभार.

    अजून एक. असलेली चूक योग्य शब्दांत दाखवणे ही मॅच्युरिटी झाली पण मुळातच नसलेली चूक फाटक्या शब्दांत दाखवणे म्हणजे माजबोली. थोडक्यात तुझी माजबोली नव्हती. निश्चिंत रहा :)

    प्रतिक्रियेबद्दल आभार. पुढच्या भागात उरलेल्या तिघांबद्दल लिहितो.

    ReplyDelete
  15. मैथिली, अग नक्की बघ. तुझ्यासारख्या (माझ्यापेक्षा ;) ) तरुण पिढीला तर नक्की आवडेल ही सिरियल..

    ReplyDelete
  16. कांचन, वा.. फ्रेंड्सचे बरेच चाहते बघून बरं वाटतंय एकदम. भारतात असताना अमेरिकन क्लायंटशी डील करताना सफाईदारपणे बोलता येण्यासाठी आणि अमेरिकन उच्चार, slangs कळण्यासाठी मीही माझ्या टीमला ही सिरीज रेफर करायचो. अमेरिकन इंग्लिश झटपट शिकण्यासाठी ही सिरीज बेस्ट आहे आणि सोबतीला फुल टीपी :)
    वॉव. तुलाही फिबीच आवडते.. झक्कास.. हो रॉस, चँडलर, जोईबद्दल लिहितो उद्या-परवामध्ये. त्यात सांगेनच की मला जोई सगळ्यांत जास्त का आवडतो ते. अर्थात डेव्हिड श्विमरचा अभिनय वादातीत आहे. आजच त्याचा तो सिंथेसायझर वाजवत असतो तो एपिसोड बघितला. हसून हसून वाट लागली नुसती.. :D

    आणि हो टोरंटवर बरेच सिझन्स आहेत.

    >>आपल्या संस्कृतीचे नसूनसुद्धा आपले वाटणारे फ्रेंड्स नेहमी नेहमी थोडीच मिळतात. <<
    अगदी अगदी.. १०१% अनुमोदन..

    ReplyDelete
  17. Mitra...Aata kaay lihu. Me swata 2003-2010 madhe he sagale seasons atleast 35-40 vela pahile aaahet.. Ani mitrana deun tyanchya Aai-vadilankadun shivya dekhil khallya aahet. (Aamcha mulga salag 3-4 diwas pc smor aahe..Aani he sagal 100% khar aahe. Ajibat atishyokti naahi.) Level of comedy ati uccha ahe (This is totally subjective. Many folks will disagree). The side effect of this is you keep comparing FRIENDS with other sitcoms(:(). I know its wrong but chaltaa hai..And till date i atleast watch one episode b4 goin to sleep :D Keep it up. Want to read other char. in your own tadkaa Language :)

    ReplyDelete
  18. And at last "Could I be writing any more?" :)

    ReplyDelete
  19. सुंदर ,अपतिम ,छान आहे ,

    ReplyDelete
  20. मी पण खुप ऐकुन आहे हया ’फ़्रेंडस ’ बद्दल पण अजुन बघीतली नाही कधी..आता मुहुर्त काढावा लागेल अस वाटते...

    ReplyDelete
  21. निशिकांत, सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत. अगदी अगदी. माझेही हे सगळे सिझन्स कित्येकदा पाहून झालेले आहेत. अक्षरशः आता तर म्युट करून बघितले तरी चालतील इतके संवाद तोंडपाठ झालेले आहेत. पण कितीही वेळा पहिले तरी समाधानच होत नाही :)

    अर्थात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे फ्रेंड्स अजिबात न आवडणारे किंवा फ्रेंड्समधले विंद अतिशय बालिश किंवा प्रेडिक्टेबल आहे असं म्हणणारेही मला इथे अनेक जण भेटले. असो.

    यस. मीही गेली पाच वर्षं नियमित न चुकता रोज एक तरी एपिसोड बघतोच :)

    हो रॉस, चँडलर, जोईबद्दल पुढच्या भागात लिहितो लवकरच..

    ReplyDelete
  22. देवेन, अरे लगेच बघायला सुरुवात कर,बेटर लेट दॅन नेव्हर !! :)

    ReplyDelete
  23. मस्तच आहे.... मी सुद्धा कोलेजमध्ये असताना एका मित्रामुळे बघायला लागलो.

    जेनिफर माझी आवडती कलाकार.... बरेच दिवस बघितलेले नाहे आहे मी हे आता... बोटीवर सर्व एपिसोड पडलेले आहेत.... पुन्हा बघून काढायला हवेत...

    ReplyDelete
  24. खरंच रे .. फ्रेंड्स बघणं म्हणजे एक मस्त अनुभव आहे. पुन्हा बघून टाक :)

    ReplyDelete
  25. अरे वा.... सह्हीच माहिती... खुप कमी पण फ्रेंड्स मी पाहीले आहे.... फिबी अर्थातच आवडती... पण ह्याच्या १० सिरिज आहेत हे माहित नव्हते.. आता मिळवणार आहेच... ओळ्ख मात्र मस्त करून दिली आहेस...

    ReplyDelete
  26. धन्स आनंदा.. अरे नक्की बघ. कमी वेळा बघूनही तुला फिबी आवडते म्हणजे तू नक्की फिबीचा जामच भन्नाट परफॉर्मन्स असणारे एपिसोड्स बघितले असावेस. टोरंटवर बरेच सिझन्स आहेत आणि हैद्राबादच्या बऱ्याच व्हिडिओ लायब्ररीजमध्येही सगळ्या सिझन्सच्या डीव्हीडीज आहेत.

    ReplyDelete
  27. कधी पहिली नाही हि series पण आता बघावी लागेल.
    This one have all seasons.
    http://tv.blinkx.com/show/friends/Yh7AfnjYko-adQpc7cZfLwvZYvo#s1e1

    ReplyDelete
  28. जीवनिका, नक्की बघच. आवडेल तुला. ही लिंक मस्त आहे एकदम.

    ReplyDelete
  29. ओन्लाईन होतो आणि बाजूला शमी फ्रेंड्स बघत बसली आहे... तुझ्या पोस्टची आठवण झाली म्हणून लगेच कमेंट करतोय... :)

    ReplyDelete
  30. हा हा.. धन्स रे रोहणा.. :D

    ReplyDelete
  31. माझी प्रचंड प्रचंड लाडकी आहे ही सिरीयल !!!! कितीही वाईट मूड मध्ये असलो तरीही ह्याची कुठलीही डीव्हीडी घ्यावी आणि बघायला सुरुवात करावी !! जादू जादू !!!
    आणि पोस्ट पण खरंच छान झालीय...सगळ्या व्यक्तिमत्वातील विशेषणं बरोब्बर उचललेली ! :)

    ReplyDelete
  32. अरे वा वा वा.. माझीही... माझ्याकडे दहाही सिझन्स आहेत आणि सगळ्यांची असंख्य वेळा पारायणं झालेली आहेत. इतकी की प्रसंगी टीव्ही म्युट करूनही आम्ही (मी आणि बायको) संवाद तोंडपाठ म्हणू शकतो :)

    प्रतिक्रियेबद्दल आभार्स. ब्लॉगर ग्रुपमधे अनेक जण फ्रेंड्सचे चाहते आहेत तर !!

    ReplyDelete
  33. नेटफ्लिक्स कृपेने मी आता सलग पाहायला सुरु केली आहे नाहीतर मी अमेरिकेत आले तेव्हा नवऱ्याबरोबर अधूनमधून पहिली आहे. आता मी ही पोस्ट जास्त रिलेट करू शकते म्हणून कमेंट लिहायला आले आणि लक्षात आलं की अजून इथे मैत्रीदिन आहे :) Happy Friendship day Joe ;)

    ReplyDelete
  34. नेटफ्लिक्स कृपेने मी आता सलग पाहायला सुरु केली आहे नाहीतर मी अमेरिकेत आले तेव्हा नवऱ्याबरोबर अधूनमधून पहिली आहे. आता मी ही पोस्ट जास्त रिलेट करू शकते म्हणून कमेंट लिहायला आले आणि लक्षात आलं की अजून इथे मैत्रीदिन आहे :) Happy Friendship day Joe ;)

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...