Friday, June 28, 2024

स्वीडन, वॉलंडर आणि मॅन्केल

माझ्या इंग्रजी (फिक्शन) वाचनाचा प्रवास आजवर (काही मोजके अपवाद वगळता), साधारणतः एखादी सिरीज/चित्रपट बघून तो आवडल्यास, तो चित्रपट अथवा सिरीज ज्या पुस्तकावर आधारित आहे ते पुस्तक आणि त्यानंतर त्या लेखकाची अन्य पुस्तकं मिळवून वाचणं अशा प्रकारे होत आलेला आहे. मात्र नुकताच हा क्रम उलट्या दिशेने घडण्यासाठी निमित्त ठरेल अशी एक घटना घडली. एका इंग्रजी पुस्तकांच्या समूहात एका वाचकाने त्याने २०२३ मध्ये वाचलेल्या निवडक पुस्तकांची छायाचित्रं टाकली होती. सगळी पुस्तकं रहस्य, थरार, गुन्हेगारी या माझ्याही आवडत्या जॉनरमधलीच होती. जॉन ग्रिशम, ली चाईल्ड, मायकल कॉनली, डॅन ब्राऊन, डेव्हिड बालडाची, जेम्स पॅटर्सन या नेहमीच्या यशस्वी कलाकारांची मांदियाळी तिथे जमली होती. मात्र त्यात एका वेगळ्या लेखकाने माझं लक्ष वेधून घेतलं. त्याचं नाव होतं हेनिंग मॅन्केल (Henning Mankell) आणि पुस्तकाचं नाव होतं 'फेसलेस किलर्स' (Faceless Killers). लेखकाच्या नावावरून हा आपला नेहमीचा अमेरिकन, ब्रिटिश लेखक नाही हे लक्षात येत होतं. थोडी शोधाशोध केल्यावर मॅन्केल साहेब स्वीडनमधल्या आघाडीच्या ज्येष्ठ लेखकांपैकी एक असून त्यांनी त्यांचा मानसपुत्र असलेला स्वीडिश पोलीस इन्स्पेक्टर कर्ट वॉलंडर (Kurt Wallander) या पात्राला केंद्रस्थानी ठेवून साधारण १२ पुस्तकं लिहिली असल्याची माहिती मिळाली. त्यातलं पहिलं पुस्तक, अर्थात ज्यात कर्ट वॉलंडर हे पात्र पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीस येतं ते पुस्तक म्हणजे फेसलेस किलर्स असून ते मॅन्केल यांनी ३३ वर्षांपूर्वी अर्थात १९९१ साली लिहिलं असल्याचंही समजलं.

कुतूहल म्हणून मी फेसलेस किलर्स वाचायला सुरुवात केली. निदान पहिलं प्रकरण वाचून बघून पुस्तक कसं आहे, वर्णनं कशी आहेत याचा काहीतरी अंदाज बांधू असा विचार केला. पण झालं उलटच! पहिलं प्रकरण तर दहा मिनिटांत संपलंच पण आपोआपच दुसरं प्रकरण वाचायला सुरुवात झाली होती. त्यादिवशी रात्री उशिरापर्यंत जागून तीन प्रकरणं संपवली आणि मॅन्केलची शैली, वर्णनं, त्याने वॉलंडरचं पात्र ज्या खुबीने रंगवलं होतं ते पाहून थक्कच होऊन गेलो.

आपल्याला नेहमीच्या सवयीच्या असणाऱ्या न्यूयॉर्क, लॉस अँजल्स, शिकागो, लंडन, वगैरे ठिकाणांच्या वर्णनांच्या ऐवजी स्वीडन मधल्या स्केन (Skane/Scania) काऊंटीतल्या यस्टाड (Ystad) शहराच्य्या  पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेलं एक दुर्गम गाव, तिथलं राहणीमान, तिथले शेतकरी इत्यादींची मी यापूर्वी कधीच न वाचलेली वर्णनं होती. गावातल्या एका वयोवृद्ध एका शेतकऱ्याचा आणि त्याच्या पत्नीचा अतिशय अमानुषपणे खून करण्यात येतो आणि तिथे आपला नायक वॉलंडर जाऊन पोचतो आणि तपासाला सुरुवात करतो. शेतकऱ्याच्या पत्नीने मृत्यूपूर्वी 'फॉरेन' अशा अर्थाचा काहीतरी शब्द उच्चारला असल्याचं त्याच्या शेजाऱ्यांकडून कळल्यावर वॉलंडर त्याही दिशेने तपास करायला सुरुवात करतो. खूप तपास करून, शोधाशोध करूनही सगळीकडे नन्नाचा पाढा असल्याने वॉलंडर आणि त्याचे सहकारी अक्षरशः हतबल होऊन जातात. दरम्यान एका निर्वासित व्यक्तीचा खून होतो आणि रहस्य अधिकच गहिरं होत जातं.

बरीच सव्यापसव्य करत, अपयशं पचवत, धक्के खात वॉलंडर आणि त्याचे सहकारी काही निष्कर्षांपर्यंत पोचतात आणि पुढचा प्रवास त्या दिशेने सुरु करतात आणि अखेरीस महत्प्रयासाने आणि भरपूर उलथापालथ झाल्यानंतर अतिशय धक्कादायकरीत्या तिन्ही खुन्यांपर्यंत पोचण्यात यशस्वी ठरतात. या प्रवासादरम्यान स्वीडन देश, तिथलं ग्रामीण आणि शहरी जनजीवन, सरकारी कारभार, सुसंपन्न आणि प्रगत असलेला पश्चिम युरोप आणि तुलनेने मागास असा पूर्व युरोप, तिथल्या निर्वासितांचे प्रश्न, त्यातून जन्माला आलेली गुन्हेगारी या सगळ्याची इत्यंभूत माहिती वाचकाला मिळत जाते. वॉलंडरचं साधं परंतु चौकस व्यक्तिमत्व, त्याचे त्याच्या कुटुंबाशी, सहकाऱ्यांशी, वरिष्ठांशी असणारे संबंध, नात्यांमधली ओढाताण, त्याच्या तपासाची शैली, एखाद्या गोष्टीचा अखेरपर्यंत पाठपुरावा करत राहण्याचा हट्टीपणा या सगळ्याचं अतिशय प्रवाही असं वर्णन करण्यात लेखक हेनिंग मॅन्केल अतिशय यशस्वी ठरला आहे.

इतका यशस्वी की पहिलं पुस्तक काही दिवसांत संपताच वॉलंडर मालिकेतलं पुढचं पुस्तक अर्थात डॉग्ज ऑफ रीगा (The Dogs of Riga) आपसूकपणेच सुरु केलं गेलं. दुसऱ्या पुस्तकात स्वीडनशी सागरी हद्द शेअर करणारा शेजारी देश अर्थात लाटविया (Latvia, ज्याच्या राजधानीचं नाव रीगा आहे) देशातलंअस्थिर जीवन, हुकूमशाही सदृश परिस्थिती इत्यादी आपण आजवर कधीही न वाचलेल्या गोष्टींशी आपली ओळख करून दिली जाते. पुस्तकाच्या सुरुवातीलाच अतिशय छळ करून ठार मारण्यात आलेल्या दोन व्यक्तींची प्रेतं एका नावेतून स्वीडनच्या सागरी हद्दीत प्रवेश करतात. अर्थातच आपल्या नायकाला तपास करण्यासाठी नियुक्त केलं जातं. दोन्ही मृत व्यक्ती लाटवियाचे नागरिक असून लाटवियामधील गुन्हेगारी टोळ्यांशी त्यांचे संबंध असून लाटवियामधला एक पोलीस अधिकारी अधिक तपासासाठी स्वीडनमध्ये येणार असतो. तो काही दिवस येऊन, तपास करून परत गेल्यावर लगेच त्याचा त्याच्या देशात खून केला जातो. हे सगळं नक्की काय रहस्य आहे हे न कळल्याने लाटविया पोलिसांकडून मदत म्हणून वॉलंडरला लाटवियामध्ये पाठवण्याची विनंती केली जाते. लाटवियाला पोचल्यावर तिथलं विचित्र जनजीवन, गुन्हेगारी समाज, अंमली पदार्थ आणि त्या अनुषंगाने पोखरली गेलेली नोकरशाही आणि सरकार बघून वॉलंडरला अक्षरशः धक्काच बसतो. काही काळाने वॉलंडर आपल्या नेहमीच्या शैलीने याही खुन्यांचा शोध लावण्यात यशस्वी होतो.

तिसऱ्या पुस्तकात तर एका गुन्ह्याच्या शोधासाठी वॉलंडरला आफ्रिकेत पाठवण्यात आलं असून तिथे योगायोगानेच त्याला नेल्सन मंडेलांच्या खुनाच्या कटाचा सुगावा लागतो अशी साधारण कथा आहे. तिसरं पुस्तक मी अजून सुरु केलं नाहीये पण लवकरच करेन. मॅन्केलच्या कादंबऱ्या या एका अर्थी थोड्या ताणलेल्या दीर्घकथा आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

त्याच्या या वैशिष्ट्यामुळेच त्याच्या पुस्तकांवर आधारित वॉलंडर नावाच्या मालिकेची निर्मिती स्वीडिश आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये करण्यात आली आहे. ब्रिटिश मालिका बीबीसी वर असून साधारण दीड तासाचा एक भाग असून तो वॉलंडरच्या एकेका पुस्तकावर आधारलेला आहे. इंग्रजी मालिकेत वॉलंडरचं पात्र Kenneth Branagh या अभिनेत्याने साकारलं असून अगाथा ख्रिस्तीच्या 'मर्डर ऑन द ओरियंट एक्स्प्रेस' या २०१७ साली प्रकाशित झालेल्या चित्रपटात Branagh ने सुप्रसिद्ध गुप्तहेर हर्क्युल पॉरो (Hercule Poirot) याची भूमिका केली होती.

नेहमीची, टिपिकल शहरी, चकचकीत अमेरिकन वर्णनं वाचून कंटाळा आला असेल, युरोपातलं राजकारण, समाजजीवन याची थोडीफार आवड असेल तर वॉलंडरच्या तपासविश्वात आवर्जून प्रवेश करून बघाच. काहीतरी वेगळं वाचल्याचा आनंद नक्की मिळेल. आणि अर्थातच ज्यांना पुस्तकं वाचायची इच्छा/वेळ नसेल ते थेट मालिका तर बघू शकतातच. जय वॉलंडर, जय मॅन्केल, जय स्वीडन!!!


--हेरंब ओक

No comments:

Post a Comment

गुन्हेगारी साहित्यविश्वाचा विक्रमादित्य सम्राट : मायकल कॉनली

२०११ मध्ये ' द लिंकन लॉयर ' नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट बघायचा ठरवत असतानाच चित्रपट ज्या पुस्तकावर आधारित आहे ते पुस्त...