न्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये

अनुभव मांडणं महत्त्वाचं..

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
मराठी ब्लॉगरांचा - किंवा हेरंब ओक यांच्या शब्दांत ‘ब्लॉगु-ब्लॉगिनींचा’ मेळावा दादरला पाच जूनच्या रविवारी होऊन गेला. त्याबद्दल ब्लॉगांवर काही लिहिलं जाईल, अशा अपेक्षेनं गेल्या दोन रविवारी काही लिहिलं नाही, पण आता मात्र थांबण्यात अर्थ नाही..
मराठी ब्लॉगरांचा - किंवा हेरंब ओक यांच्या शब्दांत ‘ब्लॉगु-ब्लॉगिनींचा’ मेळावा दादरला पाच जूनच्या रविवारी होऊन गेला. त्याबद्दल ब्लॉगांवर काही लिहिलं जाईल, अशा अपेक्षेनं गेल्या दोन रविवारी काही लिहिलं नाही, पण आता मात्र थांबण्यात अर्थ नाही.. पाच जूनच्या त्या आठवणी नंतर वाचायला जून वाटतील! दादरच्या मेळाव्याचं हे दुसरं वर्ष होतं. मे 2010 मध्ये झालेल्या पहिल्या मेळाव्यात, एकमेकांच्या ओळखी करून घेण्याचंच अप्रूप होतं. त्यानंतर होणा-या यंदाच्या मेळाव्याची माहिती ब्लॉगवरून देताना अपर्णा  ( http://majhiyamana.blogspot.com/) यांनी 30 मे 2011 रोजी जुन्या आठवणीही काढल्यात- ‘‘या मेळाव्यामुळे कित्येक चेहरे आजवर फक्त ब्लॉगमुळे माहीत होते त्यांच्याशी ओळख झाली. इतरही चर्चा तिथे झाल्या आणि ब्लॉगिंगविषयी जास्त माहिती मिळाली’’ असं ‘जय हो ब्लॉगिंग’ या पोस्टमध्ये त्या म्हणतात. सुहास झेले ( http://suhasonline.wordpress.com/2010/05/10 ) हे गेल्या वर्षी कार्यकर्ते म्हणून, तर यंदा आयोजक म्हणून या मेळाव्यांत सहभागी होते. त्यांनी गेल्या वर्षीच त्या मेळाव्याबद्दल जी नोंद केलीय तिच्यातला आत्ता वाचनीय ठरणारा भाग असा..
 
‘‘आत शिरताच आप, साबा, भामुं, श्रीमंत, कांचन ताई, अपर्णा, आर्यन (सोनाली) गप्पा मारत उभे होते. मग भेटी झाल्या. हळूहळू सगळेजण येऊ लागले. मी आणि सचिन त्यांची नाव पडताळून त्यांना बॅच देत होतो. एक उत्साह होता सगळ्यांच्या चेह-यावर. सगळ्यात आधी त्याची ओळख आम्हालाच होत होती आणि आम्ही अरे तू काय झकास लिहितोस / अरे या काका/ काकू.. असं स्वागत करू लागलो. ट्रेनचा गोंधळ असल्याने कार्यक्रम 30 मिनिटे उशिरा सुरू झाला आणि कांचन ताईने माइक चा ताबा घेऊन छोटं प्रास्ताविक केलं. मग सगळे ब्लॉगर्स एक एक करून आपली थोडक्यात ओळख करून देऊ लागले’’.
 
या लिखाणातली आपुलकी जाणवल्याशिवाय राहात नाही. मेळाव्याचे पहिल्या वर्षीपासूनचे आयोजक महेंद्र कुलकर्णी यांनी गेल्या वेळी ओळख करून घेण्याचा उत्साह अधिक होता आणि यंदा ओळखी घट्ट झालेल्या आहेत, असा मुद्दा त्यांच्या ‘काय वाट्टेल ते’ या ब्लॉगवर (दुस-या मेळाव्याबद्दलच्या पोस्टमध्ये) मांडला आहे, तो वाचताना सुहास, अपर्णा यांच्या नोंदींची आठवण येतेच.
 यंदाच्या मेळाव्यात काय झालं, याचा छोटेखानी अहवाल श्रेया यांनी ‘माझीमराठी’ (http://majhimarathi.wordpress.com/2011/06/06 ) या ब्लॉगवर ठेवला आहे. पोस्टचं नाव ‘मराठी ब्लॉगर्स मेळावा- 2011’ इतकंच असल्यानं हा अहवाल आहे, मुद्देसूदपणे कुणीतरी माहिती लिहायलाच हवी होती ते काम श्रेया यांनी संवेदनशीलतेनं केलंय, याबद्दल बरं वाटतं. ब्लॉग-कॉपीराइटचा आदरच ‘ब्लॉगार्क’ हे सदर करत असल्यानं एकाच ब्लॉगवरल्या एकाच नोंदीमधला 30 टक्क्यांहून अधिक मजकूर जसाच्यातसा ‘प्रहार’मध्ये उद्धृत करू नये, असा शिरस्ता एरवी पाळला जातो. मात्र इथे श्रेया यांनी शब्दांत टिपलेला मेळावा कसा होता, हे सांगण्यासाठी ‘ब्लॉगार्क’च्या नियमाला अपवाद केला जाणार आहे. मेळाव्याला ‘‘मिडीयावाल्यांची गरज नव्हती. कारण वेगवेगळ्या माध्यमांद्वारे ब्लॉगर्सच्या लिखाणाची दखल मिडीया घेत असतंच.’’ असं त्यांनी म्हटलं असल्यानं, ब्लॉगार्कच्या माध्यमाद्वारे मेळाव्याची दखल घेणं त्यांना नापसंत असणार नाही, असं गृहीत धरता येईल.
श्रेया यांच्या अहवालातला काही भाग असा :
 
‘‘बहुतेकांचे ब्लॉग आधीच माहीत असल्याने प्रत्येकाने आपल्या ब्लॉगची ओळख थोडक्यात करून दिली. लीना मेहेंदळे यांनी एक महत्वाचा मुद्दा असा मांडला की, प्रत्येक ब्लॉगरने आपला एक फोटो आणि ईमेल आयडी आपल्या ब्लॉगवर अवश्य लावावा ज्यामुळे आपण कोणाचा ब्लॉग वाचतो आहोत हे कळेल आणि त्या व्यक्तिशी खाजगी संपर्क करायचा झाल्यास ईमेल द्वारे करता येईल. 2010 च्या ‘स्टार माझा’च्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या त्या एक परीक्षक असल्याने त्यांची ही सूचना निश्चितच उपयुक्त आहे असे मला वाटते. आलेली सगळीच मंडळी काही ब्लॉगर्स नव्हती. खास गोव्याहून हेमंत दाभोळकर म्हणून एक वाचक आले होते. त्यांनी त्यांच्या अपघाताच्या काळात बरेचसे मराठी ब्लॉग्स वाचले आणि तो एक मोठा विरंगुळा त्यांना त्या काळात होता असे नमूद केले. सुनील सामंत, सुभाष इनामदार यांच्यासारखे प्रकाशन माध्यमाशी निगडीत असणारे ब्लॉगर्स देखील इथे उपस्थित होते. नेटभेटच्या सलील चौधरींनी; ब्लॉगर्सच्या मदतीकरता नेटभेट नावाने सुरू केलेल्या ब्लॉगला आता वेब डिझायिनग,ई कॉमर्ससारखी फळे लागल्याचे सांगितल्यावर एका मराठी माणसाचा या क्षेत्रात बसलेला जम पाहून अभिमान वाटला.’’
 
दुस-या सत्रात ब्लॉगरांचे कॉपीराइट आणि अन्य कायद्यांची चर्चा झाली, तेव्हा कायदेतज्ज्ञ राजीव फलटणकर यांनी ब्लॉगर्सना वेळोवेळी आवश्यक ती मदत विनामूल्य करण्याचे मान्य केल्याचं श्रेया लिहितात. सुभाष इनामदारांनी मराठी ब्लॉगर्सचा एखादा संघ स्थापून सध्या अस्तित्वात असलेल्या ब्लॉग्जना क्रमवारी देण्याचा मानस व्यक्त केला, असा उल्लेख श्रेया यांनी केला आहेच, शिवाय, ‘‘‘एकाच ठराविक विषयावरचे ब्लॉग्ज फारच कमी असतात. अशा वेळी त्यांना कोणत्या क्रमवारीत स्थान द्यायचे ? ते योग्य की अयोग्य हे कोण ठरवणार ?’ असे काही मुद्दे विशाल रणदिवे यांनी उपस्थित केले आणि ही गोष्ट अशक्य असल्याचे म्हटले.’’ हा चर्चेतला तपशीलही दिला आहे.
 
‘‘लीना मेहेंदळे यांनी याचसंदर्भात. ‘अजूनही बहुतेक ब्लॉग्जवर प्रेमकविता, प्रेमकथा यांनाच स्थान दिलं जातं. वेगळ्या विषयावरचं काही लिहिलं जात नाही’, अशी खंत व्यक्त केली.’’ असं श्रेया आवर्जून लिहितात, पण -
 
‘‘रामदास यांनी मात्र.. ‘या मेळाव्याला चळवळ असे म्हणू नये. काळाच्या ओघात जे काही टिकून रहायचे ते राहिलंच असे सांगून; गेल्या तीन वर्षातल्या काही दिवाळी अंकांनी त्यांच्या अंकाकरता घेतलेले साहित्य हे ब्लॉ्गर्सचे होते’ हे निदर्शनास आणून दिले.’’
 
‘‘देवकाकांनी ‘‘बझ ग्रुप’च्या मदतीने निर्मिलेल्या ‘जालरंग प्रकाशना’चा आणि त्यायोगे प्रकाशित केलेल्या ई अंकांचा उल्लेख करून ‘केवळ लिखित साहित्य हेच साहित्य न धरता.. लिहिता न येणा-यांनी. आपले अनुभव ध्वनीमुद्रित/ध्वनीचित्रमुद्रित करून मांडले तरी देखील ती साहित्य सेवाच होईल’ असा दिलासा दिला.’’ ही त्यापुढली चर्चा सकारात्मक ठरते.
 
विशेषत: प्रमोद देव (देवकाका) यांची सूचना मननीय आहे. ब-याच ब्लॉगरना ‘काय लिहू?’ असा प्रश्न पडतो - काहीजण हा प्रश्न पडल्याची कबुलीच देतात, काही ब्लॉग महिनोन्महिने निष्क्रिय झाल्यानं हा प्रश्नच अधोरेखित होतो. त्यापेक्षा तुमच्याकडे सांगण्यासारखे- लोकांपर्यंत जावेत असे अनुभव आहेत की नाही? असल्यास ते ‘लिहिले’च पाहिजेत असं कुठेय, हा मुद्दा देव यांनी मांडला असावा, असं श्रेयाचं लिखाण वाचून वाटू लागलं.
 
सांगण्याजोगा अनुभव आणि ते सांगण्यासाठीचा लेखकीय ‘प्रेझेन्स ऑफ माइंड’ यांमुळे वाचनीय ब्लॉग लिहिणा-या हेरंब ओकचंच http://www.harkatnay.com/2011/06/blog-post.html)  उदाहरण पाहा : न्यूजर्सीत राहिल्यानं मेळावा मिस करणा-या हेरंबकडे .. भारतात आणि मेळाव्यालाही जाण्यासाठी निघता-निघता रोहन (चौधरी?) त्याच्याकडे एक रात्र राहून गेला, तेवढय़ा भेटीचा वृतान्त रोहननं ‘मराठी ब्लॉगर्स मेळावा- न्यूजर्सी शाखा’ अशा नावाच्या नोंदीत दिला आहे! वाचता-वाचता कळतंच की, हा मेळावा वगैरे काही नव्हता- दोन ब्लॉगर मित्र भेटले, इतकंच. ऊनोक्ती आणि अतिशयोक्ती (न्यूजर्सी शाखा वगैरे) हे दोन्ही अलंकार या पोस्टमध्ये दिसतात, नाही दिसले तरी लिखाण आवडतंच.
 
असो. कुणा एकाच्या स्तुतीसाठी हे लिखाण नाही. सर्वजण मिळून काही करताहेत, याचं कौतुक आहे आणि न आलेले अनेक जण यात सहभागी आहेतच. दादरच्या दुस-या मेळाव्याच्या निमित्तानं एक गोष्ट फारच चांगली झाली ती म्हणजे ‘मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्या’चा सर्वसमावेशक ब्लॉग सुरू झाला! (http://marathibloggersmeet.blogspot.com/ ) सर्वसमावेशक ब्लॉग? म्हणजे? .. ही प्रस्तावना जशीच्यातशी वाचा :
 
मराठी ब्लॉगर्स केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात व भारताबाहेरही आहेत. 2010 साली पुणे व मुंबई येथे दोन ब्लॉगर्स मेळावे झाले, त्यानंतर महाराष्ट्रातील इतर शहरांमधेही ब्लॉगर्स मेळावे भरवले जावेत, अशा आशयाचे प्रस्ताव येऊ लागले. भविष्यात महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात व भारतातील प्रत्येक राज्यात मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा आयोजित केला जाऊ शकतो, या गोष्टीची जाणीव ठेवून हा ब्लॉग बनवला आहे. जेणेकरून सर्व शहरातील मराठी ब्लॉगर्स मेळाव्याची माहिती एकाच ठिकाणी संकलित होईल व इतर शहरांतील ब्लॉगर्सनाही त्याची इत्यंभूत माहिती मिळू शकेल. ब्लॉग मेळाव्याच्या आयोजकांना या ब्लॉगचे व्यवस्थापक म्हणून त्या-त्या वर्षी काम पाहता येईल. यापूर्वी भरलेल्या दोन ब्लॉगर्स मेळाव्यांची सचित्र महिती काही दिवसांतच संकलित करून इथे प्रकाशित करण्यात येईल.
ते काही दिवस कधी उलटणार, याची वाट पाहणंच आपल्या हाती आहे. तूर्तास या मजकुरासोबतचा फोटो सुहास झेले यांनी पिकासावर टाकला होता, तो इथं ढापलाय.. अगदी ‘आतल्यासहित माणूस’कार नीरजा पटवर्धन म्हणतात त्याप्रमाणे, ब्लॉगरांनाही आपण कुणाचा तरी फोटो उचलून कॉपीराइटचा अवमान करतोच आहोत याची कल्पना नसते, तसंच! 

http://www.prahaar.in/collag/43778.html
http://www.harkatnay.com/2011/06/blog-post.html

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...